अल्लड हे प्रेम जरासे (भाग-चाळीस)

Story Of Nisha And People Around Her

                निकिताने जिकडे इशारा केला तिकडे सगळ्यांनीच पाहिले. निशा त्या विद्यार्थ्यांशी अगदी सलगीने अन् उत्साहाने त्यांच्यात समरस अन् समवयस्क होऊन वावरत होती पण त्यात कुठल्याही प्रकारचा आक्षेपार्हपणा नव्हता. थोड्याच अंतरावरून तिच्या हालचाली ए.के. देखील टिपत होता; पण त्यालाही तिच्या वागण्यातून अन् बोलण्यातून कुठलेच गैर इंडिकेशन्स जाणवत नव्हते; त्यामुळे निकिताचे धारदार अन् कर्णकर्कश शब्द व निशाबद्दल तिचा दृष्टीकोन जाणून घेतल्यावर त्याला तिचा अतिशय राग आला. 


ए.के.चा पारा फारच चढला होता अन् त्याचा विस्फोट होणारही होता पण अगदी त्याचवेळी निकिताजवळ निशा गेली आणि अत्यंत नम्र शब्दात ती निकिताला उद्देशून म्हणाली, " निकिता मॅडम, विद्यार्थ्यांना माझे कपडे नाही तर मी शिकवते आणि माझे कपडे माझा दर्जा वा माझ्या चारित्र्याचं वर्णन करू शकत नाही. आणखी काय म्हणालात चारित्र्य? चारित्र्याच्या संकल्पनेबद्दल माझे खूप विपरीत मत आहे म्हणून त्याबद्दल न बोललेलेच बरे! शिवाय आजमितीला साडी नेसलेल्या वयस्कर महिला असो वा फ्रॉक घातलेली लहान चिमुकली! नराधमांना काहीही दिसत नाहीच. त्यामुळे या विषयाच्या खोलीत न शिरलेलेच बरे! म्हणून कृपया माझ्या कपड्यांवरून निदान मला जज करू नका.


                राहिला प्रश्न विद्यार्थ्यांना नावाने हाक मारण्याची परवानगी देण्याचा! तर मी विद्यार्थ्यांमध्ये समरस होऊन शिकवते ती माझी पध्दत आहे. महत्त्वाचे म्हणजे, मॅडम विद्यार्थ्यांच्या मनात काही वाईट विचार वगैरे असं काही नसतंच ओ! ते आपणच त्यांच्या मनात शिरवत असतो. असे अतिसभ्य शब्दप्रयोग करून! शिवाय मला माझ्या मर्यादा कळतात; म्हणूनच कोण, काय विचार करतं? याचा विचार मी ना कधी केलाय ना कधी करणार! म्हणून माझ्या चारित्र्याची पोचपावती कुणी द्यावी असा आग्रह मी करणार नाही; कारण मला माहीत आहे की, मी मुळात कशी आहे. त्याचबरोबर माझं स्पष्ट मत आहे की, माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने माझा अनुभव घ्यावा अन् त्यानंतर ठरवावं मी कशी आहे! मी ती मुभा प्रत्येकाला देऊ केलेली आहे. 


                तुम्ही देखील तुमच्या अनुभवांवरून तुमचं मत बनवलं असेल, यात काही दुमत नाही अन् माझी हरकत ही नाही! कारण प्रत्येकाची मतं निरनिराळी असतात; त्यामुळे मला तुमच्या मताचा आदरच आहे. " निशा बोलली अन् मंद हसत जिथे विद्यार्थी होते तिथे गेली. 


                कदाचित निशाने निकिताचा एकूण एक शब्द ऐकला होता; कारण निकिता अगदी मोठ्या आवाजात बोलत होती. त्यामुळे तिथे उपस्थित अनेकांनी निकिताचे ज्वलंत शब्द ऐकले होते. 


निशा तेथून गेल्यानंतर अमेय निकितावर भयंकर चिडला अन् तो चिडूनच तिला म्हणाला, " मिस निकिता, तुम्हाला कधीतरी वेळेचं भान असतं का? कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी काय बोलावे हे ही कळत नाही का? शिवाय कोण आहात तुम्ही एखाद्याबद्दल असे कटू उद्गार काढायला? तुम्ही एक शिक्षिका असून असं कसं बोलू शकता? जर आपल्याला झाडाच्या प्रजातीची व्याप्तीच ठाऊक नसेल तर त्याच्या गुणधर्मांची ओळख तरी कशी होईल ना? तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नाही याचा वेळोवेळी पुरावा देणे गरजेचे नाही. "


" ओ अमेय सर, तुम्ही ना गप्पच बसा. मी काय बोलावे आणि काय नाही ते सांगणारे तुम्ही कोण आहात? असेल ती तुमचं पहिलं प्रेम त्याचं मी काय लोणचं घालू? मला घेणंदेणं नाहीये तुम्हा दोघांशी; त्यामुळे मला उपदेश देऊ नका. " निकिता रागाच्या भरात चरफडतच बोलत होती; पण तिचे शब्द ऐकून तिथे उपस्थित शिक्षक वृंद आश्चर्याने अमेयकडे पाहू लागले. त्याचबरोबर त्याला चीडही येत होती. 


अमेय मुठ आवळत म्हणाला, " मिस निकिता, तुम्ही आता अति बोलत आहात. " 


                एकीकडे अमेयला निकिताच्या बोलण्याचा संदर्भ लागत नव्हता. अर्थात अमेयला निशा आवडत होती अन् ह्याबद्दल फक्त निशा आणि ए.के.लाच कल्पना होती. शिवाय ते दोघे ह्याबाबत कुणालाच काही सांगणार नव्हते, याची त्याला पुरेपूर खात्री होती. त्यामुळे निकिताला त्याबद्दल कसे कळले असावे, याचा तो मनोमन विचार करत होता. दुसरीकडे निकिता खुनशी हसत होती. 


" काय झालं अमेय सर? माझे शब्द कटू वाटत आहेत का? पण सत्य हे कटूच असतं, हो ना? हं! त्या कॅम्पच्या शेवटच्या दिवशी तुमचं आणि ए.के. सरांचं संभाषण मला ऐकू आलं होतं तेव्हा कळलं मला... " निकिताने स्पष्टीकरण दिले अन् ते ऐकताच अमेयचा पारा आणखी चढला. 


तो डोळ्यातून आग ओकत तिला म्हणाला, " मिस. निकिता, कुणाच्या व्यक्तिगत आयुष्याचा बाजार मांडण्याचा तुम्हाला हक्क नाहीये. चारचौघात माझ्या व्यक्तीगत बाबींचा उल्लेख करून तुम्हाला काहीच साध्य होणार नाही. कळलं मिस निकिता? " 


" मी नाहीच आहे ओ बाजार मांडणारी... पण जर तुम्हालाच हौस असेल तर त्याला मी तरी काय करणार ना! शिवाय निशाला तर तसा पण नादच आहे म्हणा स्वतःच्या मागेपुढे मुलं फिरवण्याचा हं! आणि जे खरं आहे ते आहे! अन् मी खरं तेच बोलतेय. ती निशा आहेच चारित्र्यहिन. " निकिता तिटकाऱ्याने बोलली. 


निकिता आवेगात तोंडात येईल ते बोलत होती; त्यामुळे अमेयच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो तिला चापट मारणार होता पण त्याने स्वतःला आवरलं. त्याने दिर्घ श्वास घेतला अन् तो तिला म्हणाला, " हे बघा मॅडम, निशाचं चारित्र्य स्पष्ट करायला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाहीये. महत्त्वाचं म्हणजे, कोणती व्यक्ती कशी आहे? हे तुम्ही आजतागायत ओळखूच नाही शकलात अन् पुढेही तुम्हाला जमणार नाहीच! कारण तुम्हांला लोकंच ओळखता येत नाही. निशाच्या बाबतीत तुम्ही बरेच गैरसमज करून घेतलेले आहेत. कदाचित तुम्हाला हे ही पटणार नाहीच. त्यामुळे असो! परंतु तुमची चारित्र्य संपन्नता तुम्हाला लखलाभ असो... अन् यापुढे निशाबद्दल एक जरी अपशब्द तुम्ही बाहेर काढला तर माझ्या एवढा वाईट कुणीच नाही. याद राखा! " 


                अगदी सौम्य शब्दात अमेयने निकिताला दम दिला होता. निकिता ही बरीच वरमली होती पण तरीही ती माघार घेत नव्हती. स्वतःचीच बाजू योग्य सिद्ध करण्यासाठी तिची धडपड सुरूच होती अन् याचा अंदाज अमेयलाही आलेला होता; परंतु त्याचा संयम क्षणोक्षणी ढासळत होता. म्हणून उसासा घेत त्याने रागाने मुठी आवळल्या अन् तो हात-पाय आपटतच शाळेच्या ऑडिटोरियम मधून बाहेर गेला. 


                ऑडिटोरियममधून बाहेर पडल्यावरही अमेयला निकिताचे शब्द आठवत होते. त्याला खूप संताप येत होता अन् चीडही येत होती. तेवढ्यात त्याला निशाची आठवण आली. निकिताचे शब्द त्याच्या जिव्हारी लागले होते त्यामुळे त्याक्षणी निशाही नाराज असेल याची खात्री त्याला होती. त्यामुळे तो निशाचा शोध घेऊ लागला. त्याने सभोवती नजर फिरवली. तेवढ्यात त्याला निरभ्र आकाशाकडे पाहणारी, हवेचा आस्वाद घेणारी निशा दिसली. 


                त्याचे तिच्याकडे लक्ष जाताच तो तिच्याकडे एकटक पाहू लागला. त्याला परत तोच किस्सा आठवू लागला. त्यामुळे त्याचे डोळे अंगार ओकत होते. कालांतराने निशाचेही अमेयकडे लक्ष गेले अन् तिला त्याच्या चेहऱ्यावर संताप दिसला. ती मात्र त्याच्याकडे पाहून मंद हसली. अमेयने मात्र चेहरा फिरवून घेतला. त्याला खूप वाईट वाटत होते. एक प्रकारचा अपराधीभावही जाणवत होता. तो पाठमोरा वळून त्याचे अश्रू पुसू लागला. निशा मात्र गोंधळून गेली. अमेयच्या बदललेल्या आविर्भावाचा तिला संदर्भ लागत नव्हता. ती आश्चर्याने त्याच्या हालचाली टिपत होती. तोपर्यंत अमेयच्या मागोमाग ऑडिटोरियममधून ए.के. देखील बाहेर आला. 


                तो लगेच अमेयजवळ गेला अन् त्याने त्याला आधी मिठी मारली. नंतर त्याने अमेयची समजूत काढली. हळूहळू अमेय शांत होऊ लागला. अमेय शांत होताच ए.के.ने परत एकदा त्याला मिठी मारली. त्याला धीर दिला. त्यानंतर त्या दोघांजवळ निशाही गेली. तिने विचारपूस केली. अमेय कानकुन करत होता; त्यामुळे निशाने ए.के.ला विचारले. ए.के.ने निशा ऑडिटोरियममधून बाहेर गेल्यावर घडलेला प्रकार निशाला सांगितला. सर्व जाणून घेतल्यावर निशा हलकेच मंद हसली पण तिला हसताना पाहून अमेय अन् ए.के.चा गोंधळ उडाला. 


क्रमशः

..................................................... 


©®

सेजल पुंजे.


🎭 Series Post

View all