Feb 27, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग तेरा

Read Later
अलवार प्रेम... भाग तेरा

अलवार प्रेम... भाग तेरा

विषय =प्रेमकथा

मागील भागात आपण बघितलं...

ऋचाला एकटीला वर कंटाळा आला आणि ती खाली गेली. तिच्या लहानपणाचे किस्से सांगत सगळ्यात मिसळली फक्त्त आबासाहेब नव्हते घरी...

आता पुढे...वेदने गाडी काढली आणि सरळ शिवकडे गेला. शिव मनूला झोपवायच्या तयारीत होता.
"शिव आज रात्री हॉस्पिटलला थांब मी मनूला घेऊन घरी जातो. काय मनू येणार ना काकांसोबत?" वेद दारात शिवच्या मागे आलेल्या मनूला म्हणाला.
"हो मज्जा मज्जा, वेद काका सोबत जायला मिळणार." मनू नाचत म्हणाला.
"आजा मेरे शेर." म्हणत त्याने मनूला गाडीवर बसवले.
मनूने त्याच्या आईबाबाला आनंदाने टाटा केला.
"चला भेटू सकाळी." म्हणत वेदने गाडीला किक मारली.
शिव आणि उमा त्याला बाय करत होते.

मनू आईबाबापेक्षाही वेदच्या अंगावरचा होता. तो पोटात असल्यापासून ते आतापर्यंत नेहमीच वेदने त्याची खूप काळजी घेतली होती.

उमाची आजी गेली, तेव्हा उमा बारावीत होती. आजी तिचा एकटाच आधार होता. आबासाहेबांनी तिला पुढे शिकवायची तयारी दाखवली आणि ती माधवकाकाच्या शहरात होस्टेलवर राहून नर्सिंग करायला लागली.

शिव आणि वेद दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकले, त्यानंतर वेद गावात येणार होता. दादासाहेब त्याला हॉस्पिटल काढून देणार होते. शिवला कुठेतरी नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याच्या घरी बेताचीच परिस्थिती होती. तो स्कॉलरशिपवर शिकलेला. वेद त्याला मदतीला म्हणून सोबत घेवून आला, कारण भोवतालच्या गावात एकच हॉस्पिटल असूनही आबासाहेबांच्या गटाचे लोक त्याच्याकडे उपचार घेत नव्हते.

एकदा गावात एक व्यक्ती अशाच घाणेरड्या राजकारणाचा बळी गेला होता. झालं असं की आबासाहेबांचा नोकर असलेल्या हरीला साप चावला. वेदला कळलं तसं वेद उपचार करायला धावला पण दादासाहेबांनी त्याला जावू दिले नाही आणि आबासाहेबांच्या लोकांनी त्याला येऊ दिले नाही. या सगळ्यात हरी मात्र हकनाक मेला.
शिवची आई आबासाहेबांकडे नोकरी करायची, त्याच्या शिक्षणाला लागणारी मदत आबासाहेब करत होते, त्यामुळे वेदने शिवला गावात आणले. हॉस्पिटलचे दोन भाग करुन टाकले की, पुन्हा असं काही झालं, तर शिवच्या मदतीने तो लोकांना वाचवू शकतो.

उमाही बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये जॉब करत होती, तिच्या लग्नाची जबाबदारी आबासाहेबांनी घेतली. शिवला आधीपासून ती आवडायची आणि एकाच गावातले असल्यामुळे त्याने तिला मागणी घातली. आबासाहेबांनी त्यांचे लग्न लावून दिले. त्यानंतर दोन वर्षातच त्याचे बाबा अचानक गेले आणि आई वेडी झाली, तिला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. आता शिवच्या घरी शिव, उमा आणि बाळ असायचे. उमा बाळाला घेवूनच हॉस्पिटलमध्ये यायची. आताआता एक शेजारची बाई मनूला सांभाळायला तयार झाली होती.
हॉस्पिटलमध्ये मनू असला की वेद आणि मनू मस्त गोंधळ घालायचे.
आता मनू तीन वर्षाचा व्हायला आला होता. त्याला स्पष्ट बोलता यायचे आणि वेद काका त्याची बडबड ऐकायचा.

वेद घराजवळ आला आणि मुद्दाम हॉर्न वाजवू लागला. त्याचे सगळे लक्ष ऋचाच्या खिडकीत होते. नोकरांना आणि घरच्यांना वाटलं की, गेट उघडायला तो हॉर्न वाजवतोय. नोकराने गेट उघडले. गाडी पार्क करतांना त्याने वर बघितलं आणि पडदा हलला.
अंधार असताना रुममधील लाईट दिसली म्हणजे ती होती तिथे. तो मनूला घेऊन धावत वर गेला. टेरेसवर मनूला बसवून नोकराला जेवण आणायला सांगितले.

मनूची बडबड ऐकत जेवण करुन झाल्यावर, त्याने प्लेट ठेवली. त्याची वहिनी येऊन मनूचा लाड करुन प्लेट घेऊन निघून गेली. त्यानंतर वेद तिथल्या आरामखुर्चीसारख्या झोपाळ्यावर मनूला अंगावर घेवून आडवा झाला.

त्याचे लक्ष खिडकीकडेच होते. ती आहे तिथे हे त्याला जाणवत होते.

का बघतेस अशी चोरुन
बघ ना एकदा मन भरुन
प्रेम कर व्यक्त तुझ्या मनातलं
जीव टाकेल तुझ्यावर वारुन...


वेद स्वतःशीच हसला. मनू त्याला बिलगून बोलता बोलता झोपला होता.


********

ऋचा बेचैन होऊन रुममध्ये बसली होती. ही तिच्या आईचीच रुम होती, तिने सकाळी एक कपाट बघितलं होतं. आता तिने दुसरं कपाट उघडलं. त्यात तिच्या आईच्या सगळ्या साड्या, आईचं सामान छान पॅक करुन ठेवलं होतं. तिची आई नेहमी मोठ्या बॉर्डर असलेल्या कॉटन साड्या घालायची. त्या सगळ्या साड्या व्यवस्थित पेपरमध्ये लपेटून पॅक केलेल्या होत्या.

'आज त्यांना भेटताच आलं नाही, काका बोलले तेव्हा वाटलं जावं आणि माफी मागावी त्यांची पण खरंच माफी मागता येईल का?
माफी मागून त्यांच्या आयुष्यातील ती दहा वर्षे परत येतील कां?'
ऋचा विचारात हरवली होती, तोच हॉर्न वाजायला लागला.

ती धावतच खिडकीत आली, हळूच डोकावून बघितलं, कौशी काकी झोपली होती. तिने हळूच पडदा बाजूला केला. तिला वेद दिसला पण सोबत छोटा मुलगा होता. असेल कुणी म्हणून तिने दुर्लक्ष केलं आणि रुममध्ये आली.
'तो त्याचा मुलगा असला तर?' विचार चमकला तसं ती पुन्हा खिडकीत आली. तिने हळूच बघितले. वेद टेरेसवर जेवत होता आणि एक मुलगा त्याच्या गोलगोल फिरत होता. काही वेळाने वेद त्या मुलाला घेवून आडवा झाला. मध्ये एक बाई येऊन त्या मुलाचा लाड करुन गेली.

'म्हणजे याचं लग्न झालंय, चोमडा मेला, एका लेकराचा बाप असूनही मुलींवर नजर ठेवतो, कसा फ्लर्ट करत होता सकाळी. हूंsss...'

तिने नाक मुरडलं आणि आत आली.

आता तिची झोप उडाली होती. त्याला बघितल्यापासून वाटतं असलेली बेचैनी आता रागात बदलली होती.
'खरंच माझंच चुकलं मी तो पडदा उघडायलाच नको होता.'

आता तो पडदा पुन्हा कधीच उघडायचा नाही ठरवून ती बेडवर आडवी झाली.

'तो मला आवडला होता का, का मला त्याला बघावं वाटतं होतं, असं आजपर्यंत तर कधी झालं नव्हतं. मी जास्तच त्याचा विचार करते आहे का? लग्न झालंय त्याचं आणि मी आठ दिवसासाठी आलीय फक्त्त.'
तिने स्वतःलाच बजावलं.


क्रमश:


ऋचा मनु ला वेद चा मुलगा समजतेय...बघू पुढे...©®पल्लवी चरपे

टीम=अहमदनगर 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//