अल्लड हे प्रेम जरासे (भाग-पंचावन्न)

Story Of Nisha And Her Past.

अमेयचे शब्द ऐकून निकिताने दीर्घ श्वास घेतला व ती मान खाली घालून दिलगिरी व्यक्त करत म्हणाली, " ह्म्म. बरोबर आहे तुमचं. मी ही सहमत आहे. शिवाय तुम्ही माझी मागू नका सर. तुम्ही जे केलंत ते योग्यच होतं. माझा त्यावर काहीच आक्षेप नाही. उलटपक्षी भारी वाटलं हे पाहून की, निशाच्या आयुष्यात तुमच्यासारखा जिवलग मित्र आहे. मैत्रीची जाणीव असणारा! खरंच, तुमच्या मैत्रीचा मलाही आदर आहे. त्यामुळे आजपासून मी कधीच आशंका घेणार नाही. ना तुमच्या मैत्रीबाबत, ना इतर कुणाच्याही नात्याबाबत. त्याचबरोबर तुम्ही खरंच माझी माफी मागू नका कारण तुम्हाला माफ करण्यासाठी मी पात्र नाही. तुमची बाजू योग्यच होती. मीच उगाच अट्टाहास केला होता. मीच विनाकारण बंड पुकारला होता. मीच विनाकारण निशावर भडकली होती अन् तुमचे मन ही निरर्थक गोष्टींचा गाजावाजा करत मी दुखावले होते. या सर्व बाबींचा मला खरंच पश्चात्ताप आहे. जमल्यास तुम्ही मला माफ करा. "


" जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी एक बोलू का निकिता मॅडम? " अमेय निकिताचा अंदाज घेत म्हणाला. 


" हो, बोला ना. " निकिताने मान हलवून समर्थन केले. तिचा इशारा कळताच अमेयने बोलायला सुरुवात केली. 


दीर्घ श्वास घेत अमेय निकिताला म्हणाला, " मॅडम, मला माहीत आहे की, तुम्हाला ए.के. आवडतो ते ही अगदी पहिल्या दिवशीपासून. तुम्ही ए.के.मध्ये पार गुंतून गेलात आणि म्हणून तो जेव्हा ही निशाच्या सभोवती असतो तेव्हा तुम्हाला वाईट वाटतं. तुम्हाला डावलले गेल्याची भावना तुमच्या मनात निर्माण होत असते. अनायासे तुमच्या मनात ईर्ष्या निर्माण होते आणि कळत-नकळत तुमच्या मनात असुरक्षिततेची भावनाही निर्माण होते; कारण तुम्हांला ए.के.प्रती आकर्षण आहे. त्याचा सहवास तुम्हाला हवाहवासा वाटतो. त्यामुळे तुम्हा दोघांमध्ये तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्हाला नकोसा वाटतो आणि वारंवार तेच घडतं; त्यामुळे तो आक्रोश तुमच्या मनात दडपून होता अन् त्या दिवशी कळत-नकळत तो आक्रोश चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने व्यक्त केला गेला. " 


" हो, मान्य आहे मला सर्व! हो, आवडतात मला ए.के. सर. अगदी पहिल्या दिवसापासून माझा जीव भाळला त्यांच्यावर. हो आहे माझं प्रेम त्यांच्यावर! " निकिता हुंदका आवरून घेत म्हणाली. तिला रडू कोसळले. म्हणून तिने तात्काळ दोन्ही हातांनी स्वतःचा चेहरा झाकून घेतला. 


अमेय निकिताचे सांत्वन करत म्हणाला, " मॅडम सांभाळा स्वतःला. रडून सत्य बदलणार नाही आणि मला काय म्हणायचंय ते ऐकून घ्या एकदा. प्रेम हा शब्द वापरून तुम्ही स्वतःच्या भावनांना चुकीच्या पद्धतीने अधोरेखित करत आहात. मॅडम, तुम्हाला केवळ आकर्षण आहे ए.के.प्रती प्रेम नाही. प्रेम ही पवित्र भावना आहे. त्यात स्वार्थ दडलेला नसतो. एवढेच नव्हे तर, प्रेमरंगात ओलेचिंब भिजताना राग, लोभ, द्वेष, मत्सर, अहंकार आणि मुख्य म्हणजे ईर्ष्येला कधीच थारा नसते. व्यक्ती आपल्या जिवलगाप्रती पझेसिव्ह अन् प्रोटेक्टिव्ह असतोच पण स्वतःच्या प्रेमावर अविश्वास मुळीच केलाच जात नाही. 


                         प्रेमात समर्पण असतं. एक सुप्त समाधान असतं की, आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम नसलं तरी आपण प्रेम करणे थांबवत नाही. हो, मन झुरतं नक्कीच पण त्या व्यक्तीचा आनंद आपल्यासाठी सर्वस्व असतो. आपल्या प्रत्येक हालचालीत त्या व्यक्तीचा उल्लेख होत असतो अन् निसर्गही कळत-नकळत आपल्या नितांत प्रेमाची साक्ष देत असतो. आपलं मन कोणत्याही परिस्थितीत ते प्रेम शाश्वत ठेवत असतं. मनाचे खच्चीकरण होऊ देत नाही. कठीण प्रसंगात ही ते प्रेम आपल्याला जगण्याची दिशा देत असतं अन् मला माफ करा मॅडम पण तुमच्या बाबतीत असं काहीच नाही. ना हे दुतर्फा प्रेम आहे, ना एकतर्फी! 


                         मी एवढं कठोर मत मांडतोय की, त्यामुळे तुमचं मन नक्कीच दुखावले जाईल पण वास्तव हेच आहे. ना तुमचं प्रेम राधेसारखं प्रेममय आहे, ना मीरासारखं भक्तीमय. मुळात तुमच्या मनात ज्या काही भावना आहेत त्यामध्ये केवळ ए.के.ला प्राप्त करण्याची सुप्त इच्छा दडलेली आहे. तुमच्या त्या भावनांमध्ये केवळ अपेक्षांचा अंतर्भाव आहे आणि त्यावरून हे स्पष्ट होते की, तुम्ही कधीच ए.के.वर प्रेम केले नाही. तुम्हाला फक्त आकर्षण आहे. तुम्हाला तो आवडतो असे नाही तर त्याचं व्यक्तिमत्त्व आवडतं. 


                         थोडक्यात, ए.के.च्या व्यक्तिमत्त्वात जे स्वभावगुण आहेत ते इतर एखाद्या व्यक्तीमध्ये आढळल्यावर कळत-नकळत तुम्ही त्या व्यक्तीलाही पसंत कराल; पण प्रेमात असं नसतं. तुमचं प्रेम ज्या व्यक्तीवर असतं त्याची क्षुल्लक गोष्ट आवडते अन् त्या व्यक्तीच्या दोषांकडेही आपण सहज दुर्लक्ष करतो. सॉरी, मी हे सगळं ठामपणे बोलतोय; कारण जर तुमचं प्रेम असतं ना ए.के.वर तर तुम्ही स्वतःच्या प्रेमावर अविश्वास बाळगला नसता. अविश्वासाने ए.के.च्या सर्व लोकांशी एकरूप आहे त्या सर्व लोकांचं मन तुम्ही कधी दुखावलं नसतं. तुम्ही स्वतःला प्राधान्य देता ते चांगलंय पण प्रेम जपता येत नाही तुम्हाला. तुमच्या हृदयात अजून प्रेमाचे बीज पेरलेच गेलेले नाहीये आणि हे वास्तव जेवढ्या लवकर तुम्ही स्विकाराल तेवढे बरे आहे. महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही खरंच एखाद्यावर प्रेम करायला शिकून घ्याल तेव्हा त्या व्यक्तीच्या आनंदासह त्याच्याशी संबंधित सर्व लोकांना जपणेही तुम्ही जाणून घ्याल. तो खरा दिवस असेल जेव्हा तुमच्या हृदयात प्रेमाचे बीजारोपण होईल. " 


अमेयने जमेल तेवढ्या सौम्य शब्दात निकिताला प्रेम अन् आकर्षण यातला फरक समजावून सांगितला. तो अगदी नम्रपणे निकिताचे मनोग्रह दूर करत होता. तेवढ्यात हुंदका आवरून निकिता बोलण्याचा प्रयत्न करू लागली; परंतु अमेयने तिला थांबवले व त्याने बोलणे सुरू ठेवले. तो म्हणाला, " मॅडम, एकवेळ मान्य करूनही घेतलं की, तुमचं प्रेम आहे ए.के.वर; पण याचा अर्थ हा नाहीच की, त्याचंही तुमच्यावर प्रेम असायलाच हवं. अर्थात कुणी कुणावर प्रेम करावं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. कोणाला कोणासाठी भावना आहेत यावर आपलं नियंत्रण नसतं. हो ना? मग अशावेळी आपण आपलं प्रेम थोपविण्यासाठी उगीच धडपड का करावी? स्वतःलाच का म्हणून छळावे; कारण वास्तविकता आपल्या डोळ्यापुढे उघड असते आणि वास्तवापासून पळवाट काढायची नसते. त्याचा स्वेच्छेने स्विकार करावा लागतो. अवघड असतं पण अशक्य मुळीच नाही. " 


" ह्म्म.. " निकिताने पाणावलेल्या डोळ्यांनी अमेयकडे पाहून हुंकार भरला. 


" आता मला सांगा की, का म्हणून ए.के.ने तुमच्यावर प्रेम करायलाच हवं हा अट्टाहास तुम्ही बाळगून आहात? महत्त्वाचं म्हणजे तुमचं त्याच्यावर प्रेम असेलही पण त्याला तुमच्यावर प्रेम नाही, हे तुम्ही समजून घ्या. तो टाळतो सर्रास तुम्हाला. तो तुमच्यापासून पळवाट काढतो, हे वास्तव तुम्ही स्विकारायलाच हवं, असं नाही का वाटत तुम्हाला? नक्कीच प्रेम करावं मॅडम पण आपला स्वाभिमान भिकेला लावून नाही. " अमेय नम्रपणे एकेक करून निकिताच्या मनातली कवाडे उघडत होता अन् तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता व निकिता शांत बसून सगळं ऐकत होती. 


" माफ करा निकिता मॅडम जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर; पण तुमचं मन दुखवायचा हेतू नव्हता माझा! मला फक्त एवढंच म्हणायचंय की, मी जे काही सांगण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही त्यावर निदान एकदा विचार करा. अपेक्षा करतो की, तुम्ही माझ्या शब्दांचा मतितार्थ हेरला असावा. सरतेशेवटी एकच म्हणेल की, आपण कुणावर प्रेम करतो यापेक्षा आपल्यावर कोण प्रेम करतं हे जास्त महत्त्वाचं असतं. बरं आता येतो मी! बाय, काळजी घ्या आणि परत एकदा एक्स्ट्रीमली सॉरी. कधीकधी नाईलाजाने का होईना वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी कटू शब्दांचा आसरा घ्यावा लागतो, तेच मी केलं. म्हणून जमलं तर माझ्या निस्वार्थी भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. " अमेय म्हणाला व सोफ्यावरून उठला. 


क्रमशः

...............


©®

सेजल पुंजे. 


🎭 Series Post

View all