अल्लड हे प्रेम जरासे (भाग-सतरा)

Story Of A Girl Who Is Stuck In Past But Hope For The Live Present Elegantly...

ए.के.ने कॅफेमध्ये येण्यामागे त्याचे कारण सांगताच निशा मंद हसली. त्यावर ए.के. म्हणाला, " सॉरी, मी चोरून काकांची लव्हस्टोरी ऐकली. " 


" इट्स ओके ओ! सॉरी वगैरे म्हणायची गरज नाहीये आणि मुळात तुम्ही कुठे चोरून ऐकली? तुमच्या कानावर शब्द पडत गेले आणि तुम्हाला आपोआप स्टोरी ऐकू येत गेली; पण हो! तुम्ही अर्धवट स्टोरी ऐकून येथून बाहेर न जाता थांबून राहिले, हा भाग अलाहिदा... " निशा हसून बोलली. 


" ह्म्म! थोडक्यात, मी चोरून ऐकलंसुद्धा आणि नाहीसुद्धा... असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला? " ए.के. बोलला. 


" ह्म्म, अगदी असंच नाही; पण असंच काहीसं... " निशाने परत हसून प्रत्युत्तर दिलं. 


तेवढ्यात काका मध्यस्थी करत निशाला उद्देशून बोलले, " निशा, तू ओळखतेस का या मुलाला? "


" हो काका! ते काय आहे ना... " असं बोलून निशा काकांना सगळं सविस्तर सांगू लागली. त्यांची शाळेत झालेली पहिली भेट, तो माशीचा किस्सा, ज्यात तो माशीशी काय बोलला, कशी माशीची कान उघाडणी केली, ते सगळं सांगितलं निशाने काकांना... ते ऐकून काकाही जाम हसले. ए.के. तर पार ओशाळून गेला होता. 


काका हसत असतानाच ते ए.के.च्या अगदी जवळ गेले आणि त्याच्या कानात अतिशय हळू आवाजात म्हणाले, " ती माशी निशा होती ना? "  


काकांनी अचूक अंदाज घेतला असल्याने त्यांचे शब्द ऐकून ए.के.चे डोळे विस्फारले होते आणि तो काकांकडे आश्चर्याने व काहीशा केविलवाण्या नजरेने पाहू लागला. त्याच्या मनातली चलबिचल ओळखून काका परत कुजबुज करत म्हणाले, " बाळा, मी चाळीस वर्षाचा आहे आणि अद्याप अनुभव बराच कमावलाय. त्यात माझी स्मरणशक्तीही खूप तगडी आहे; म्हणून अंदाज घेताना क्वचितच गफलत होते माझी! " 


ए.के.ला काकांच्या बोलण्याचा संदर्भ लक्षात येत नव्हता. म्हणून काका परत त्याला म्हणाले, " असा का गोंधळ करून घेतलास? बरं! अजूनही तुला नाही कळलं का? अरे तू नाही का त्यादिवशी निशाचा पाठलाग करत होतास. तिचं अगदी सूक्ष्म निरीक्षण करत होतास आणि ती कॅफेतून तिच्या घरी गेल्यावर तिच्याबद्दल विचारपूस करायला माझ्याकडेच तर आला होतास पण मी तुला माहिती देणे टाळलं होतं. आठवतंय का काही? " 


" हो! आता आठवलं... " ए.के. तो किस्सा आठवून बोलला. 


" ह्म्म! तर त्यावरूनच सगळा अंदाज लावला मी की, ती माशी दुसरी तिसरी कुणी नसून निशाच होय. आताशः हा किस्सा निशाकडून ऐकल्यावर आणि तुझा चेहरा पाहून मला ते सगळं लगेच आठवलं... " काका मंद हसत म्हणाले. 


काकांनी मुद्द्याची सविस्तर उकल करताच ए.के.ला कळलं की, काका नेमकं काय बोलत होते. म्हणून तो ओशाळून म्हणाला, " अं काका, हे सगळं ठीक आहे पण काका प्लीज निशाला... " 


एके पुढे काही बोलणारच पण त्याआधी काकांनी त्याला अडवले व ते स्वतः बोलले, " काळजी करू नकोस. मी निशाला काहीच सांगणार नाहीये. तिला भनकही लागणार नाही की, तू निशाला आधीही पाहिलं होतंस आणि ती माशी म्हणजे ती स्वतःच आहे. " काकांनी ए.के.च्या पाठीवर थोपटून त्याला आश्वस्त केलं व ते स्वतः गालातल्या गालात हसत होते. 


" थॅंक्यु सो मच काका! मी काही बोलायच्या आतच तुम्हाला कळलं मी काय बोलणार ते! बाय द वे, काका मी तिला अंधारात ठेवणार नाहीच. मी तिला सांगणार आहे की, मी आधीच तिला कुठे आणि कसं पाहिलं होतं पण हे सर्व अचूक वेळ आल्यावरच! आणि हे सगळं सांगायला जास्त उशीर करणार नाही मी! " ए.के. स्मित करत बोलला. 


" गुड! " काकांनी त्याच्या हातावर मंद हसून टाळी दिली. 


" काका, तुम्ही दोघेही एकट्यात काय बोलत आहात? " निशा एक भुवई उंचावून दोघांवरही नजर रोखून बोलली. 


" काही नाही गं! हा मुलगा परत सॉरी म्हणत होता त्यामुळे मी त्याची समजूत काढत होतो दरम्यान मी त्याला एक फुकटचा सल्ला दिला की, त्याला जर एखादी मुलगी आवडत असेल तर त्याने लवकरात लवकर तिला सांगायला हवं! " काकांनी खोटं उत्तर दिलं आणि ते ए.के.कडे पाहून गालातल्या गालात मंद हसले. 


" अच्छा... " निशा बोलली. 


" बरं, एक बोलू काका? " ए.के.ने काकांना विचारले. 


" हो, बोल ना... " काका म्हणाले. 

" आज तुमच्याकडून बरंच काही शिकलोय मी! पण सरतेशेवटी परत एक सल्ला तुम्हाला द्यावासा वाटतोय की, तुम्ही आता परत अबोल राहण्याची चूक करू नका. भूतकाळात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करू नये. " ए.के. गंभीर होत बोलला. 


" आता या उतारवयात अबोल राहण्याचा तर प्रश्न शेष राहतच नाही रे बाळा! कारण आताशः या वयात प्रेम-बिम होणार नाहीच. " विराज काका हसत बोलले. 


" काका, काय ओ तुम्ही! प्रेम करण्यासाठी कशाचंच बंधन नसतं. ना जातीचं, ना धर्माचं, ना लिंगाचं, ना वयाचं, ना प्रदेशाचं अन् ना कालावधीचं! प्रेम केव्हाही, कोणालाही, कुठेही अन् कोणत्याही वयात होऊ शकतं. असा कुठलाच नियम नाही की प्रेम फक्त तरुणांनी करावं. ज्या वयात प्रेमाची परिभाषा कळली त्या वयात प्रेम होत असतं. बालपण असो, तारुण्य असो वा वृद्धत्व! " ए.के. त्याचं मत व्यक्त करत बोलला. 


" अगदी बरोबर! काका, तुम्ही परत तिच चूक करत आहात. तुम्ही पुनश्च तुमचं प्रेम नाकारत आहात. " निशा नजर रोखून बोलली. 


" हे काय बोलत आहेस तू निशा? या वयात प्रेम? तेदेखील मला? कसं शक्य आहे? आणि बरं, समजा... मी मान्य केलं की, माझं एका व्यक्तीवर प्रेम आहे तर मग लोक काय म्हणतील गं मला? म्हणतील म्हाताऱ्याच्या अंगात तरुणपणाचे वारे शिरलेत... बरोबर ना! आणि लोकांचाही विचार सोडला तर माझ्यावर कोण प्रेम करणार? म्हणून नाहीये गं बाई माझं आता कुणावरच प्रेम... " काका बोलता-बोलता पाठमोरे उभे राहिले. 


" काका, नका ना असं खोटं बोलू... माझ्याशी नाही तर निदान स्वतःशी तरी खोटं बोलू नका... आणि लोकांचं काय घेऊन बसलात ओ? लोकांना काहीच देणं घेणं नसतं. ते फक्त तमाशा पाहायला आणि टोमणे मारायला टपून असतात. " निशा म्हणाली. 


" बरं, तू म्हणते आहेस तर लोकांचा विचारही सोडला समजा मी एक वेळ! तर मग आता मला सांग की, नेमकं तुला असं का वाटतंय की, माझं कुणावर तरी प्रेम आहे? आणि जर समजा मी खोटं बोलतोय तर मग खरं काय आहे? आता तूच सांग बरं सविस्तर! निदान मला तरी कळायलाच हवं! हो ना? " काकांनी निशालाच प्रतिप्रश्न केला. 


" हो, खोटंच बोलत आहात तुम्ही आणि मी सांगतेय ठामपणे की, तुमचं प्रेम आहे. ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे ती व्यक्तीचीही ओळख आहे मला! पण मला असं वाटतंय की, मी त्या व्यक्तीचा उल्लेख करण्याआधी तुम्ही स्वतःच सर्वकाही स्विकारणे, योग्य राहील. " निशा अगदी मुद्द्याला हात घालून बोलली. 


" काय सुरु आहे निशा तुझं? काहीही काय बोलत आहेस? तू बोलत आहेस ना, त्यातलं काहीच खरं नाहीये. खरंच नाहीये माझ्या आयुष्यात अशी कोणतीच व्यक्ती... गैरसमज झाला आहे तुला निशा... " काकाचा हळूहळू संताप होत होता पण अजूनही ते पाठमोरे उभे राहूनच बोलत होते. 


" बरं, मग काका मला सांगा. खरंच, तुमचं रोहिणी काकूंवर प्रेम नाहीये? त्यांच्यासाठी तुमच्या मनात जराही भावना नाहीत? त्यांच्याबद्दल काळजी नाही? द्या माझ्या या प्रश्नांची उत्तरं ते ही नजरा चोरून नव्हे तर माझ्या डोळ्यात बघून बोला... " निशा बोलली आणि तिने विराज काकांना स्वतःच्या चेहऱ्याकडे वळवलं. ए.के. मात्र फक्त बघ्याची भुमिका घेऊन होता कारण नेमकं काय सुरू आहे त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न तो करत होता.

क्रमशः

...................................................................


©®

सेजल पुंजे. 


🎭 Series Post

View all