Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग अठरा

Read Later
अलवार प्रेम... भाग अठरा

अलवार प्रेम...भाग अठरा

विषय =प्रेमकथा

मागील भागात आपण पाहिलं,

ऋचा उकला भेटायला गेली, तिच्या मागेच वेद गेला. त्याने तिला खिडकीत का येत नाहीस विचारले आणि ऋचा घाबरली.

आता पुढे...


वेद चहा घेवून उठला, ऋचा आत बेडरुममध्येच होती आणि उमा बेडरुमच्या दारात. तो मनूला घेवून थोडं जोरातच म्हणाला,
" मग मनू लक्षात आहे ना उद्या काका कुठे जाऊन बसणार ते? "
"मनूला नाय कळलं काहीच." मनू रडवेला चेहरा करत म्हणाला.
"अरे माझ्या राजा." म्हणत त्याने मनूची पप्पी घेतली.
"ज्याला कळायला हवं त्याला कळलं म्हणजे झालं." म्हणत तो गेला.
ती घाबरतेय, बावरतेय म्हणजे तिलाही ओढ लागलीय या आनंदात वेद हॉस्पिटलमध्ये गेला. आज त्याचा उत्साह ओसंडून वाहत होता.
ऋचा मात्र मनातून घाबरली होती खूप.
"उमा हे काय आहे गं, दादाकाका आणि आबा मित्र होते ना चांगले, मग हे असं, घरी गॅलरीत जड पडदे लावलेत उघडायचे नाही म्हणून आणि हा..."
"याला नाही आवडत ते राजकारण, हा डॉक्टर आहे. चांगला डॉक्टर असूनही गावात राहून गावातल्यांची सेवा करायची ठरवून आला गावात. दुसरा गट मरेल पण त्याच्याकडे उपचार घेणारे नव्हते, म्हणून शिवला बोलावून घेतलं. आता बघतो आम्ही तिघे कसबस...
या दोन गटात जरा काही झालं की मारामारी वर उतरतात दादासाहेबांचे लोक. आधी आबा निमूट राहायचे पण आता अनिल दादा आणि सुनिलदादा उसळतो त्यामुळे तोडीस तोड मारामारी ठरलेली असते." उमाने सांगितले.

"पण हे सगळं झालं कसं अचानक? दादासाहेब तर आबांच्या तालमीत तयार झाले होते ना... मग त्यांनी असं?"

"आबासाहेब आमदार बनणार होते, त्यावेळीच तो प्रसंग घडला. आबासाहेब तुझ्याजवळ बसून होते, त्यामुळे आमदारकीचा उमेदवार म्हणून त्यांचा उजवा हात असलेल्या दादासाहेबांना तिकीट मिळालं. दादासाहेबांनी सहानुभूती मिळवली की या काळात आबासाहेब स्वतः उभे राहू शकत नाही, म्हणून त्यांनी मला ही संधी दिली. आबा पंधरा दिवस आपल्याच कोषात राहिले आणि त्यांचा हात पकडून वर आलेले दादासाहेब आमदार झाले. त्या दुःखातून सावरल्यावर आबांकडे काय उरलं, ना मुलगी, ना बायको, ना राजकारण. त्यानंतर गावातल्या लोकांचे दोन गट पडले काही लोक त्यांच्या विरोधात गेले आणि काही लोक त्यांच्यासोबत राहिले. दादासाहेबांच्या सत्तेचा माज वाढत गेला आणि आग लावणाऱ्यांनी दादासाहेबांचे कान भरुन आबासाहेबांना अलगद बाजूला केले. आबांचा उघड अपमान करायलाही ते मागेपुढे बघत नव्हते. दादासाहेब आबांची प्रत्येक सुधारणेची काम अडवू लागले. गावाचा विकास थांबला. त्यानंतर पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक झाली. आबासाहेबांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. इकडून प्रचाराला फक्त एकटे आबासाहेब आणि तिकडून त्यांचे पूर्ण घर. दादासाहेबांच्या पत्नी आणि सून सगळे प्रचार करत होते, बायांची मने वळवत होते यात दादासाहेबांचे पारडे जड झाले आणि आबासाहेब आयुष्यात पहिल्यांदा निवडणूक हरले.
त्यानंतर दोन गटात भयानक वाद झाले अगदी कर्फ्यू लागेपर्यंत. तुझ्या दोन्ही भावांना दादासाहेबांनी अपमानित केले. अशोकदादाने उघड टोमणा मारला, याचा बदला म्हणून अनिलदादाने त्यांच्या मोठ्या मुलाला म्हणजे अशोकदादाला जबरदस्त हाणले. या सगळ्याचा आबासाहेबांना खूप मनस्ताप झाला. आजीची इच्छा म्हणून ते अजूनही राजकारणात आहेत गावाचा विकास करायला."
"म्हणून ते घरी पडदे लागलेत तर?" ऋचाने विचारलं.
"हो, दोन्ही घरचे लोक एकमेकांसमोरही येत नाहीत. हा वेद आणि याची आई दोघांनाही हे आवडत नाही पण दादासाहेबांना सत्तेची नशा चढलीय खूप."
"हुह... वेगळा काय गं, दुश्मनाचा पोर तो दुश्मनच नाही का?" म्हणत ऋचाने नाक मुरडलं.
"असं होय, घुसलं तुझ्यातही राजकारण, तुला माहितीय हा लग्नाचं मनावर घेत नाही. त्याच्या घरचे सांगून थकलेत ते काम आता शिवला दिलंय आणि...बरं सोड तो विषय, अन्वय कसा वाटला?" उमाने डायरेक्ट विचारले.
"म्हणजे तुला माहिती आहे सगळं?" ऋचाने आश्चर्याने विचारलं.
" चोवीस झालेत, तुझ्या वयात मला एक लेकरु पण आहे आणि तुला अजून लग्न करायचं नाहीये होय?"
"तसं नाही गं, पण मला गावात यासाठीच बोलावलं असावं असं मला वाटतं?"
ऋचा विचारपूर्वक म्हणाली.
"तू आणि तुझे समज...असं काहीही नाहीये, जर असं वाटतं तर जा सांगून बघ मला विदेशात नाही इथेच कुठे आसपासचं स्थळ हवं म्हणजे तुमच्या जवळ राहता येईल म्हणून."
उमा थोडी वैतागत म्हणाली.
त्यानंतर बऱ्याच गप्पा झाल्यावर उद्या हॉस्पिटल बघायला येण्याचं प्रॉमिस करुन ऋचा निघाली.
वेदची गाडी तिच्या बाजूने गेली.
"याच लग्न व्हायचंय तर... पण मी का याचा विचार करतेय? यांच्या फॅमिलीमुळे आबांना किती त्रास झालाय, ते काही नाही मला माझ्या मनाला आवरायला हवं. ती घरी पोहोचली तेव्हा वेद पुन्हा तिच्या बाजूने गेला आणि त्याच्या गेटजवळ हॉर्न वाजवू लागला.

'चोंबडा, किती हिम्मत करतो, तिथे उमाने काही वाचलं असतं तर? ते काही नाही मी बघणारच नाहीये खिडकीतून, पुरात जाऊन बस नाहीतर हिमालयात जा म्हणावं.'
ती आत आल्यावर सगळ्यांशी बोलत मजा सांगत काही वेळ थांबली आणि नंतर वर गेली.
खिडकीकडे लक्ष जाऊनही तिने तिकडे बघितलं नाही. ती जाम थकली होती. कितीतरी दिवसांनी एवढ्या मनसोक्त गप्पा झाल्या होत्या. खरंच प्रत्यक्ष भेटीच्या आनंदाची सर त्या व्हिडिओ कॉलला नाही.
काही वेळात फ्रेश होऊन खाली आली. सगळे मनसोक्त गप्पा मारत जेवले. दुसऱ्या दिवशी अनिलदादा मीराकाकूला सोडायला जाणार होता. काका कालच गेले होते सुट्या नसल्यामुळे. ऋचा अजून चार दिवस थांबणार होती पण का कोण जाणे तिला मात्र आता तिथे राहावं वाटत होतं. मेघाकडून खूप काही शिकावं वाटत होतं. जेवताना तिला आठवलं उमाने सांगितलं होतं तिने नकार दिला तर लग्न होणार नाही. सगळे झोपायला जायच्या वेळी तिने आबासाहेबांना थांबवलं आणि तिचा निर्णय सांगितला. अन्वयला नकार दिल्यावर तिला सगळे समजावतील होकार द्यायला असं तिला वाटलं होतं पण आबासाहेब शांततेत तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले,
"तू जवळ राहणार असशील, तर मी घरजावई सुद्धा करुन घेईल."
त्यांच्या बोलण्यावर तिला आश्चर्य वाटलं. तिने त्यांना मिठी मारली, ते समजावत म्हणाले, "मला आवडलं तू सरळ सगळं सांगितलं ते, आज पहिल्यांदा बापाकडे काही विश्वासाने मागितलंस आणि मी देणार नाही असं होईल का? जा आराम कर आता." म्हणत ते झोपायला गेले. ऋचाही वर गेली झोपायला, पुन्हा तिची इच्छा झाली एकदा खिडकीतून बघायची, पण तिने मन आवरलं आणि झोपली.


क्रमश:

©®पल्लवी चरपे

टीम =अहमदनगर 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//