अल्लड हे प्रेम जरासे (भाग-पन्नास)

Story of nisha and her past.

                     निरोप समारंभाच्या थीमनुसार निकितानेही काळ्या रंगाचा साधासा पटियाला पॅटर्न सलवार सुट घातला होता. लांबसडक केसांची सागरवेणी घातली होती. मेकअपचे प्रमाण अति केले नव्हते. हलकीशी लिपस्टिक आणि डोळ्यांत काजळ आणि त्यावर चष्म्याचे आवरण चढवले होते. साधेसे रूप तिचे फारच गोजिरवाणे दिसत होते. निशानेही नेहमीप्रमाणे साधीसुधी वेशभूषा अन् केशभूषा केली होती. तिने ऑफशोल्डर स्लिव्ह्सचे टॉप आणि पांढऱ्या रंगाचा जीन्स घातला होता. केसांना क्लचर लावून मोकळे सोडले होते. नेहमीप्रमाणेच मेकअप टाळला होता; पण तरीही गोंडस दिसत होती. स्वर्णा मॅडम ही साध्याच पद्धतीने तयार झाल्या होत्या. सरपोतदार सरांनीही पांढरा कुर्ता आणि काळा पायजामा घातला होता. विद्यार्थ्यांसाठी वेगळी थीम असल्याने सर्व विद्यार्थी रेट्रो थीमनुसार नटून-थटून आले होते. 


                     त्या दिवशी कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. त्यामुळे सगळं आटोपल्यानंतर निशाने ए.के. आणि अमेयचे विशेष कौतुक केले. शिवाय तिची मदत न घेता त्यांनी सर्व काही नीट हाताळले होते म्हणून ती फार खूष होती त्यांच्यावर. तथापि त्या दोघांची स्तुती करत होती. एकीकडे त्या तिघांचे आयुष्य एकमेकांच्या सहवासात सुखकर सुरू होते पण दुसरीकडे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमापासून निकिताच्या स्वभावात बराच बदल झाला होता. ती एक-एकटी राहायला लागली होती. स्वर्णा मॅडमसोबत तिचा जो बंध होता त्यातही बदल घडला होता. त्यांच्याशीही तिचा संवाद कमी झाला होता. थोडक्यात, सगळ्यांशीच अबोला धरला होता तिने. म्हणूनच निरोप समारंभाचा कार्यक्रम आटोपताच ती सगळ्या विद्यार्थ्यांना शुभाशिर्वाद अन् शुभेच्छा देऊन ताबडतोब घरी निघून गेली. त्यादिवशी तिच्याकडे गाडी उपलब्ध नसल्याने तिने पायदळ जाणे निवडले होते. 


                      कार्यक्रम आटोपला होता म्हणून काही वेळाने निशाही अमेयसोबत घरी जायला निघाली. ए.के.ला आयोजनासंदर्भातील तुरळक कामे आटोपायची होती त्यामुळे तो शाळेतच थांबला होता. अमेय-निशा पार्किंग लॉटमध्ये गेले. तिथून अमेयने त्याची बाईक घेतली, सुरू केली. बाईक सुरू होताच निशाही त्याच्यामागे बसली. त्यानंतर तो बाईक ड्राईव्ह करू लागला. ते दोघेही नेहमीसारखेच एकमेकांशी चर्चा करतच जात होते. थोड्या गप्पा, जुन्या आठवणी, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, इतर उपक्रम ह्या प्रत्येक विषयावर संभाषण सुरू होतं. तेवढ्यात अचानक निशाला जोरदार किंकाळीयुक्त हाक ऐकू आली. तिने तात्काळ अमेयला कल्पना दिली. त्यानेही कानोसा घेण्याचा प्रयत्न केला; पण त्याला काहीच ऐकू आले नाही. दुसऱ्यांदा तिलाही आवाज ऐकू आला नाही पण तरीही तिने अमेयला बाईक थांबवायला सांगितली. 



                     निशाने सांगितल्याप्रमाणे अमेयनेही बाईक थांबवली आणि फुटपाथवर बाईक पार्क केली. निशा लगेच खाली उतरली आणि सभोवतालच्या परिसराचा अंदाज घेऊ लागली. सगळीकडे शुकशुकाट अगदी पसरलेला होता. ते दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. अमेयने खांदे उडवून घेतले. निशानेही ओठांचा चंबू केला व ती थोडावेळ विचार करत राहिली. तरीही काहीच ऐकू आले नाही. त्यामुळे त्या दोघांनाही वाटतं की, कदाचित निशाला भास झाला असेल; म्हणून अमेय परत एकदा बाईक चालू करायला पुढे सरसावला. 


                     तेवढ्यातच त्या दोघांनाही 'वाचवा' अशी आरोळी ऐकू आली. निशाला आवाज ओळखीचा वाटला. त्या व्यक्तीच्या काळजीने तिच्या काळजात धस्स झाले. ते दोघेही त्या आवाजाच्या दिशेने पळू लागले. 


                     दुसरीकडे एका कारच्यामागे एक गुंड एका तरुणीचं तोंड दाबून उभा होता आणि दूसरा गुंड वासनांध नजरेने त्या तरुणीकडे पाहत होता. इतर काही गुंड हातात चाकू घेऊन तिच्याशी लगट करत होते. त्या सर्व गुंडांचा तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा मनसुबा होता. त्या तरुणीला त्यांच्या किळसवाण्या नजरा घृणास्पद वाटत होत्या. तिला बंड करायचा होता पण त्याक्षणी त्या गुंडांनी तिला हतबल केले होते. त्यातलाच एक गुंड तिच्याजवळ जाऊ लागला. तेवढ्यात त्या ठिकाणी निशा पोहोचली. तिला संपूर्ण दृश्य दिसले आणि ते पाहून तिचे डोळे आग ओकू लागले. एकीकडे तिने घट्ट मुठी आवळून घेतल्या. दुसरीकडे ती तरुणी प्रतिकार करण्यात कमी पडत होती. तरीही ती कसोशीने हालचाल करून त्यांचा कडाडून विरोध करत होती पण ती कुकर्मी गुंड तिच्यावर भारी पडत होते. 


                      निशा आणि अमेय तिथे पोहोचले होते. त्या दोघांचा राग उफाळून आला होता. त्या तरुणीचा चेहरा दिसताच त्या दोघांचेही डोळे विस्फारले होते; कारण ती तरुणी खुद्द निकिताच होती. त्यावेळी ती खूप भेदरलेल्या अवस्थेत उभी होती. स्वतःचा बचाव करू पाहत होती. स्वःसंरक्षणार्थ संघर्ष करत होती. 



निकिताचा चेहरा पाहताच अनावधानाने निशाने तिला हाक मारली. तथापि, तिच्या आवाजाने ते गुंड सजग झाले. ते गुंड त्या दोघांना हातातील धारदार शस्त्रे दाखवून धमकी देऊ लागले; परंतु ते दोघे लढवय्ये होते. शिवाय पोकळ धमक्यांना घाबरणारे तर मुळीच नव्हते. ते दोघेही त्या गुंडांचा वचपा घेण्याच्या तयारीत होते. त्या गुंडांच्या प्रमुखाला त्यांची चाल कळली म्हणून त्याने निकिताच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि तो धमकी देत गांभीर्याने म्हणाला, " तुम्हाला तुमच्या जीवाची पर्वा नसेल पण या मुलीच्या जीवाची काळजी आहे ना? लक्षात घ्या, यापुढे एक पाऊल जरी पुढे टाकलं तर ह्या छमियाला जीव गमवावा लागेल. विचार करून निर्णय घ्या. तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आम्ही एखादी कृती केली तर त्याला आम्ही जबाबदारी राहणार नाही. समजूतदार असाल तर आमच्याविरूद्ध जाण्याची चूक तुम्ही करू नका. आम्हाला फक्त एक रात्रीपुरती हवीय ही लाडो... " 


                      गुंडप्रमुखाचे शब्द ऐकताच अमेयचा राग उफाळून आला. त्याने लगेच मुठी आवळल्या परंतु नाईलाजाने निकितापोटी त्याला माघार घ्यावी लागली. त्या दोघांनी माघार घेतलेली पाहून त्या गुंडप्रमुखाने त्याच्या साथीदारांना इशारा केला व त्या दोघांना ताब्यात घ्यायला सांगितले. प्रत्येकी दोन गुंड त्या दोघांना घट्ट पकडून होते. तेवढ्यात निशाने शक्कल लढवली अन् डोळा मारून तिने अमेयलाही संपूर्ण प्रकरण इशाऱ्यात कळवले. त्यानंतर उगाच वायफळ बडबड करून तिने त्यांना पेचात पाडले. हळूहळू तिने त्या सर्वांना फूस लावली पण त्याआधी गुंड-प्रमुखाच्या हातातील चाकूवर तिच्या चपलेने तिने निशाणा साधला. चपलेमुळे तो चाकू दूर जाऊन पडला. तो चाकू बऱ्याच अंतरावर अन् अंधारात पडला होता म्हणून तात्पुरते ते दोघे निश्चिंत झाले. त्यानंतर तीच संधी साधून त्या इतर गुंडांना त्या दोघांनीही मातीत लोळवले. 


त्यानंतर अमेयने मुख्य गुंडाकडे मोर्चा वळवला होता पण तेवढ्यात त्याला अडवून निशा म्हणाली, " अम्या, या चिंधीसाठी मी एकटीच पुरेशी आहे. "


                     अमेयनेही तिला मुजरा केला अन् त्या गुंडाला तुडविण्याचा इशारा केला. त्यानंतर ती झपझप पावले टाकत आधी निकिताजवळ गेली व तिला आश्वस्त करून तिने अमेयकडे सोपवले. त्यानंतर त्या गुंड-प्रमुखाला वेगवेगळ्या कराटेच्या वेगवेगळ्या मुव्हस् वापरून तिने चित केले. साथीदार गुंड परत तिच्या अंगावर धावून गेले पण तिने सगळ्यांना धूळ चारली; परंतु तिच्याही नकळत एक गुंड तिच्यावर धावून गेला. त्याच्या हातात एक छोटा चाकू होता. त्याने तिच्यावर वार करण्यासाठी हात उगारला अन् तेवढ्यात अमेयचे लक्ष गेले आणि त्याने निशाला हाक मारून सजग केले. ती प्रसंगावधान साधून सज्ज झाली होती पण त्याआधी नजरचुकीने त्या गुंडाच्या चाकूचा तिच्या हाताला स्पर्श झाला अन् तिचा हात हलकासा कापल्या गेला. तरीही तिचे स्वतःच्या जखमेकडे जराही लक्ष नव्हते. ना तिला जखम जाणवत होती, ना वेदना होत होत्या. म्हणून ती सगळ्यांनाच चोप देत होती. तथापि ज्या गुंडाने तिच्यावर चाकू उगारला होता त्यालाही तिने बदडून काढले. ती प्रत्येक गुंडाला अखंड मारत होती. ते सर्व गुंड तिची माफी मागू लागले पण ती शांत होईना. त्यादिवशी तिने त्या एकेकाला चांगलाच दम दिला होता. म्हणूनच सरतेशेवटी त्या गुंडांनी तिथून धूम ठोकली होती. 



क्रमशः



............. 


©®

सेजल पुंजे. 



🎭 Series Post

View all