Mar 01, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग अकरा

Read Later
अलवार प्रेम... भाग अकरा

अलवार प्रेम... भाग अकरा

विषय=प्रेमकथा 

मागील भागात आपण बघितलं...

काका ऋचाला सांगत होते त्यांना आणि मीराकाकूला मुलं का झालं नाही ते आणि मध्येच मेघा चहा घेवून आली...

आता पुढे...


          सगळे चहा घेत होते, ऋचाला काहीतरी आठवलं, तिने मेघाला विचारलं,

"तू पाल का पकडलीस?"
मेघाने काकांकडे बघितलं काकांनी डोळ्यांनीच तिला सांग चा इशारा दिला.
"तुम्ही एकट्या यायला तयार झाल्यावर मीरा काकूंनी सूचना पाठवल्या होत्या सगळ्यांसाठी."
"काय?" ऋचा आश्चर्याने ओरडली.
"हा पण मग आम्हाला वाटलं तुम्ही नाही येणार, यांनी फुलांचा ऑर्डर दिला होता, घरात सगळीकडे फुगे लावणार होतो, ते अलीकडे मुलगी झाल्यावर घरी आणतात तेव्हा करतात तसं सगळं पण काका म्हणाले पाऊस बघून तुम्ही येणारच नाही."

मेघा काकांकडे बघात म्हणाली.

"हा येणारच नव्हते पण आशा म्हणाली,

'काय त्या पावसाला भितेस, जायचंच नव्हतं तर घरून कशाला निघालीस एकटीच जाते म्हणून'
मला राग आला आणि आले तावातावात पण इथे तर नेटवर्क जस्ट मग फोन..."

ऋचा आठवत म्हणाली.
"फक्त्त बिएसएनएल असतं, आलं तरं वापरायचं गेलं तर चूप बसायचं असं. लँडलाईन चालतो कसाबसा."

मेघाने सांगितलं.
"चला मी जाते खूप काही आवरायचं आहे."

म्हणत मेघा पळाली.
ऋचा विचारात पडली आज तिला पाणी बघून गरगरल्यावर नक्कीच झालं काय? ती लगेच कशी शांत झाली.

"कसला विचार करतेयस?"

काकांनी विचारलं.
"नाही काही नाही, आई कशी गेली?"

तिने भितभीत विचारलं.

माधव काकांनी एक लांब श्वास घेतला.
"सुरेश दादाला कधी राजकारण जमलंच नाही आणि वहिनींनी कधी लक्ष घातलं नाही. आमचा राजकारणाचा वसा आबासाहेबांना चालवावा लागला. गावात राजकारण असं असतं की माणसांपेक्षा बायांना प्रचार जास्त करावा लागतो. बायांना सामाजिक जीवनात जास्त वेळ द्यावा लागतो. तेव्हाच कुठे नवऱ्याची प्रगती असते. इथे कांता वहिनी काहीच करत नव्हती पण रेखावहिनी आल्या आणि चित्रच बदललं. त्या सगळ्याच्या घरी जातयेत होत्या. सगळ्या गावाची खबर ठेवत होत्या त्या होत्याही राजकारणी घरातल्या. तेथूनच तुझ्या बाबांची भरभराट व्हायला लागली. आमदारकीचे तिकीट त्याच्या नावाने निघणार होते ज्यादिवशी तुला दवाखान्यात न्यायचं होतं. त्या दिवशी दुपारी पक्षाचे लोक येणार होते आणि त्यांच्या सरबराईत काही कमी होऊ नये यासाठी तुझ्या आईने तिथं असणं जरुरी होतं म्हणून वहिनी तुला घेवून गेल्या आणि आबा घरी थांबला. वहिनीलाही लवकर यायचे होते घरी कारण त्या असल्या की आबांना हिम्मत असायची. एका यशस्वी पुरुषामागची स्त्री होती ती पण झालं काहीतरी विपरीतच. ती मीटिंग सुरू असतानाच निरोप आला आणि आबा धावला. दोन मुली की बायको त्याच्या दोन्ही हातात सगळ्यांना नाही पकडू शकत होता. उमाला वाचवणं जरूरी होतं. कारण स्वतःच्या पोरीपेक्षा दुसऱ्याची पोर वाचवणे जास्त जरुरी असतं राजकारणात. आबाने दोन पोरी पकडल्या पण बायकोला नाही वाचवू शकला. तुला वाटतं आईने तुम्हाला झाडाला बांधलं होतं आणि तुम्ही बांधुन होत्या पण पाण्याच्या प्रवाहात आईला तुम्हाला बांधता आलंच नव्हतं ती जिवाच्या आकांताने फक्त प्रयत्न करत होती. तिला स्वतःपेक्षा आपली मुलगी वाचवायची होती. आबा पोहोचताच तिने निरोप घेतला. खूप प्रेम होतं आबाचं तिच्यावर कारण ती आली तेव्हापासूनच घरात लक्ष्मी आली होती. राजकारणात तिने लक्ष घातल्यामुळे आबाची आणि गावाची प्रगती होत होती. आदर्श गावं ठरल होतं हे गाव. ती आली तेव्हापासून प्रचारासाठी फिरत असे, बायांशी बोलून त्यांच्या समस्या सोडवून देत असे. उद्योगधंद्यांमध्ये मदत करत असे, त्यामुळे ती गावातली आणि घरातली लाडकी सून होती.

        स्वतःच्या डोळ्यांनी आपलं प्रेम वहात गेल्याचं पाहिल्यावर आबाकडे आधार होती त्याची मुलगी पण पाण्यातून बाहेर येताच तू ग्लानीत त्याच्यावर ओरडलीस,
" तुम्ही मारलं माझ्या आईला!" ऐकूनच तुटला तो. त्यानंतर तू बेशुद्ध झालीस ते तीन दिवस तुझ्या उशाशी बसून राहिला. तीन दिवस ना कोणाची भेट, ना कोणाचा निरोप, न कोणाकडे लक्ष. फक्त्त तू ग्लानीत बोललीस समजून पण तू शुद्धीवर आल्यावर त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला. तू त्याला दोषी समजत होतीस, त्याच्याकडे बघतही नव्हती, तो तुला तुझ्या समोरच नको होता. जसं आताही तुला त्याचा विषय काढलेलाही चालत नाही. "
ऋचाने घाबरत काकाकडे बघितलं, खरं तर होतं त्यांचं. ती तिच्याच कोषात होती आणि आपल्याच लोकांच्या दूरदूर पळत होती.

"तुम्हाला वाचवायला तो पक्ष मिटिंग सोडून आला. त्यानंतर त्या लोकांनी संपर्क केला पण आबानी कुणालाच दाद दिली नाही कारण त्याच्यासाठी तू महत्वाची होतीस...शेवटी आमदारकीचा फॉर्म तर भरावाच लागणारे होता त्याची डेट तर बदलणार नव्हती.

          तुझ्या आईच्या तेरवीपर्यंत तो कुठे गेला नाही आणि त्यातच तुझी अवस्था बघता त्याने अजून एक मोठा निर्णय घेतला. मीराच्या मनात असलेली मुलाची हाव, आई व्हायची जिद्द आणि तुझं हरवलेलं आईचं छत्र. माझ्या आईने तुला माझ्या झोळीत टाकलं. मी तुला घेऊन गेलो. आणि दादा पूर्ण तुटला. वहिनी गेली, मुलगी त्याचा तिरस्कार करत सोडून गेली. त्यानी खूप प्रयत्न केला तुला भेटायचा, तुझ्याजवळ यायचा. माझ्याकडे आल्यावर असलेल्या तुझ्या पहिल्या वाढदिवसाला त्याला बघून तू घातलेला गोंधळामुळे खचलेला तो, तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला यायचा तुझी ख्यालीखुशाली विचारून निघून जायचा पण तुला त्रास होऊ नये म्हणुन थांबायचा देखील नाही आणि एवढं मोठं काळीज असलेला माणूस तू उलट्या काळजाचा ठरवत राहिलीस."


माधव काकांनी डोळे पुसत स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फेरला.

ऋचाला काय बोलावं तेच कळतं नव्हतं ती थिजून गेली होती. गोठली होती जागेवर.
"ऋचा, एका बापाला सगळ्यात जवळची असते त्याची मुलगी, काळजाचा तुकडा देतो तो मुलगी सासरी पाठवताना, आबाने तर त्याचा काळजाचा तुकडा कधीच दूर केला. वहिनी गेली, तू गेली आणि...आणि त्याचं आयुष्य असलेलं राजकारणही त्याच्या दूर झालं."

"राजकारण, ते कसं?" ऋचाने आश्चर्याने विचारलं.


क्रमश:


काय झालं राजकारणात असं?...©®पल्लवी चरपे

टीम =अहमदनगर 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//