अल्लड हे प्रेम जरासे (भाग-पंचेचाळीस)

Story Of Nisha. The Heroine Is Stuck In Her Past. But Cherishing Her Present Too But She Is Waiting For His Prince Charming.

               असंख्य विचारांची गर्दी निशाच्या डोक्यात घुटमळत होती. अनंत वेळा रडून आधीच तिचं डोकं पार बधीर झालं होतं. तिला काहीच सुचायला मार्ग नव्हता म्हणून डायरीतला तो कागद परत तिथेच ठेवून अन् त्या डायरीला निशा कपाटात जपून ठेवल्यानंतर ती परत हॉलमध्ये निघून गेली. तिचे डोळे रडल्यामुळे लाल झाले होते, तिचं मन ही बेचैन होतं. वारंवार तेच विचार तिच्या मनात डोकावत होते. ती काऊचवर बसली होती अन् एक खिडकी जराशी उघडी ठेवून शून्यात नजर घालवून बसली होती. अगदी सर्व विचारांना वाट मोकळी करून देत, अश्रूंच्या धारा सोडत ती काऊचवर लोळत होती अन् असेच करताना तिला कधी झोप लागली ते तिचे तिलाही कळले नाही. 


                दुसरीकडे सकाळी नाश्ता केल्यानंतर ए.के.ने आवरून घेतले. त्यादिवशी शनिवार होता परंतु मुख्याध्यापक साहेबांनी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचा थकवा घालवण्यासाठी संपूर्ण शाळेला अर्थात विद्यार्थी अन् अध्यापकांना सुट्टी दिली होती. थोडक्यात, शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस सुट्टी होती. त्यामुळे ए.के.ने मनोमन ठरवलं होतं की, तो अख्खा दिवस ए.के. निशासोबत वेळ घालवणार. त्या दिवसाचा आनंद घेणार. म्हणूनच लवकरात लवकर नाश्ता आटोपून अन् सगळं आवरून घेत तो घराबाहेर पडला. त्याने त्याची बाइक काढली आणि स्वारी पंधरा मिनिटांतच निशाच्या घरी हजर झाली. 


               बाईक पार्क करून ए.के. अंगणाबाहेरून फाटकाजवळ उभे राहून निशाला हाक मारू लागला. खरंतर, एरवी ए.के.च्या बाईकचा आवाज ऐकला तरी निशा घराबाहेर येत असायची; पण त्या दिवशी ए.के. निशाला वारंवार हाका मारत होता पण तरीही ती ना प्रतिसाद देत होती, ना दार उघडत होती. त्यामुळे ए.के.चा गोंधळ उडाला होता. त्याच्यासाठी तो खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता; पण तरीही मनातील सारे विचार झटकून देत त्याने फाटक उघडलं आणि तो अंगणात शिरला. नंतर बंद दारावर थाप मारू लागला; पण तरीही आतून पुसटसा आवाज येत नव्हता. त्यामुळे हळूहळू ए.के. अस्वस्थ होऊ लागला. त्याला निशाची फार काळजी वाटू लागली. काही क्षण तर त्याला कळेनासे झाले होते, तो आणखी वेगाने दारावर थाप मारू लागला परंतु तेवढ्या प्रयत्नानंतरही हाती निराशा आल्याने तो सुन्न झाला होता. तो विचारात हरवला होताच पण तेवढ्यात त्याला काहीतरी आठवले अन् तो लगेच एका कुंडीजवळ निशाच्या घराची स्पेअर चावीची शोधाशोध करू लागला; कारण एकदा त्याने निशाला घराची एक स्पेअर चावी गार्डनमधील एका कुंडीत ठेवताना पाहिले होते. तोच प्रसंग आठवून त्याने कुंडीखाली नीट तपासणी केली अन् अंततः त्याला चावी मिळाली. 


                चावी मिळताच त्याच्या जीवात जीव आला व त्याच्या कपाळावरील चिंतेचे जाळे मिटले अन् ओठांवर स्मित पसरले. त्याने क्षणाचाही विलंब न करता लवकरच दार उघडून घेतले व तो निशाला हाक मारतच घरामध्ये शिरला. तो सैरभैर नजर फिरवून तिला शोधू लागला; पण सबंध घरातही शुकशुकाट पसरलेला होता अन् ती नीरव शांतता त्याच्या मनाला आरपार भेदून गेली. त्याला धास्ती भरली. त्याने आवंढा गिळला. असंख्य विचार सुरू होते. त्यामुळे तो आणखीच घाबरला होता पण तात्पुरते विचारांना पूर्णविराम लावून तो शोधाशोध करू लागला. तो वारंवार निशाला हाक मारत होता पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती अन् तेवढ्यात अचानक त्याचं लक्ष हॉलमधल्या एका खिडकीपाशी असलेल्या काऊचकडे गेले व तिथेच त्याला त्या काऊचवर निशा पेंगलेली दिसली. तिला शांत आणि निपचित झोपलेले पाहून त्याच्या माथ्यावरील आठ्यांचे सावट पुनश्च दूर झाले अन् डोळ्यातल्या काळजीची जागा समाधानाने घेतली. 


निशाला झोपलेले पाहून त्याच्या ओठांवर आपोआप मंद हसू पसरले अन् तो त्याच्या हृदयावर हात ठेवून दीर्घ श्वास घेत स्वतःशीच बोलला, " घ्या... इथे हिच्या काळजीने माझा जीव जाण्याची वेळ आली होती अन् ही वेडी! इथे झोपलीय अगदी शांत आणि मी वेड्यागत चौफेर फिरून, शोधाशोध करत, इकडेतिकडे पाहून आवाज मारत फिरतोय. वेडी कुठली... पण यार झोपेत तर माझी स्वीटी भलतीच क्युट दिसत आहे. असं वाटतंय, हिला असंच पाहत राहावं. कहर आहे यार माझी निशू क्युटनेसचा! पण हिच्या डोळ्यांच्या कडा का पाणावलेल्या दिसत आहेत? याचा अर्थ काल रात्री निशा झोपण्यापूर्वी रडली होती? पण का? काय झालं असेल? निशा ठीक असेल ना? विचारावं का? पण नाही... नको. सध्या ती झोपून आहे, उठल्यावर सविस्तर विचारणेच योग्य राहील. तोपर्यंत हिला असंच झोपू देतो. तसं पण नुसती धावपळ करून दगदग होते निशाची महत्त्वाचं म्हणजे ही कुणाला सांगत देखील नाही. आज शांत झोपून आहे तर मी डिस्टर्ब करणार नाही. झोपू द्यावं निवांत. तेवढाच आराम! म्हणतात ना झोप शांत झाली की, अख्खा दिवस प्रसन्न जातो. ठरलं तर... मी निशाच्या झोपेत व्यत्यय आणणार नाही. तोपर्यंत मॅडमसाठी मी नाश्ता अन् कॉफीचं बघतो. " 


                निशाचा चेहरा न्याहाळताना ए.के. स्वतःशीच बोलता बोलता खुदकन हसला. त्यानंतर त्याचे एकाएकी निशाकडे लक्ष गेले. त्याला दिसले की, निशा काऊचपेक्षा जमिनीवर कमी जास्त लोळत होती. तिचं संपूर्ण शरीर जमिनीला स्पर्श करत होतं. त्यामुळे तिला आजार होण्याची त्याला शक्यता वाटली. म्हणून तो लगेच तिला सावरून नीट काऊचवर ठेवण्यासाठी तिच्याजवळ गेला. तिच्याजवळ जाताच खिडकीतून वाऱ्याची एक मंद झुळूक शिरली अन् त्यामुळे निशाचा चेहरा केसांनी झाकल्या गेला. तो मंद हसला. तेवढ्यात परत हलकीशी झुळूक आली अन् तिचे केस आपोआप नीट झाले पण तिच्या डोळ्यांवर येणारी, त्याला कायम डिवचणारी अन् तिच्याकडे आकर्षित करणारी एक बट मात्र निशाच्या चेहऱ्यावर रेंगाळत होती. त्यामुळे ती बट सावरण्याचा मोह त्याला काही केल्या आवरता आला नाही; म्हणून गालातल्या गालात हसून त्याने तिची ती बट तिच्या कानामागे सारण्यासाठी त्याचा हात पुढे केला. त्याने तिच्या चेहऱ्यावर स्वतःच्या बोटांचा स्पर्श होऊ न देता बट हातात घेतली अन् नंतर तो हळूहळू तिच्या कानामागे बट सारू लागला. 


                कळत-नकळत त्याच्या बोटांना तिच्या गालाचा अन् कानाचा हलकासा स्पर्श झाला. स्पर्श होताच त्याला थोडीशी उब जाणवली. म्हणून त्याने त्याच्या मनातली शंका दूर करण्यासाठी तिच्या गालावर हात ठेवला. हात ठेवताच त्याला उष्णता जाणवली. त्यावरून त्याला लगेच अंदाज आला. त्याने परत एकदा तिच्या कपाळाला हात लावला. तिच्या कपाळाचा त्याच्या हाताला स्पर्श होताच त्याला चटका लागला. सरतेशेवटी निशाला भयंकर ताप आला असल्याची खात्री पटली. त्यामुळे तो लगेच घाबरला. त्याला तिची काळजी वाटू लागली. तो तिच्या आणखी जवळ गेला तेव्हा ती थंडीने कुडकुडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने क्षणाचाही विलंब न करता तिला अलगद उचलून घेतले आणि तो तिला तिच्या खोलीमध्ये घेऊन गेला. 


                लगेच त्याने तिला तिच्या बेडवर व्यवस्थित झोपवले. नंतर तिच्या अंगावर त्याने ब्लॅंकेट ओढून दिले. त्यानंतर त्याने लगेच डॉक्टरांना कॉल करू लागला पण नंबरच लागत नव्हता. त्याने परत डॉक्टरांना कॉल करण्याचा प्रयत्न केला तरिही कॉल लागला नाही. इतर कोणत्या डॉक्टरचा नंबर त्याच्याकडे नव्हता. निशाची त्याला आणखीच काळजी वाटत होती त्यामुळे त्याने रागाच्या भरात भिंतीवर हात आपटला. निशाच्या काळजीने तो भावूक झाला होता; पण तेवढ्यात त्याला काहीतरी सुचले व त्याने ताबडतोब रोहिणी काकूंना फोन केला. 


रोहिणी काकूंनी लगेच फोन उचलला अन् त्या बोलू लागल्या, " हॅलो ए.के. बोल ना बाळा काय झालं? "


" काकू मला डॉक्टरांचा नंबर हवाय. लवकर! " ए.के. घाईत बोलला.


" अरे देते पण झालं काय नेमकं? " रोहिणी काकू विचारपूस करू लागल्या. 


" मी तुम्हांला सगळं सांगतो पण आधी मला तुम्ही डॉक्टरांचा नंबर द्या. " ए.के. बोलला. 


" बरं घे लिहून... " रोहिणी काकू बोलल्या व त्यांनी ए.के.ला डॉक्टरांचा नंबर दिला. नंतर त्यांनी परत विचारणा करण्याआधीच ए.के.ने सगळी वस्तूस्थिती त्यांना सांगितली. 

             

क्रमशः


...................................................................


©®

सेजल पुंजे.


🎭 Series Post

View all