अल्लड हे प्रेम जरासे (भाग - चोवीस)

Story Of A Girl Nisha... Who Had Stuck In Her Past But Needs To Lead The Present!

सिडचे शब्द ऐकून निशा त्याच्याकडे एकटक पाहत मनातल्या मनात म्हणाली, " एवढासा आहे हा सिड पण किती काळजी आहे ह्याला स्वतःच्या आईची! किती आणि काय काय निरखून पाहिलंय सिडने! आईचं सुख असो वा दुःख सर्व कळतं ह्याला... महत्त्वाचं म्हणजे किती समंजस व्यक्तीसारखं बोलत आहे हा! मला वाटलं होतं की, आज मी विराज काकांबद्दल सिडसोबत बोलली तर कदाचित सिड चिडेल, कदाचित तो रागावेल... मी काय विचार केला होता आणि काय निघालं? स्वतः सिड माझ्याकडून ती भेटवस्तू मागतोय अन् तेदेखील स्वतःच्या आईसाठी! आज सिडने खरंच माझी सारी मते खोडून काढली. " 


निशा मनातल्या मनात सिडचं अखंड कौतुक करत होती. तेवढ्यात सिड म्हणाला, " डार्लो, सांग ना! प्लीज! तू सांगशील ना आईला आणि काकांना... तू म्हणशील ना त्यांना कायम सोबत राहण्यासाठी... तू बोलशील ना त्या दोघांशी कारण तेव्हाच आई नेहमी खूश राहील. म्हणून प्लीज तू देशील ना मला हे गिफ्ट? प्लीज नाही म्हणू नकोस. "


                सिडला काकुळतीने विनंती करताना पाहून निशाचे डोळे अश्रुने डबडबले होते. तिने त्याला होकार दिला अन् तिने अलगद सिडला मिठीत घेतले व ती त्याचा लाड करू लागली. त्या दोघांचा संवाद दुरूनच ऐकणाऱ्या ए.के.चंही मन भरून आलं होतं शिवाय त्यालाही सिडचं कौतुक वाटत होतं.


                काही वेळानंतर सिडसोबत निशा कॅफेमध्ये गेली. तिथे अमेय, रोहिणी काकू, विराज काका तसेच नुकताच ए.के.ही येऊन बसला होता. सर्वजण चेष्टामस्करी करत होते. त्यांचे गप्पागोष्टी करणे सुरू होते. रोहिणी काकू खळखळून हसत होत्या. स्वतःच्या आईला विना दडपणाने खळखळून हसताना पाहून सिड खूष झाला आणि त्याने निशाला मुद्दा छेडण्याची खूण केली. 


निशाने हलकाच उसासा घेतला आणि ती रोहिणी काकू व विराज काकांना उद्देशून म्हणाली, " विराज काका आणि रोहिणी काकू, मी काय म्हणतेय, ते प्लीज ऐकून घ्या ना... " निशाच्या वाक्याला विराज काका आणि रोहिणी काकूंनी हुंकार भरला... पण ते दोघेही निशा नक्की काय बोलणार असावी, याचा अंदाज मनातल्या मनात घेऊ लागले. 


निशाने खोल श्वास घेतला आणि नंतर ती म्हणाली, " काकू, सिडने मला एक गिफ्ट मागितलंय! आणि ते गिफ्ट असं आहे की, तो तुम्हाला कायमस्वरुपी आनंदात बघू इच्छितो. त्यासाठी त्याचं असं मत आहे की! म्हणजे त्याने असे निरीक्षण केलेले आहे की, जेव्हा विराज काका तुमच्यासोबत असतात तेव्हा काकू, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद अद्वितीय असतो. त्याचबरोबर तुमच्यासोबत जेव्हा काका असतात तेव्हा तुम्ही जशा आहात तशा वावरता! तुमच्या चेहऱ्यावर निखळ भाव असतो. तुमच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद असो वा इतर कुठलाही भाव हा फसवा नसतो. म्हणूनच त्याला तुम्हा दोघांना एकत्र हसताना पाहायचंय. थोडक्यात, सिड आणि त्याच्या आईच्या विश्वात विराज काकांनी यावं, अशी त्याची इच्छा आहे. " 


निशाने एका दमात त्या दोघांना सिद्धांतची इच्छा सांगितली. तेवढ्यात विराज काका निशावर त्यांची धारदार नजर रोखून म्हणाले, " इट्स इम्पॉसिबल निशा! मला खरं सांग, तूच त्याचा ब्रेन वॉश केला आहेस ना? तू त्याच्याशी हे सर्वकाही बोलली आहेस ना? सिड लहान आहे त्यामुळे तो असा विचार करूच शकणार नाही. " 

" नाही काका, तुम्हाला गैरसमज होतोय. मी सिडला काहीच बोललेली नाहीये. त्यामुळे त्याचा ब्रेनवॉश करण्याचा मुद्दा तर कोसो दूर लांब राहिला. त्याने स्वतःच मला हे बर्थडे गिफ्ट मागितलंय. तुम्ही त्याला स्वतः विचारू शकता. " निशा नम्रपणे उत्तरली. 


विराज काका आणि रोहिणी काकू दोघेही सिडकडे एकटक पाहू लागले. त्यामुळे सिडने एक आवंढा गिळला आणि तो बळ एकवटून बोलायला सरसावला. तो त्या दोघांना उद्देशून म्हणाला, " निशा दी, योग्य बोलतेय आई आणि विराज काका! मी स्वतः तिला हे बर्थडे गिफ्ट मागितलंय. मला माहीत आहे की, तू सगळी खटाटोप माझ्यासाठी करतेस फक्त मला आनंदी ठेवण्यासाठी; पण तू हे का विसरतेस की, माझंही सुख तुझ्या सुखात आहे! खरं सांगायचं तर, मी तुला पाहिलंय कित्येकदा एकांतात रडताना, भूतकाळात वावरताना, त्या माणसासाठी झुरताना ज्याने कायम तुला गृहीत धरलं होतं पण खरंच मला वाटतं विराज काका नाही आहेत तसे... 


                तुला वाटत असेल की, मी लहान आहे आणि काहीही बरळतोय पण लहान असलो तरी बरंच ओळखायला शिकलोय. काकांसोबत तू तुझ्याही नकळत आनंदी असतेस. तुला त्यांच्यासोबत हसताना पाहून मला खरंच भारी वाटतं. शिवाय काका सुद्धा तुझी काळजी घेतात म्हणून तू भूतकाळाला आठवून नको शंका घेऊस त्यांच्या काळजीपूर्ण स्वभावावर... बाबांनी तुझ्यासोबत जे केलंय ते बदलता येणार नाही पण निव्वळ तोच विचार करण्यात काय अर्थ आहे? त्या निरर्थक माणसाने दिलेल्या त्या आठवणींना कवटाळून काय साध्य होणार आहे? त्यामुळे त्यातून तू बाहेर पड! स्वतःच्या भावनांची गफलत करू नकोस. नकोसा असलेला तो भूतकाळ तू वर्तमानाला सुखद करून पुसून काढ. उगाच गुंतागुंत न करता तुझ्या आयुष्यात सुखाला वाट मोकळी करून दे आई... इतरांचा विचार बराच केलास ना तू आता स्वतःकडे लक्ष देऊन बघ! निदान माझ्यासाठी तू तुझा विचार करून बघ. " सिडला एखाद्या मोठ्या व्यक्तीसारखं बोलताना पाहून तिथे हजर असलेले सर्वजण अवाक् झाले होते. 


" सिड काय बोलतोय तू? काहीही बरळू नकोस. नक्की कुठल्या चित्रपटाचे डायलॉग पाठ करून आला आहेस तू? " रोहिणी नजर रोखून बोलल्या. 


" आई, चित्रपटाचा डायलॉग नव्हे मी वास्तविक बोलतोय. मी ना काल्पनिक बोलतोय ना काहीही खोटं बोलतोय... आणि तूच शिकवलं आहेस ना मला की, चुक असलं तर खाली मान झुकवायला घाबरायचं नाही पण जर आपण खरे आहोत तर नजरेला नजर भिडवून आपलं मत मांडावं. मी ही अगदी तेच करतोय आणि तू सगळ्यांशी खोटं बोललीस तरी चालेल मला... पण निदान स्वतःच्या मनाशी तरी नको ना खोटं बोलूस.. 


                डोळे मिटून बघ, तुझ्या नजरेपुढे जी व्यक्ती येईल ती व्यक्ती नक्कीच विराज काका असतील! आणि तुझ्याही नकळत एक स्माइल येईल तुझ्या ओठांवर... बघ जरा! मिट डोळे! " सिडने बळेच रोहिणी काकूला डोळे मिटायला आग्रह केला. त्याच्या हट्टाखातर काकूंनी डोळे मिटले आणि खरंच, त्यांच्या डोळ्यापुढे विराज काकासोबत त्यांनी घालवलेले क्षण तरळले. शिवाय दरम्यान त्यांच्या ओठांवर स्मितही पसरले होते. 


थोड्या वेळानंतर रोहिणी काकूंनी डोळे उघडताच सिडने त्यांना विचारले," सांग आता, कोण आलं तुझ्या नजरेपुढे? "


रोहिणी काकू नजर चोरून घेत होत्या तेवढ्यात हट्ट करत सिड त्याच्या आईला म्हणाला, " आई! अगं, सांग ना... "


" सिड, बाळा! तू काय बोलतोय, हे तुला सध्या नाही पण कदाचित तू मोठा झाल्यावर कळेल. म्हणून आता सोडून दे हा विषय इथेच. तेच योग्य आहे. उगाच मुद्दा ताणून घेण्यात अर्थ नाही. " रोहिणी काकू निर्विकार चेहरा करून म्हणाल्या. 

" आई, मला कळतंय की, मी काय बोलतोय! शिवाय मी मोठा झाल्यावरही माझं हेच मत असणार आहे. त्याचबरोबर मला भविष्यात ही खंत करायची नाहीये की, मी आईला कन्व्हिन्स करू शकलो नाही; म्हणून मला माझ्या परीने प्रयत्न करू दे आणि तू सुद्धा जाणून घे की, मी माझ्या मतावर ठाम आहे आणि कायम असणार! सिच्युएशन कॅन बी चेंज बट माय ऑपिनियन कान्ट! " सिड त्याच्या मतावर ठाम राहिला. त्याचं उत्तर जाणून घेतल्यावर सर्वजण आश्चर्याने सिडकडे पाहू लागले. सगळ्यांनाच सिडच्या विलक्षण मताचा आदर वाटत होता आणि त्याच्या समजुतदारपणाचं नवलही! शिवाय तिथे उपस्थित कुणीच मायलेकांच्या संवादात उडी घेत नव्हतं. फक्त त्या दोघांना संवाद साधायला मोकळीक देऊन ते दोघांचेही मतमतांतरे जाणून घेत होते. 


क्रमशः

....................................................... 

©®

सेजल पुंजे.


🎭 Series Post

View all