Mar 04, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग पंधरा

Read Later
अलवार प्रेम... भाग पंधरा

अलवार प्रेम...भाग पंधरा

विषय = प्रेमकथा

मागील भागात आपण पाहिलं...

ऋचा आपल्या घरात व्यस्त झालीय, मनुला ती वेदचा मुलगा समजतेय त्यामुळे ती खिडकीतून बघत नव्हती पण वेद बिचारा बेचैन झालाय, ती दिसली नाही म्हणून...

आता पुढे...


सकाळी घरी येताच पुन्हा वेदने आशेने प्रयत्न केला, हॉर्न वाजवून ती बघेल असा. रात्री झोप लागलीच नव्हती, म्हणून अर्ध्या रात्री हॉस्पिटलमध्ये जाऊन बसला होता उगाच.

टेरेसवर बऱ्याच फेऱ्या मारुन झाल्या. त्यांच्याकडे दुपारी श्राद्ध होतं आणि शिव उमा जाणार होते हे त्याला कळलं होतं. म्हणजे सकाळनंतर ती वर येणार नाही हा अंदाज बांधून दहा वाजता गाडी काढून पुन्हा वेद हॉस्पिटलमध्ये गेला.
जाताना त्याने आशेने एक प्रयत्न केला. त्याची आशा कालपासून फक्त्त निराशेत बदलत होती. त्याच्या अश्या वागण्याचा संशय आला, तर मोठी गडबड होऊ शकत होती पण त्याचं मन एवढं सैरभैर झालं होतं की, विचारी असलेला वेद असं अविचारीपणाने सतत हॉर्न वाजवत होता.

तो हॉस्पिटलमध्ये गेल्यावर शिव आणि उमा ऋचाकडे जायला निघाले. त्यांचं जुजबी बोलणं झालं, हल्ली तो जरा कमीच बोलत होता. शिवला वाटलं तो वेदवर ओरडला, म्हणून वेदला वाईट वाटलं असेल. तसा वेद मनाने खूप प्रेमळ होता. त्याच्यासाठी पेशंट महत्वाचा असायचा, मग तो कुणीही असो. तो नेहमीच म्हणायचा
"आपले पहिले कर्तव्य लोकांचा जीव वाचवणे हे असते."
करमत नव्हतं म्हणून वेदने मनूला ठेवून घेतले. तिथे कुठे गोंधळात न्यायचं हा विचार करुन त्या दोघांनीपण ठेवले.
ऍटलीस्ट मनूमुळे वेळ जरा बरा जाईल असं वेदला वाटलं.

शिव-उमा बाहेर आल्यावर उमा शिवला म्हणाली.
"हा जरा बदलल्यासारखा नाही वाटतं आहे का तुला?"
"वाटतोय खरं, पण तो बोलेल नक्की... त्याला कदाचित त्यादिवशी मी ऋचावरुन राडा होईल तू जा म्हटलेलं आवडलं नसावं, तो म्हणाला होता 'तिच्या जिवापेक्षा महत्वाचं आहे का ते?' खरंच त्यावेळी मला नसतं सुचलं एवढं." शिव विचारात पडत म्हणाला.
"हो, ती एक खुबी आहे त्याची, काहीही झालं तरी डोकं शांत ठेवून काम करतो पण लग्नाचं कधी मनावर घेतोय कोण जाणे?"
उमा हसत म्हणाली.
"तुझी मैत्रीण पण तर लग्नाचं मनावर घेत नाहीये ना... माझाच मित्र बरा दिसतोय तुला." शिव चिडवत म्हणाला.

"हा यावेळी तिला यासाठीच तर आणलंय गावात?" उमा लांब श्वास घेत म्हणाली.
"म्हणजे?" शिव म्हणाला.
"आबासाहेबांनी बोलावलं होतं त्यादिवशी, माधवकाका तिचं कन्यादान करायला तयार नव्हते, त्यांच म्हणणं ज्याचा हक्क त्याने घ्यावा पण ऋचा ऐकणार नाही आणि तिला त्रास होऊ नये म्हणून मुलगा आबासाहेबांनी बघितला आणि कन्यादान काका करणार असं ठरलं पण माझ्याकडे पहिल्यांदा काहीतरी मागितलं त्यांनी." उमा उदास होतं म्हणाली.

"काय?" शिव आश्चर्याने म्हणाला.
"आज तो मुलगा तिला बघायला येणार, मला तिला लग्नासाठी तयार करायचं आहे. गावात बोलवायचं कामपण होतं माझ्याकडे पण नाही आली ती, ना आपल्या लग्नात ना मनूला बघायला, ना मनूच्या बारशात. " उमा दूर बघत बोलली.
"अगं पण तू कसं मनवणार? तिला सगळं खरं सांगता येत नाही ना, पॅनिक होते ना ती, माधवकाका बोलले की त्यांनी खूप प्रयत्न केला पण जमलंच नाही म्हणून."
शिव टेन्शन घेत म्हणाला.
"हो, पण यावेळी तिला ऐकावंच लागेल, ती गावात आलीय ते तरी बरं नाहीतर मी तर तिच्याकडे जाणार होते यावेळी. आबासाहेबांची स्थिती बघून राहवत नाही रे. त्याचं दिवशी मनूला ताप आला आणि मी तुला सांगायचं विसरले."

"हो ना, मनू आल्यापासून आपल्याला दोघांनाही बोलायला वेळच मिळतं नाही ना? " शिव खट्याळपणे म्हणाला.
"हो का, तरी बरं वेद आपल्याला जमेल तेवढी मोकळीक देतो." उमा डोळे दाखवत म्हणाली.
"हो ते आहेच म्हणा." बोलता बोलता ते ऋचाच्या घरी पोहोचले, शिव बाहेर बसला आणि उमा आत गेली. तिची आजी गेल्यापासून उमासाठी ते घर म्हणजे तिचं माहेरच होतं.
*******

ऋचा सकाळी उठून विचार करत होती, "आबासाहेबांशी कसं बोलावं, त्यांची माफी कशी मागावी, कुणाला काही विचारावं का? "
ती रुममध्ये इकडून तिकडून फेऱ्या मारत होती, त्या नादात तिच्या पायाला कपाट लागलं, जोरात अडखळली ती कपाटाला आणि तिची ट्यूब पेटली.

नाश्ता घेवून आलेल्या कौशीला तिने सांगितलं,
"कुणालाही वर येऊ देऊ नका, मी बरोबर पुजेच्या वेळी खाली येईल असा निरोप दया."

कौशी गेली तसं तिने दार बंद केलं. कपडे घेतले आणि अंघोळीला गेली, तिकडून आल्यावर मस्त आवरलं आणि तयार झाली. कितीदा तरी तिने आरश्यात डोकावून आपलं रूप न्याहाळलं. तिचं समाधान झालं तसं तिने रूमचं दार उघडलं आणि बाहेर आली.

ऋचाचा निरोप ऐकून सगळे काळजीत पडले होते, पण मेघाने लगेच सांभाळून घेतलं.

"त्या आजीच्या कार्याला आल्या नव्हत्या, त्यामुळे अपराधी वाटत असेल त्यांना. थोडा वेळ एकटं राहावं वाटतं असेल."
तिचं बोलणं सगळ्यांना पटलं.
"आपण वाट बघूया थोडी तिने सांगितलंय तर नक्की येईल ती वेळेवर." मीरा काकू विश्वासाने म्हणाल्या.
"चला चला आवरा लवकर गुरुजी आलेत." सुनील सगळ्यांवर ओरडला.

ऋचा खाली यायला तर निघाली पण सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे जायला हवं असं काही तिला करावं लागणार होतं. तिने मुद्दाम एक ग्लास पायऱ्यांवरुन सोडला. स्टीलचा पेला घरंगळत खाली गेला आणि त्याच्या आवाजाने सगळ्यांनीच तिकडे बघितलं.
ऋचा एकेक पायरी उतरत होती. तिची नजर आबासाहेबांवर खिळली होती. तिचं ते रुप बघून सगळे शॉक झाले होते. आबासाहेब पुजेसाठी आता पाटावर बसणार त्याचवेळी आवाज झालेला. आबासाहेब तसेच स्तब्ध होऊन बघतचं राहिले, बाकी सगळ्यांनी तोंडात बोटे घातली म्हटलं तरी चालेल.

क्रमश:


ऋचाने काय केलं असेल? बघू पुढील भागात...©®पल्लवी चरपे

टीम =अहमदनगर 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//