Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... (भाग एक )

Read Later
अलवार प्रेम... (भाग एक )

 

अलवार प्रेम...भाग १

 

विषय -प्रेमकथा

            तिला पाऊस अजिबात आवडतं नव्हता, तिच्यासाठी पाऊस म्हणजे वैताग, ढग दाटून आले की तिची नकळत चिडचिड सुरु व्हायची. पाऊस म्हणजे चिखल सारा, पाऊस म्हणजे मरगळ,पाऊस कपडे खराब करतो, पाऊस वैतागवाणा असतो, पाऊस म्हणजे रेंगाळलेली कामे, पाऊस म्हणजे उगाच सुट्टी,पाऊस म्हणजे तुंबलेले रस्ते, पाऊस म्हणजे रोगराई, पाऊस म्हणजे डासांचा त्रास, पाऊस म्हणजे माश्या, किडे यांचा वाढता वावर, पाऊस म्हणजे पुरात वेढलेले रस्ते, वाहून जाणारे लोक,यासारखे पावसाचे कितीतरी तोटे ती सांगू शकायची.

           थोडी कणखर मनाची ऋचा, पावसाचा मात्र खूप रागराग करायची, तिला लहानपणापासून पाऊस आवडतच नव्हता. पावसाची जीवनभराचा सल देऊन गेलेली एक दुःखद आठवण होती तिच्या मनात खोल रुतलेली.


********


          खूप मुसळधार पाऊस सुरु होता. आभाळ फाटलं होतं जणू, पाऊस थांबायचं नावचं घेत नव्हता. रोडच्या बाजूला टॅक्सीतून ऋचा उतरली. पांढरा कुर्ता, लाल चुडीदार आणि लाल ओढणी घातलेली, चिंब भिजलेली. त्या पावसातही तिच्या चेहऱ्यावर वैतागाच्या आठ्या स्पष्ट दिसेल एवढी ती त्रासलेली होती आणि त्याला कारणही तसंच होतं. तब्बल पंधरा वर्षांनी गावात येत होती ती, तिचे बाबा गाडी पाठवणार होते पण गाडी आली नव्हती. घरचे सगळे लोक आधीच पोहोचले होते, ही एकटीच उशिरा आलेली. आता गाडी तर नव्हतीच नव्हती पण फोनला रेंज पण नव्हती आणि त्यात धो धो बरसणारा नावडता पाऊस. आता या गावात फोनशिवाय कसे राहतात लोक हे तिला नव्हतं ना माहिती.
       

 

 

            ती जिथे उतरली तिथून दिड-दोन किलोमीटर पायी चालत गावात जायचं होतं, ते ही पायवाटेने. साधा रस्ता, डांबरी पण जागोजागी फुटलेला होता ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. तरीही आता नाईलाज होता, घरी तर जावंच लागणार होतं. तिने ओढणी अंगाला लपेटली आणि रागात आपली बॅग ओढत चालू लागली. गावातले रस्ते तर इतके खराब होते की बॅगला व्हील असूनही सरळ ओढून नेता येत नव्हतं. दोनतीनदा तर तिला असं वाटलं की, ती बॅग फेकून द्यावी आणि परत निघून जावं. असंच वैताग वैताग करत ती अर्धा रस्ता आली.

          ऋचा एमएससी केमिस्ट्री झालेली, सातवीपासून शहरात काका-काकूंकडे वाढलेली. गाव सोडल्यावर ती कधी गावात आलीच नव्हती. यावेळी तिचे बाबा म्हणाले म्हणून ती यायला तयार झालेली. काका आधीच आले होते आणि काकूंना बरं नव्हतं त्यामुळे ती एकटी आली.

          रस्त्यावर चिटपाखरुही नव्हतं आणि एका जागी बॅग खेचताना तिच्या बॅगचं व्हील तुटलं. आता ते लावता येईल का? म्हणून बघायला ती खाली वाकली आणि तिच्या बाजूने एक बाईक गेली. बाईकवाल्याला ती दिसली की नाही दिसली कोण जाणे पण त्या बाईकवाल्यामुळे तिच्या अंगावर सगळं रस्त्यावरचं पाणी उडालं.

"ये, डोळे फुटले का तुझे, रस्त्यावर चालताना लोकं दिसत नाही का?"
ती जोरात ओरडली.


तो थबकला. त्याने मागे वळून बघितलं. एक पंचविशीतली मुलगी, गोरीपान, उंचपुरी, पाणीदार डोळ्यांची पावसात पूर्ण भिजलेली. तो क्षणभर तिला बघतच राहिला, तोच ती घाईघाईत त्याच्याजवळ पोहोचली.


" कळत नाही का तुला कुणाच्या अंगावर पाणी उडतं ते, बघ माझ्या ड्रेसची काय हालत केली आहे. "
तिच्या राहणीमानावरुन आणि वैतागावरुन ती गावातली नाही हे त्याने लगेच ओळखले.


'ह्म्म्म...शहरी लोकांना असाच वैताग येतो गावाचा.' मनात अंदाज लावत तो म्हणाला,
" ड्रेसचे काय घेऊन बसलात, इथे माणसांची काय हालत असते, ते तरी तुम्हाला माहिती आहे का?"

"ये मला त्याचं काही करायचं नाहीये, तू माझे कपडे खराब केलेस,आता तूच मला गावात नेऊन सोडणार."
ऋचा चिडून म्हणाली.

"नेत नाही जा."
म्हणत त्याने गाडीला किक मारली आणि निघून गेला.

"अरे, मी असं कसं गावात जाणार?..."
तिचं वाक्य तसंच राहिलं.
"या गावातल्या लोकांना जरा म्हणून मॅनर्स नाहीयेत."
पुटपुटत ती पुन्हा बॅग ओढायला लागली.

         बॅग उचलायची सवय नसलेली, त्यात आठ दिवसांचं सामान घेवून आलेली ऋचा, ना बॅग उचलू शकत होती, ना ओढू शकत होती. ती रडकुंडीला आली होती. वर धो धो पाऊस सारखा सुरुच होता. ती शेवटी कंटाळून तिथल्याच एका दगडावर बसली. पुढे गेलेला तो, लगेच परत आला आणि तिच्यासमोर हॉर्न वाजवू लागला.

तिने वर बघितलं.
"पाऊस आहे म्हणून सोडतोय, चला बसा गाडीवर."

"काही गरज नाहीये, बघेल माझं मी."
ऋचा खुन्नस देत म्हणाली.

"हो का,राहिलं मग, मला वाटलं एकटी मुलगी अशी पावसात बसलीय, इकडे जंगली जनावरं फिरतात, सरपटणारे पण,शहरात जाऊन उगीच म्हणाल, गावातल्या लोकांनी माझी काळजी घेतली नाही."
तो मुलींसारखे हातवारे करत बोलला.


"असो तुम्ही हिम्मतवान दिसताय."
म्हणत त्याने गालात हसत गाडीला किक मारली.

          हा वेद, या गावातलाच, बाबा आमटे त्याचे आदर्श. डॉक्टर झाल्यावर इकडेतिकडे न जाता त्याने गावात दवाखाना टाकला. घरी लक्ष्मी पाणी भरायची त्यामुळे कशाला काही कमी नव्हतीच. वेद हा काहीच घमंड नसलेला, कमीत कमी खर्चात लोकांना जास्तीत जास्त सुविधा पुरवणारा गावचा लाडका डॉक्टर होता.

            ऋचाचे फासे उलट पडले होते,माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता, रस्त्यात पूल लागतो आणि त्यावरुन पाणीपण असते, हे तिने ऐकलं होतं. पोटात कावळे ओरडत होते, रागात तिने स्टेशनवर काही खाल्लं नव्हतं आणि टॅक्सी स्टॅण्डवर पाऊस आणि घमघमणाऱ्या माश्या बघून तिची खायची इच्छाच झाली नाही. तिच्याकडे छत्री होती, पण ती वाऱ्याच्या जोराने उलटी झाली आणि सरळ करताना तुटली. ती रेनकोट घेवून आली नव्हती. तिला वाटलं होतं की,स्टेशनवर मस्त गाडी येणार, ड्राइवर येणार आणि ती गाडीत बसून राजकुमारीसारखी घरी येणार म्हणून तिने सामान पण भरपूर आणलं होतं, पण इथे तरं सगळंच उलट झालं होतं.

       वेद अजूनही गालात हसत तिथेच उभा होता, तो चिंब भिजला असूनही रिलॅक्स होता जसं पावसाचा आनंद घेतोय असा.

ऋचाला वेदच्या वाक्याची भिती वाटली पण,
'आता याच्यासोबत जायचं म्हणजे? नाही गेले तर जंगली प्राणी.मी तर साध्या झुरळाला घाबरते, एखादा साप अजगर पाण्यातून आला तर?' कल्पनेने ती स्वतःच दचकली.क्रमश:सुरुवात आहे, वेद आणि ऋचा कोण? ऋचा कुठे जातेय? याचा उलगडा होईल पुढील भागात...

जाईल का ती वेदसोबत की थांबेल सरपटणाऱ्या प्राण्यांसोबत?...


@पल्लवी चरपे
टीम -अहमदनगर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//