अल्लड हे प्रेम जरासे (भाग-बावन्न)

Story Of Nisha And Her Past.

                         एकीकडे ए.के. निशाला भेटण्यास शाळेतून रवाना झाला होता. दुसरीकडे रस्त्याने जाताना निशाला झालेल्या जखमेतून रक्तप्रवाह होत होता पण निशा मात्र अनभिज्ञ होती. तिला त्या जखमेची जाणीवही नव्हती. ती आपल्याच विचारात गुंग होऊन जात होती; परंतु बऱ्याच अंशी रक्तप्रवाह झाल्यामुळे हळूहळू तिला भोवळ येऊ लागली. तरीही तिने त्याकडे दुर्लक्ष केले व ती चालत राहिली. त्याच दरम्यान अचानक तिने डोकं पकडून घेतलं. ती जागीच थांबून गेली; कारण तिला काहीच दिसत नव्हते. डोळ्यापुढील सर्व चित्र धूसर दिसत होते. तिचे डोळे गरगरून गेले होते. त्यामुळे क्षणार्धात डोळे मिटून घेत ती बेशुद्ध झाली.


                         निशा धाडकन खाली पडणार होती; परंतु तत्पूर्वी ए.के. तिथे पोहोचला होता. त्याने अलगद तिच्या कमरेत हाताचा विळखा घालून घट्ट पकडून घेतले व तिला मिठीत घेऊन अलगद हातांवर उचलले. तिची अवस्था पाहून तात्काळ तो तिला थोड्याच अंतरावर असलेल्या छोट्याशा इस्पितळात घेऊन गेला. तिथे गेल्यावर ताबडतोब त्याने डॉक्टरांना निशाला तपासण्यास सांगितले. त्याच्या शब्दांतले गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी वेळेचा अपव्यय न करता लगेच तिला तपासायला सुरुवात केली. तपासणी करून झाल्यावर त्यांनी तिला इंजेक्शन दिले. तसेच औषधींची यादी ए.के.ला सोपवली. 


तेवढ्यात ए.के. डॉक्टरांना म्हणाला, " डॉक्टर, निशा बरी आहे ना? काळजी करण्यासारखे कारण नाहीये ना? "


" नाही. छोटासाच कट झाला होता त्यामुळे रक्तप्रवाह फारसा झाला नाही. मिस निशा ठीक आहेत. थोडा आराम केला की, लवकरच पूर्ववत होतील. " डॉक्टर निशाच्या प्रकृतीची सविस्तर माहिती देत म्हणाले. 


" बरं ठीक आहे. " ए.के. सुटकेचा श्वास घेत म्हणाला. 


" पण मिस निशाला ही जखम कशामुळे झाली? " डॉक्टरांनी साशंक नजरेने विचारले. 


" ॲक्च्युली आमच्या सह-कर्मचारिणी (कलिग) मिस निकिता यांची रक्षा करताना त्यांना ही इजा झाली. " ए.के. म्हणाला व त्यानंतर त्याने संपूर्ण घटना सांगितली. 


सर्व ऐकून झाल्यावर डॉक्टर निराश होत म्हणाले, " हल्ली, काय झालंय आपल्या देशातल्या लोकांना? एवढे हवसेचे पुजारी झालेले आहेत. स्त्रियांचं जगणं मुश्किल केलंय. रात्र असो वा दिवस स्त्रिया असुरक्षितच आहेत. " 


" हो ना. देवीच्या मंदिरात नतमस्तक होणारी पुरुष काळ्याकुट्ट अंधारात नराधम होऊन स्त्रियांच्या शरीराचे लोचके मुळात कसे घेऊ शकतात? खूप बिकट परिस्थिती आहे आपल्या या देशाची. एकीकडे आपल्या संस्कृतीचा प्रभाव सबंध जगावर पडतोय. लोक भारताला विशेष दर्जा देतात अन् इथे आपलीच माणसे आपल्याच आब्रुचे धिंडवडे काढतात. " ए.के. संतापून आक्रोश व्यक्त करत म्हणाला. 


" ह्म्म! पण एक निदान बरंय की, मिस निशासारख्या तरुणी आत्मरक्षणापासून अवगत आहे. निदान त्यामुळे तरी स्त्रिया स्वतःचे व स्वतःच्या सभोवती असणाऱ्या स्त्रियांचे रक्षण करू शकतात. " डॉक्टर निशाची प्रशंसा करत म्हणाले. 


" ह्म्म. " ए.के.ने हुंकार भरून डॉक्टरांना प्रतिसाद दिला पण तो बेडवर झोपलेल्या निशाकडे पाहून खिन्न झाला अन् हळूच म्हणाला, " ह्म्म. निशासारख्या तरुणी इतरांचे रक्षण तर करतात पण स्वतःकडे कानाडोळा करतात. " 


" काय म्हणालात? " डॉक्टरांना नीट ऐकू न गेल्याने त्यांनी ए.के.ला विचारले. 


" काही नाही सहजच. " ए.के. कसनुसं हसून उत्तरला. 


" बरं. तुम्ही काळजी घ्या. " डॉक्टर म्हणाले व तेथून बाहेर गेले. 


                         थोड्या वेळाने निशालाही शुद्ध आली. तिच्या शेजारीच तिचा हात हातात घेऊन ए.के. विचारात गुंतून बसला होता; परंतु त्याला लगेच निशाची चाहूल लागली व तो तिच्याकडे पाहू लागला. दोघांचीही नजरानजर होताच निशाने नजर चोरून घेतली; कारण ए.के. तिच्यावर संतापणारच ही खात्री तिला होती. म्हणूनच ती कसनुसं हसून त्या खाटेवर (कॉटवर) व्यवस्थित बसली. ए.के. निशाच्या देदिखाऊ हास्याला बळी पडणार नव्हता म्हणून तो चिडून तिच्याकडे पाहत होता. 


ए.के.चा रागीट कटाक्ष पाहून निशाने उसने हसून एक आवंढा गिळला व ती म्हणाली, " ए.के. तू कधी आलास? माझ्या लक्षातच आलं नाही. शिवाय इथेही तूच घेऊन आला असशील ना मला. ह्म्म. कळलं! पण तू काळजी नको करू मी पूर्णपणे ठणठणीत आहे. मला काहीच झालेलं नाहीये. "


" मी आलो होतो वेळेत आणि तुला कळलं नाही कारण तू बेशुद्ध झाली होतीस. शिवाय तू किती ठणठणीत आहेस ते पाहिलं मी मघाशीच अन् आता ही पाहतोच आहे. " ए.के. राग गिळून थंड आवाजात उत्तरला. 


" ए.के. रुसलास का? " निशाने कापऱ्या स्वरात विचारले. 


" नाही. मी कशाला रुसायला हवं तुझ्यावर? आपलं नातंच काय आहे एवढं. दोघे एकत्र काम करतो बस एवढंच. मैत्रीण आहेस तू माझी बस एवढंच. काळजी वाटते मला तुझी बस एवढंच. तुला काही झालं तर जीव तुटतो माझा बस एवढंच! याव्यतिरिक्त काहीच नाहीये तुझ्या-माझ्यात. हो ना! " ए.के. मंद हसून खिन्न स्वरात उत्तरला. 


" ए.के. सॉरी ना! आज खरंच, मला जराही कल्पना नव्हती की, माझ्या हाताला त्या गुंडाने जखम केलीये. कळलं असतं तर मी आणखी तुडवलं असतं त्या सगळ्यांना. " निशा गुंंडांना आठवताना म्हणाली. 


" तू कशाला माफी मागतेस. काहीच गरज नाही त्याची. तुझ्यावर ना मला रुसण्याचा हक्क आहे, ना रागवण्याचा, ना तुला माफ करण्याचा! " ए.के. मंद हसून म्हणाला; परंतु त्याच्या शब्दांत कमालीचा उपरोधिक भाव दडला होता. 


" ए.के. प्लीज. समजून घे. मला माहीत आहे की, आज परत एकदा मी तुला दिलेल्या वचनाची राखरांगोळी केली पण हे सर्व नकळत घडलं. मी मुद्दाम काहीच केलेलं नाहीये. शिवाय तुझा आहे माझ्यावर हक्क; त्यामुळे असं खिन्न स्वरात बोलू नकोस. प्लीज. हे सगळं त्या गुंडांमुळे झालं. त्यांना ना खरंच कमी तुडवलं मी ते सर्व जण भल्यामोठ्या प्रमाणातील मारहाणीस पात्र होते. " निशाने आधी ए.के.ची समजूत काढली. त्यानंतर पुन्हा एकदा गुंडांना आठवून ती संतापली. 


" निशा, एकीकडे तूच म्हणतेस की, माझा तुझ्यावर हक्क आहे आणि दुसरीकडे तुला कळतही नाही माझी चीडचीड माझा संताप का होतोय? " ए.के. त्रासिक स्वरात म्हणाला. 


" म्हणजे? " निशाने गोंधळून विचारले. 


" निशा, मला माहिती आहे की, तू जे केलेस ते निकिताच्या भल्यासाठी पण यात स्वतःकडे का दुर्लक्ष केले? तू निकिताऐवजी इतर कुणाचीही मदत केली असतीस तरीही मला आक्षेप नव्हता पण ह्यादरम्यान स्वतःच्या जीवाचा खेळ करायचा का? तू मदत केलीस याचा मला गर्व आहे पण जरा सांभाळून. थोडक्यात, मला फक्त हेच म्हणायचं आहे की, तू स्वतःची काळजी घेत जा. तू वारंवार अशी बेजबाबदारपणे धडपड करत जाऊ नकोस. तू जे करतेस ते शंभर टक्के इतरांच्या भल्याचं असतं पण यात स्वतःची विटंबना करून घेऊ नकोस. स्वतःला अति महत्त्व भलेही तू देऊ नकोस पण स्वतःला जपणं विसरू नकोस. " ए.के. भावूक होत काळजीयुक्त स्वरात म्हणाला. 


" हो रे, बाबा मी ही घेतेच काळजी. फक्त कधीकधी कळत-नकळत दुर्लक्ष होतं माझं माझ्याकडेच; पण विश्वास ठेव माझ्यावर मी आजपासून बेफिकीरपणे वागणार नाही अन् तू देखील वचन दे की, तू माझ्यावर कोणत्याही कारणामुळे कधीच रुसणार नाहीस. " निशा वचन मागण्यास हात पुढे करून केविलवाणा चेहरा करून म्हणाली. 


" ह्म्म. बरं. ठीक आहे! वचन देतो की, मी विनाकारण रुसणार नाही. आता अशी चेहरा पाडून घेऊ नकोस. तू हसताना गोड दिसतेस म्हणून कायम अशीच हसत राहा. औदासीन्य तुझ्या चेहऱ्याला शोभत नाही. " निशाचे गाल खेचत ए.के. तिच्या हातावर स्वतःचा हात ठेवून वचन देत म्हणाला. 


" थॅंक्यु सो मच ए.के. मला वाटलं होतंच की, तू जास्त वेळ माझ्यावर रुसू शकणार नाहीस. " निशा म्हणाली व तिने अनायासे ए.के.च्या गालावर ओठ टेकवले व क्षणार्धात स्थानापन्न झाली.  


क्रमशः

............ 


©®

सेजल पुंजे. 

🎭 Series Post

View all