Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग सहा

Read Later
अलवार प्रेम... भाग सहा


अलवार प्रेम...भाग सहा

प्रकार-प्रेमकथा 

मागील भागात आपण पाहिलं...

ऋचा घरी आली, तिचं छान स्वागत होतं.
वर गेल्यावर ऋचाला खिडकी उघडायला मेघा नाही म्हणाली.


आता पुढे...


"माहिती नाही पण तिकडच्या खिडक्या उघडायच्या नाही आणि तिकडचे पडदे पण उघडायचे नाही म्हणतात, मला येऊन तीनच महिने झालेत ना. हे म्हणाले की, घरात काही नियम आहेत ते तोडायचे नाहीत."

मेघाने सांगितले.
"अहो पण का म्हणून तर विचारता येतं ना?"

ऋचा थोडं वैतागत म्हणाली.
"नाही, हे म्हणतात उगाच प्रतिप्रश्न करुन आबासाहेबांचा राग ओढवून घ्यायचा नाही."
मेघाच्या उत्तरावर हसावं की रडावं तेच ऋचाला कळत नव्हतं.

तेवढ्यात काशी खायला घेऊन आली.
"अहो ताई, इथून जे घर दिसतं ते कोणाचं होतं आठवतं का तुम्हाला?"
ऋचाने डोक्याला ताण दिला आणि म्हणाली.
"हो दादाकाकांच, मित्र होते ना ते बालपणीचे." तिने मुद्दाम आबासाहेबांचा उल्लेख टाळला.
"ते भूतकाळात, आता सगळंच बदललंय, आता त्या दादासाहेबांचं नावसुद्धा या घरात घेतलेलं चालत नाही." कौशी म्हणाली.

"का पण, ते तर पक्के मित्र होते ना?" ऋचाने अजून विचारलं.
"सांगितलं ना, होते एकेकाळी पण त्या जीवाभावाच्या मैत्रीला कुणाची नजर लागली तेच कळलं नाही बघा, आता दोघेही एकमेकांचे हाडवैरी आहेत, एकमेकांचे मुडदे पाडतील असे शत्रू, एकमेकांची तोंड सुद्धा बघत नाहीत म्हणून ही खिडकी आणि पडदे नेहमी बंद असतात."
कौशी बोलता बोलता रुम आवरत म्हणाली.

राजकारण म्हटलं की ऋचाचा नावडता विषय, त्यात आबासाहेब आणि राजकारण नकोच. याच राजकारणापायी आज तिची आई नव्हती. तिने विचार झटकले.
मेघाला आवाज दिला खालून तशी ती
"येते मी." म्हणत निघून गेली.
ऋचाला खूप भूक लागली होती, तिने लगेच नाश्त्याची प्लेट घेतली आणि खायला सुरुवात केली. कौशी पण
"काही लागलं तर सांगा आणि त्या खिडक्यांचं लक्षात ठेवा, मी जेवायला बोलवते तोवर पडा तुम्ही." म्हणत निघून गेली.
"हा सगळा काय प्रकार आहे? ते तिला फक्त उमा सांगू शकत होती. तिच एक होती तिच्या जिवाभावाची मैत्रीण.

पण आज कितीतरी दिवसांनी तिला भेटूनही नीट बोलता आलं नव्हतं.

आता ती रुममध्ये एकटीच होती. तिच्या रुमचं ती निरीक्षण करू लागली, तिच्या सगळ्या वस्तू तिथे सांभाळून ठेवल्या होत्या जणू. तिची लहानपणीची डोळे मिचकावणारी बाहुली, तिचा चिनीमातीचा कपसेट, तिची खेळणी भांडी, छोटा गॅस, कढई, पातेले असे छोटू छोटू भांडे. बघताना तिला लहानपणी खेळलेली भातुकली आठवली. तिची आई मस्त खाऊ बनवून द्यायची, उमा,ती, शिव आणि अजून एक कुणीतरी असे मिळून खेळायचे ते लहानपणी.
'कोण असायचा तो चौथा, शिवचा मित्र? मला आठवत का नाहीये तो चौथा आणि त्याचा चेहरा? तिने डोक्याला ताण दिला.' डोकं दुखायला लागलं तसं तिने ते विचार झटकले आणि बाजूचं बंद कपाट उघडलं. त्या कपाटात बरेच गिफ्ट बॉक्स ठेवले होते. तिला आश्चर्य वाटलं,
'हे काय असावं?' तिने एक बॉक्स उचलून बघितला. त्यावर चिट लागलेली होती तिच्या वाढदिवसाची तारीख आणि साल लिहिलेली. तिने भरभर सगळे बॉक्स बघितले. दरवर्षी तिच्या वाढदिवसाला गिफ्ट घेतलं जायचं मग दिलं का जात नव्हतं? तिने आठवण्याचा प्रयत्न केला आणि तिला आठवलं, आई गेल्यानंतर काही दिवस ती खूप घाबरलेली असायची. तिला सारखं वाटायचं तिची आई आबासाहेबांमुळे या जगात नाहीये. तिने जेव्हा कधी तो प्रसंग आठवायचा प्रयत्न केला, तेव्हा तिला खूप त्रास व्हायचा. सगळं एकदम गरगरायला लागायचं डोळ्यापुढे अंधार जाणवायचा आणि पायांना पाण्याची ओढ, जणू ती पुरातच उभी आहे असं. त्यानंतर चार पाच दिवस तरी लागायचे तिला नॉर्मल व्हायला. अश्यातच काकांकडे गेल्यावर एक दिवस आबासाहेब तिला भेटायला आले आणि ती खूप किंचाळली त्यांना दारात बघून. तिचा वाढदिवस होता त्यादिवशी. मीराकाकूंनी खूप तयारी केली होती, पण ऋचाला पॅनिक अटॅक आल्यामुळे सगळं कॅन्सल झालं. त्यानंतर आबासाहेब कधी तिच्यासमोर आलेच नव्हते.

घरचे सगळे यायचे तिला भेटून जायचे. गावात जायचं असलं की, तिला मिराकाकूच्या आईकडे ठेवून काकाकाकू जायचे. एक वर्षाआधी आजी गेली, शेवटच्या काळात सहा महिने काकांकडेच औषधपाण्यासाठी होती. ती ऋचाला नेहमी म्हणायची,
"माझ्या तेरवीला तरी गावात येशील ना?"
पण ऋचा गेलीच नाही, तिला आग्रह करुन कोणी नेत नव्हतं. काही दिवसांपूर्वी अनिलचं लग्न झालं, तिने मनाची खूप तयारी केली तरी ती आजारी पडलीच.

फक्त्त यावेळी तिच्या मनाला उभारी देत होते तिने कधी न ऐकलेले आबासाहेबांचे शब्द "तुझं घरं आणि बाप वाट बघताहेत."

बस! यासाठी तिने हिम्मत केली होती.
यावेळी आली नसती तर आयुष्यभर तिच्या मनात बोच असती, आजीची इच्छा पुर्ण करु न शकल्याची.

काकू सोबत असली की, ती बिनधास्त असायची पण यावेळी काकूला मेनॉपॉजचा त्रास होत होता, तिची अवस्था नव्हती यायची, शिवाय गावात चालत पण नव्हतं श्राद्धात असं पिरियड असताना. सगळ्यांना वाटलं होतं आता ऋचा येणार नाही म्हणून, म्हणावं तशी तयारी नव्हतीच घरी तिच्या स्वागताची. पाऊस बघून माधव काकानी तर सांगून टाकलं की,ती स्टेशनजवळ राहणाऱ्या मैत्रिणीकडे थांबेल पण पावसात येणार नाही.

ती अशीच हरवली होती आठवणीत, तेवढ्यात तिला बाईकचा आवाज आणि हॉर्न ऐकू आला. ती कुतूहलाने खिडकीजवळ आली. आजूबाजूला बघून तिने हिम्मतीने पडदा बाजूला केला. काचातून काही स्पष्ट दिसत नव्हतं. तिने हळूच खिडकी उघडली. पलीकडे रस्त्यावर वेद होता. त्याच्या घराच्या गेटबाहेर हॉर्न वाजवत इकडेतिकडे बघत, त्याची नजर एकदम वर ऋचाकडे गेली आणि अचानक तिची धडधड वाढली. तिने घाबरुन खिडकी बंद केली, पडदा नीट केला. धावतच बेडवर जाऊन बसली आणि श्वास नॉर्मल करू लागली.

'काय होतंय हे मला?'...

क्रमश:

कसं वाटतंय सांगा हा...आवडताहेत का ऋचा आणि वेद?


©पल्लवी चरपे 

टीम = अहमदनगर 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//