अल्लड हे प्रेम जरासे (भाग-एकवीस)

Story Of A Girl Nisha...

ए.के. आणि अमेयची बोलती बंद करून निशा अमेयला उद्देशून म्हणाली, " अम्या, मी बोलली होती ना तुला विराज काकांबद्दल तर माझा अंदाज अगदीच खरा ठरला. अप्रत्यक्ष का होईना पण काकांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आणि महत्त्वाचं म्हणजे याचा साक्षीदार स्वतः ए.के. आहे. म्हणून आता आपल्यापुढे एक टास्क आहे आणि तो म्हणजे रोहिणी काकूंकडून कबुली घेणे. हे काम थोडं जास्तच अवघड आहे पण करावंच लागेल कारण काकांच्या बाबतीत मला ज्या गट फिलींग्ज होत्या त्याच मला रोहिणी काकूंबद्दल जाणवतात. त्यामुळे माझ्या मनाला थोडी का होईना पण शाश्वती आहे की, कदाचित काकूंनाही काकांबद्दल भावनिक ओढ आणि प्रेम आहे. त्यामुळे काकूंचं मत जाणून घेणे गरजेचे आहे आणि मी काही ट्रिक्स वापरून त्यांच्याकडून वदवून घेईल; पण मला वाटतंय की, त्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे आणि याची आमोरसामोर कबुली देण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार आहेत कारण ते दोघेही पुढाकार घेणार नाहीत. 


                थोडक्यात, आपण इनिशिएटिव्हली घेतलं नाही तर कदाचित ते कधीच व्यक्त करणार नाहीत. हे माझं निरिक्षण आहे. आता यावर तुम्हा दोघांचं काय मत आहे? म्हणजे आपल्याला काय करता येईल जेणेकरून ते दोघेही इनिशिएटिव्ह घेऊन त्यांचं प्रेम एकमेकांपुढे कबूल करतील? आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दोघंही मला या मिशन विरोहिणीमध्ये मदत करणार आहात की नाही? "  


" यार, निशू! विश्वासच होत नाहीये की, तुझा अंदाज खरा ठरलाय पण खूष आहे मी खूप ही बातमी ऐकून! बाय द वे, मिशन विरोहिणीमध्ये मी देखील सामील आहे आणि मला वाटतं की, ए.के. ही नकार देणार नाहीये; कारण त्याच्याकडे नाही म्हणायचा पर्यायच नाहीये ना! थोडक्यात काय तर, कुछ पाने के लिए कुछ ना कुछ करना पडता है! हो ना ए.के.? बरोबर बोलतोय ना मी? "अमेय ओठातलं हसू दाबून म्हणाला.  


" अं... हो! निशा मी देखील सहभागी आहे या मिशन विरोहिणीमध्ये! " ए.के.ने त्याचा निर्णय ऐकवताच त्या तिघांनी एकमेकांना टाळ्या दिल्या. 


                थोड्या वेळातच प्रार्थनेची घंटा वाजली. सर्वजण प्रीमायसेसमध्ये एकत्र जमले. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना वगैरे आटोपताच सर्व शिक्षकवर्ग आपापल्या लेक्चर्सला निघून गेले. त्या दिवशी सर्वजण दिवसभर शाळेतील कामात व्यग्र होते; त्यामुळे लेक्चर घेतानाच दिवस कसा निघून गेला, याची जाणीव कुणालाही झाली नाही. पाच वाजता शाळा सुटताच निशा, अमेय आणि ए.के. हे तिघेही स्टाफरूममधून बाहेर पडणार होते पण त्याआधी निशाने अमेयला विराज काकांच्या कॅफेमध्ये भेटायला सांगितले. त्यानेही लगेच होकार दिला. कॅफेत जाण्याचा प्लॅन ठरवून झाल्यावर ए.के. आणि अमेय पार्कींगच्या दिशेने वळले. त्यांच्या मागोमाग निशाही जाऊ लागली. पार्किंगमधून बाईक काढून घेत त्याने बाईक स्टार्ट केली व नंतर त्याने निशाला बाईकवर बसण्याचा इशारा केला. इशारा कळताच बसली. त्यानंतर दोन बाईक मध्ये थोडे अंतर ठेवून अमेय आणि ए.के. बाईक ड्राईव्ह करू लागले. 


                साधारण वीस मिनिटांनी त्यांच्या बाईक्स कॅफेजवळ थांबल्या. निशा ए.के.च्या बाईकवरून खाली उतरली आणि तिने त्या दोघांनाही कॅफेमध्येच बसायला सांगितलं व ती स्वतः मात्र लगबगीनेच नर्सरीमध्ये रोहिणी काकूला भेटायला गेली. ती नर्सरीमध्ये जाताच तिथे तिला सिड दिसला. त्याला तिने खेळायला जायला सांगितले. तो देखील अगदी शहाण्या मुलासारखा गपगुमान खेळायला गेला. तो जाताच निशाने तिचा मोर्चा रोहिणी काकूकडे वळवला.


तिला पाहताच रोहिणी काकूंनी नेहमीच्या अंदाजात विचारले, " अगं निशा कशी आहेस? तब्येत वगैरे ठीक आहे ना तुझी? " 


" हो मी ठिक आहे काकू! धडधाकड आहे अगदी! तुम्ही सांगा, तुम्ही बऱ्या आहात ना? काल तुम्ही नव्हत्या ना इथे तर कळलं मला सिड कडून की, तुम्हाला बरं नव्हतं. आता ठीक आहात ना! " निशानेही हसून प्रतिसाद दिला अन् नंतर ती देखील ख्यालीखुशाली विचारू लागली.


" अगं बाळा, फारसं काही झालं नव्हतं. थोडीशी कणकण जाणवत होती आणि जरा थकवा जाणवत होता. त्यामुळे सिडचा स्वभाव तर माहिती आहेच तुला! त्याने मला ताकीद दिली आणि आराम करायला बजावलं. त्याचा आग्रह पाहता मी निमूटपणे त्याचं मन राखण्यासाठी म्हणून घरीच होती आराम करत! " रोहिणी काकू बोलल्या. 


" अच्छा! " निशा मंद हसून उत्तरली. 


" हो ना! तुला काय सांगू, ह्या सिडचं कौतुक! तुला तर माहिती आहेच की, माझा सिड किती गुणी आहे! खूप शहाणं आहे गं माझं बाळ! कधीच हट्ट करत नाही, विनातक्रार मी म्हणेल तसं वागतो. हुज्जत न घालता सगळं निमूट ऐकतो. त्यात तुझंही सगळंच ऐकतो. खरंच तुझ्यामुळेही मला बराच आधार मिळालाय गं! अन्यथा एकट्या आईने एका मुलाला वाढवायचं म्हटलं की, कठीणच असतं. " रोहिणी काकू भावूक होत बोलल्या. 


" नाही ओ काकू, असं काहीच! मला उगाच श्रेय देऊ नका. शिवाय असं बोलून तुम्ही मला परकं करत आहात; कारण हे असे आभाराचे आणि कृतज्ञपणाचे बोल परक्यांसाठी वापरले जातात! महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही कुठे एकट्या आहात ओ काकू! आम्ही आहोतच की सोबतीला! मी आहे आणि विराज काकाही आहेत. " निशा ओठाचा चंबू करत बोलली. 


" निशा, तुला कसं बरं परकं करेल मी! मी तर सहज तुझं कौतुक करत होती. कृतज्ञता वगैरे व्यक्त करत नव्हतीच! शिवाय तू परकी नाहीस तू माझी हक्काची छकुली आहेस. " रोहिणी काकू बोलल्या आणि त्यांनी लगेच निशाला मिठी मारली व तिच्या गालाचा पापा घेतला. 


त्यानंतर थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या दोघींनीही! त्यानंतर निशाने हळूहळू मुद्द्याला हात घालायला सुरुवात केली. ती रोहिणी काकूंना उद्देशून म्हणाली " काकू, ऐका ना... मला ना जरा महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी! " 


" हो, बोल ना... " रोहिणी काकू म्हणाल्या. 


" मला ना त्यादिवशी हा कागद खाली पडलेला दिसला. मी तो उचलून पाहिला तर त्यावर काहीतरी महत्त्वाचं लिहिलेलं दिसलं. बघा बरं जरा आणि सांगा मला की, हा तुमचाच आहे की नाही? कारण यावर जी हॅंडरायटींग आहे ती तुमचीच आहे. त्यामुळे कदाचित होऊ शकतं की, हा कागद महत्त्वाचा असेल आणि नकळत खाली पडला असेल, असं मला वाटलं म्हणून मी हा जपून ठेवला नि आज तुम्हाला दाखवतेय. " निशाने तिच्या बॅगमधून एक कागद काढला आणि तो रोहिणी काकूला दिला. 


" बरं, दाखव बघू मला तो कागद! मी कधी महत्त्वाचे कागद अस्ताव्यस्त ठेवत नाही पण नजरचुकीने झाले असेल कदाचित! " रोहिणी काकू बोलल्या आणि नंतर निशाने दिलेला कागद हातात घेऊन त्यावर लिहिलेले शब्द वाचू लागल्या. त्यात लिहिलं होतं- 


" वेड्या मना, 


तुझ्या निरुत्तर प्रश्नांची उत्तरं मजजवळ नाही, 

माझ्या प्रश्नांचीही उत्तरे सारीच निरुत्तर राही... 

बंधन रहित असतं शाश्वत हे प्रेम, 

परंतु स्विकारणार नाही जग हे सत्य जेमतेम... 

याउलट प्रीतीस माझ्या कलंक ठरवतील सारे, 

मृदू नात्यासभोवती वाहतील कठोरतेचे वारे... 

प्रेमाची या जग हे घेत आलंय सातत्याने परीक्षा, 

विधात्यानेही माझ्याच नशिबी लिहिलीय सदा प्रतिक्षा... 

म्हणून मनाचा हिय्या करून राहणार मी अव्यक्त,

कारण लोकांच्या नजरांचा पहारा असतो सक्त... 

फुल फुलण्याआधी समाज चिरडेल प्रीतीची कळी, 

जग स्वहस्ते घेईल चव्हाट्यावर माझ्या प्रेमाचा बळी... 

अपूर्ण प्रेम आमचे ठरेल जगासाठी चर्चेचा विषय, 

कायमस्वरूपी आमचं प्रेम हद्दपार होईल निःसंशय... 

आमच्या प्रेमाची अग्निपरीक्षा जगासाठी ठरेल तमाशा, 

स्वप्नांच्या राखरांगोळीने समाजात पिकेल हशा... " 


                काकूंनी त्या कागदावर लिहिलेले शब्द वाचताच त्या थोडा वेळ शांतच बसून राहिल्या. त्यांना शांत झालेले पाहून निशा काकूंना हाक मारू लागली; परंतु काकूंचं लक्ष नसल्याने त्या प्रतिसाद देत नव्हत्या. 





क्रमशः


....................................................................


©®

सेजल पुंजे. 


🎭 Series Post

View all