अल्लड हे प्रेम जरासे (भाग-६४)

Story Of Nisha And Her Past.
संपूर्ण भूतकाळ आठवून ए.के. थोडा भावूक झाला होता. तथापि, त्याने हळूच गालावर ओघळणारा अश्रूचा एक थेंब करंगळीने  पुसून घेतला पण निशाने त्याचा हात अडवून धरला.

ए.के.ने तिच्याकडे आश्चर्याने पाहताच ती त्याला म्हणाली, " ए.के. आज निदान त्या अश्रूंच्या साहाय्याने तरी व्यक्त होऊन मोकळा हो. नको अडवून ठेवूस त्या मनातील भावना. कधीतरी उद्रेक होण्याआधी आज सलोख्याने वाट मोकळी करून दे त्या आठवणींना. स्वतःला कुठल्याही बंधनात बंदिस्त नको करू. तू बोल आणि हो व्यक्त. मी आहे ऐकायला. "

थोड्या वेळाने ए.के.च्या गालावर हात ठेवून निशाने त्याला धीर दिला व पुढील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी विचारणा केली.

" त्यानंतर मी मेट्रिकची परीक्षा दिली. परीक्षा देऊन साधारण  तीन दिवस झाले होते. दरम्यान माझ्या बाबांना आजीने ब्रिटेनला बोलवून घेतले कारण तिथे व्यवसाय सांभाळण्यात प्रकृती खालावल्याने अडचण येत होती. आजीला सक्षम अशा मदतीची आणि सोबतीची गरज होती. त्यामुळे त्यांना तिकडे जाणे गरजेचे होते पण मला तिकडे जायचं नव्हतं. म्हणून मी बाबांना ब्रिटेनला शिफ्ट होण्याबाबत नकार दिला पण त्यांनी ऐकून घेतलं नाही. शिवाय आजीनेही शपथ दिली आणि अप्रत्यक्षपणे माझा नाईलाज झाला.

            अंततः माझ्या हाती काहीच नव्हतं कारण आजी आणि बाबा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. माझ्या आग्रहाला आणि माझ्या विनंतीला ते जुमानत नव्हते. सरतेशेवटी नाईलाजास्तव कुणालाही पूर्व खबर न देता मी बाबांसह ब्रिटेनला शिफ्ट झालो आणि तिथेच स्थायिक झालो. दहावीचा माझा निकालही बाबांनी आणला होता. खरंतर ब्रिटेनमध्ये नवी ओळख, नवीन कॉलेज हे सगळं काही नवीन होतं. मैत्री करण्याकरिता लिंगभाव आड येत नसायचा. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या अन् वैचारिकदृष्ट्या एक नवी सुरुवात होती ती माझ्यासाठी पण इतरही बाबी होत्या ज्यांची केवळ मलाच जाणीव होती.

माझ्यात आणि माझ्या रातराणीत आलेल्या त्या अनपेक्षित दुराव्याने मी फार कोलमडून गेलो होतो. काही प्रमाणात एकलकोंडेपणा अंगिकारला होता मी! एकीकडे अक्षरशः गोंधळ झाला होता माझ्या भावनांचा. दुसरीकडे नवीन माणसे आयुष्यात येत गेली. बरेच मित्र-मैत्रीणी भेटले पण माझी शाळा, शाळेतले वर्गमित्र आणि माझी 'रातराणी' यांची जागा कुणीच घेऊ शकले नाही.

किंबहुना, माझ्या रातराणीची उणीव गेल्या कित्येक वर्षात कुणीच भरून काढू शकलं नाही. थोडक्यात, तिच्यासारखी ती एकमेवाद्वितीय. शिवाय माझ्या त्या भावनांची वृद्धी होत राहिली. दुरावा असूनही माझं बालमन माझ्या रातराणीत अधिकाधिक गुंतून गेलं होतं. तिच्याप्रती वाटणाऱ्या भावना अन् अल्लड वयातले ते अल्लड प्रेम या हृदयात कायमस्वरूपी बहरत राहिले. तिच्या आठवणींच्या साहाय्याने मी ब्रिटेनमध्येच माझं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणातही मी तिला प्राधान्यता दिली. बालपणी एकदा तिच्या मैत्रिणीकडून मला कळलं होतं की, माझ्या रातराणीला संगीताची ओढ आहे.

तथापि, तिच्याखातर मी ही संगीताला आपलेसे केले. वेगवेगळ्या शिष्यवृत्त्यांच्या साहाय्याने आणि विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संगीतात प्राविण्य प्राप्त केले आणि ही आवड जपत लंडनच्या विद्यापीठात 'संगीत' शिकवत होतो. त्याचबरोबर बाबांना मदत करण्याकरिता वेळात वेळ काढून त्यांचा व्यवसाय सांभाळण्यातही व्यग्र होतो. सगळं सुरू होतं. दरम्यान बाबा आणि आजी माझ्या लग्नाचा आग्रह करू लागले. शिवाय त्यांनी माझं लग्न बाबांनी त्यांच्या एका मित्राच्या मुलीसोबत ठरवले होते पण मला ते मान्य नव्हते.

मला माझ्या रातराणीशिवाय इतर कोणत्याही मुलीचा विचार करायचा नव्हता आणि दुसऱ्या मुलीशी नाते निर्माण करण्याआधी माझ्या रातराणीचा शोध घ्यायचा होता. मला माझ्या पहिल्या प्रेमाचा शोध घेऊन तिच्यापुढे व्यक्त होऊन पाहायचं होतं. तिची भेट घ्यायची होती.

मागे वळून पाहताना मला मनात कसली सल राहू नये म्हणून अल्लड प्रेमाची कबुली माझ्या रातराणीला द्यायची होती. शिवाय माझं मन मला कायम खुणावत असायचं की, नक्कीच माझ्या रातराणील माझ्या परतीची अपेक्षा अन् भेटीची आतुरता असेल. म्हणूनच मी थोडं धाडस केलं. आजी आणि बाबांना एक वर्षाचा वेळ मागितला. स्पष्टपणे त्यांना विनंती केली की, एका वर्षात मला माझ्या इच्छेनुसार वागू द्यावे. कुठलेही प्रश्न वा कुठलीही बंधने न लादता. एक वर्षाचा काळ संपताच मी त्यांच्या आग्रहाला नकार देणार नाही. किंबहुना, त्यांच्या शब्दांना आज्ञा समजून सगळ्याचा स्विकार करणार. कधीच कशाचाही आक्षेप घेणार नाही मी फक्त निदान मला एक संधी द्यावी. 

                     सुरुवातीला त्या दोघांनीही थोडी कानकुन केली. माझ्या आग्रहाला दुर्लक्षित केले. मला हे सुद्धा सांगितले त्यांनी की, कदाचित तिने लग्न करून संसार थाटला असावा. अल्लड वयातले प्रेम केवळ हृदयात शाबूत ठेवले जाते आयुष्यात नाही. थोडक्यात, ज्याअर्थी भारताच्या मातीशी संबंध तुटून कित्येक वर्षे लोटली आहेत तर मला ज्या मुलीचा शोध घ्यायचा आहे तिची भेट घडणे अशक्यप्राय! त्यांचे नकारात्मक विचार माझ्या मनाचे खच्चीकरण करू शकले नाही.

मी माझ्या मतावर ठाम राहिलो. रणांगणात न उतरता हार मानून घेणे कधी पसंत नव्हतेच मला अन् माझ्या रक्तात ही पुढाकार घेतल्याविना माघार घेणे नाहीच, हे सगळं जेव्हा मी बाबांच्या डोळ्यात डोळे घालून बोललो आणि आजीलाही माझा दृढ निश्चय पटवून दिला तेव्हा त्या दोघांनी माझ्या मताचा आदर करत होकार दिला. " ए.के. आठवणींच्या हिंदोळ्यावर झोका घेत म्हणाला. त्या क्षणाला ए.के.च्या डोळ्यात निराळी चमक दिसून येत होती. ते पाहून निशाने हलकेच स्मित केले.

थोडा उसासा घेत तो पुढे म्हणाला, " बाबांना आणि आजीकडून एक वर्षाचा वेळ तर मी मागितला होता आणि त्यांनी समर्थनही दिले होते पण वास्तविक पाहता मला कशी सुरुवात करावी, हेच ठाऊक नव्हते. तरीदेखील मी आधी सोशल मीडियाचा वापर करत माझ्या रातराणीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला पण हाती निराशा आली. साधारण दोन ते तीन दिवसानंतर मला कळून चुकले होते की, तिला शोधायचं असेल तर लंडनमधून काहीच साध्य करता येणार नाही. त्यामुळे मी लगेच फ्लाइट बुक केली. तडकाफडकी झालो रवाना तेथून आणि गाठला भारत एकदाचा व ठेवला पाय या महाराष्ट्राच्या मायभूमीवर!

                  मुरूडला आल्यावर पहिल्याच दिवशी नकळतपणे तुझ्याशी अप्रत्यक्ष गाठ झाली. मी तुला याच समुद्राजवळ पाहिलं होतं अन् अनायासे तुझ्याकडे अक्षरशः तुझ्यात गुंतून गेलो. तुझी ओढ लागली होती या हृदयाला अगदी माझ्याही नकळत. यंदा मनाविरुद्ध काहीही करायचं नव्हतंच मला; म्हणून वागलो मनाप्रमाणे! तथापि, तू जिथे जिथे जात होतीस तिथे तिथे मी सुद्धा तुला पाहण्यासाठी वाऱ्याच्या झोक्याप्रमाणे वाहत गेलो पण योग्य वेळी स्वतःवर ताबा मिळवण्यातही यश आले होते. अर्थात जेव्हा कॅफेतून तू तुझ्या घरी जायला निघाली होतीस तेव्हा मी स्वतःला सावरलं आणि इथे जिला शोधायला मी आलो होतो त्यासाठी सज्ज झालो.


                 खरं सांगायचं तर, इथे येण्यामागील मूळ उद्देशाचा मला विसर पडला होता तुझ्यामुळे. निशा, माहिती नाही काय जादू आहे तुझ्यात पण जेव्हापासून तू भेटलीस ना तेव्हापासून जणू माझं भाग्य खुललंय. सगळं अगदी चांगलंच घडू लागलं. किंबहुना, तक्रार करण्यासारखं काहीच नव्हतं. देवाकडे साकडे न घालता त्याने माझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव केला असावा, असाच काहीसा अनुभव!

थोडक्यात, आपल्या शाळेत नोकरी मिळवायलाही मला अडचण आली नाही. चांगले सहकारी प्राध्यापक मिळाले. रोहिणी काकू आणि विराज काकांसारख्या वडीलधाऱ्यांचा आशिर्वाद लाभला. अमेयसारखा घनिष्ठ मित्र भेटला अन् तुझी सोबत लाभली. अर्थात जे जे घडत गेले त्याची खबर तर तुला आहेच. म्हणूनच माझ्या मनात अन् या इवल्याशा हृदयात तुझ्याप्रती प्रेम कधी बहरू लागलं व वाढत गेलं, याचा मला थांगपत्ता लागलाच नाही पण आता जे आहे ते आहे. मी वास्तवापासून पळवाट काढणार नाही.

शिवाय काहीच अपेक्षा नसताना माझ्या रातराणीचा शोध मला लागला. आमची भेट होईल वा मी तिच्यापुढे स्वतःच्या भावना अन् बालवयातल्या अल्लड प्रेमाची कबुली देऊ शकेल याचीही खात्री नव्हती परंतु त्यादिवशी माझे सारे भ्रम दूर झाले. निशा, माझ्या रातराणीचा शोध घेण्यात अंततः मला यश लाभले. "


ए.के. जेव्हा बोलत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील उत्साह स्पष्ट ग्वाही देत होता पण निशाच्या मनात काही क्षणाला खळबळ माजली होती.

क्रमशः
.........

©®
सेजल पुंजे.

🎭 Series Post

View all