Feb 22, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग चौतीस (अंतिम )

Read Later
अलवार प्रेम... भाग चौतीस (अंतिम )

 

अलवार प्रेम...भाग चौतीस(अंतिम )

विषय =प्रेमकथा 

मागील भागात आपण पाहिलं...


आबासाहेब काहीच बोलत नाही. ऋचा त्यांच्या मनाने सगळं होऊ द्या म्हणते. सुरेश तिला समजवायला जातात तेव्हा त्यांना ती सगळं सांगते, आबासाहेब सगळं ऐकून काहीतरी ठरवतात आणि वेदच्या घरी जातात...वेद सांगतो की नकार असेल तरी त्याला मान्य आहे. कारण मुलीवर पहिला हक्क बापाचा असतो आणि बाप कधीच मुलीचं वाईट करणार नाही.


आता पुढे...

सगळे उठून जायला लागतात. नाश्त्याच्या प्लेट घेवून येणारा नोकर तसाच उभा राहतो. ते दाराबाहेर निघतात आणि वेद हताश होऊन सोफ्यावर बसतो.
"आयुष्यात पहिल्यांदा तुझ्यासाठी काही करायचा प्रयत्न केला आणि इथेही मी हरलो पोरा." म्हणत दादासाहेबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
"पण तुझा मुलगा जिंकला ना दाद्या..." आवाजासरशी वेद आणि दादासाहेबांनी पलटून बघितलं, आबासाहेब दोन्ही हात पसरुन उभे होते. दादासाहेबांनी जाऊन त्यांना घट्ट मिठी मारली. दोन मित्र कितीतरी वर्षांनी असे कडकडून भेटले होते. रश्मी आत नोकराला सूचना देऊन बाहेर आल्या आणि समोरचं दृश्य बघून त्यांनी तोंडात बोटे घातली. शिव मोठा मिठाईचा बॉक्स घेवून आत आला आणि बाकी सगळेही आले. अनिलने एक पेढा वेदला चारला.
"घ्या वेद देशपांडे, आजपासून तुम्ही देशमुखांचे जावई झालात."
मागून कांता, मेघा, उमा आणि मनूही आत आले. सगळे वेदला बकरा बनवलं म्हणून हसत होते.

ऋचा अस्वस्थ होऊन खाली आली. घरात कुणीच नव्हतं. तिने कौशीला विचारलं,

" ते नकार द्यायला गेलेत? " ती तशीच वर आली. 'शेवटी नकारच गेला, मीच चूक होते, दोन घरं जुळू शकतं नाही माहिती असूनही उगाच गुंतले.'

वेदच्या घरी मात्र मस्त धमाल सुरु होती. आता वेळ होती ऋचाला सरप्राईझ द्यायची. ते सगळे ऋचाच्या घरी आले. मेघा एकटीच ऋचाच्या रुममध्ये गेली. तिला बघून ऋचा म्हणाली,
"देऊन आलात नकार? पण एक कळलं नाही नकार द्यायला सगळे का गेलात?"
"कारण नकारासोबतच तुम्हाला खुश करायचं होतं आम्हाला."
"सोड गं वहिनी, आता उगाच बालिशपणा नको." ऋचा वैतागून म्हणाली आणि तिने मेघाकडे पाठ फिरवली. तिला डोळ्यातलं पाणी कुणाला दाखवायचं नव्हतं.
"बालिशपणा काय ते नाही बघणार?" त्या आवाजाने ऋचा दचकली आणि तिने फिरुन बघितलं, वेद तिच्यासमोर उभा होता.
आता हा इथे कसा म्हणून ती विचारात पडली तोच वेद एकेक पाऊल पुढे सरकायला लागला ऋचा एकेक पाऊल मागे सरकत होती. ती भिंतीला टेकली तसं ऋचा डोळे गच्च मिटून म्हणाली,
"हे बघा वेद तुम्ही खूप साहस करता हे माहिती आहे मला. आताही तुम्ही गॅलरीतून आला असाल उडत पण मी आबांच्या शब्दाबाहेर नाही. आधीच दहा वर्ष त्यांनी खूप भोगलंय माझ्यामुळे."
ऋचा नॉनस्टॉप बोलत होती, डोळ्यातून पाण्याचा थेंब बाहेर पडला आणि वेदने तो बोटाने टिपला, तसा एक जोरात खोकण्याचा आवाज आला.
"तुम्हाला एकांत मिळालेला नाहीये, आम्ही सगळे आहोत इथे." सुनिल म्हणाला तसं ती लगेच बाजूला झाली आणि उमा, मेघा सोबत आत येत ओरडल्या,
"कसं वाटलं सरप्राईझ?" ऋचाने बघितलं, तर सगळे तिला चिडवत होते आणि वेद गालात हसत होता. ते बघून तिने सरळ वेदला घट्ट मिठी मारली तसं वेद अवघडून तिला बाजूला करत हळूच तिच्या कानात पुटपुटला "भानावर ये वेडे, काय करतेयस? सगळे आहेत इथे."

"जातोय की आम्ही." म्हणत उमा, शिव, मेघा अनिल आणि सुनिल सगळे खाली गेले. तसं मिठी घट्ट करत वेदने ऋचाच्या मानेवर आपले ओठ टेकवले.
"सगळं कसं स्वप्नासारखं वाटतंय, एक क्षण तर मला वाटलं की, मी तुला कायमचं गमावतो की काय?" वेद भावुक होऊन म्हणाला.
"मला तर वाटत होतं की, मीच मूर्ख, सगळं माहिती असून तुमच्या प्रेमात पडले." ऋचा बाजूला होत म्हणाली.
"आता जवळ आलीच आहेस तर दूर नको ना जाऊस, नाहीतर भलतं साहस करेल मी." म्हणत वेदने तिच्या ओठांवर बोटं फिरवलं.

तिचं सर्वांग शहारलं, अंगावर रोमांच उठले आणि तिने लाजून त्याच्या कुशीत चेहरा लपवला.
बाहेर अचानक जोराचा पाऊस सुरु झालाय आणि वेद तिच्या कानात हळूच पुटपुटला.

"अलवार हृदयाची स्पंदन
अलवार पावसाची सर
अलवार वाऱ्याची झुळूक
अलवार ओझरता स्पर्श
अलवार तुझी मिठी आणि
अलवार फुललं तुझ माझं प्रेम..."

"वेद एक विचारु? " ऋचा बाजूला होत म्हणाली.
"आपल्या दोन घरात असं असताना तुम्हाला खात्री कशी होती माझ्या होकाराची आणि दोन्ही घरं जुळण्याची? "

एक दीर्घ श्वास घेत वेद बेडवर बसला.
"खात्री नव्हतीच पण पहिल्याच नजरेत बघितली तुझ्या डोळ्यातली भिती, पावसाचा तिरस्कार करणारी व्यक्ती मला अजिबात आवडतं नाही, त्यामुळे तूही आवडली असं नाही म्हणणार. एक माणुसकी म्हणून मी तुला घेवून आलो, पण पाण्यात लटपटणारी तू बघून काळजात धस्स झालं, बसं तेव्हाच मनाने कबूल केलं मी प्रेमात पडलोय. तुझं खिडकीत येणं. तुझीही अधीरता दाखवत होतं म्हणून... पण सॉरी मी तुला पाण्यात..."
"मला आता त्याची भिती वाटत नाही वेद." ऋचा ठामपणे म्हणाली.
"चल आता खाली जाऊया असं बरं दिसत नाही. लवकरच मुहूर्त काढून तुला घेवून जाणार, मग तू आणि मी... " म्हणत त्याने तिला धक्का दिला. तसं ऋचा लाजून खाली पळाली.
ती खाली पोहोचताच रश्मीने कानाजवळ बोटे मोडून तिची नजर काढली आणि एक बॉक्स तिच्या हातात दिला.

तिने उघडून बघितलं त्यात एक सुरेख साडी होती. तिने रश्मीकडे बघितलं तसं रश्मी म्हणाल्या,
"वेदची इच्छा आहे की,आजच साखरपुडा उरकूया आणि दिवाळीत लग्न."
"चला दोघेही जोडीने गणपतीच्या पाया पडा." कांता मागून येणाऱ्या वेदकडे बघत म्हणाल्या.

दोघांच्या प्रेमाने दोन्ही घरे जुळली होती आणि दोन्ही घरचा आनंद द्विगुणित झाला होता. वरवर तुटलेली पण मनात जुळलेली नाती पुन्हा फुलली होती.

अलवार प्रेम हे
नकळत जुळले
सोबतीने सारे
फासेही वळले

तू मला मी तुला
नजरेने टिपू लागलो
नाही कळले कधी
का कसे गुंतू लागलो

दोन घरे जुळली
आपल्या या प्रेमाने
सुरुवात करुया
आता नवपर्वाने...
समाप्त.

 

 

कशी वाटली कथा नक्की सांगा.

 

©®पल्लवी चरपे

टीम =अहमदनगर.

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//