Mar 04, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम...भाग दहा

Read Later
अलवार प्रेम...भाग दहा

अलवार प्रेम...भाग दहा.

प्रकार = प्रेमकथा मागील भागात आपण बघितलं...


ऋचा आणि वेद दोघेही वेगळ्याच ओढीने एकमेकांना चोरून बघत आहेत. ऋचाची ओढणी वेदकडे राहिलीय. ऋचा वेदच्या विचारात हरवलीय आणि काका तिच्याशी बोलायला आलेत...आता पुढे...


ऋचा काकाकडे बघत होती. काका बोलायला लागले.
"आजपर्यंत सगळे तुला त्रास होऊ नये म्हणून काहीच बोलत नव्हते पण आता तू मोठी झालीयेस, जिथलं तिथे सोडून पुढे जायला शिकायला हवंस, नाहीतर मी समजेल मी बाप म्हणून कमी पडलो आणि मीराची माया पातळ होती."
"नाही काका, तुम्ही सगळं सांगा मी ऐकेल, नक्की ऐकेल. तुमचं प्रेम कमी नव्हतं काका, काकूने तर कधी आई नसल्याची जाणीवच होऊ दिली नाही मला आणि मी वचन देते काका. सत्य काहीही असो मी स्वतःला त्रास करुन घेणार नाही." म्हणत ऋचा त्यांना बिलगली.

"मीरा लग्न होऊन आली तेव्हा ती खूप अल्लड होती. शेंडेफळ म्हणून खूप लाडावलेली. आपल्याकडे तसं सासुरवास म्हणून नव्हताच, तुझी आई आणि वहिनी तिला सांभाळून घ्यायचे. पहिल्यांदा ती प्रेग्नेंट होती तेव्हा तिला काही कळलेच नाही. तिला पपाया खूप आवडायच्या. रानातल्या पपया आणल्या होत्या घरी. अचानक बँकेत संप जाहीर झाला आणि आम्ही घरी आलो. एक सभा होती म्हणून सगळे बाहेर गेलेले,आणि उरलेले शेतात. घरी फक्त्त तू, अनिल आणि सुनील एवढीच बच्चा पार्टी घरी. कसं कोण जाणे, कोणी तिला सांगितलं नाही की पपई खायची नसते. तुम्ही पपई मागितली आणि मीराने तुम्हाला कापून दिली, तुमच्यासोबत स्वतःही खाल्ली पोटभर. दुसऱ्या दिवशी तिचा गर्भ गेला, पाच महिने पोटात वाढणारं बाळ...सगळ्यांनी तिला खूप समजावले, सावरले. काही दिवस गेले ती दुसऱ्यांदा प्रेग्नेंट होती. यावेळी खायचं प्यायचं सगळं ती विचारून करायची पण नशिबाला वेगळंच मान्य होतं. यावेळीही पाच महिन्याची प्रेग्नेंट होती. ती वर का गेली आणि कशी कोण जाणे धडपडली, सीडीवरून पाय घसरला, घरंगळत खाली आली... गर्भ गेला, डॉक्टरांनी सांगितलं यापुढे ती कधीही आई बनू शकणार नाही.

खूप तुटलो होतो मी आणि ती त्यापेक्षाही. दोन वेळा आपलं बाळ जगात येणार हा आनंद नियतीने हिरावून घेतला होता तिच्याकडून.
यावेळी आई तिला खूप बोलली. तिच्या अल्लडपणावरून, तिच्या बालिशपणावरून आणि तिच्या हलगर्जीपणावरून. तिच्या मनाला खूप लागलं ते, कुठेतरी आपणच या सगळ्याला जिम्मेदार समजून ती एकाएकी शहाणी झाली.

तुझ्या आईने, वहिनीने तिला समजून घेतलं. आमची सगळी मुले तुझीच आहेत म्हणून सांगितलं पण तिच्या मनात अपराधी भावना रुजली होती की आपण मुलांना सांभाळू शकत नाही, आपण कधीच आई होऊ शकत नाही आणि तिच्यामुळे मला बाप होण्याचं सुख मिळू शकत नाही.

मी माझं दुःख पिऊन तिला सांभाळत होतो, तुम्हा तिघांना आपलीच मुलं समजून समाधान मानत होतो. त्यानंतर ती गावी यायची, तुमच्यात रमायची आणि सतत वाट बघायची की कधी गावाला जाता येईल. छोटीशी होती तू तेव्हा तिला वाटायचं की तू तिचं प्रतिरूपचं आहेस.


तुझी आई गेली आणि डॉक्टरांनी तुला या वातावरणाच्या दूर ठेवायला सांगितलं. दादा सगळीकडून खचला होता वहिनीचं जाणं, तुझं त्याचा तिरस्कार करणं आणि पॅनिक होऊन ताप काढून झोपेत किंचाळणं.
तुझी अवस्था बघून आबांना वाटलं तुला आमच्याकडे पाठवावं."

ऋचा गंभीर होऊन ऐकत होती. काकाकाकूचं हे दुःख तिला कधी कळलंच नव्हतं. त्यांना मुलबाळ नाहीये पण का नाहीये याच्या खोलात ती कधी शिरलीच नाही. तिला पुढे काय झालं ते जाणून घ्यायचं होतं.

"मीरा आपल्या चुकीमुळे आई न होऊ शकणारी, त्यामुळे तिने तिची सगळी माया तुझ्यावर लुटली. तुला काही होऊ नये, तुला घडवण्यात ती कुठे कमी पडू नये म्हणून तुला खूप जपायची. तिला सिद्ध करायचं होतं ती तुला चांगल घडवू शकते. खूप हळवी होती तुझ्याबाबत... तिला नेहमीच वाटायचं तुला काही झालं तर सगळे तिलाच बोलतील, तिलाच नाव ठेवतील, तिला मुलंच सांभाळता येत नाही म्हणतील.
तुला पॅनिक अटॅक आला की तुझ्या उशाशी बसून राहायची. डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिला त्या जुन्या आठवणी आठवू देऊ नका, आनंदी ठेवा, तिचं मन दुसरीकडे वळवा म्हणून ती तुला लहान मुलांसारखी समजवायची, कधी पाल दाखवून, कधी सावल्या दाखवून तर कधी बाहेरचा आवाज दाखवून ती तुझं लक्ष वळवायची.
आता वाटतं तिच्या मायेच्या कोशात तू अजूनच नाजूक बनत गेली. तुझी पाण्याची भीती तशीच राहिली. आजही तुला पाण्याचा प्रवाह दिसला तर गरगरतं.
तुला घेऊन गेल्यावर मी खूष नव्हतो असं नाही, माझ्या घराला घरपण मिळालं होतं तुझ्यामुळे. माझ्या घरात एक मुलगी होती पण जेव्हा जेव्हा मी आबासाहेबांना बघायचो तेव्हा वाटायचं, कुणाची मुलगी आपली म्हणून आपली होणार नाही. त्याचा हक्क मारून मी माझं बाप होणं मिरवू शकत नाही.

आजही त्याचा हक्क मारून मी माझं बापपण मिरवतो, पण त्यावेळी त्याचा उतरलेला चेहरा नजरेतून जातच नाही आज पहिल्यांदा वेळ मिळाला तुझ्याशी बोलायला कारण आज पहिल्यांदाच झालं की तुला पॅनिक अटॅक येऊनही तू लगेच सावरली. नाहीतर अटॅक आल्यावर तीन चार दिवस तु नुसतं किंचाळायचीस.
आम्ही तुला जपत गेलो, तुझ्या मनाने सगळं घेत गेलो, तू गावात यायचं नाही म्हणालीस त्यानंतर आम्ही तुला कधी गावात ये नाही म्हणलं पण यावेळी आबासाहेबांना वाटलं. त्यांना माहीत होतं त्यांच्या म्हणण्यावर तू येणार नाहीस पण तरीही त्यांनी हिंमत केली तुझ्याशी बोलण्याची. आई-बापाविना पोर कसं राहत असेल हा विचार करुन. "


मेघा चहा घेवून आली तसं काका गप्प बसले. मेघा ऋचाचा हात हातात घेत म्हणाली,
"या घराला, या घराची मुलगी हवीय वन्स. मला एक मैत्रीण हवीय नेहमीसाठी."
तिचं वाक्य ऐकून ऋचा चमकलीच.
'तीन महिने झालेल्या सुनेला सगळं कळतंय मग मला का कळत नाहीये काही?'


तिने ठरवलं, 'आज नक्की खरं काय आहे ते सगळं कळायलाच हवं.'

क्रमश:काय मग उलगडतंय ना सगळं बरोबर?
©®पल्लवी चरपे.

टीम =अहमदनगर.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//