Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग सोळा

Read Later
अलवार प्रेम... भाग सोळा


अलवार प्रेम...भाग सोळा 
विषय = प्रेमकथा

मागील भागात आपण पाहिलं...

ऋचा न दिसल्यामुळे वेद बेचैन होता. ऋचा अनासाहेबांची माफी कशी मागावी या विचारात फिरताना तिला काहीतरी सुचतं...

आता पुढे...


ती पुर्ण हुबेहूब रेखासारखी दिसत होती. तशीच साडी, तशीच हेअरस्टाईल ते रुप म्हणजे जणू रेखाचंच प्रतिरुप होतं.
आबासाहेब एकटक बघत असले तरी त्यांच्याही नकळत त्यांच्या डोळ्यातून पाणी तरळले. डोळ्यातलं पाणी गालावर ओघळायला लागलं आणि ऋचाने धावत जाऊन त्यांना मिठी मारली.
सगळे बघतच राहिले. आबासाहेबांसारखा करारी राजकारणी आज विरघळला आणि भळाभळा वाहू लागला. इतके वर्षे डोळ्यात साठलेलं पाणी बाहेर पडत होतं, काळजाचा तुकडा मिळावा तसं काहीसं त्यांना वाटत होतं. ऋचाने खूप ठरवलं होतं की ती त्यांची माफी मागणार पण आता शब्दांची गरजच उरली नव्हती. दहा वर्ष या सुखाला दोघेही पारखे होते. सगळे तो सोहळा आनंदाने बघत होते. कांताआईने देवाजवळ हात जोडले आणि घंटी वाजवली. त्या आवाजाने सगळे भानावर आले.
अनिल ऋचाला सावरत नाक पुसत चिडवत म्हणाला,
"तू खूप वाईट आहेस आमच्या आबा काकाला रडवलंस तू."
"मी नाही, त्यांनीच रडवलं." ऋचा डोळे पुसत म्हणाली.
"बाप कधी पोरीला कसा रडवेल?" आबासाहेब डोळे पुसत ऋचाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले.
"चला आता पुजा सुरु करुया बाहेर पाहुणे खोळंबलेत." सुनीलच्या बोलण्यावर सगळ्यांनी हॊ हॊ करत बैठक मारली.

आनंदाने पुजा पार पडली, त्यानंतर आजीसमोर हात जोडताना आबा म्हणाले, "शेवटी तू आम्हाला मिळवलंच."
"हॊ ना, तिची खूप इच्छा होती ऋचाने या घरी यावं, नाही काही तर तिच्या तेरवीला तरी. जेणेकरुन तिला नजरेसमोर सत्य दिसेल." माधवकाका म्हणाले.

पुजा झाल्यावर जेवणं सुरु झाली. सगळ्यांशी बोलत चालत वेळ कशी निघून गेली कळलंही नाही. एकेक करुन नातेवाईक रवाना होत होते. ऋचा कितीतरी दिवसांनी या घरात आलीय असं कुणाला वाटतच नव्हतं. ऋचाच्या कौतुकासोबत मीराकाकूचंही कौतुक होत होतं. मुलं सांभाळताच न येणाऱ्या मीराकाकूने ऋचाला छान सांभाळलं होतं.


उमा तिला भेटली होती, पण नीट बोलता आलं नव्हतं, ऋचाच्या भोवती सतत गोतावळा होता. बराच वेळ झाल्यावर उमाने निरोप घेतला.
"अगं थांब ना अशी काय करतेस, मला खूप बोलायचंय ना तुझ्याशी, त्यात तू तुझं पिल्लुपण नाही आणलं सोबत."
"त्यासाठी निवांत भेटू गं." म्हणत उमा जायला वळली.
पुन्हा थबकली, "तू कधी येतेस सांग मी घरी राहिल त्यावेळी." उमाच्या म्हणण्यावर "उद्याचं येतेय. " म्हणत ऋचाने निरोप घेतला.


पुजेच्या वेळी घरात सगळे नातेवाईकच होते फक्त्त बाकीचे सगळे बाहेर बसले होते. या सगळ्या गोंधळात एक नजर मात्र अजून ऋचावर खिळून होती. एकेक करुन सगळे जात होते. अन्वय, ऋचाचा दूरचा आत्तेभाऊ जाताजाता मुद्दाम तिला भेटायला आला.
"घरी काही बोललोय मी, तू विचार करावास असं वाटतं. मी वाट बघेल तुझ्या उत्तराची." आणि तिला काहीच बोलू न देता निघून गेला.
ऋचा गोंधळून बघतच होती की मेघाने तिला हळूच धक्का दिला.
"काय बघताय वन्स असं?"
"अगं काय बोलून गेला तो कळलंच नाही मला, मी पहिल्यांदाच भेटलेय ना आज याला, चक्रमच दिसतोय." ऋचाच्या बोलण्यावर हसू दाबत "आहे खरा, तुम्हाला मागणी घातलीय, विकेट पडलीय त्याची आज." मेघा बोलली.
"काय?..." ऋचा जोरात ओरडली. सगळे बघायला लागले तसं खाली मान घालून, " नाही काही नाही." म्हणून वर निघून गेली.
'मूर्ख आहे मी, यासाठी बोलावलं यांनी मला, आता पुन्हा राजकारण, माझं लग्न लावणार आणि राजकारण वाढीस लावणार... सतत राजकारण. मला उगाच वाटलं सुधारलेत ते, माझीच चूक होती पण नाही तेही तसेच. सगळे पुरुष असेच असतात. स्वार्थी...तिचं लक्ष खिडकीकडे गेलं. तो एक त्यादिवशी लोचटपणा करत होता. स्वतःला मुल आहे, बायको आहे विसरुन.' तिने रागारागात साडी बदलली केस मोकळे केले आणि आपल्या नॉर्मल अवतारात धुसपुसत बेडवर बसली.

तिला सकाळपासून आबासाहेबांची माफी कशी मागावी कळतं नव्हतं, चुकून कपाटाची ठेस लागली आणि तिला आठवलं सगळे तिला म्हणायचे की, ती अगदी तिच्या आईसारखी दिसते, त्यात काकांनी तिला सांगितलं होतं की, आबासाहेबांचं खूप प्रेम होतं तिच्या आईवर म्हणूनच त्यांनी दुसरं लग्न नाही केलं. यावरुनच तिला सुचलं की, अगदी आईसारखं तयार व्हावं आणि तिने ते केलंही पण आता अन्वयचं बोलणं आणि मेघाचं सांगणं यावरुन तरी तिचं लग्न म्हणजे एक राजकारणी सोयरीक होती.
सगळं आवरुन झाल्यावर तिचे मोठेबाबा सुरेश वर आले. तिने त्यांना बसायला सांगितलं, खरंतर ते जास्त बोलतच नव्हते. ते का आले असावे या विचारात असतानाच ते म्हणाले,
"लग्नाचं काय ठरवलंय तू?"
"मी काय ठरवणार, सगळे मोठे आहेत की ठरवायला." ती चमकून म्हणाली.
"अन्वयचं स्थळ आलंय, इंजिनिअर आहे, पॅरिसला सेटल झालाय. आज तुला बघितल्यावर मागणी घातलीय त्यांनी, घाबरु नकोस सगळं तुझ्या मनानेच होणार, तुझा विचार सांग तू आम्हाला, नाहीतर मेघाशी तर बोलू शकशील ना?" सुरेश तिचे हावभाव निरखत होते.
"त्यांना काय वाटतं?" तिने विचारताच सुरेश समजले तिला काय म्हणायचं असावं ते,
"त्याच्यासाठी त्याच्या मुलीचं सुख महत्वाचं आहे आणि म्हणूनच मी आलोय बोलायला, तुझ्या मनाविरुद्ध नाही होणार काहीच." ते प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत होते.

अचानक असं काय उत्तर देणार होती ती?
"तुम्ही सर्व जे ठरवाल ते योग्यच असेल." ती खाली मान घालून म्हणाली.
"शांतपणे विचार करुन सांग काही घाई नाहीये आपल्याला."
म्हणत ते निघून गेले.

'लग्न, माझं लग्न, असं कसं करायचं, एवढ्या लवकर? पण त्यात काय मेघा एक वर्षाने लहान आहे माझ्यापेक्षा किती मजेत सांभाळतेय सगळं. मला जमेल का हे?... कसा हवा मला जोडीदार? मी कधी विचारच नाही केलाय मग मी कसं सांगू तो अन्वय... पण तो जवळ आला तेव्हा काहीच वाटलं नाही मला...' विचारात तिने डोळे मिटले.

'कसा मुलगा हवाय मला?' ती स्वतःशीच विचार करत होती आणि तिच्या बंद डोळ्यापुढे एक चेहरा आला...

वेद...


'नाही नाही, तो कसा त्याच लग्न झालंय, एक मुलगा आहे त्याला. घरचे ठरवतील तेच योग्य, माझ्या छोट्याश्या मेंदूला ताप न दिलेलाच बरा. झोपा ऋचा मॅडम मोठं झालोय आपण आता, लग्न करायचंय म्हणे आपल्याला. जाऊदे ठरवतील घरचे. मी तर उद्या सांगून देणार आणून उभा करा मी टाकेल हार, पुढचं पुढे बघू काय ते...'

ठरवून ती झोपली निवांत थकल्यामुळे वेदची झोप उडवून...


क्रमश:

आता अन्वयशी लग्न करेल का ऋचा? बघूया पुढे.

©® पल्लवी चरपे

टीम =अहमदनगर.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//