अल्लड हे प्रेम जरासे (भाग-१)

भूतकाळ आणि वर्तमान काळात अडकलेली निशा! जिला आस आहे तिचा हात कधीच न सोडणाऱ्या तिच्या जोडीदाराची.. जो तिच्या भूतकाळासह तिला स्विकारणार, जो प्रेमाचा दिखावा न करता खरंखुरं प्रेम करणार.. पण काय होईल जर निशाचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ एकमेकांपुढे आले तर जर फक्त दोनपैकी एक निवडायचं असेल तर काय निवडेल ती भूतकाळ की वर्तमान.. काल मध्ये अडकून राहणार की आज मध्ये जगणार... प्रश्न अनेक आहेत तर उत्तर ही मिळेलच..

               निशा अर्थात रजनी, तमिस्त्रा, यामिनी, विभावरी म्हणजेच रात्र अन् खरंच रात्रीच्या प्रत्येक छटा निशाच्या स्वरूपात दिसायच्या. नाकंडोळी तशी ती सुंदरच! गोरा वर्ण, आकर्षक डोळे, चाफेकळी नाक, कोरीव भुवया, नाजूक ओठ अन् खांद्यापर्यंत रुळणारे काळेभोर केस. विशेषतः ती तेजस्वी तर होतीच पण तिच्या सौंदर्यात भरीस भर पडायची ती तिच्या चेहऱ्यावर चार चांद लावणाऱ्या, नेहमीच गुलाबाच्या पाकळीप्रमाणे उमलणाऱ्या स्मितलहरीने... 


                ती स्वभावाने मुळातच शांत अशी... एकांतात जास्त रमणारी असली तरी ती लाजरीबुजरी मुळीच नव्हती; पण तिच्या व्यक्तिगत आयुष्यात कुणी लुडबुड केलेलं तिला पटायचं नाही. तिच्यासाठी तिची प्रायव्हसी खूप महत्त्वाची होती. मनमोकळी होतीच ती यात दुमत नाही. फक्त मुद्दा एवढाच होता की, ज्याच्याशी तिची मैत्री आहे वा ज्या व्यक्तीशी ती हक्काने बोलू शकते अशा लोकांशीच ती जास्त मनमोकळेपणाने वागायची. जेणेकरून तिच्या वागण्याचा कुणा गैर व्यक्तीला त्रास होणार नाही; म्हणून बोलताना ती भान ठेवून अन् मोजून- मापून बोलायची. शिवाय नाती जपण्यातही ती अगदी चोख होती. 


                मैत्री करताना अन् केलेली मैत्री निभावताना तिने कधीच कोणते बंधन ठेवले नाही. ती प्रत्येकाशी माणूस म्हणून वागायची, एखाद्या व्यक्तीला जास्त महत्त्व देऊन दुसऱ्या व्यक्तीचा निरादर करणं तिच्या तत्वात कधी बसलंच नव्हतं. थोडक्यात, मैत्री मित्राशी असो वा मैत्रिणीशी ती सगळ्यांशीच आपुलकी, जिव्हाळा अन् प्रेमाने वागायची. मित्र असो वा मैत्रीण त्यांच्यात कुठलेही अंतर वा फरक तिने मानला नाही; पण मैत्रीच्या नात्यावर कुणी प्रश्नचिन्ह उठवावे, असेही ती वागायची नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच की, तिला मर्यादांचीही तेवढीच जाणीव होती. 


                मुख्य म्हणजे प्रेमावर तिला अमाप विश्वास होता; पण अनंत प्रेम करत असल्याची दवंडी घालून ऐनवेळी साथ सोडून पळून जाणाऱ्या तथाकथित प्रेमवीरांची तिला भयंकर चीड होती. म्हणून ती एक गोष्ट कायम म्हणायची, " माझा प्रेमावर विश्वास आहे पण प्रेम करणाऱ्यांवर नाही. " कदाचित असे विधान करण्यामागे तिच्याकडे वाजवी कारणही होते अन् ते कारण म्हणजे पावलोपावली फसव्या प्रेमाचे आलेले स्वानुभव! 


                मुद्द्याचे बोलायचे झाल्यास, ती महाविद्यालयीन शिक्षण घेत होती तेव्हापासून ते आतापर्यंत कित्येक मुलांनी तिला प्रपोज केलं होतं पण प्रेम कबुली देणाऱ्या त्या असंख्य चेहऱ्यांपैकी कुणीच तिच्यावर खरं प्रेम केले नव्हतेच कधी... म्हणून तर ती अद्याप सिंगल होती! त्यातही प्रत्येक मुलांनी स्वतःचे गुणदोष झाकून कायम तिच्या अस्तित्वावर बोट उचलण्याचाच प्रयत्न केला अन् तिच्या अस्तित्वावर बोट उचलण्यामागे निमित्त होतं ते तिच्या भूतकाळाचं... 


                तिचा भूतकाळ म्हणजे एवढाही विदारक होता असं काही नाही; पण तिच्या आयुष्यात तिच्या भूतकाळाला विशेष महत्त्व होतं. तिचा भूतकाळ असा की, ती माध्यमिक शाळेत शिकत असताना आदित्य नावाच्या एका मुलावर तिचं प्रेम होतं. त्या लहानशा वयात बरीच स्वप्न पाहिली होती तिने; पण त्याच्यापुढे ती कधीच व्यक्त झाली नाही. दुसरे असे की, तो देखील दहावी बोर्डच्या परीक्षेनंतर कुठे गेला, याविषयी कुणालाच काही थांगपत्ता नव्हता. महत्त्वाचे म्हणजे, निशाने त्याच्याबद्दल विचारपूस करून माहिती काढण्याचा प्रयत्न केला तरी तिला फारशी उपयुक्त माहिती मिळालीच नाही; म्हणून प्रत्येक वेळी तिच्या हाती यायची ती फक्त नि फक्त निराशा... कारण कुणालाही खबर न देता, न कळवता, न सांगताच आदित्य जणू वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे निशाच्या अन् किंबहुना सगळ्यांच्याच आयुष्यातून निघून गेला होता; म्हणूनच कदाचित तिचं ते प्रेम अपूर्णच राहिलं होतं.


                तिच्या मनात एक गोष्ट कायम फिरत राहायची की, जी भावना तिला आदित्यबद्दल होती अगदी तीच भावना त्याचीही तिच्याबद्दल असावी. कदाचित त्या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते असावे पण ना त्याने कधी पुढाकार घेतला होता ना तिने; म्हणून आदित्य आणि त्याच्याविषयी वाटणाऱ्या भावना वा प्रेम जणू तिच्यासाठी आताशः न सुटणारे कोडे बनून राहिले होते... मुख्य म्हणजे सर्व अनुत्तरित प्रश्नांचे उत्तर मिळणार तरी कसे? कारण तिला ज्या वयात प्रेमाचा अर्थ उमगला होता ते वयंही उनाडच होतं. त्या वयात खऱ्याखोट्याची कुणाला जाण असते? कुणालाच नाही... म्हणूनच तर आकर्षणाला प्रेम आणि प्रेमाला आकर्षण समजून कायम पेचातच अडकलेली असतात पौगंडावस्थेतील मुलं! मग याला निशा आणि आदित्यही अपवाद ठरणार कसे? पण तरीही का कोण जाणे अव्यक्त राहिल्याची सल निशाच्या मनाला कायम बेचैन करायची. 


                निशाला बरेचदा असेही वाटायचे की, कदाचित आदित्य तिला शाळेतला एखादा चेहरा समजून वा फक्त भूतकाळ समजून विसरला असावा. कदाचित त्याच्या आयुष्यात निशाचे स्थान भूतकाळात असावे; म्हणून तर तो कधी परत आला नसावा. हे असे विचार करून तिचे मन नेहमीच खिन्न व्हायचे पण तरीही निशा आदित्यला विसरुच शकली नाही; कारण एखाद्याने आपल्यावर प्रेम करावे की करू नये, हे आपल्या हातात नसलं तरी आपण कुणावर प्रेम करावे, तो सर्वस्वी आपलाच निर्णय असतो. म्हणूनच निशा कायम आदित्यवर अन् त्या जुन्या आठवणींवर जीव ओवाळून टाकायची. 


                कधीकधी एखाद्या क्षणी तिचं मन म्हणायचं की, कदाचित आदित्यबद्दल तिला फक्त आकर्षण असावं, तो तिचं पहिलं प्रेम नसून निव्वळ एक क्रश असावा. तिला आदित्यबद्दल जाणून घेण्याची वा त्याच्या सहवासाची केवळ ओढ जाणवत असावी पण ती ओढ प्रेमाची परिभाषा नसावी... पण लगेच तिच्या मनातील हे द्वंद्व मिटायचे, जेव्हा आदित्यला आठवताच तिच्या ओठांवर स्मित विराजमान व्हायचं; तेव्हा असंख्य गुंतागुंतीच्या प्रश्नांनाही आपोआप उत्तर मिळायचं. म्हणून वेळेपरत्वे निशाच्या मनातील आदित्यप्रती असणाऱ्या भावना वा निस्सीम प्रेम यात तसूभरही कसर झाली नाही उलट वाढंच होत राहिली अन् कळत-नकळत आदित्य निशाचा फक्त क्रश नसून तिचं पहिलं प्रेम होतं, हेच तिच्या हृदयाने सिद्ध केलं.


                शाळेत अनुभवलेला तिचा तो सुंदर काळ, तिचा तो एकतर्फी प्रेम प्रवास तिने शाळेत अनुभवल्याने शाळेशी तिची एक नाळ जुळली होती. म्हणूनच तिच्या अन् तिच्या एकतर्फी प्रेमाच्या आठवणी नेहमीच जपल्या जाव्यात, त्या चिरतरुण राहाव्यात, त्या आठवणींना हृदयात साठवावे अन् त्या आठवणींसह तिला उभं सुखात व्यतित करता यावं म्हणून तिने कित्येक गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या धुडकावून लावून दिल्या व तिने तिच्या शाळेतच शिक्षिका म्हणून नोकरी करणं पसंत केलं. 


                तिचा हा एकतर्फी प्रेम प्रवास म्हणा किंवा तिच्या आनंद व समाधानाचे उगम असलेल्या त्या शाळेबद्दल वा तिच्या त्या सुवर्ण आठवणींबद्दल कुणाला काहीच माहीत नसल्याने तिचे असे एखाद्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करणे बहुतेकांच्या संशयाला खतपाणी घालणारे होते. कधी ना कधी प्रत्येक जण तिच्या पेशाविषयी प्रश्नचिन्ह उचलायचे; पण त्यावरही निशा अगदी नम्रपणे उत्तर द्यायची व म्हणायची, " या इथे कमी पगाराच्या नोकरीत जे समाधान आज मला मिळतंय ना कदाचित ते लठ्ठ पगाराच्या नोकरीत कधीच मिळालं नसतं! म्हणून मी जे करतेय त्याविषयी मला कधीच पश्चात्ताप वाटत नाही कारण मी देदिखाऊ हसत नाही माझ्या चेहऱ्यावर हसू पहुडलेलं असतं कारण मी मुळातच खूश आहे. " तिच्या या उत्तराने प्रश्न विचारणारा आपसूकच चिडीचूप व्हायचा. 


                खरं पाहता आजही तिच्या मनात तिच्या पहिल्या प्रेमाप्रति ज्या भावना होत्या वा जे स्थान होते ते स्थान इतर कुणीही व्यक्ती तिच्या आयुष्यात येण्याने वा न येण्याने बदलणार नव्हते अन् हेच वास्तव होते. या सत्यापासून ती अवगत होती म्हणून ती त्या सत्याची जाणीव तिला प्रपोज करणाऱ्या मुलांनाही करवून द्यायची... पण तिचा हा भूतकाळ जाणून घेतल्यावर कुणीच तिच्या भूतकाळाला स्वीकारण्याचा प्रयत्न करू शकत नव्हते; कारण त्यांची इच्छा असायची की, आदित्यबद्दल तिच्या मनात असणारी जागा तिने त्या व्यक्तीला द्यावी अन् हेच निशाला खटकायचं... म्हणून जेवढे मुलं निशावर प्रेम आहे असे म्हणत तिच्या आयुष्यात झपाट्याने आले होते अगदी तेवढ्याच वेगाने ते सर्वजण पसार झाले. शिवाय निशाकडे परतून आले देखील नाही, त्याविषयी तिला साधी खंतही वाटायची नाही; कारण कुणीतरी कधीतरी तिला समजून घेणारा तिच्या आयुष्यात येईल, ही आस तिच्या मनात कायम जागी होती.


क्रमशः

..............................................................

©®

सेजल पुंजे. 


             

🎭 Series Post

View all