अल्लड हे प्रेम जरासे (भाग-त्रेचाळीस)

Story Of Nisha And the People Who Are Around Her.

                थोड्याच वेळात ए.के. त्याच्या घरी पोहोचला. घरी पोहोचल्यावर त्याने लगेच स्वतःचं आवरून घेतलं. त्यानंतर त्याने त्याचे जेवण आटोपून घेतले. त्यानंतर थोडा वेळ तो लॅपटॉपवर त्याचं काम करत बसला. सर्व आटोपल्यावर वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी एकीकडे ए.के. त्याच्या घराच्या गच्चीवर गेला आणि कुंद हवेत मंद आवाजात एफ.एम.वरची गाणी ऐकू लागला. दुसरीकडे निशाही तिचं जेवण करून झाल्यावर तिच्या घराच्या गच्चीवर गेली आणि ती देखील झोपाळ्यावर झोके घेत संथ आणि गार वारा अनुभवायला लागली. त्याचबरोबर ती सुद्धा एफ.एम.वरची गाणी ऐकत बसली होती. ए.के. आणि निशा दोघेही आपापल्या घरी एकाच एफ.एम. चॅनेलवर गाणी ऐकत होते. 


तेवढ्यात दमदार आवाजात उद्घोषणा करताना एफ.एम.चा आर.जे. म्हणाला, " हॅलो-हाय, आदाब, नमस्कार मित्रांनो! मी तुमचा आर.जे. उत्कर्ष घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम '#गाणी, गप्पा अन् बरंच काही!' या कार्यक्रमात आज खास तुमच्यासाठी प्रेमावरचीच गाणीच प्ले होणार आहेत; कारण आपल्या या कार्यक्रमाच्या चाहत्या श्रोत्याने खास प्रेमगीतांची मागणी केली आहे. फिलिंग लव्ह इन द एअर? सो गाईज, लेट्स इंजॉय! " 


                एकीकडे आर.जे. उत्कर्ष बोलला व नंतर त्याने एक मराठी प्रेमगीत प्ले केले अन् दुसरीकडे निशा अन् ए.के.च्या कानात 'ट्रिपल सीट' चित्रपटातील 'कोण जाणे' या प्रेमगीताचे सूर पडले. 


'कोण जाणे, काय जुळले? भावनांना ही ना कळले...

कालचे परके कुणीचे, काळजाला आज भिडले... 

चालता चालता सोबती मी असे... 

ना कळे का नको वाटतं थांबणे...' 


                ते प्रेमगीत सुरू होताच ते दोघेही त्यात गुंतून गेले. ते स्वतःच्या हृदयावर हात ठेवून अन् डोळे मिटून स्वतःच्या मिटून घेतलेल्या डोळ्यांपुढे उभे ठाकलेले सारे क्षण रोजनिशीच्या पृष्ठाप्रमाणे पालटू लागले. म्हणूनच त्या दोघांनाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या एकमेकांची आठवण येऊ लागली. त्यांना त्यांच्या डोळ्यांपुढे एकमेकांचे चेहरे आठवू लागले. तसेच त्यांनी एकत्र जगलेले क्षण त्या दोघांनाही आठवत होते. त्यामुळे वेगळेच हसू त्यांच्या ओठांवर पसरले होते. काही वेळाने दोघांनीही डोळे उघडले आणि गालातल्या गालात मंद हसून ते परत एकदा त्या सौम्य वातावरणाच्या सुरेख छटा अनुभवू लागले. काही वेळानंतर ते गाणे संपताच आर.जे. उत्कर्षने परत श्रोत्यांशी संवाद साधला अन् नंतर 'दगडी चाळ' चित्रपटातील 'मन धागा धागा' हे प्रेमगीत प्ले केले. 


'असे कसे, बोलायचे? 

असे कसे बोलायचे न बोलता आता? 

तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता... 

डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता... 

मन धागा धागा जोडते नवा...

मन धागा धागा रेशमी दुवा...'  


                 त्या गीताच्या भावगीतातही निशा आणि ए.के. पार गुंतून गेले होते. काही वेळानंतर ते गाणं संपताच 'बबन' चित्रपटातील 'साज ह्यो तुझा' हे गीत सुरू झाले. 


'साज ह्यो तुझा गं जीव माझा गुंतला गं

उशाखाली फोटो तुझा चांदरातीला...'


                 त्या गीतानंतर लगेच 'दुनियादारी' चित्रपटातील 'टिक टिक वाजते डोक्यात' हे गाणं सुरू झालं. 


'टिक टिक वाजते डोक्यात... धडधड वाढते ठोक्यात... 

कभी जमी, कधी नभी... संपते अंतर झोक्यात... 

टिक टिक वाजते डोक्यात... धडधड वाढते ठोक्यात...'


                त्यानंतर 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?' या चित्रपटातील 'स्वर्ग हा नवा' या गीताचे भावगीत सुरू झाले. 


'स्वर्ग हा नवा वाटतो हवा... 

साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा... 

स्वर्ग हा नवा वाटतो हवा...'


                एकीकडे 'स्वर्ग हा नवा' गाणे संपताच आर.जे. उत्कर्षने रजा घेतली. त्यामुळे एफ.एम. बंद करून ए.के. त्याच्या खोलीत जाऊन झोपी गेला. दुसरीकडे निशानेही एफ.एम.बंद केला. थोड्या वेळाने ती झोपाळ्यावरून उठली आणि एकटीच गच्चीवर गोल घिरट्या घालून 'टाईमपास' चित्रपटातील 'मला वेड लागले प्रेमाचे' हे गीत गाऊ लागली.


'रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा... 

कुंद कळ्यांना... वेलींना... सांगा रे सांगा... 

हे भास होती कसे? हे नाव ओठी कुणाचे? 

का सांग ना वेड्या... मला भान नाही जगाचे... 

मला वेड लागले प्रेमाचे...'


                निशा एकटीच गाणे गात घिरट्या घालत होती. एक वेगळेच तेज होते तिच्या चेहऱ्यावर कारण त्यादिवशी तिला प्रत्यक्ष जाणवलं होतं की, ए.के.साठी तिच्या मनात उमळणाऱ्या भावना या आकर्षणापलिकडच्या आहेत. तिला प्रत्यक्ष जाणवत होतं की, तिचं ए.के.वर प्रेम जडलेलं आहे. म्हणून त्याक्षणी तिच्या खुशीचा काही केल्या ठिकाणाच नव्हता; पण अचानक गाणं गाताना ती थांबली. अनायासे तिचे डोळे आसवांनी डबडबले होते. हळूच तिच्या गालावर अश्रूंचा एक थेंबही ओघळला होता अन् त्याक्षणी मनाचा बांध सैल करत तिने वेदनेने विव्हळत आक्रोशाने टाहो फोडला. 


अचानक तिच्या हृदयात एक कळ गेली अन् ती एकटीच तिच्या विचारांच्या चक्रव्यूहात अभिमन्यूप्रमाणे गुंतून गेली. तिच्या मनात कित्येक विचार एकाचवेळी सुरू होते. ती मनोमन विचार करू लागली. ती एकटीच स्वतःशीच संवाद साधताना म्हणाली, " मी जरी प्रेम करायला लागली आहे ए.के.वर पण तो माझ्यावर प्रेम करणार का? पण मला ए.के.च्या डोळ्यात माझ्याप्रती ओढ अन् प्रेम दोन्ही दिसतं त्याचं काय? पण यावरही तोडगा काढता येईल. मला याचीही जास्त काळजी नाही; पण माझ्या भूतकाळाचे काय? माझ्या भूतकाळाबद्दल कळल्यावर ए.के. ज्याप्रमाणे आता निरपेक्ष, निर्बंध अन् निर्व्याज प्रेम करतोय त्याप्रमाणेच तो यापुढेही करणार का? की तो सुद्धा कदाचित मला सोडून जाईल? पण का? हे सगळं माझ्याच नशिबी का? आणखी किती आपली माणसं गमावू मी? आणखी किती भीतीत वावरायचं मी? आणि मीच का? "


                निशाच्या मनात कित्येक प्रश्न डोकावत होते. तिचं डोकं अगदी बधीर झालं होतं त्या विचारांच्या जंजाळाने! तिला स्वतःच्याच भूतकाळाची भीती वाटत होती. तिला ए.के.ला गमवावेसे वाटत नव्हते. तिला एकटेपणाची अक्षरशः भीती वाटत होती. तिला ए.के.ची सोबत हवी होती. तिला तिचा सहवास हवा होता. त्यामुळे घिरट्या घालणे थांबवून ती डोकं पकडून खाली बसली. 


निशाचं डोकं जड झालं होतं. भयंकर डोकेदुखी तिला जाणवत होती पण तिचे विचार काही केल्या थांबत नव्हते. ती परत एकदा शून्यात नजर घालून स्वतःशीच बडबड करू लागली. ती म्हणाली, " आदित्य तू कसा आहेस? कुठे आहेस? सध्या काय करतोय? यापैकी मला तुझ्याबद्दल काही म्हणजे काहीच माहिती नाहीये; पण तरीही तुझ्याप्रती मला आजही एक वेगळीच ओढ जाणवते. आतापर्यंत तुझ्याच आठवणीत जगत आलीय मी; पण... पण खरं सांगायचं तर, जेव्हापासून ए.के. माझ्या आयुष्यात आला आहे तेव्हापासून का नि कुणास ठाऊक पण तुझी छबी मला खरंच त्याच्यात दिसायला लागली आहे. शिवाय मी जेव्हा जेव्हा त्याच्यासोबत असते तेव्हा तेव्हा तुझी आठवण मला क्वचितच येते. ए.के. सोबत असताना मी भूतकाळात काही केल्या वावरूच शकत नाही; कारण त्याच्यासोबत असताना मला वर्तमानात जगावंसं वाटतं. आधी वाटायचं की, त्याचा सहवास, त्यांची सोबत मला हवीहवीशी वाटत असावी; पण आज मला कळून चुकलंय की, मला त्याचा सहवास अनुभवावासा वाटतो. आयुष्यभरासाठी मला त्याची सोबत हवी आहे.


                यावेळी पहिल्यांदाच असं झालंय की, मागचा पुढचा जराही विचार न करता इव्हन तुझाही विचार न करता मी ए.के.मध्ये पार गुंतून गेली आहे. मला भुरळ पडली आहे त्याच्या सहवासाची. मी कितीही स्वतःच्या भावनांवर संयम साधायचा विचार केला तरीही मला कायम तोच हवा असतो अन् असे का होतेय याचेही कारण मला कळून चुकलेय आदित्य. मला कळलेय की, मी ए.के.वर प्रेम करायला लागली आहे. मला त्याच्यावर एवढं प्रेम जडलंय की, मला तुझा विसर पडत नसला तरी मी त्याच्यात तुझा शोध घ्यायला लागली आहे. मी भूतकाळ सोडून वर्तमान जगायला लागली आहे आदित्य. मला नाही कळतंय मी अशी का वागतेय पण जे घडतंय ते सगळं अनपेक्षित आहे अन् माझ्या नियंत्रणाबाहेर आहे. " निशा लागोपाठ रडत होती. त्यामुळे तिचे डोळे लाल झाले होते अन् तेवढ्यात तिला रडता रडता ठसका बसला. 


क्रमशः


..............................................................


©®

सेजल पुंजे. 

🎭 Series Post

View all