Feb 28, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम - भाग चार

Read Later
अलवार प्रेम - भाग चार

अलवार प्रेम... भाग चार

विषय -प्रेमकथा मागील भागात आपण बघितले,

ऋचाला चक्कर आली आणि घरचे तिला भेटायला आले. वेद आणि शिव तिच्यापासून काहीतरी लपवत होते.

आता पुढे...

"शिव काय झाले अचानक?" आबासाहेबांनी विचारलं.
"काही कळलं नाही अचानक चक्कर आली तिला अर्ध्या पुलावर."
"पाण्याला आधीपासूनच भिते ती, अजून काही प्रॉब्लेम नाहीये ना?
आबासाहेब उदासपणे म्हणाले.
"हो,काळजीचं काही कारण नाहीये."
शिव उमाला इशारा करत म्हणाला कारण ऋचाचं सगळं सामान वेदच्या केबिनमध्येच राहिलं होतं.
"बरं, मग आम्ही तिला घरी घेवून जातो."
"हो नक्कीच, उमा तिचं सामान पॅक कर."
म्हणत शिवने पून्हा एकदा ऋचाचं बीपी चेक केलं आणि डोळ्यांनीच तिला,
"कुणाला काही बोलू नकोस."
म्हणून इशारा केला.
उमाने घाईत जाऊन तिचं सगळं सामान गाडीत टाकलं, ऋचा उठून गाडीकडे जात होती पण तिची नजर मात्र तिच्याही नकळत त्या हॉस्पिटलमध्येच रेंगाळत होती. ऋचा काकांशेजारी खाली मान घालून बसली.
वेद खिडकीआडून तिला बघत होता.

'नजरेत तुझ्या हरवतोय
कसं मी स्वतःला सावरू
अलवार माझ्या भावनांना
सांग तूच कसे मी आवरु?'

वेदला आज फक्त्त एवढंच माहिती होतं की आबासाहेबांची मुलगी शहरातून येणार होती आणि शिव तिला घ्यायला जातोय. जेव्हा ऋचाने त्याला आवाज दिला तेव्हा तिच्यावरुन त्याने अंदाज बांधला. तिला घेवून जाणे म्हणजे वाद पण पुढे गेल्यावर मात्र तिची दया येऊन तो तिला घ्यायला परत माघारी गेला. तो पोहोचून शिव तिला घ्यायला येईपर्यंत तिला तसं एकटं सोडणे त्याला प्रॉपर वाटत नव्हतं.

गावात बोंब व्हायला नको होती, म्हणून शिवच्या म्हणण्यावर लगेच तो निघाला होता, मन पुन्हा पुन्हा तिच्याकडे धाव घेत होतं म्हणून त्याने पलटून बघितलंच, आणि...
त्याला ती लटपटतांना दिसली, तिच्या चेहऱ्यावर प्रचंड भिती होती, ते बघून नकळत तो तिच्याकडे झेपावला. काहीच सुचतं नव्हतं त्याला, शिव ओरडत होता तरीही तो तिला घेवून त्याच्या केबिनमध्ये गेला. त्याच्या आत काहीतरी तुटत होतं काहीतरी जवळचं हातातून सुटल्यासारखं.

त्याने उपचार केले तोपर्यंत त्याला आजूबाजूचं भानच उरलं नव्हतं, पण भानावर आल्यावर त्याला येणाऱ्या संकटाची चाहूल लागली आणि आबासाहेबांची गाडी येतांना दिसली.

आताही तो पडद्याआडून तिला बघत होता, आबासाहेबांनी गाडी सुरु झाल्यावर खिडकीकडे बघितलं, तसं वेद पटकन बाजूला झाला.

आबासाहेब गेले आणि वेदचे बाबा म्हणजे दादासाहेब लगेच आले. त्यांना बघून वेद स्वतःला सावरत आपल्या केबिनमध्ये जणू काही झालंच नाही या अविर्भावात चेअरवर बसला होता.

त्याने सभोंवार नजर फिरवली, ऋचाची ओढणी तिथेच राहिली होती.
त्याने लगेच ती ओढणी ड्रॉवरमध्ये लपवली, तोच दादासाहेब आत आले.
"काय रे, काय झालंय?"
"कुठे काय दादा... आणि तुम्ही इथे कसे?"
वेद अंदाज घेत म्हणाला.
"डबा पाठवलाय आईने, काल रात्रभर इथेच होतास म्हणे म्हणून डबा द्यायला आलो आणि हॊ, देशमुखची गाडी इकडे कशी?"

"दादा, कितीदा सांगितलंय तुम्हाला, तुमचं राजकारण माझ्या हॉस्पिटलमध्ये नको, आले असतील, असेल कुणी आजारी, शिवकडे जातात ना ते?" वेद थोडं चिडून म्हणाला.

"बरं बरं, जेव आणि घरी येत जा रात्री."
म्हणत दादासाहेब जायला निघाले.
वेद चुळबुळत ते जायची वाट बघत होता. ते जाताच त्याने ती ओढणी काढली, त्या ओढणीचा सुगंध मनात भरला तोच कुणी आल्याची चाहूल लागली.
त्याने पुन्हा ओढणी लपवली.शिव आणि उमा होते.
"काय रे, तुला माहिती आहे ना इथे भारत-पाकिस्तान व्हायला वेळ लागत नाही तरी तू अशी रिस्क घेतलीस का?" शिव ओरडतच म्हणाला.
"माझ्यासाठी पेशंट मेन असतो राजकारण नाही." म्हणत तो उठून खिडकीजवळ उभा राहिला.
उमाने शिवकडे बघितलं, तिचा इशारा समजून शिव उठून त्याच्याजवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला,
"मला कळते रे तुझी मनस्थिती, पण गेले दहा वर्ष हेच चालतंय... तू त्रास करुन घेऊ नकोस, आम्ही निघतो आता, मनु एकटा आहे."
"हो"
म्हणत वेद खुर्चीवर बसला. पावसामुळे आज हॉस्पिटल तसं रिकामंच होतं. हल्ली फक्त्त सर्दी-पडस्याने त्रस्त लोक यायचे.


शिव आणि उमा बाहेर तर निघाले पण कुणीच कुणाशी बोलत नव्हतं.

ऋचा उमाची बेस्ट फ्रेंड. सातवीपर्यंत दोघीही सोबत शिकलेल्या अगदी एकमेकींचा हात सुटणार नाही अशी जोडी. सातवीत असताना एकदा दोघीही आजारी पडल्या सर्दी खोकला ताप. गावात सोय नव्हती. आबासाहेबांनी बैलगाडीने त्यांना शहरात पाठवले, तेव्हा मोजकी साधने आणि गाव तसे प्रगत नव्हते.

उमाचे आईबाबा एका साथीच्या रोगाने देवाघरी गेले होते, आजीच काय ती तिचा आधार. आईबाबाशिवाय वाढलेली पोर म्हणून ऋचाच्या आईचा म्हणजेच रेखाताईचा तिच्यावर भारी जीव.

पावसाळ्याचे दिवस होते. आजारी असलेल्या त्या दोघी, ऋचाची आई रेखा आणि गाडीवान तालुक्यातून उपचार घेवून आले आणि परतीच्या वाटेवर असताना खूप पाऊस सुरु झाला. त्यावेळी धरणाचे दरवाजे उघडण्याची पुर्वसूचना मिळायला आजसारखी आधुनिक साधने नव्हती.

पुलावरून पाणी होतं, पुलावर दोऱ्या बांधल्या नव्हत्या. कमी पाणी आहे तर सहज पूल पार होईल हा अंदाज लावून गाडीवानाने पुलावर गाडी टाकली पाण्याचा जोर वाढायला लागला, बैल अचानक थांबले. गाडीवानाने तुतारी टोचली, बैल बिफरले आणि पाण्यात पडले सोबत बैलगाडीही.

गावात बातमी पोहोचली, आबासाहेब आणि माणसे त्या पुराच्या पाण्यात उतरली. पाण्याला ओढ खूप होती, त्या पाण्यात सूर मारून शोध सुरु होता. पुढे अर्ध्या किलोमीटर वर एका झाडावर काहीतरी दिसत होतं... आबासाहेब तिकडे गेले दोन्ही मुलीना रेखा त्या झाडाला साडीच्या साहाय्याने बांधत होत्या. पाण्याचा जोर अजूनच वाढला त्यांनी लगेच जाऊन मुलींना पकडले आणि रेखाला हात देणार तोच तिचा तोल गेला. आबासाहेबांच्या समोर त्या वाहून गेल्या, पण या दोन मुलींसाठी त्यांना त्यांच्या बायकोला वाचवता आलं नाही. अजून एकदोघे पोहोचले, दोर टाकला गेला मुलींना आणि आबासाहेबांना बाहेर काढले पण...

क्रमश:पुढे काय झाले असेल?

वाचा पुढल्या भागात.


©पल्लवी चरपे

टीम -अहमदनगर 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//