अल्लड हे प्रेम जरासे (भाग-६१)

Story Of Past And Present.
एकीकडे निशाच्या शब्दांतील सकारात्मकता ओळखून ए.के.च्या मनाला थोडा दिलासा मिळाला होता. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरले होते. दुसरीकडे निशा ए.के.शी अगदीच संयमाने बोलत होती. काही वेळाने तिने हलकासा उसासा घेतला. त्यानंतर ती एक कविता म्हणू लागली. ती कविता पुढीलप्रमाणे:

" हृदयात माझ्या या वाजे
अल्लड ह्या प्रीतीची धून
तू सोबत असताना सख्या
जाते मी जगास विसरून

तुझ्या प्रत्येक अदा पाहता
मन नाचे सदैव बावरून 
पण तुझ्या-माझ्या नकळत
घेते मी मनास या सावरून

तुझा सहवास मज लाभता
येई वाऱ्यासम उधाण भरून
आभास खरा तुझ्या मिठीचा
देतो अनंत समाधान रुजवून

पाहिले मी ही सख्या आज
अस्सल शाश्वत प्रेम करून
हृदयही माझे ना राहिले
तुझंच नाव घेतलंय कोरून "


कविता ऐकताच ए.के.चा चेहरा पूर्वीपेक्षा आणखी चकाकला होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकण्यास सुरुवात झाली होती.

तथापि, तो निशाच्या डोळ्यात आरपार बघून खात्री करून घेण्यासाठी आश्चर्ययुक्त स्वरात म्हणाला, " खरंच? "

" हो! पण... " निशाने गूढ स्वरात उत्तर दिले.


निशाच्या मनाची चल-बिचल अन् तिच्या 'पण' या शब्दाचा मतितार्थ ए.के.ला कळला नव्हता. तो भीषण कोड्यात फसला होता. तो निशाच्या मनाची अस्वस्थता जाणून घेण्याच्या प्रयत्नात होता परंतु त्याच्या हाती निराशा आली. तथापि, त्याने प्रत्यक्षात निशाचीच विचारपूस करणे श्रेयस्कर मानले.


ए.के.ने दिर्घ श्वास घेतला व त्याने विनम्र स्वरात विचारले, " पण काय निशा? जर माझेही प्रेम आहे अन् तुझेही माझ्यावर प्रेम आहे तर आपल्या दोघांत 'पण' या शब्दाला थारा कशासाठी? या अवाजवी अंतराचा अर्थ काय? "  


" कधीकधी प्रेमाची कबुली देताना अंतर अन् दुरावा शाबूत ठेवावा लागतोच ए.के. " निशा निर्विकार स्वरात गूढ अंदाजात म्हणाली.

" सॉरी पण मला अजूनही नीट कळलेलं नाहीये. तू सविस्तर सांग ना काय भानगड आहे? " ए.के. कासाविस होत  म्हणाला.

" ए.के. खरं सांगायचं तर मला कोणतंही नातं निर्माण करण्याआधी त्या नात्यात पारदर्शकता असणे महत्त्वाचे वाटते. शिवाय वर्तमान स्विकारताना एकमेकांच्या भूतकाळाची आपल्याला परस्पर कल्पना असायला हवी, हे माझं स्पष्ट मत आहे. " निशा भावनाशून्य स्वरात स्वमत व्यक्त करत होती.

" बरं. " ए.के.ला थोडक्यात संदर्भ कळला होता. त्यामुळे त्याने सौम्य स्वरात उत्तर दिले.

" ह्म्म. त्यामुळे मला तुझ्यापासून काहीही लपवून ठेवायचं नाहीये. आपल्या दोघांमध्ये जर कुठलेही रहस्य नसतील तर आपलं नातं भविष्यात सशक्त होऊ शकेल असं मला वाटतं. त्यामुळे मला तुला माझा भूतकाळ सांगावासा वाटतोय. " निशा ए.के.च्या डोळ्याला डोळा भिडवून म्हणाली.

" निशा, आपल्या नात्यात पारदर्शकता असावी. एकमेकांवर विश्वास असावा, हे सगळं मान्य आहे मला पण याकरिता भूतकाळाचा उल्लेख करणे वा भूतकाळ कवटाळून घेणे मला तरी अयोग्य वाटतं. म्हणजे आपण वर्तमानाचा विचार करुयात ना. भूतकाळाचं स्थान भूतकाळातच योग्य वाटतं त्याची सावली वर्तमानात कशाला पडू द्यायची? त्यामुळे मला वाटतं की, तू तुझ्या भूतकाळाचा उल्लेख केला नाहीस तरी काहीच वावगे नाही. यामुळे ना आपल्या वर्तमानावर कुठलाही परिणाम होईल, ना आपल्या भविष्यावर. ह्या सगळ्याची शाश्वती मी स्वतः देतो. " ए.के. नम्र स्वरात उत्तरला.


" कदाचित, तू या प्रसंगी योग्य असशील ही पण मला माझ्याशी प्रामाणिक राहायचंय. भूतकाळ अंधारात असताना मी वर्तमानाचा प्रकाश स्विकारू शकणार नाही. त्यामुळे मी सर्वकाही सांगू इच्छिते. अपेक्षा करते की, तुझा आक्षेप नसेल. " निशा ए.के.ला आग्रह करत म्हणाली.

" बरं. काही हरकत नाही. तू बोल आणि मोकळी हो. " ए.के. म्हणाला.

" ए.के. तू माझं पहिलं प्रेम नाहीस. तुझ्या आधी माझं एका मुलावर प्रेम होतं. अगदी बालवयातच माझं त्याच्यावर प्रेम जडलं होतं. त्याची क्षुल्लक बाबही माझ्यासाठी फार महत्त्वाची असायची. त्याचा सभोवताली असणारा वावर माझ्या आनंदाचं निमित्त होत असायचा. माझा वर्गमित्र होता तो पण कधी व्यक्तच होऊ शकली नाही मी त्याच्यापुढे आणि ती सल माझ्या मनात आता देखील आहेच. शिवाय त्याच्या प्रती माझ्या मनात जे स्थान, जे प्रेम आहे ते सर्वकाही चिरतरुण आहे.


त्याच्या प्रती वाटणाऱ्या भावना अन् तुझ्या प्रती वाटणाऱ्या भावना यांची सरमिसळ मी करू शकणार नाही अन् कितीही प्रयत्न केला तरी मी त्याला विसरू शकणार नाही. किंबहुना, त्याच्याशी संबंधित कुठल्याही आठवणी मला माझ्या हृदयाच्या कप्प्यातून कधीच पुसायच्या नाही आहेत. अगदी जपून ठेवायच्या आहेत आयुष्यभर. तू माझ्या आयुष्याचा जोडीदार झालास तरी मी तुझी आणि त्याची तुलना कधीच करणार नाही. मला पटणार ही नाही ते काहीच.


प्रामाणिकपणे ए.के. माझं तुझ्यावर नक्कीच प्रेम आहे पण मी माझं पहिलं प्रेम कधीच विसरू शकणार नाही. आजही कळत-नकळत माझ्या लेखणीतून कवितारूपी माझा भूतकाळ, माझं पहिलं प्रेम कागदावर रेखाटले जाते. त्या वयात खरंतर मलाही प्रेमाची संकल्पना ज्ञात नव्हती. त्या भावनांना आकर्षण म्हणावे की प्रेम याची कल्पना मलाही नाहीच; परंतु एक मात्र खरंय की, ज्या भावना त्या कोवळ्या वयात त्याच्या प्रती हृदयात रुंजी घालायच्य त्या सर्व भावना आजही एवढा काळ लोटला तरी सहज पुसता येण्यासारख्या नाहीच.


जगाच्या दृष्टीने त्या अजाणत्या अन् अल्लड वयात बहरत जाणारे सारे भाव निव्वळ आकर्षण असेलही पण माझ्या मते, ते माझं पहिलं प्रेम होतं आणि हे वास्तव मी नाकारू शकणार नाही. मला खरंच तुझ्यासवे नवी सुरुवात करायची आहे ए.के. पण माझा भूतकाळ विसरून मुळीच नाही; कारण मी कितीही पळवाट काढून वर्तमानात जगली तरी मागे वळून पाहताना मला माझं पहिलं प्रेम, त्याच्या सोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जगलेले क्षण, असंख्य आठवणी माझा पाठलाग करतात.

त्याची प्रतिकृती नित्यनेमाने माझ्या डोळ्यांपुढे थैमान घालत असते. त्याचे ते आकर्षक डोळे, मधाळ हसू, लोभस निरागसता! आमचा कळत-नकळत घडलेला संवाद, कधीकधी गैरसमजुतींना खतपाणी घालणारे रुसवे-फुगवे, एकमेकांची कळत-नकळत काढलेली छेड, नजरांचा लपंडाव, एकमेकांच्या नकळत एकमेकांची दखल घेणे इत्यादी आठवणी माझ्या स्मरणात आहेत.


आजही मला पौगंडावस्थेतील आम्हा दोघांच्या प्रतिकृती दिसतात. एवढेच नव्हे तर, या क्षणी हा भास होतोय की, कदाचित माझं पहिलं प्रेम ही ह्या क्षणी आपल्या संवादाचा साक्षीदार असेल. कदाचित त्यालाही ह्या क्षणाची प्रचिती येत असेल. माझ्या भासातही त्याचा अंतर्भाव असतो अन् ह्या सत्यापासून तू ही अवगत व्हावं, असं मला वाटतं.


            त्याच्यानंतर माझा कुणातही एवढा जीव गुंतला नव्हता पण तू एकमेव आहेस ज्याने माझ्या हृदयात परत प्रेमाचे बीज पेरलेस. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि कायम राहणार; पण माझं पहिलं प्रेम तू नाहीस, यापासून मी तुला अनभिज्ञ ठेवू शकत नाही. तो सध्या काय करतोय, मला याची खबर नाहीये; पण मी तीच निशा आहे. मी माझ्यात तसूभरही बदल केलेला नाही.

  माझं मन आजही त्या भूतकाळात गुंतलंय अन् त्याचा शोध घेण्यासाठी बेचैन आहे. त्याची-माझी भेट घडेल की नाही, यापासून मी अनभिज्ञ आहे हा भाग अलाहिदा पण भूतकाळाला पाठ दाखवून वर्तमान स्विकारणे मला कधीच जमले नाही.


                  खरंतर, आज एका क्षणाला मनात इच्छा निर्माण झाली होती की, मी मौन धारण करावे. तुला माझ्या भूतकाळाची अन् माझ्या निर्णयाची पूर्वकल्पना देऊ नये पण अंततः मन धजावले नाही. शिवाय मी जसं तुझ्यावर प्रेम केलंय त्याचप्रमाणे त्याच्यावरही केलं होतं अन् हे स्विकारायला मला दडपण जाणवत नाही; कारण व्यक्ती बदलला म्हणून खऱ्या प्रेमाची परिभाषा बदलत नाही.

त्याचबरोबर एका क्षणाला मला हे ही वाटलं होतं की, होऊन पाहावे मी जरा स्वार्थी! करावा फक्त स्वतःचा विचार. माझ्या या वर्तणुकीने काय फरक पडणार आहे? शिवाय भूतकाळाचा पाठपुरावा करण्यापेक्षा वर्तमान जगणे नक्कीच सार्थ आहे. करावा तुझ्या प्रेमाचा स्विकार अन् व्हावी तुझी जोडीदार तुला अंधारात ठेवून पण खरंच मन नाही जुमानले अखेर. तथापि, झाली मी व्यक्त. अगदी मनातले बंध मोकळे करून आज झाली रिक्त एकदाची तुझ्यापुढे! " निशाने दीर्घ श्वास घेऊन तिचा भूतकाळ ए.के.पुढे बिनदिक्कतपणे मांडला. त्यानंतर ती थोडा वेळ शांत झाली अन् ए.के.चे मौन उलगडण्याचा प्रयत्न करू लागली.

क्रमशः
............

©®
सेजल पुंजे.

🎭 Series Post

View all