थोड्या वेळाने निशा त्या कॅफेमधून निघून गेली. त्यानंतर ज्या काकांशी निशा गप्पा करत होती, त्याच काकांना तो तिच्याबद्दल विचारपूस करू लागला; पण त्या काकांना तो व्यक्ती त्या परिसरात नवखा वाटल्याने त्यांनी त्याच्याकडे दूर्लक्ष केले. शिवाय परक्या आणि अनोळखी व्यक्तीला निशाची माहिती देणे आवर्जून टाळले. जरासा खिन्न झाला होता तो; पण त्याच्याकडे निशाबद्दल माहिती काढून घेण्याचा कोणता पर्यायही उरला नव्हताच. म्हणूनच नाईलाजाने तो व्यक्ती माघारी वळला व आपल्या वाटेने निमूट निघून गेला.
तो पायदळ त्याच्या मार्गाने जात असताना एकटाच बडबडत होता. स्वतःच्या वेडेपणावर स्वतःचीच कान उघाडणी करत होता. तो स्वतःच्याच डोक्याला टपली मारून घेत बोलू लागला, " काय झालंय मला? का ओढ वाटतेय मला त्या अनोळखी मुलीची? प्रत्येक मुलींच्या नजरेला नजर भिडवून बोलणारा मी, आज तिच्याशी नजरानजर करणे का टाळत होतो? का मी तिला चोरून पाहत होतो? का मला तिची एवढी ओढ लागली? तिच्या त्या गहिऱ्या डोळ्यांना पाहताच मी का असा स्वतःला अनायासे हरवून बसलो? अन् माझं हे हृदय देखील का एवढं बेफाम होऊन धडधडायला लागलं होतं? आजपर्यंत मी कुणाचाच पाठलाग केलेला नाहीये; पण आज काय झालं होतं मला नेमकं? मी आज पहिल्यांदा कुणाचा तरी पाठलाग केला अन् तेही चक्क एखाद्या मुलीचा... पण का? का खेचला जात होतो मी तिच्या मागे? का मी तिच्या सभोवताली एखाद्या भुंग्याप्रमाणे भिरभिरत होतो? कोण असावी ती? काही कळतच नाहीये... "
अशाच असंख्य विचारांच्या नौकेत स्वार होऊन तो त्याच्या घरी निघून गेला. घरी येताच स्वतःचं आवरून, जेवण आटोपून तो बेडवर पहुडला. परत एकदा त्याला सायंकाळी घडलेला किस्सा आठवला आणि प्रश्नांचे सावट कपाळावर असतानाही तिचा चेहरा आठवताच त्याच्या ओठांवर हसू तरळले. अलगद त्याने त्याचा मोबाईल हातात घेतला आणि मोबाईलमधली फोटो गॅलरी उघडून त्यातले काही फोटो तो पाहू लागला. ते फोटो निशाचेच होते, जे त्याने चोरून काढले होते. त्या रात्री निशाचे फोटो पाहतच मध्यरात्री कधीतरी त्याला झोप लागली.
दुसऱ्या दिवशी शनिवार होता. त्याने मनात बरेच काही ठरवले होते. शिवाय निश्चित काम पार पाडण्यासाठी त्याने नियोजन केले होते अन् त्यासाठीच घराबाहेर जाण्याची त्याची धडपड सुरू होती. त्याने स्वतःचे आवरून घेतले व तो घराबाहेर पडला. त्यादिवशी त्याचा इंटरव्ह्यू असल्याने तो घाईगडबडीत होता. खरं सांगायचं तर, त्याच्या मनात इंटरव्ह्यूची भीती नव्हती... फक्त जराशी हुरहुर होती. ती हुरहूर देखील एवढीच की, ठरविल्याप्रमाणे त्याची त्या पदासाठी निवड व्हावी; कारण त्याने आतापर्यंत त्या पदासाठी बरीच धडपड केली होती. ती नोकरी करण्याची त्याची इच्छा पूर्ण व्हावी, त्याला फक्त एवढेच वाटत होते अन् तो त्याच तंद्रीत होता.
साधारण अर्ध्या तासाच्या आत तो ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू आयोजित केला गेला होता तिथे पोहोचला. तो तिथे पोहोचल्यानंतर काही वेळातच इंटरव्ह्यूला सुरुवात झाली. बराच वेळ इंटरव्ह्यू घेणे सुरू होते. कित्येक उमेदवार मुलाखत देवून उदास होऊन परतत होते. त्यामुळे त्यालाही थोडे दडपण जाणवत होते. त्याची पाळी येताच त्यानेही इंटरव्ह्यू दिला. त्याने बऱ्यापैकी त्याचा इंटरव्ह्यू दिला होता म्हणून त्याला आता फक्त निकाल जाहीर होण्याची वाट होती.
तो थोडा अस्वस्थ होता अन् तेवढ्यात एका चपराशीने निकाल जाहीर केला. त्यात त्याची त्या पदासाठी निवड करण्यात आली. ते पद आणि ती नोकरी कमी पगाराची होती; पण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद काही भलतंच सांगत होता; जणू त्याने गड जिंकला असावा. तिथे उपस्थित इतर उमेदवारांना त्याचा आनंद रुचला नाही. दुसरीकडे तो चक्क नोकरी मिळाल्याचा आनंद साजरा करत वेड्यागत नाचत होता; पण लगेच भानावर आला अन् शांत झाला.
पाच-एक मिनिटानंतर तेथील चपराशीने वरीष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश सांगितला व त्याला सोमवारपासून नोकरीवर रुजू व्हायला सांगतिले. त्यानेही समर्थन दर्शविले व तपशीलवार काही औपचारिक विधी पार पाडून घेतल्यावर तो त्याच्या घरी गेला. घरी पोहोचताच त्याने स्वतःचे आवरून घेतले व दुपारचे जेवण आटोपले. त्यानंतर काही वेळ मोबाईल चाळून तो टाईमपास करत होता. मोबाईल चाळताना मध्येच त्याला झोप लागली.
सायंकाळी त्याला जाग आल्यावर त्याने त्याची खोली आवरून घेतली व नंतर तो सुद्धा फ्रेश झाला. नंतर तो त्याच्या खोलीच्या बाल्कनीत असलेल्या छोट्या काऊचवर बराच वेळ शांत मुद्रेत बसून होता अन् तेवढ्यात त्याला आदल्या दिवशी घडलेला प्रसंग आठवला. त्याच्यासाठी अनोळखी असलेली निशा त्याच्या डोळ्यापुढे तरळली. तिचं स्मित आठवून त्याच्या ओठांवरही हसू पसरलं. तो लगेच त्याच्या खोलीत गेला अन् गिटार घेऊन बाल्कनीत आला. नंतर बाल्कनीच्या ग्रीलला रेलूनच मावळणाऱ्या सूर्याकडे पाहून गिटार वाजवून गुणगुणायला लागला. त्यानंतर त्याच्या घरी काम करणाऱ्या मावशीने जेवण बनविले. त्यानेही जेवणाची वेळ होताच जेवण आटोपून घेतले. त्यानंतर थोडा वेळ गच्चीवर शतपावली करून तो परत त्याच्या खोलीत जाऊन झोपी गेला.
त्याचा दुसरा दिवसही नेहमीप्रमाणेच निघून गेला. त्यानंतर सोमवार उजाडला. त्या दिवशी अगदी लगबगीनेच स्वतःचं सगळं आटोपून तो त्याच्या मार्गी लागला. त्याचा नोकरीचा पहिला दिवस असल्याने त्याचे किमान अर्धातास निश्चित वेळेच्या आधी हजर असणे अपेक्षित होते; पण तरीही या महाशयाने अगदी ठरवलेल्या वेळेवरच प्रवेश केला. सगळेजण तेथील प्रीमायसेसमध्ये जमलेले होते आणि तेवढ्यात तो पोहोचला, त्याची स्टायलिश बाईक घेऊन ते ही अगदी रुबाबदार अंदाजात!
काळा जीन्स, पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट अन् त्यावर हिरव्या रंगाचे लेदरचे जॅकेट! पायात स्पोर्ट्स शूज आणि हातात महागडे घड्याळ, हा त्याचा पेहराव होता. ज्यात तो अगदी आकर्षक दिसत होता. मुळातच गोरी कांती अन् भरीस भर म्हणजे केसांना जेल लावून नीट सेट केलेले असल्याने तो अर्थातच हॅंडसम दिसत होता. हलकेच गुलाबीसर असलेले ओठ आणि त्यावर अधिराज्य गाजवणारे दिलखेचक स्मित, अगदी कमाल दिसत होते. विशेषतः हलकेच हसताना त्याच्या गालावर पडणारी खळी आणखीच लोभस वाटायची. तो अगदी एखाद्या कॉलेज स्टुडंट प्रमाणेच दिसत होता; त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आपसूकच त्याच्यावर खिळून होत्या; पण तो त्याच्या त्याच अंदाजात, त्याच रुबाबात, स्मित करत बाईक पार्क करून जिथे सगळे जमलेले होते तिथे गेला व सगळ्यांसमक्ष उभा राहिला.
त्यानंतर थोडा जड आवाज असलेला एक इसम पुढे येऊन तिथे उपस्थित सर्वांना उद्देशून म्हणाला, " मुलांनो, आज आपल्या शाळेत एका नवीन सदस्याचे आगमन झालेले आहेत. हे तुमचे नवीन म्युजिक टिचर आहेत- ए.के. सर! आता तुम्ही सगळे टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. मी अपेक्षा करतो की, ए.के. सरांकडून तुमच्याबद्दल कसलीही तक्रार माझ्याकडे येणार नाही. " तो इसम अर्थातच शाळेचे मुख्याध्यापक होते.
" हो सर... " मुख्याध्यापकांना प्रत्युत्तर देत सर्व विद्यार्थी एकसुरात म्हणाले व नंतर सगळ्यांनी नवीन आलेल्या सरांचे टाळ्या वाजवून हसतमुखाने स्वागत केले. त्यानंतर मुख्याध्यापक ए. के. सरांवर नजर रोखून पण हसून म्हणाले, " ए.के. सर मी तुमच्याकडूनही अपेक्षा ठेवतोय बरं की, तुमच्याविरूद्ध कोणत्याही विद्यार्थ्यांची तक्रार माझ्या कानावर ऐकू येणार नाही. "
" मी वचन देतो सर, माझी तक्रार इथे उपस्थित कुणीच करणार नाही अन् कळत-नकळत असं काही घडण्याची आशंका मला वाटलीच तर, तो मामला फक्त विद्यार्थी अन् माझ्यात राहणार. त्याचा गौप्यस्फोट होऊच देणार नाही मी... " त्याने असं म्हणताच सगळेच हसायला लागले.
विद्यार्थांना थोडक्यात ए.के. सरांची ओळख करून दिल्यानंतर नित्यनेमाने राष्ट्रगीत आणि प्रार्थना झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थी त्यांच्या वर्गात निघून गेले आणि इतर शिक्षक वृंद त्यांच्या स्टाफरुममध्ये निघून गेले. ए.के. देखील स्टाफरुममध्ये जाण्यासाठी वळणार होता पण तेवढ्यात त्याला ती येताना दिसली. हो तीच, जिचा विचार तो एवढ्यात दिवसरात्र करत होता. जिच्याविना त्याला हल्ली गमत नव्हतं. जिचा विचार त्याच्या ध्यानी-मनी असायचा. होय तीच 'निशा!'
त्याला निशा येताना दिसली. त्याने तिला पाहिलं आणि तो परत एकदा नकळत तिच्याकडे हळूहळू पावले टाकत जाऊ लागला. दुसरीकडे ती शाळेच्या पटांगणात शिरली अन् नंतर थोडा वेळ थांबून मुख्याध्यापकांशी बोलू लागली.
क्रमशः
...............................................................
©®
सेजल पुंजे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा