अल्लड हे प्रेम जरासे (भाग-१२)

This Series Is The Journey Of The Characters Who Are Searching Their Soulmates...

                ए.के.च्या चेहऱ्यावर तेज कुणामुळे आलं हा जर प्रश्न मनात डोकावत असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर निशाच होतं! कारण त्याच्यापुढे दुसरे तिसरे कुणी नसून समुद्रासोबत हसत-खेळत बोलणारी निशाच उभी होती अन् अर्थातच ए.के. तिलाच पाहायला म्हणून घराबाहेर पडला होता... कारण कुठे ना कुठे त्याला मनातून वाटत होतं की, ती नक्कीच तिथे येईल आणि त्याला तिला पाहता येईल. म्हणूनच निशाला स्वतःच्या नजरेपुढे पाहून ए.के. जाम खूश झाला होता. निशाला समुद्राशी हसून बोलताना पाहून ए.के.ला फार अप्रूप वाटत होतं अन् त्यामुळे कदाचित तो त्याच्याही नकळत अगदीच सुखावला होता. म्हणूनच तो तिचे आणखीच बारकाईने निरीक्षण करत होता. 


                थोड्या वेळानंतर त्याने घड्याळात पाहिलं तर साडे पाच झाले होते अन् तोपर्यंत तिचाही समुद्रासोबतचा संवाद आटोपला होता व ती जवळच्याच 'वृंदावन' नर्सरीमध्ये गेली. तिथे गेल्यावर थोडा वेळ ती तिथल्याच एका दहा वर्षाच्या मुलाशी गप्पा मारत बसली होती अन् सवयीप्रमाणे ए.के. सुद्धा तिच्या मागोमाग नर्सरीमध्ये जाऊन तिचं बोलणं ऐकू येईल एवढ्या अंतरावर झाडाझुडपांच्या साहाय्याने स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत उभा होता. 


तेवढ्यात तिथल्याच दहा वर्षाच्या मुलाला उद्देशून निशा बोलली, " अरे सिड! बाळा, रोहिणी काकू कुठेच दिसत नाही आहेत? त्या ठीक आहेत ना? त्यांची तब्येत वगैरे ठीक आहे ना? " 

" अगं डार्लो! डोन्ट वरी! आईची तब्येत तशी ठीकच आहे गं... पण काय झालं ना, आज तिचा उपवास होता ना म्हणून मीच तिला आराम करायला सांगितलं. उगाच कशाला तिला दगदग करायला लावायची म्हणून... बाय द वे, मी चांगलं काम केलं ना? " तो दहा वर्षाचा मुलगा सिड त्याची नसलेली कॉलर टाइट करत निशाने विचारलेल्या प्रश्नाला प्रत्युत्तर देत बोलला. 


" हो रे पिल्लू! जाम भारी काम केलंस तू! माझं पिल्लू लय गुणाचं आहे बघ... " निशा सिडचे गालगुच्चे घेत बोलली. 



" मग डार्लो... मला माझं हक्काचं गिफ्ट दे ना? " सिड त्याच्या गालाकडे बोट दाखवून निशाला उद्देशून बोलला. 


" ह्म्म! पिल्लू आता खूप बालिश आणि मस्तीखोरही झालंय वाटतं; पण असो! देते मी तुला तुझं गिफ्ट! ये इकडे! " निशा बोलली अन् लगेच तिने सिडच्या गालाचा पापा घेतला. त्यानंतर सिडनेही तिची नक्कल करत तिच्या गालाचा पापा घेऊन तिला मिठी मारली आणि निशाने त्याला मिठीत घेत त्याच्या डोक्यावर मस्करीत हळूच टपली मारली. 


                सिड अर्थातच सिध्दांत हा साधारण दहा वर्षाचा असून त्याच्या आईचं नाव रोहिणी नलावडे आहे. रोहिणीचे वय पस्तीस वर्ष असून तिने एकटीनेच सिध्दांतला लहानाचं मोठं केलंय. खरंतर, तिने बारा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता पण लग्न केल्यानंतर तिची दशा बिकट झाली. मोजून मापून चार दिवस तिचे सुखात गेले; पण नंतर वेळेपरत्वे रोहिणीचा नवरा तिचा जाच करू लागला. तो जाचही ती निमूट सहन करायची; परंतु दारूचं व्यसन रोहिणीचा नवरा अरविंद याला जडल्याने तो मर्यादेपलीकडे चिडचिड करायचा, अग्रेसिव्हली वागायचा. एवढेच नव्हे तर, त्याची विद्रूप बुध्दी रोहिणीचा छळ करण्यात पटाईत होती म्हणून तर तो नको नको त्या सर्वप्रकारे रोहिणीचा शारीरिक अन् मानसिक छळ करायचा. 


                अरविंदने कामधंदा कधी केला नव्हता अन् चार पैसे कमवावे, अशी इच्छाशक्तीही त्याच्या स्वभावात दूरदूरपर्यंत नव्हती. दरम्यान रोहिणीला दिवस गेले पण ती प्रेग्नंट असल्याची खबर मिळताच तो भविष्यात त्याला पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदारींना घाबरून तो अख्खा प्रपंच उद्ध्वस्त करून रोहिणीला आणि तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला वाऱ्यावर सोडून घर सोडून गेला. त्यावेळी रोहिणी पूर्णत: खचून गेली होती पण नंतर तिने स्वतःला खंबीर केलं. पोटात वाढणाऱ्या बाळासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांपुढे पदर पसरला. काही स्वयंसेवी संस्थांनी तिला मानसिक आधार दिला. तसेच एका स्वयंसेवी संस्थेने तिचं बाळंतपणाचा खर्च उचलला. तिची नि तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाची देखभाल केली. 


                बाळंतपण झाल्यावर काही काळानंतर तिला लोन काढून एक छोटेखानी नर्सरी उघडून दिली. त्यामुळे जास्त काही नाही पण त्यांच्या दैनंदिन गरजा भागतात. त्याचबरोबर निशाच्या सल्ल्यानेच वेस्ट पासून बेस्ट वस्तू बनविण्याचं कौशल्य रोहिणीने आत्मसात केलं अन् स्वतःला कुशल करवून घेतलं. त्या कौशल्याचा फायदा व्हावा म्हणून निशाने त्या हॅंडमेड वस्तूंची ऑनलाईन विक्री करण्यासाठी एक वेबसाइट तयार करून दिली अन् वेबसाईटबद्दल सर्व माहिती रोहिणीला सांगितली. त्यामुळे रोहिणी बऱ्यापैकी त्या क्षेत्रात पारंगत झाली असून ती त्यातूनही घरखर्च काढते. 


                शिवाय सिध्दांतही त्याच्या आईच्या तुलनेत कमी नाहीच! तो स्कॉलरशिप मिळवून स्वतःचं शिक्षण घेतोय. त्याचबरोबर रोहिणीच्या मनाविरुद्ध वागणे टाळून तो तिच्या मनाला जपतो. तसेच तो रोहिणीला नर्सरीच्या कामात हवी ती मदत करतो अन् त्याच्या कलाकुसरीने तो बुके बनवतो आणि त्याची त्याच्यापरीने थोड्याफार प्रमाणात अधुनमधून विक्री करतो. थोडक्यात सिध्दां आणि रोहिणी या कथेतील इतर महत्त्वाचे पात्र आहेत हे लक्षात आले असेलच. 


                सिद्धांतसोबत बोलताना निशाला वेळेचं भानच राहिलं नाही; पण वेळेची जाणीव होताच तिने तिचं बोलणं आवरतं घेतलं व ती नर्सरीमधून निघाली आणि लगेच नर्सरीलगतच्या कॅफेमध्ये गेली. साहाजिकच तिच्याच मागोमाग ए.के.ही गेला. कॅफेचे मालक असलेले काका फ्रंट काऊंटरवर न दिसल्याने ती कॅफेमध्ये शिरताच त्या काकांना हाक मारू लागली. 

" विराज काका? ओ विराज काका! कुठे आहात? या ना जरा! " निशा हाक देत बोलली. 


" अगं, हो! आणखी किती हाका मारणार आहेस! थांब जरा आलोच! " बोलता-बोलताच फडक्याला हात पुसत विराज काका बाहेर आले. नंतर ते निशाला उद्देशून म्हणाले, " बोल गं! काय बोलत होतीस तू? "


" अं... तसं एवढं काही विशेष नाही पण तुम्ही माझ्यासाठी जी स्ट्रॉंग कॉफी बनवता ना... तर नित्यनेमाने माझ्या कॉफी पिण्याची वेळ झालीय... तर, मी त्यासाठीच तुम्हाला हाक मारत होते.. " निशा एखाद्या लहान बाळाप्रमाणे अगदीच बालिश स्वरात बोलली. 


तिची फर्माईश ऐकून विराज काका गालातल्या गालात हसले आणि त्यांनी तिच्या डोक्यावरून आपुलकीने हात फिरवला आणि ते कॉफी करण्यासाठी लगेच वळले; पण तेवढ्यात निशा विराज काकांना उद्देशून बोलली, " काका, असं नाही का वाटत की, आज कॅफे जरा जास्तच शांत आणि सामसूम आहे... "


" हो, आहे तर खरं! पण मग आता त्याला उपाय काही नाही ना! " विराज काका उत्तरले. 


" हो, त्यावर उपाय नक्कीच नाहीये; पण या एकांताचा आणि शांततेचा आपल्याला लाभ घेता येईल. " निशा सूचक बोलली.


" म्हणजे? तुला नेमकं काय म्हणायचंय निशा मला कळलं नाही गं! " विराज काका न कळून बोलले.


" काका, तुम्ही पण ना... फार भोळे आहात. असो! तुम्ही एक काम करा! तुम्ही आधी आपल्या दोघांसाठीही कॉफी घेऊन या नि नंतर माझ्या बाजूला निवांत बसा आणि मला तुम्ही जे मागे प्रॉमिस दिलं होतं ते पूर्ण करा. आता कोणतं प्रॉमिस बोलून मला वेड्यात काढू नका. तुम्हाला ठाऊक आहे की, मागे तुम्ही मला शब्द दिला होता की, जेव्हा तुम्हाला उसंत मिळेल, तुम्ही निवांत असाल तेव्हा तुम्ही मला तुमची आणि जान्हवी काकीची लव्हस्टोरी सांगणार! तर तुमचा तो शब्द पाळा आणि वेळ न घालवता सुरुवात करा. " निशा ओठांचा चंबू करून विराज काकांकडे हट्ट करत होती. विराज काका नानाविध कारणं देऊन त्यांची प्रेमकथा सांगायला नकार देत होते पण निशाच्या हट्टापुढे त्यांचं काही एक चाललं नाही.


                दुसरीकडे ए.के. मात्र कॅफेमधल्या एका कोपऱ्यातील टेबलवर बसून निशाच्या सर्व लीला न्याहाळत होता. मात्र त्याने त्याच्या हातात वृत्तपत्र घेऊन त्याने त्याचा चेहरा पूर्णतः झाकून घेतला होता; पण त्याला अधुनमधून संधी मिळताच तो अलगद लपूनछपून निशाच्या हालचाली टिपत होता. 


क्रमशः

......................................................... 


©® 

सेजल पुंजे. 


🎭 Series Post

View all