Feb 25, 2024
पुरुषवादी

अल्लड हे प्रेम जरासे (भाग-२)

Read Later
अल्लड हे प्रेम जरासे (भाग-२)

                निशाला ठाम विश्वास होता की, तिच्यावर अटी नियमांचे बंधन न लादणारा, खरं प्रेम करणारा, कुणीतरी तिच्या आयुष्यात येईलच! तिला तिच्या गुणदोषांसह स्वीकारणारा, तिला तिच्या भूतकाळासह आपलंसं करणारा, असा कुणीतरी हमखास तिच्या आयुष्यात येईल. जीवापाड प्रेम करणारा, जो फक्त नि फक्त तिचाच जोडीदार असेल, तो येईल! खरंच तिला आस होती तिच्या जीवलगाची, तिच्या जोडीदाराची! जो तिच्या आयुष्यात येऊन तिचा वर्तमान होईल! गतकाळाचा उगाच बाऊ न करता वर्तमानाला स्विकारून भविष्याची स्वप्ने विणणार! अगदी या आशेतच ती जगत होती अन् असेच हळूहळू दिवसामागून दिवस सरत होते.


                सवयीप्रमाणे एके दिवशी निशा तिच्या हक्काच्या ठिकाणी गेली होती. जिथे ती अगदी बेभान व्हायची. ज्याची सोबत तिला सर्वप्रिय होती, त्याला भेटायला ती गेली होती अन् तेवढ्यात तिथे कुणीतरी आलं आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या निशाची अन् त्या व्यक्तीची भेट झाली. कोण होता तो? तिथे काय करत होता, याची काहीच खबर नाही; पण प्रश्न तर हा देखील होता की, खरंच त्या दोघांची भेट झाली होती की नाही? 


                खरंतर त्या दोघांची भेट झाली, असे म्हणताच येणार नाही; कारण फक्त त्यानेच तिला पाहिलं होतं. निशाला मात्र त्याच्याबद्दल कळले सुद्धा नाही कारण तिने त्याच्यावर एक कटाक्ष ही टाकला नव्हता; म्हणून कदाचित ती भेट नव्हतीच! कारण ना दोघांची नजरानजर झाली होती ना प्रत्यक्ष भेटगाठ झाली होती; पण हो! भेट झाली होती कळत-नकळत का होईना पण झाली होती. 'त्याच्या हृदयाची तिच्या हृदयाशी' भेट झाली होती. म्हणून अगदी तिला पाहताक्षणीच त्याचं हृदय बेफाम झालं होतं. कदाचित त्याच्याही नकळत त्याचं हृदय तिच्यावर फिदा झालं होतं. त्याला ती आवडली होती पण का? कसे? आणि केव्हा? हे त्यालाही ठाऊक नव्हतेच पण तिला पाहताच त्याच्या मनाची वाढलेली हुरहुर एक क्षण थांबत नव्हती, हे देखील तेवढेच खरे होते! 


                त्याने तिला पाहिलं तिच्या हक्काच्या ठिकाणी अर्थातच निळ्याशार समुद्रकिनाऱ्यावर! ज्या ठिकाणी ती नेहमीच जायची, जेथील एकांतात ती स्वतःचा शोध घ्यायची. ज्या समुद्राच्या मागे सरणाऱ्या लाटांच्या कानात स्वतःच्या आयुष्यातील सुखदुःखाचे क्षण ती सांगायची, तिथेच त्यानेही तिला पाहिले. खूप घनिष्ठ नातं होतं तिचं आणि समुद्राचं! तिने अगदी बालपणापासून तिची समुद्राच्या कुशीत स्वतःला रिते करण्याची सवय अजूनही जपली होती; कारण समुद्राशी हितगुज साधल्यावर एक अनामिक सुखाची रेष तिच्या चेहऱ्यावर उमटायची. त्या समुद्रकिनारी तिला अपेक्षित असलेला एकांत होता. विशेषतः तो समुद्रतट विराण नव्हता, बरीच रेलचेल असायची तिथे... पण जेव्हा ती समुद्राच्या सानिध्यात असायची तेव्हा तिथला गजबजाट, ती गर्दी नाहीशी झालेली असायची अन् असायचा तो तिला हवाहवासा असणारा निव्वळ एकांत! त्या एकांताची भलतीच ओढ होती तिला म्हणून ती क्षणोक्षणी समुद्राच्या आणखीच प्रेमात पडायची. 


                 मुरुडचा तो समुद्रतटही भलताच दिमाखदार अन् नटलेला भासायचा. जणू त्याला अख्ख्या क्षितिजाने वेढा घातला होता! त्या समुद्रतटाच्या अवतीभवती झाडे झुडपेही होती. अगदी जवळच एक रोपवाटिका (नर्सरी) होती, त्या रोपवाटिकेचं नाव होतं, 'वृंदावन.' तिथे विविध फुलांची रोपटी असल्याने तेथील फुलांचा दरवळ त्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत यायचा. थोड्याच अंतरावर त्या रोपवाटिकेच्यालगत एक 'कॅफे-प्रेमऋतू' नावाचा कॅफे होता. अशा या दोन स्थळांना नजराणा पेश करायचा पुढेच विसावलेला, अथांग पसरलेला, क्षितिजापल्याडचे देदीप्यमान नेत्रसुख बहाल करणारा समुद्र!


                अशा त्या मुरुडच्या समुद्रकिनारी सांजवेळी निशा तिचं सर्वस्व त्या समुद्राला अर्पण करून स्वतःला रिते करत होती अन् पुनश्च स्वतःचे नवे पैलू उलगडून पाहत होती. एक वेगळीच किमया होती तिच्या नजरेत त्या जागेची! समुद्राशी हितगुज साधून झाल्यावर ती त्या नर्सरीमध्येही तिचा थोडा वेळ घालवून तेथील सुगंध अन् तेथील प्रसन्नतेला मनात साठवून घ्यायची. हा तिचा नित्यनेमच होता जणू... अन् दैनंदिन घडामोडीत प्रेमऋतू कॅफेतली कॉफी पिणे ही निश्चितच होते. 


                नेहमीप्रमाणेच त्यादिवशी देखील तिथे कुणीच नव्हतं. ना कसलीच वर्दळ ना कशाची फिकीर! तिथे होती ती फक्त नीरव शांतता, लाटांच्या खळखळाटेने संवाद साधणारा शांततेने नटलेला समुद्र अन् ते दोघे! तो तिला न्याहाळत असला तरी ती मात्र लीन होती समुद्राशी संवाद साधण्यात, जुने मित्र भेटल्यावर जसे औत्सुक्याने संवाद साधतात अगदी त्याचप्रकारे तिच्या समुद्राशी गप्पा रंगल्या होत्या. कदाचित समुद्र सुद्धा तिला प्रतिसाद देत असावा, एक क्षण असेही वाटून जायचे; कारण ती समुद्राशी बोलताना अगदी भान हरपून जायची. 


                त्या दिवशीही ती तल्लीन होऊन खळखळणाऱ्या लाटांना तिचं गुपित सांगत होती पण का कोण जाणे त्यादिवशी तिला अस्वस्थ वाटत होतं. तिच्या नकळत तिचं हृदय देखील अगदी अनामिक ओढीने धडधडायला लागलं होतं. तिला कळतंच नव्हतं की, तिला नेमके काय झाले असावे; कारण अनायासे तिला वेगळीच हुरहूर वाटत होती. अचानक तिला भास होऊ लागला जणू की, कदाचित कुणीतरी तिला साद घालत असावे; म्हणून पुष्टी करण्यासाठी तिने आसपास नजर फिरवली... पण अवतीभवती कुणीही न दिसल्याने तिची बेचैनी कमी न होता आणखी वाढली; परंतु तिने तात्पुरते दुर्लक्ष केले व खोल उसासा घेतला आणि परत एकदा नजर समुद्राकडे वळवून ती समुद्राच्या विभिन्न छटांचे निरिक्षण करू लागली. 


                 दुसरीकडे तो मात्र अजूनही थोड्या अंतरावर उभा राहून तिच्या हालचाली टिपत होता; पण तिचे त्याच्याकडे लक्ष जाताच ती संकोचून समुद्राशी गप्पा करणे टाळेल, हा विचार करून तो एका झाडाच्या पाठीमागे लपला होता अन् जेव्हा ती परत समुद्राशी गप्पा करू लागली तेव्हा तो झाडाआड लपूनच तिला पाहत उभा राहिला. तो असा एकमेव व्यक्ती होता, ज्याला इतरांना न दिसणारी, जगापासून अलिप्त असलेली, एका वेगळ्याच निशाचा परिचय झाला होता; पण तिला मात्र त्याची जरा कल्पनाही नव्हती. ती बिचारी अनभिज्ञ होती. स्वतःच्याच विचारचक्रात मग्न! असो... 


                साधारण अर्धा तास निशाने त्या समुद्राशी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यानंतर ती जवळच असलेल्या 'वृंदावन' या रोपवाटिकेत गेली. दुसरीकडे तो निव्वळ तिच्या चाहुलीने तिच्यामागे जणू खेचला जात होता. ती जिकडे जाईल अनायासे तिकडे तो जात होता. मुळात, त्याला सवय नव्हती कुणाचा पाठलाग करण्याची; पण तो सुध्दा पहिल्यांदाच असं करत होता, ते देखील अगदी स्वतःच्याही नकळत... 


                त्या नर्सरीमध्ये थोडा वेळ थांबून ती तेथील फुलांचा सुगंध मनात साठवून घेत होती अन् तिला पाहून तोसुद्धा थोड्या अंतरावर आणि कुणाचीही सहज नजर पडणार नाही, अशा ठिकाणी उभा राहून तिच्या सहवासाच्या दरवळाला स्वतःच्या मनात साठवत होता.


थोड्या वेळाने ती मात्र नर्सरीमधून बाहेर गेली व कॅफेमध्ये शिरली. तिथे गेल्यावर तिथल्या काकांनी तिला लगेच विचारलं, " बाळा, तुझी स्पेशल कॉफी आणू ना? "


त्यावर ती लगेच हसून उत्तरली, " नाही काका, आज कॉफी नको. जरा निवांत बसायला आलीये. चालेल ना थोडा वेळ इथे बसले तर? " 


" अगं, असं काय करतेस? तुझ्या हक्काचंच ठिकाण आहे ना हे... मग बस की! बाळा, तुला जेवढा वेळ इथे घालवायचा आहे तेवढा वेळ घालव. फक्त असं उगाच औपचारिकता म्हणून विचारु नको. चालेल का वगैरे... कळलं ना! " ते काका हसून म्हणाले. 


 " हो काका! सहज मज्जा म्हणून बोलली ओ मी! " निशा बोलली. 


" ह्म्म, मज्जा म्हणे! सारखी सारखी औपचारिकतेची चेष्टामस्करी केली तर बघ हं, तुझ्या निर्बंधांवर इथे मोठा फलकच लावणार मी... " काकांनी नाटकी दम दिला. त्यावर निशा खुदकन हसली अन् तिला हसताना पाहून काका देखील हसले. 


                तो थोड्या अंतरावरून कॅफेच्या आत न जाता बाहेरूनच तिला पाहत होता. त्याला तिचा आवाज फारसा ऐकू येत नव्हता पण ती त्या काकांशी खेळीमेळीने बोलत असल्याचा साधारण अंदाज त्याने बांधला. तिच्या हसण्याचा हलकासा आवाज ऐकून पुन्हा एकदा नकळत त्याच्या मनात ती डोकावली. त्याला ओढ लागली तिचा आवाज ऐकण्याची; कारण त्याला तिचे फक्त ओठ हलताना दिसत होते, तिचा आवाज मात्र नीट ऐकू येत नव्हता; पण तरीही त्याने स्वतःच्या भावनांवर आवर घातला. 


क्रमशः


................................................................ 

©®

सेजल पुंजे. 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//