अल्लड हे प्रेम जरासे (भाग-१४)

Anokhi Kahani

" काका, मग तुम्ही कोणता निर्णय घेतला? " निशाने न राहावून विराज काकांना विचारले. 


काकांनी उसासा घेतला आणि ते पुढे बोलू लागले, " सर्वजण मला एकच गोष्ट सुचवत होते त्यामुळे मी एकदा सहज विचार केला, सगळ्यांच्या बोलण्याचा... मी स्वतःलाच प्रश्न विचारले की, आतापर्यंत मी देशासाठी स्वतःला वाहिलं पण घरच्यांचं काय? त्यांच्याही अपेक्षा असतीलच मग त्या अपेक्षा कोण पूर्ण करणार? घरातला एकुलता एक मुलगा पण एक मुलगा म्हणून मी माझं कर्तव्य खरंच निभावलंय? देशाची सेवा करून कदाचित मी त्यांच्या डोळ्यात स्वतःसाठी अभिमान जागवला असेलही पण एक मुलगा या नात्याने कधीतरी त्यांच्यासोबत दोन सुखद क्षण घालवले? एवढंही करून त्यांनी कधीच तक्रार केली नाही पण जर ते आता उतारवयात माझ्या सोबतीची, आधाराची अपेक्षा करत असतील तर त्यात गैर काय आहे? 


               अशा कित्येक प्रश्नांच्या उत्तरांनी मला आरसा दाखवला होता. त्यामुळे मला प्रकर्षाने जाणवलं की, एक मुलगा म्हणून कर्तव्य पार पाडण्यात मी खरंच अपयशी ठरलो होतो. म्हणून मला परत त्याच चुकांची पुनरावृत्ती करणे टाळायचे होते अन् त्यासाठी माझ्या आई-बाबांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं मी माझं नैतिक कर्तव्य मानलं अन् मी ध्यास घेतला आई-बाबांना कायम सुखात ठेवण्याचा... एकट्यानेच मनोमन चर्चा करून शेवटी मी माझा निर्णय घेतला व कायमस्वरूपी फौजेला राम राम ठोकून माझा राजीनामा दिला; पण राजीनामा दिल्याबद्दल मी घरी कळवलं नाही. कारण अर्थातच मला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं.


                त्यांच्या चेहऱ्यावरील तो आनंद स्वतः अनुभवायचा होता. शिवाय बरेच दिवसापासून मी मनोमन ठरवलं होतं की, जान्हवीशी जुळवून घ्यावे, नात्याला नवी कलाटणी द्यावी, वैवाहिक आयुष्याला सुरुवात करावी. त्याचबरोबर मला तिला प्रत्यक्षात भेटून तिला सांगायचे होते की, मला तिचा अल्लडपणा भावतो. ती ज्याप्रकारे एकटीने घराची जबाबदारी पार पाडते त्यासाठी माझ्या मनात तिचं खूप स्पेशल स्थान आहे. माझं तिच्यावर प्रेम आहे, हे सर्वकाही सांगायचं होतं मला प्रत्यक्ष भेटून... तिची माफी मागायची होती, तिच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधायचा होता अन् त्याचबरोबर जे झालं ते झालं आता नव्याने सुरुवात करायची, हे वचनही तिला द्यायचं होतं व निभवायचं होतं. यासाठीच राजीनामा देऊन व ती बातमी सरप्राईज ठेवण्याचे निश्चित करून मी पहिलं पाऊल उचललं होतं नवीन सुरुवात करण्याच्या ध्यासाप्रती! 


                प्रवासादरम्यान माझ्या निर्णयाने मी खूप खूश होतो. त्यामुळे मी इतरत्र कुठेही भटकंती न करता घर गाठलं. घरी पोहोचताच अनामिक शांतता जाणवली होती. एरवी जाणवणारी हालचाल, धावपळ सर्व जणू स्थगित झाले होते कारण घरी कुणीच नव्हतं. घरी काम करणाऱ्या शारदा मावशीने सांगितलं की, सगळे दवाखान्यात गेले आहेत; कारण जान्हवीला ऍडमिट केलंय. 


                ते ऐकताच मी पुरता ब्लॅंक झालो पण तरीही मी मावशींना विचारण्याचा प्रयत्न केला परंतु त्या एवढंच बोलल्या की, जान्हवीला चक्कर आली होती म्हणून आई-बाबा तिला इस्पितळात घेऊन गेले आहेत. एकाएकी कानावर ती बातमी आल्याने मला सुचेनासे झाले होते. अगदी धक्कादायक प्रकार होता तो... मनात हुरहूर होती पण का कोण जाणे मी ते कॅज्युअली घेतलं. मी फार दिरंगाई केली. अगदी निश्चिंतपणे फ्रेश होऊन इस्पितळात गेलो कारण मला वाटलं होतं की, एखाद्या तात्पुरत्या कारणामुळे अर्थात तिच्या धावपळ करण्याच्या स्वभावामुळे तिने गरजेपेक्षा जास्त काम केल्याने चक्कर आली असावी. जान्हवीची काळजी नव्हती अशातला भाग नव्हता पण तिची काळजी घ्यायला तिच्यासोबत आई-बाबा असल्याचे समाधान होते. 


                इस्पितळात पोहोचताच मला पाहून आईचा सहनशीलतेचा बांध फुटला आणि ती मला मिठी मारून धाय मोकलून रडू लागली. मला कोणी काहीच सांगायला तयार नव्हतं. वातावरण फारच गंभीर होतं. मी प्रत्येकाला प्रश्न विचारत होतो पण सर्वजण उत्तरादाखल फक्त रडत होते. तिथे जान्हवीचे आई-बाबा आणि दादा-वहिनीसुध्दा आले होते. एवढ्या सगळ्यांचं तिथे हजर असणं मला विषयाचं गांभीर्य सांगून गेलं; पण तरीही स्वतःला खंबीर ठेवून नेमकं काय झालं आहे, याचा अंदाज घेणं कठीणच होतं. मी बराच वेळ तिथे उपस्थित सगळ्यांना विचारपूस करत होतो पण कुणी काहीच बोलत नव्हते. माझा गोंधळ उडालेला पाहून बाबाच मला एका कोपऱ्यात घेऊन गेले आणि त्यांनी मला सांगितलं की, जान्हवीला लास्ट स्टेजचा ब्रेस्ट कॅंसर आहे. बाबा बोलले की, जान्हवीला याबाबत पूर्वकल्पना होती पण वेळीच तिने योग्य ट्रीटमेंट करून घेतली नाही. शिवाय घरीही सगळे तिच्या प्रतिकुल तब्येतीबद्दल अनभिज्ञ असल्याने ती परिस्थिती उद्भवली होती अन् त्यामुळेच ती इस्पितळात भरती होती. 


                एकाएकी त्रास असह्य झाल्याने तिला कळ गेली आणि ती बेशुद्ध होऊन पडली. इस्पितळात आणल्यावर आई-बाबांना त्या सत्याची जाणीव झाली होती. शिवाय डॉक्टर त्यांना बोलले की, ऑपरेशनसाठी बराच उशीर झाल्याने उपचार करणे व्यर्थ आहे. " विराज काका भावूक झाले होते. 


थोडा वेळ विसावा घेऊन ते पुढे बोलू लागले. ते म्हणाले, " बाबांकडून इत्थंभूत वार्ता कळताच मी भांबावून गेलो होतो. क्षणार्धात असं वाटून गेलं की, माझ्या हातातून खूप काही सुटतंय अन् माझा श्वास गुदमरतोय. माझ्या डोक्यात बाबांनी बोललेले वाक्य फिरत होते. मी क्षणार्धात तिथल्याच बाकावर डोकं पकडून बसलो सगळ्या घडून गेलेल्या घटनांचा पाढा वाचत... "


क्रमशः

.......................................................... 


©®

सेजल पुंजे. 

🎭 Series Post

View all