Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग सतरा

Read Later
अलवार प्रेम... भाग सतरा

 

अलवार प्रेम... भाग सतरा...
विषय
= प्रेमकथा

मागील भागात आपण पाहिलं...
ऋचा आईसारखी तयार झाल्यामुळे सगळ्यांना गोड धक्का बसला. आजीचं श्राद्ध झाल्यावर ऋचाला कळलं की तिच्यासाठी स्थळ आलंय...वेद मात्र बिचारा ऋचाला बघायला तळमळतोय.

आता पुढे...

ऋचा थकल्यामुळे रात्री तर लगेच झोपली पण सकाळी?
सकाळी उठताच कालच्या विचारांनी पुन्हा तिचा पिच्छा पुरवला.
'आबासाहेबांनी लग्नासाठी बोलावलं असेल का मला गावात?'
आज ती जरा उशिराच उठली होती. मेघा तिच्यासाठी चहा घेवून वर आली ते बघून ती ओशाळली.
"अगं तू कशाला आलीस, मी येतंच होते की खाली."
"असंच आले, म्हटलं बघावं वन्स उठल्या की हरवल्या राजकुमाराच्या स्वप्नात."
तिने डोळा मारला आणि सावरत म्हणाली.
"मस्करी करतेय हॊ, तुमच्यासोबत घ्यावा म्हटलं आजचा चहा म्हणून आलेय."
"तुझं लग्न कसं झालं गं?" ऋचाने एकदम विचारले.
"सगळ्यांसारखंच, हे बघायला आले, सगळ्यांनी होकार दिला, मग यांनी मला फोन करुन घरची, घरच्या वातावरणाची पुर्ण कल्पना दिली. मला समजदार वाटले हे आणि मी चौकोनी कुटुंबातली त्यामुळे भरलेलं घर म्हणून आवडलं सगळं."
मेघा सांगत होती.
"तुमचं पटतं चांगल? असं अचानक अनोळखी व्यक्ती आणि..."
ऋचाला मध्येच थांबवत मेघा म्हणाली.
"हाताची सगळी बोटे सारखी नसतात, थोडं कमी जास्त होतंच आणि मी त्यांना समजून घेतेय तसं तेही मला समजून घेतात. आता बघ मला मोकळीक दिलीय मी काहीही घालू शकते पण मला कळतं घरात कार्यक्रम आहे तर घरातली मोठी सून म्हणून मी साडीतच असावं... कसं असतं ना वन्स आपण आपल्या मर्यादा पाळून नातं निभावलं की समोरच्यालाही ते जाणवतं आणि मग तेही आपला विचार करतात."
"अगं पण असं अनोळखी?" पुन्हा ऋचाला मध्येच थांबवत मेघा म्हणाली,
"त्यातच तर खरी मजा असते. दोघेही एकमेकांना हळूहळू ओळखत पुढे जातो, त्यात आधी तू असा होतास आता तू असा आहेस असं काही उरतच नाही मग. " मेघाला कुणीतरी आवाज दिला तसं
"नंतर बोलू येते मी." म्हणत मेघा पळाली.

'खरंच किती समजूतदार आहे ही, नाहीतर मी...आता आज उमाकडे जायचंय तर तिला विचारावं लागेल, ती नक्की योग्य सल्ला देईल मला. चला आवरायला हवं.'
म्हणत ती तयारीला लागली.

खाली आल्यावर तिने भीतभीतच उमाकडे जायचंय सांगितलं.
"कुणी सोबत नको मला घर माहिती आहे." म्हणत एकटीच निघाली.
उमाचं घर सरळ गेल्यावर पलटून तिसऱ्याच गल्लीत होतं, त्यामुळे कुणी काहीही म्हटलं नाही. शिवाय घरात सगळ्यांना माहिती होतं, उमाला आबासाहेबांनी काय काम दिलंय ते.

ऋचा कांताआईचा होकार घेवून निघाली होती. कितीतरी दिवसांनी ती गावात एकटी अशी बाहेर पडली होती.********

वेदचा कालचा दिवस असाच गेला ऋचासाठी तळमळत. ती बरी आहे हे तर कळलं होतं त्याला उमा आणि शिवच्या बोलण्यातून पण ती खिडकीत का येत नाहीये ते कळेना.
रात्रीही तो बराच वेळ टेरेसवर थांबला होता आणि नंतर हॉस्पिटलमध्ये येऊन झोपला.

सकाळी शिव आल्यावर तो घरी जायला निघाला, आतातरी ती दिसेल या आशेने. दहाच्या आसपास तो गेटपर्यंत पोहोचला, नेहमीसारखं हॉर्न देऊन बघितला. ती आली नाही बघून रागातच टेरेसवर जाऊन बसला.
'का अशी करतेय ही? ओढ तर तिलाही होतीच ना, की फक्त्त कुतूहल म्हणून बघत होती आणि मीच वेडा झालोय उगाच?'
वेद विचारात टेरेसवर फेऱ्या मारत होता तोच देशमुखांच गेट वाजलं. ती बाहेर निघाली एकटीच, पिंक कलरचा पटियाला सूट घालून 'ही एकटीच कुठे जातेय?' वेद भरभर खाली आला आणि गाडी घेवून दुसऱ्या रस्त्याने निघाला. दुरुन गोल गोल फेरी मारत ती कुठे गेली याचा अंदाज घेतला.

*******

ऋचा उमाच्या घरी पोहोचली. उमा सगळी कामं आटोपून, मनूला ब्लॅकबोर्डवर खडूने एबीसीडी लिहायला शिकवत होती. ऋचा जाताच दोन्ही मैत्रिणी कडकडून भेटल्या. उमाचं घर म्हणजे रो हाऊस सारखा तीन खोल्यांचा ब्लॉक.
समोर हॉल, मध्ये बेडरुम आणि पलीकडे किचन एका रांगेत.
दोघीही खाली चटईवर बोलत बसल्या होत्या, सोबतच मनूला खेळवत उमा खडूने फळ्यावर काहीतरी लिहीत होती तोच वेद तिथे आला.
त्याला बघून ऋचाची धडधड पुन्हा वाढली.
'हा कशाला आला आता इथे?' म्हणत ऋचाने मान खाली घातली.
उमाने त्याला बसायला सांगितलं, वेद खुर्चीवर बसत काहीतरी बोलला, उगाच काही विचारायचं असं आणि उमाला पाणी मागितलं.
उमा पाणी आणायला गेली तसं तो पटकन मनूच्या बाजूला फळ्याजवळ बसला.
"काय रे बदमाश, काकाकडे लक्ष नाहीये का आज तुझं?" म्हणत मनूचा लाड करत फळ्यावर काहीतरी लिहिलं आणि ऋचासमोर चुटकी वाजवत फळ्याकडे बोट दाखवलं.
ऋचाने बघितलं त्यावर लिहिलं होतं,
"खिडकीत का येत नाहीयेस दोन दिवसापासून?"
ऋचाला दरदरुन घाम फुटला, तिने पटकन हाताने ते पुसलं तोच उमा पाणी घेवून आली. वेद मनूला खेळवत उठलाही होता तिथून.
ऋचाला असं खाली मान घालून अवघडून बसलेलं बघून उमा म्हणाली,
"अरे हा ओळख करुन द्यायची राहिली, ऋचा हा वेद दादाकाकांचा लहान मुलगा, आणि वेद ही..."
"आबासाहेबांची मुलगी."
"तुम्हाला कसं कळलं?" ऋचा नकळत बोलून गेली.
"गावातल्या सगळ्या मुली ओळखतो मी म्हणून." म्हणत त्याने पाणी पिऊन ग्लास वापस केला.
"वहिनी एक मस्त चहा होऊन जाऊदे तुझ्या हातचा." वेद म्हणाला तसं उमा, "तुम्ही बसा मी आलेच." म्हणत चहा बनवायला आत गेली.
ऋचा उठून मागे जाणार तोच वेदने एका हाताने मनूला बाऊ करत(त्याचे डोळे झाकत )दुसऱ्या हाताने तिचा हात पकडून तिला तिथेच बसवले आणि फळ्यावर लिहिले, "खिडकीत आली नाहीस तर उद्या पुराच्या पाण्यात जाऊन बसेल."

ऋचाने घाबरतच ते पुसलं आणि हात सोडवून आत पळाली.
'काय होतं हे, सरळ धमकी, गावातल्या सगळ्या मुली माहितीये म्हणतोय लोचट कुठला?'
"उमा हा इथे कसा?"
"अगं येत राहतो तो अधेमध्ये, शिवचा पक्का मित्र आहे आणि मनूचा लाडका काका." उमाने सांगितले.
'हा माझ्याच मागे आलाय.' ऋचाची खात्री पटली.
"त्यादिवशी शिव याला बघून म्हणाले 'तू जा इथून लगेच आणि आज मी असताना हा इथे?'" ऋचा जणू काही झालंच नाहीये असं दाखवत म्हणाली.
"अगं हा, माझ्या डोक्यातच आलं नाही." म्हणत उमाने पटकन चहा नेला त्याच्यासाठी आणि त्याला म्हणाली, "वेद तू जा इथून राडा व्हायचा उगाच. "


क्रमश:कसं होईल ऋचाचं?

©®पल्लवी चरपे
टीम =अहमदनगर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//