अल्लड हे प्रेम जरासे (भाग-सोळा)

Story Leads Past And Present...

निशा वारंवार दिलगिरी व्यक्त करत माफी मागत होती त्यामुळे विराज काका तिचे हात त्यांच्या हातात घेत म्हणाले, " निशा, तू कशाला सारखं सारखं सॉरी बोलत आहेस? आज तू जान्हवीचा उल्लेख केलास म्हणून कितीतरी दिवसांनंतर व्यक्त तरी झालो गं मी... अन्यथा जान्हवी गेली आणि मी व्यक्त होणं जवळजवळ टाळलं होतं. जान्हवीला फक्त आठवणीतच आठवलंय मी आजपर्यंत; पण आज तुझ्यामुळे तिच्या त्या आठवणी पुन्हा जगता आल्या मला! त्यासाठी मी तुझा आभारी आहे म्हणून तू सॉरी म्हणू नकोस! बाय द वे, एक मनातली गोष्ट सांगू, मला ना खरं दुःख तर एकाच गोष्टीचं वाटतं, की मी तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत व्यक्त होऊ शकलो नाही. खरंच, राग येतो मला माझाच! मी जर त्यावेळी अव्यक्त न राहता, तिच्याकडे दुर्लक्ष न करता तिला वेळ दिला असता आणि मी व्यक्त केलं असतं माझं मन तर आज परिस्थिती वेगळी असती, हीच खंत मला आजही जाणवते. कदाचित, मला आधी अक्कल आली असती तर बरं झालं असतं. निदान ही पश्चात्तापाची वेळ आली नसतीच! " विराज काका नाराजी व्यक्त करताना तोंड पाडून बोलले.


" जेव्हा ठरवले होते करावी व्यक्त प्रीत माझी

तेव्हा नियतीनेही खेळी विचित्र खेळली, 

अबोल प्रीत माझी अबोलच राहिली

कारण शेवटी तिची प्राणज्योत मावळली... " विराज काकांचं मन भरुन येताच ते चारोळीतून व्यक्त झाले. 

त्या दरम्यान निशा आणि विराज काकांच्या पाठीमागून एक आवाज आला. " जर दोन हृदयाची झाली नसती काहिली

तर प्रीत ती तुमची अबोल नसती राहिली

आज तुमच्याहीसोबत असती तुमची अर्धांगी

जिच्या सहवासाने रंगले असते आयुष्य प्रेमरंगांनी... 


अव्यक्त राहण्याची का सवय करून घेतली

विरहाला कायम का तुम्ही गवसणी घातली? 

त्याच चुकीचे प्रतिफळ लाभतंय तुम्हास क्षणोक्षणी, 

आज वाटेत चालताना गमावली तुम्ही सोबती.. " 


                ते शब्द ऐकताच निशा आणि विराज काकांचे डोळे विस्फारले आणि त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले. समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे बघताच निशाचे डोळे विस्फारले. ती त्या व्यक्तीशी बोलणार होती पण तेवढ्यात त्या व्यक्तीने मध्येच तिला रोखलं आणि मोर्चा विराज काकांकडे वळविला.


तो व्यक्ती विराज काकांना उद्देशून म्हणाला, " काका, मी पहिल्यांदा तुमची माफी मागू इच्छितो, कारण तुमची परवानगी न घेता मी तुमचं सगळं बोलणं ऐकत होतो. तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातील क्षणांचा, आठवणींचा कळत-नकळत भागीदार झालोय आणि तुमच्या प्रेमकथेचाही साक्षीदार झालोय. मला हक्क नाहीये, तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात बोलण्याचा पण तरीही मला बोलावंसं वाटतंय. जर तुमची काही हरकत नसेल तर बोलू का? "


काकांनी मानेनेच परवानगी दिली. परवानगी मिळताच तो व्यक्ती बोलू लागला, " काका मला ना खरंच वाटतंय की, तुम्ही खूप जास्त चुकलात. तुम्ही चुकी केली अव्यक्त राहून, कायम टाळाटाळ करून! मला सांगा, काय हवं असतं ओ स्त्रियांना, फक्त प्रेमाचे दोन शब्द... दुसरी कुठलीच अपेक्षा नसते त्यांना! त्या सगळं राजीखुशीने सांभाळतात. माहेरी असल्यावर माहेरच्यांना आणि सासरी असल्यावर सासरच्या लोकांना आधार देतात. निव्वळ कष्ट करतात विनातक्रार... 


                जान्हवी काकूंनीही तेच केलं! ना कधी तक्रार केली, ना कोणता हट्ट बाळगला! सगळं निमूटपणे करत राहिल्या अखेरच्या श्वासापर्यंत पण त्याची परतफेड कशी केली तुम्ही? फक्त आणि फक्त दुराव्याची ओटी पदरात पाडून? तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव उशीर होण्याआधी का झाली नाही? काकूंना निदान दोन क्षणांचा विसावा जोडीदाराच्या मिठीत मिळावा ही त्यांची माफक अपेक्षा असेलच पण त्या क्षुल्लक अपेक्षेचाही अपेक्षाभंग झाला असेल तर, किती मन दुखावलं असेल त्याचं! 


                जरा तुम्ही वेळीच निर्णय घेऊन जान्हवी काकूंची ख्यालीखुशाली विचारण्याचा प्रयत्न केला असता तरी, त्यांना त्या आनंदापुढे आभाळ ठेंगणं वाटलं असतं. त्यांचा ब्रेस्ट कॅन्सर ठीक झालाच असता असं म्हणणार नाही मी; पण निदान त्यांनी जगण्याची इच्छा सोडली नसती. त्यांचं शरीर नाही मन थकलं होतं अन् एकदा मन थकलं की, सर्व इच्छा आकांक्षा जणू मृत पावतात. म्हणून काकूंनीही विश्रांती घेण्याचं ठरवलं. " एवढं बोलून तो इसम जवळच्याच टेबलचा आधार घेत बसला.


बोलताना त्याचा आवाज जड झाला होता. त्यामुळे स्पष्ट जाणवत होतं की, तो व्यक्ती खूप भावूक झाला होता; पण त्याचं बोलणं संपताच निशा त्याला उद्देशून बोलली, " हे बघा, तुमचं म्हणणं पटतंय मला... पण त्यावेळी काकांना नाही कळल्या काही गोष्टी! म्हणून तर म्हण आहे ना की, काही व्यक्तींची किंमत ती व्यक्ती आपल्या सोबत नसतानाच कळते. अगदी तसंच काकूंच्याही बाबतीत झालं. काकांना वेळ गेल्यावर त्यांची चूक कळली आणि जेव्हा त्यांनी स्वतः व्यक्त व्हायचं ठरवलं होतं तेव्हा बराच उशीर झाला होता. यात त्यांचीच पूर्णतः चूक होती, असं नाही ना म्हणता येणार! हा सगळा नियतीचा अन् वेळेचा खेळ आहे ओ! म्हणून जेव्हा व्यक्त व्हायचंय तेव्हाच व्यक्त झालेलं बरं असतं... "


" हो, तुमचंही अगदी बरोबर आहे. काकाच सर्वस्वी जबाबदार नाही आहेत पण काय करू? मला सर्व ऐकून गप्पच बसावेसे वाटले नाही. तुमचं म्हणणं आताशः पटतंय मला... थोडक्यात, कदाचित काकांनी ती चूक केली म्हणून त्यांना त्यांचं जान्हवी काकूंवर किती प्रेम आहे, ह्याची तरी जाणीव झाली. त्याचबरोबर मला पर्सनली वाटून गेलं की, कळत-नकळत काकांनी केलेली अबोल राहण्याची चूक आपण न केलेलीच बरी! " तो व्यक्ती कसनुसं हसून बोलला. त्यावर निशाने हुंकार भरला


थोड्या वेळाने तो व्यक्ती विराज काकांना उद्देशून म्हणाला, " बाय द वे, सॉरी काका! भावनेच्या भरात मी जर तुमचं मन दुखावलं असेल तर! मला हर्ट करायचं नव्हतं पण कळत-नकळत झालं असेल तर सॉरी! " तो इसम दूरवर नजर रोखून बोलला.


" नाही रे, बाळा! तू माफी मागू नकोस कारण अगदीच बरोबर बोललास तू आणि यात सॉरी म्हणण्यासारखं खरंच काय आहे? तुला जे वाटलं ते तू बोललास. " काका अगदी नॉर्मल होऊन हसत बोलले. 


" थॅंक्स काका, मला समजून घेतल्याबद्दल! " तो इसम बोलला.


त्या इसमाशी काका आणखी बोलणार होते पण तेवढ्यात निशा त्या व्यक्तीला उद्देशून म्हणाली, " अं... बाय द वे, एक मिनिट! मला तुम्हाला ना याआधी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय... अं... मला वाटतं की... तुम्ही... कदाचित तुमचं नाव ए.के. आहे ना? नुकताच जॉईन झालेले म्युझिक टिचर? बरोबर? " 


" हो, बरोबर ओळखलंत! माझं नाव ए.के.च आहे." तो इसम अर्थात ए.के. बोलला. 


" ह्म्म! कदाचित म्हणूनच मला मघापासून असं वाटत होतं की, तुम्हाला मी कुठेतरी पाहिलंय... पण नेमकं कुठे पाहिलंय ते आठवत नव्हतं. " निशा स्पष्टीकरण देत बोलली. 


" ह्म्म कदाचित आपली नीट झाली नाही म्हणून फारसं तुमच्या लक्षात राहिलं नसेल. " ए.के. बोलला. 


" ह्म्म कदाचित! असो! पण तुम्ही मला सांगाल का की, तुम्ही आज अचानक इकडे कसे काय आणि विशेष म्हणजे या कॅफेत कोणत्या निमित्ताने येणं झालं बरं? " निशा ए.के.ला उद्देशून बोलली. निशाने प्रश्न विचारताच ए.के.ची धांदल झाली कारण तो का तिथे गेला होता, हे सांगू शकणार नव्हता; म्हणून तो प्रश्नांची जुळवाजुळव करू लागला. 


" अं... मी इथे एका मित्राला भेटायला आलो होतो पण त्याने ऐनवेळी सांगितलं की, त्याला इथे यायला जमणार नाही म्हणून मग इथे टाइमपास करत बसलो होतो. तेवढ्यात काका आणि तुमचं बोलणं कानावर पडलं. तुम्ही त्यांची लव्हस्टोरी ऐकण्यासाठी केलेला हट्ट वगैरे सगळं ऐकलं मी आणि नंतर काकाची स्टार्ट टू एन्ड लव्हस्टोरीही ऐकली मी! " ए.के.ने बहाणा केला.


क्रमशः

.............................................................. 


©®

सेजल पुंजे. 


🎭 Series Post

View all