Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग आठ

Read Later
अलवार प्रेम... भाग आठ


अलवार प्रेम भाग आठ...
विषय=प्रेमकथा

मागील भागात बघितलं...

ऋचा स्वप्न बघून उठली आणि मेघाने लहान मुलासारखं बालिशपणा करत तिला हसवलं, मेघा तिला समजावणार तोच कांता आई तिच्यावर ओरडल्या आणि सगळे जेवायला गेले.


आता पुढे...


        ऋचा खाली आली सगळे एकत्र जेवायला बसले होते, म्हणजे मध्ये सगळं अन्न झाकलेली भांडी होती आणि भोवताल जेवणाची ताटं वाढलेली. आबासाहेब त्यांच्या बाजूला माधवकाका मग सुनील,अनिल, सुरेश आणि कांताबाई, त्यांच्या बाजूला मेघा आणि एक जागा रिकामी अशी गोलाकार बैठक होती.
          आबासाहेबांच्या बाजूला बसून जेवणे, ऋचाच्या जीवावर आलं पण सगळ्यांसमोर काय आणि कसं बोलणार? ती निमूट जेवायला बसली. सगळे बोलत जेवत होते. माधवकाका तिच्याकडे लक्ष ठेवून होते. तिचे मोठे बाबा सुरेश फक्त्त तिच्याकडे बघत होते.
'हे लोक माझ्यासाठी जेवायचे थांबलेत तर? पण देशमुखांकडे असं सगळे एकत्र जेवणे कधीपासून सुरु झाले.'
ऋचाला आठवलं की, त्यांच्याकडे ती लहान असताना पहिले मोठ्या लोकांची पंगत असायची. मग बच्चापार्टी जेवली की, त्यानंतर महिलावर्ग जेवायला बसायचा. इथे तर सून सासरे सगळे एकत्र.
'बरंच काही बदललेलं दिसतंय, बहुतेक दुपारची वेळ टळून गेलीय जेवणाची, म्हणून बाहेरचं कुणी दिसतं नाहीय जेवायला.'
तिने गुपचूप पानात वाढलेलं संपवलं अजून काहीच घेतलं नाही. वातावरणात जरा तणाव जाणवत होता. मेघा, अनिल, सुनील काहीबाही बोलत होते, पण ऋचाचं लक्ष कधी एकदा जेवणं संपवून जाते यात लागलेलं.
कांताआई आग्रह करत असूनही तिने काहीच घेतलं नाही आणि

"तुम्ही जेवा मी पडते जरा."

म्हणत उठून हात धुतला आणि वर जायला लागली. तिला तसं जाताना बघून कुणी काहीच बोललं नसलं, तरी आबासाहेबांच्या आत काहीतरी तुटलं. ती वर गेलेली बघून,
"रात्रीपासून माझं जेवणं रुममध्ये पाठवत जा आणि तुम्ही सगळे जेवत जा एकत्र." म्हणत तेही उठले. नेमकं ऋचाने ते वाक्य ऐकलं ती त्याचवेळी मीराकाकूंशी कसं बोलावं विचारायला खाली येत होती. आबासाहेबांचं वाक्य ऐकून ती तशीच परत गेली.
       त्यांच्या बाजूला बसून तिला जेवण करायचं नव्हतं आणि नाश्ता केल्यामुळे भूक नव्हती. आता जेवताना तिच्या डोक्यात आलं होतं की, मेघाला कुणी सांगितलं ती पॅनिक झाल्यावर काय करायचं अगदी ट्रेनिंग घेतल्यासारखं ती वागली होती. नक्कीच मीराकाकूने तिला सांगितलं असावं, असं तिला वाटतं होतं. माधव काका तिच्याशी ती आल्यापासून काहीच बोलले नव्हते. सुरेश बाबा तर तिच्यासाठी कायम अनोळखी.
आज तिला कुणाशी बोलावं वाटत होतं, ती विचारातच उभी होती तोच माधव काकाने दारं ठोकलं.
"काका तुम्ही कधीपासून परके झालात माझ्यासाठी, इथली हवा लागली की काय?"
"जिथे बाप परका झालाय तिथे चुलत्याने काय अपेक्षा करावी." माधवकाकाच्या बोलण्याने ऋचा चमकलीच.
"काका, त्यांच्यात आणि तुमच्यात किती फरक आहे, माहितीय तुम्हाला?"
"हे तू विचारतेयस ऋचा मला, जन्मापासून बघितलंय मी माझ्या भावाला आणि मी ओळखत नाही." माधव म्हणाले तसं ऋचा त्यांच्याजवळ जात म्हणाली.
"काका काय झालंय आज तुम्हाला, तुम्ही असे का बोलताय माझ्याशी? "
"बऱ्याच वर्षांपासून वाटायचं बोलावं पण तुला काही होऊ नये म्हणून आणि मीरा म्हणायची म्हणून चूप बसलो, पण आज तुझं त्यांच्याशी असं तुटक वागणं, त्यांना समोर बघून न बोलता, न जेवता निघून येणं आणि त्यावर त्यांचं खचणं, म्हणून बोलावं वाटलं एकदा."
माधव काका तिथे बसत म्हणाले.
"तुम्हाला माहितीय आहे काका मला तो विषय नाही आवडत." ऋचा निग्रहाने म्हणाली.
"किती दिवस तुला आवडत नाही म्हणून चूप बसायचं. तुला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी सहन करायचं? सगळं गमावून कितीदा त्यांनी भक्कम उभं राहायचं." माधव काका जरा चिडून म्हणाले.
"चोवीस वर्षाची झालीस तू, दहा वर्षांनी आलीयेस इकडे, या दहा वर्षात तुला तू काय गमावलं तेच दिसलं पण कुणीतरी सगळं गमावूनही भक्कम असल्याचं भासवतंय ते बघायचंच नाहीये का तुला?" माधव काका उदासपणे म्हणाले.
ऋचाला भरुन येत होतं. आतापर्यंत ज्या व्यक्तीने कधी तिच्यावर आवाज चढवला नाही तो व्यक्ती आज तिच्याशी चिडून बोलत होती. तिने काकाच्या मांडीवर डोकं ठेवलं,
"का असं बोलताय काका, तुम्हीच म्हणता ना मी तुमची छकुली आहे, मग आज असं काय झालंय तुम्ही या छकुलीवर चिडला आहात?" ऋचा जड आवाजात म्हणाली.

"चिडलो नाहीये गं पण आज वाटतंय तुला खरं कळायला हवं होतं, तुला अंधारात ठेवून आम्ही खूप चूक केलीय. आज दादांशी तुझं वागणं बघून मलाच अपराधी वाटतंय, असं वाटतंय त्याच्या पोटचा गोळा मी हिसकावून घेतलाय." माधव भरल्या आवाजात बोलत होते आणि हे वाक्य ऐकून ऋचा धाडकन उठून बसली.
"हे असं का बोलतंय काका तुम्ही?"

"कारण मी निपुत्रिक आहे. मला स्वतःचं मुल होऊ शकत नाही." माधव काका उदासपणे शून्यात बघत बोलले.
"नाही काका, मी आहे ना, मी तुमचं बाळ, तुमची छकुली." ऋचा त्यांना समजावत म्हणाली.
"हॊ पण मुलं नसल्याचं, निपुत्रिक असल्याच दुःख मी जाणतो आणि आज मला वाटतंय, मी माझ्या सुखासाठी माझ्या भावाला निपुत्रिक करुन टाकलंय. जन्मदाता आहे गं तो तुझा, तरीही आज हॉस्पिटलमध्ये बेचैन होऊन धावत येणाऱ्या त्याला सोडून तू मला मिठी मारलीस. त्याच्या बाजूला बसून जेवताना तू अर्धवट उपाशी राहिलीस.
मनातून तुटला गं तो ते पाहून आणि तुझं वागणं बघून मी... आम्ही प्रेम दिलं तुला पण तुझं प्रेम ज्याला मिळावं त्याचा हक्क मारुन."

"नाही काका, माझी आई केवळ त्यांच्यामुळे गेली, हे मी कधीच विसरु शकत नाही."

"तुझी फक्त्त आई गेलीय, त्याने काय काय गमवलंय याची माहिती तरी घेवून बघितली का तू कधी? उद्वस्त झालंय गं तो." माधव काका रागात म्हणाले.

"काय?" ऋचा आश्चर्याने म्हणाली.क्रमश:काय आहे सत्य? कळेल पुढील भागात...

©®पल्लवी चरपे

टीम =अहमदनगर 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//