Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग पाच

Read Later
अलवार प्रेम... भाग पाच

अलवार प्रेम... भाग पाच

विषय - प्रेमकथा 

मागच्या भागात आपण बघितलं...

रेखा ऋचा आणि उमा पुराच्या पाण्यात वाहत जातं होत्या. आबासाहेबांच्या हातात दोन्ही पोरी लागल्या पण...

आता पुढे...

रेखापर्यंत पोहोचायला वेळ झाला होता. पुढे अजून अर्धा किलोमीटरवर त्यांचं प्रेत सापडलं.

घरात हाहाकार माजला होता. भरलेलं, गुण्यागोविंदात असलेल्या घरावर क्षणात शोककळा पसरली होती. तीन भावांचं गावातील नावाजलेलं आबासाहेबांचं घर होतं. त्यांची आई सखुबाई, मोठे बंधू सुरेश, वहिनी कांताबाई त्यांची दोन जुळी मुलं अनिल आणि सुनील. लहान भाऊ माधव शहरात बँकेत नोकरीवर असला तरी प्रत्येक सणवाराला घरी यायचा. मुलबाळ नसल्यामुळे व्यथित असलेली त्याची बायको मीरा या तीन मुलामध्ये रमायची.
स्वतः आबासाहेब ज्यांना रमेश नावाने कुणी ओळखतही नव्हतं ते आपल्या घराण्याचा राजकारणाचा वसा चालवत होते आणि रेखा त्यांची पुरेपूर साथ देत होत्या. कशालाच काही कमी नव्हतं पण त्या घराला अचानकच कुणाची नजर लागली होती.

त्या प्रसंगानंतर ऋचाला शुद्धीवर यायला तीन दिवस लागले. तोवर तिच्या आईचे सगळे क्रियाक्रम झाले होते. ऋचा शुद्धीवर आल्यावरही भेदरल्यासारखी बघायची, पाणी दिसलं की घाबरायची.आबासाहेब दिसले की,
"तुमच्यामुळे माझी आई गेली." म्हणून ओरडायची. शहरातून स्पेशल डॉक्टर बोलावले गेले, त्यांच मत होतं की, काही दिवस तिला या वातावरणापासून दूर ठेवावं, जेणेकरुन तिच्या मनातील पाण्याची भिती आणि तो प्रसंग ती विसरु शकेल.

काय करावं, घरात कुणालाच काही सुचतं नव्हतं. माधवने जबाबदारी घ्यावी असं मीराला वाटतं होतं पण निपुत्रिकपणामुळे खचलेले माधव आपण असं कसं बोलावं याच विचारात होते. माधवच्या आईने माधवच मन जाणलं आणि ऋचाला मीराच्या पदरात घातलं.
तेव्हापासून मिरा ऋचाची आई झाली आणि माधव तिचे बाबा.

आबासाहेब स्वतःच खूप खचले होते. गावच्या सरपंच्याच्या घरी शोककळा पसरली होती आणि गावातील काही लोक दादासाहेबांना चिथावत होते. आमदारकीचा प्रबळ दावेदार असलेले आबासाहेब दुःखात बुडालेले असताना दादासाहेब त्या पदासाठी कसे योग्य ते पटवून देत होते आणि दादासाहेबांनी या सगळ्याला भुलून जुनी मैत्री विसरुन आमदारकीसाठी आपला अर्ज दिला.


यावरुनच गावात वाद पेटला. आबासाहेबांना हा वार म्हणजे पाठीत खंजीर वाटला आणि दादासाहेबांना वाटले की, आबासाहेब त्यांच्या प्रगतीला जळतात. बस इथूनच देशमुख-देशपांडे वैर वाढतं गेलं. या सगळ्यात आगीत तेल ओतायला गावातले काही लोक होतेच.

"उमा, तुला पाण्याची भिती नाही वाटली कधी त्यानंतर?"
आपल्याच विचारात जाणारी उमा शिवच्या या प्रश्नाने भानावर आली.

"तिने आई गमावली, माझ्याकडे गमवायला काही नव्हतंच.मी खचले असते,तर मी त्यादिवशीच अनाथ झाले असते. कारण आजीचं वय धक्का पचवायचं नव्हते, म्हणून मी माझा धक्का गिळून टाकला."
उमा दूर कुठेतरी बघत बोलत होती.

"आज पहिल्यांदा मी ऋचाला असं बघितलं, म्हणजे कायम वटवट करणारी,सतत भांडणारी ऋचा पाण्याला बघून एवढी घाबरते हे मला कुणी सांगितलं असतं तर मी विश्वासच ठेवला नसता."
शिव सहज बोलून गेला.
"तिच्या मनातलं तिलाच ठाऊक, ती कधी व्यक्त झालीच नाही आणि कुणी तिला त्रास होऊ नये म्हणून व्यक्तही होऊ दिलं नाही." बोलताबोलता ते घरी पोहोचले आणि मनु उमाकडे धावला. उमाने त्याला उचलून घेतलं आणि दोघेही त्याच्यासोबत मस्ती करण्यात रमले.
*******


ऋचा घरी पोहोचली. कांताबाईंनी तिच्यावरुन भाकर तुकडा ओवाळून तिला घरात घेतले. घर बाहेरुन जुन्या वाड्यासारखेच दिसत असले तरी आत मात्र आधुनिक सुखसोयी केलेल्या दिसत होत्या.
स्वतःच्याच घरात ऋचा बावरल्यासारखी एकेक पाऊल पुढे टाकत होती.

एकेकाळी किती भरलं घर होतं ते, दोन दिवसांनी सखूआजीचं वर्षश्राद्ध होतं.
ऋचाची आई गेली आणि माधव-मीरा ऋचाचे आईबाप बनले. सातवीपासून ती शहरात माधव काकांकडेच राहिली.

दहा वर्षे... तब्बल दहा वर्षांनी ती त्या घरात पाऊल टाकत होती.तिला काका-काकू सोबत घर सोडून निघून गेलेली छोटी ऋचा आठवली, जी आबासाहेबांना ओरडून सांगत होती.
"मला नाही राहायचं तुमच्यासोबत, तुम्ही मारलंत माझ्या आईला."

त्यानंतर ती कधी गावात आलीच नाही. आबासाहेबांनी कधी तिच्यासोबत बोलायचा प्रयत्न केला नाही. मध्येमध्ये जाऊन ते तिला दुरुनच बघून यायचे. यावेळीही ती गावात येणार नव्हती पण आबासाहेबांनी म्हटलं म्हणून आली ती. पहिल्यांदा त्यांनी तीला बोलावलं होतं.
"तुझं घर आणि बाप वाट बघतोय, नक्की ये." त्यांचं ते वाक्य भिडलं तिच्या मनाला आणि आली ती, त्यात काकू आजारी होती तर एकटी आली.

"कौशी, जा ऋचाला तिची रुम दाखवं, तिला बरं नाहीये आणि खायला पाठव तिच्या खोलीत लगेच." कांताआईच्या आवाजाने ऋचा भानावर आली.
कौशी धावतच किचनमधून बाहेर आली, तोच अजून एक साडी घातलेली मुलगीही बाहेर आली.
ही कोण म्हणून ऋचा तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती,मग मागून येणाऱ्या अनिलने तिला ओळख करुन दिली.
"वहिनी आहे गं तुझी."

आणि पलटून म्हणाला,
"मेघा,माझी बहीण खूप दिवसानंतर घरी आलीय तिच्या सरबराईत काहीच कमी राहायला नको."
"हो."
म्हणत मेघा तिला घेवून वर गेली...
पायऱ्या नवीन बनविल्या होत्या. वरच्या तीन रुम तशाच होत्या, फक्त्त सगळीकडे आधुनिकतेची झालर चढवली होती. समोरच्या टेरेसला काचा लावून पॅक केले होते आणि जाड पडदे लावले होते, बाहेरचं काहीच दिसणार नाही असे.


ऋचाला आठवलं लहानपणी त्या टेरेसवर खूप कुंड्या होत्या आणि समोरचा रस्ता दिसायचा पण हे असं बंद का?

तिने पडदा उघडायला हात वर केला तशी मेघा लगेच घाबरुन म्हणाली,
"नको नको वन्स, हा पडदा आणि या खिडक्या कधीच उघडायच्या नाहीत."

"का? " ऋचाने न कळून विचारलं.

इथे आल्यापासून तिला बरेच प्रश्न पडत होते, पहिले तर वेद आणि आता हे पडदे.क्रमश:

काय आवडतेय ना, ऋचाचं उत्तर मिळेल पुढील भागात....
©पल्लवी चरपे

टीम = अहमदनगर 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//