अल्लड हे प्रेम जरासे (भाग-६)

दोन ध्रुवावर ते दोघे, जुळतील का त्यांच्यात प्रेम दुवे?

निकिताने परिचय दिला व ती थोडी मागे सरकून उभी राहिली. तेवढ्यात एक मॅडम तिच्या कानात कुजबुज करू लागल्या. त्या तिला म्हणाल्या, " नक्की म्युझिकमध्ये इंटरेस्ट आहे की म्युझिक शिकवणाऱ्यात इंटरेस्ट आहे गं तुझा निकिता? " 


                त्या मॅडमचे वाक्य ऐकताच निकिता ओशाळली. तिने तिचा चष्मा लाजून परत एकदा सावरला. दुसरीकडे त्या मॅडम जे कुजबुजल्या ते ए.के.लाही ऐकू गेलं होतं. म्हणून ते ऐकताच त्याला थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं. शिवाय त्यावर निकिताचे ओशाळणे पाहताच त्याच्या भुवया आपोआप उंचावल्या होत्या आणि तो त्या मॅडमकडे एकटक पाहू लागला.


त्या मॅडमची आणि ए.के.ची नजरानजर होताच त्या बोलल्या, " बरं! आता मी माझा परिचय देते. नमस्कार, मी सौ. स्वर्णा राज्याध्यक्ष! इथे विद्यार्थ्यांना गणित शिकवते आणि नावडीने का होईना मुलांना गणित शिकावंच लागतं माझ्या मार्गदर्शनाखाली; पण कुणी तक्रार करत नाही. धाक आहे ना माझा तसा! बाय द वे, मी मस्करी करतेय ओ... अन्यथा विद्यार्थ्यांऐवजी तुम्हीच माझी मुख्याध्यापकांकडे तक्रार कराल. असं करु नका हं! " स्वर्णा मॅडम बोलल्या. 


" नाही करणार तक्रार! खरं सांगायचं तर, मॅडम मला तुम्ही आवडल्या. विशेषतः तुमचा स्वभाव भारी वाटला मला. अगदी दिलखुलास! " ए.के. गालातल्या गालात हसत बोलला. 


" ह्म्म, आता स्वभाव आवडला काय नि मी आवडली काय! सर्व निरर्थक आहे बरं! कारण माझं लग्न झालंय ना दहा वर्षे आधीच. माझ्या मते, तुम्ही माझ्या आयुष्यात यायला बराच उशीर केलाय. एवढी चांगली मुलगी गमावून बसलात तुम्ही ए.के. सर. " स्वर्णा मॅडम परत हसून बोलल्या. 


" हो ना, बघा ना... बराच उशीर केलाय मी! मला विचार येतोय की, तुमच्यासारखी सोज्वळ मुलगी मिळणार की नाही आता मला भविष्यात... तरी चला असो... पश्चात्ताप करण्यात तथ्य नाहीये. हो ना! " ए.के. गालातल्या गालात हसून बोलला त्यावर स्वर्णा मॅडमही खळखळून हसल्या. ए.के. पुढे बोलला, " मस्करीचा भाग वेगळा पण खरंच मज्जा येणार आहे मला तुमच्या सोबत. सेन्स ऑफ ह्युमर खरंच भारी आहे तुमचा. "  


स्वर्णा मॅडमने हलकेच स्मित केले व त्यांनी ए.के.चे स्वागत करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर थोडं टक्कल असलेले सर परिचय देण्यासाठी पुढे आले. ते म्हणाले, " नमस्कार, मी राकेश सरपोतदार आहे आणि मी इतिहास विषयाचा प्राध्यापक आहे. या शाळेत तुमचे स्वागत आहे. "


ए.के. मंद हसला आणि राकेश सरपोतदार सरांशी हातमिळवणी करून म्हणाला, " नमस्कार सर! तुमच्याकडून शाळेच्या इतिहासाची पाळेमुळे जाणून घेण्यात मला मज्जा येईल आणि त्यामुळे माझी मदतही होईल! "


" हा मज्जा येईल ते नक्कीच पण मदत कसली? " सरपोतदार सरांनी साशंक नजरेने विचारले. 


" मदत काही मोठी नाही ओ सर... शाळेचा इतिहास कळला तर, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अंदाज बांधता येईल. तसेच सर्वांगीण रितीने विद्यार्थ्यांमध्ये संगीताची आवड निर्माण कशी करता येईल, याचे नियोजन करता येईल ना मला म्हणून... " ए.के. शब्दांची जुळवा-जुळव करत बोलला. म्हणून सरपोतदार सर साशंक नजरेनेच ए.के.कडे पाहत होते. 


" सर, मी मदतीबद्दल सहज बोलून गेलो. थोडक्यात मला एवढंच म्हणायचं होतं की, मला विद्यार्थी अन् इथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला मदत होईल तुमच्या आणि इतर शिक्षकांच्या मदतीने... " एके कसंनुसं हसत बोलला. 


" हो, मग बरोबर बोललात तुम्ही! " सरपोतदार सर म्हणाले. 


" हाय ए.के.! मी अमेय देशमुख! मी जेव्हापासून निशा इथे आहे अगदी तेव्हापासून इथेच आहे आणि हो, मी दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थ्यांचा आवडता सर आहे. मला वाटतं तुझं माझं छान जमेल. " अमेय म्हणाला. 


                अमेय देशमुख हा साधारण सव्वीस ते सत्तावीस वर्षाचा होता. दिसायला अगदी रुबाबदार अन् त्याचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता. 


" दुसऱ्या क्रमांकाचा का बरं? " ए.के.ने हनुवटीला बोट घासत विचारले. 


" कारण पहिल्या क्रमांकाच्या सिंहासनावर निशा विराजमान आहे ना... तीच तर विद्यार्थ्यांची सर्वात आवडती टिचर आहे. तिच्यानंतर माझा नंबर लागतो म्हणून मी दुसऱ्या क्रमांकाचा आवडता सर आहे! " अमेय हसत बोलला. 


अमेयच्या वाक्यावर ए.के. सुद्धा हसला आणि म्हणाला, " अच्छा... असं असेल तर मला बघावं लागेल की, किती दिवस निशा मॅडम पहिल्या क्रमांकाच्या सिंहासनावर विराजमान राहणार! कारण आता मी आलोय ना तर साहाजिकच निशा मॅडमचा स्पर्धक आलाय म्हणून समजा... " 


" हो, हो पाहा! आणि तुम्ही करा कसोशीने प्रयत्न... आणि मीही पाहतोच कोण कोणाला मात देणार? खरंतर, निशाला कुणाशी स्पर्धा करायची नसते म्हणून ती काहीच खास करणार नाही, तिची जागा शाबूत ठेवण्यासाठी पण तरीही तीच तुम्हाला मात देईल! " अमेय हसत म्हणाला.


" ओह! मला चॅलेंज? बघ हा! मला हरण्याची सवय नाहीये आणि मला कुणी नापसंत करूच शकत नाही... " ए.के. हसून म्हणाला. 


" तू तुझ्या परीने प्रयत्न कर! निकाल वर्षाअखेर कळेलच! " अमेय म्हणाला. त्यावर ए.के.ने हसूनच हुंकार भरला.


                ते दोघेही जणू जुने मित्र भेटल्याप्रमाणे गप्पा करत होते. कधी त्यांच्यातील औपचारिकतेची जागा अनौपचारिकतेने घेतली, हे कळलंच नाही. ते अरे-तुरे करत एकमेकांशी बोलू लागले. त्यांनी हातमिळवणी करण्याऐवजी मित्रांनी एकमेकांची भेट घ्यावी तशी मिठी मारली. थोडक्यात, थोड्या वेळातच त्यांची चांगली मैत्री झाली होती. 


" चला, सगळ्यांची ओळख परेड झालीय तर आता आपण महत्त्वाचं काम आटोपायला हवे! विद्यार्थी अन्यथा वर्गात गोंगाट करत बसतील. " सरपोतदार सर बोलले. सगळ्यांनीच सरपोतदार सरांच्या वाक्याला दुजोरा दिला व ते सर्वच आवरून स्टाफरुमच्या बाहेर गेले. 


                ए.के.ची पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांशी छान मैत्री झाली होती. शिवाय शिक्षकांशीही जुळले होते आणि भरीस भर त्याला अमेयसारखा मित्र मिळाला होता. थोडक्यात, त्याची सुरुवात योग्य झाली होती. एव्हाना संध्याकाळ झाली होती पण अजून ऑफिशियली ए.के. आणि निशाची भेट झाली नव्हती. त्यादिवशी निशाकडे गाडी नव्हती म्हणून मुख्याध्यापकांच्या परवानगीने ती थोडी लवकर घरी गेली होती; त्यामुळेदेखील ए.के. आणि निशाच्या भेटीचा योग जुळून आला नाही. सायंकाळचे चार वाजले होते अमेय आणि ए.के. त्या दोघांचेही कुठल्याही वर्गात लेक्चर नसल्याने ते दोघे स्टाफरुममध्ये बसले होते. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर दोघेही गप्प बसले.


तेवढ्यात ए.के.ला काहीतरी सुचलं आणि त्याने अमेयकडे पाहून बोलायला सुरुवात केली, तो म्हणाला, " अमेय, तुझी हरकत नसेल तर मला एक गोष्ट विचारायची होती. विचारू का? " 


" अरे ए.के. यार... अशी परवानगी कशाला घेतोय? जे विचारायचंय ते तू मला बिनधास्त विचार! " अमेय मंद हसून बोलला. 


" ह्म्म! विचारतो पण प्रश्न थोडासा पर्सनल आहे. " ए.के. बोलला. 


" बिनदिक्कत विचार तू... " अमेय हसून बोलला.


" तू आणि त्या निशा मॅडम एकत्रच कामावर रुजू झाले आहात... बरोबर ना... तर मला वाटतं की, तुला बऱ्याच अंशी त्यांचा स्वभाव कळला असेल... म्हणून तू मला सांगू शकतोस का त्या निशा मॅमचा नेमका स्वभाव कसा आहे? " ए.के. थोडा अवघडून बोलला. 


" हो, मला निशाचा स्वभाव माहिती आहे पण तू एकाएकी तिच्या स्वभावाबद्दल असं का विचारतोयस? काय झालं? विद्यार्थ्यांच्या फेव्हरेट लिस्ट बद्दल तू खरोखरंच सिरियस झालास का? मी मस्करीत बोललो होतो, त्यासाठी एवढे एफर्ट्स घ्यायची गरज नाही. हो, निशा विद्यार्थ्यांची आवडती टिचर आहे पण ती खरंच कुणाशी स्पर्धा करत नाही आणि महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थीदेखील बाकी शिक्षकांसोबत भेदभाव करत नाहीच मुळी... म्हणून, तू निवांत राहा! " अमेय लागोपाठ बोलत होता अन् ए.के. डोळे विस्फारून त्याच्याकडे एकटक पाहत होता. 


अमेयचे प्रश्न संपताच तो गप्प बसला. ए.के. त्याला म्हणाला, " अमेय! अमेय! अमेय! दम घे जरा! तू विचार करतोय, तसं काही नाहीये. मला माहीत आहे की, तू मस्करीत बोलला होतास आणि मी देखील मिस निशा सोबत स्पर्धा करणार नाहीये. तर शांत हो आधी! " 


" मग तुला निशाचा स्वभाव का जाणून घ्यायचा आहे? " एव्हाना अमेय शांत झाला होता. म्हणून त्याने ए.के.ला त्याच्या मनातला प्रश्न विचारला पण त्याचा प्रश्न ऐकून ए.के. काही वेळ गप्प बसला. 


क्रमशः

............................................................... 


©®

सेजल पुंजे. 



🎭 Series Post

View all