अल्लड हे प्रेम जरासे (भाग-चौतीस)

Story Is About The Lead Character Nisha And The People Arround Her


                अंतराचे शब्द ऐकताच ए.के.ला कळून चुकलं होतं की, तिला नेमके काय झाले असावे. त्यामुळे त्याने आधी तिला शांत व्हायला सांगितले. शिवाय वातावरणात बरीच थंडी वाढली होती अन् अंतरा कुडकुडत होती त्यामुळे त्याने तिला स्वतःचं जॅकेट दिले. त्यानंतर तिला घेऊन तो एका तंबूजवळ गेला आणि हर्षदाला हाक मारू लागला. त्याची हाक ऐकताच हर्षदा तंबूमधून बाहेर आली. थोडा वेळ तिच्याशी ए.के. बोलू लागला. त्याच्याशी बोलून झाल्यावर हर्षदा अपूर्वाला जवळच्याच एका सार्वजनिक स्वच्छतागृहात घेऊन गेली. 


                त्यानंतर अपूर्वाला थोडक्यात माहिती देऊन अन् काही सुचना देऊन हर्षदा स्वच्छतागृहाबाहेर थांबली आणि अपूर्वा मात्र थोडं फ्रेश व्हायला गेली. थोड्या वेळाने तिचं आवरून होताच त्या दोघीही ए.के.जवळ गेल्या. हर्षदा ए.के.सोबत निवांत गप्पा करू लागली. अपूर्वा मात्र शांतच उभी होती. शिवाय तिच्या मनातली भीती अन् दडपण तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं; त्यामुळे ती झोपायला देखील जात नव्हती. 


हर्षदा तिला बोलते करण्यासाठी म्हणाली, " अप्पू, असं गप्प नाही बसायचं बाळा! बोल ना काहीतरी! इट्स ओके ना! मी सांगितलं ना... एवढी काळजी करू नकोस. तू सध्या जेवढी शांत राहशील तेवढं चांगलंय. ना तू चीडचीड करायचीस, ना त्रागा करून घ्यायचा! आनंदात राहायचं. तोच उत्तम पर्याय आहे आणि वेळेत झोपायचं असतं. बघ किती उशीर झालाय! म्हणून चल आपण झोपायला जाऊयात! " 


" नाही, मला नाही येतेय झोप. मी निशाला भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही. मला सांगा निशा कुठे आहे? एकतर तिला बोलावून आणा. नाहीतर मीच तिला शोधायला जाते. " अपूर्वा चीडचीड करत म्हणाली. 


" अप्पू! शांत हो बघू! " ए.के. अपूर्वाला शांत करत म्हणाला. 


" नाही. मला निशा हवी आहे. मला तिला भेटायचं आहे म्हणजे भेटायचंच आहे. " अपूर्वा हट्ट करत म्हणाली. 


" मी ही कुठे नकार देतोय! तू घे भेट तिची अन् बोल तिच्याशी बिनधास्त; पण तिला येऊ दे आधी! ती येतेय थोड्या वेळात... तोपर्यंत तुला गोष्ट ऐकायला आवडेल का? " ए.के. अपूर्वाला विश्वासात घेत बोलला. 


" गोष्ट? कोणती गोष्ट? " अपूर्वाने आश्चर्याने विचारले. 


" आहे एक गोष्ट पण तुला ऐकायची असेल तरच मी सांगणार. ती गोष्ट ऐकताना खरंच खूप मजा येईल. मग सांगू तुला गोष्ट? तू ऐकशील ना? " ए.के. लडीवाळपणे अपूर्वासोबत बोलला. 


" बरं! सांगा! मी ऐकते. " अपूर्वा बोलली. 


                त्यानंतर ए.के. तिला एक काल्पनिक गोष्ट सांगू लागला. गोष्ट ऐकताना कधी अपूर्वा झोपून गेली याची जाणीवही ए.के. अन् हर्षदाला झाली नव्हती. थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात येताच ए.के.ने अलगद अपूर्वाला कडेवर उचलले अन् तिला तंबूमध्ये नीट झोपवले अन् तिला अंथरुण ही पांघरले व लगेच तो तंबूमधून बाहेर आला. 


               तोपर्यंत शतपावली करून निशा परतली आणि अपूर्वाची शोधाशोध करू लागली. तेवढ्यात तिला झोपलेल्या अपूर्वाला कुशीत घेऊन जाणारा ए.के. दिसला. तिला फार आश्चर्य वाटले कारण त्यादिवशी पहिल्यांदा अपूर्वा तिच्याऐवजी कुणा दुसऱ्या व्यक्तीच्या आधाराने शांत झाली होती अन् निमूट झोपली होती. तिने हातवारे करून इशाऱ्यातच हर्षदाला विचारपूस करू लागली.


प्रतिसादाखातर हर्षदा सविस्तर माहिती देत म्हणाली, " ऍक्च्युली, आज अपूर्वाला पहिल्यांदा मासिक पाळी आली. पहिल्यांदाच असल्याने अप्पू फारच घाबरली होती. ती सारखी तुझीच आठवण काढत होती. तुला भेटण्याचा हट्ट करत होती; पण ए.के. सर तिच्याशी लाडीगोडीने बोलले. त्यांनी तिची समजूत काढली व ते माझ्याजवळ घेऊन आले आणि नंतर मी तिला सॅनिटरी पॅड दिलं आणि ऑल इंस्ट्रक्शन्स दिले. त्यानंतर ती थोडी फ्रेश झाली. तिचं आवरल्यावर आम्ही परत आलो पण अप्पूचं बेचैन मन तरीही थाऱ्यावर नव्हतं. तरीदेखील ए.के. सरांनी पुढाकार घेत परत एकदा गोष्ट सांगण्याचं निमित्त केलं. हळूहळू ती गोष्टीत गुंतून गेली अन् पाहता पाहता तिला झोप लागली. म्हणून सर आता तिला घेऊन तंबूमध्ये गेलेत. " 


                हर्षदाने जे काही सांगितले होते, ते ऐकून निशाला ए.के.चं फार कौतुक वाटले अन् आपसूकच तिच्या ओठांवर स्मित पसरले. ए.के. तंबूमधून बाहेर आल्यावर त्याने हर्षदाला विश्रांती घ्यायला सांगितले. तिनेही 'शुभ रात्री' बोलून त्यांचा निरोप घेतला व ती निमूटपणे तिच्या तंबूमध्ये झोपायला निघून गेली. 


हर्षदा जाताच तिथे ए.के. आणि निशा उभे होते. ते दोघेही तिथल्या तिथे शतपावली करत होते. दोघेही शांत असताना निशाने एकाएकी ए.के.चे हात हातात घेतले अन् ती त्याला आभारयुक्त स्वरात म्हणाली, " ए.के. तू आज खरंच खूप धीराने काम घेतलंस. अप्पू खरंतर फार हट्टी आहेस पण तू तिला सांभाळून घेतलंस. थॅंक्यु सो मच यार! इट मीन्स अ लॉट! तू नेहमी मी समजूतदार असल्याचा दावा करतोस पण प्रत्यक्षात तू ही फारच समजूतदार आहेस. " 


" कम-ऑन यार निशा! मी एवढंही काही केलेलं नाहीये. मी फक्त माझं कर्तव्य निभावलंय. एक शिक्षक या नात्यानेच नव्हे तर एक पुरुष या नात्याने! त्यामुळे मी फार ग्रेट काम केल्याप्रमाणे माझी प्रशंसा करू नकोस; कारण मासिक पाळी दरम्यान प्रत्येक मुलीला सुरक्षित वाटावे, असे वातावरण निर्माण करणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. मी ही त्याहून काही वेगळे काम केलेले नाही. " ए.के. मंद हसून म्हणाला. 


" तुझे विचारही प्रगल्भ आहेत यार! तुझ्यासारखी विचारसरणी प्रत्येक पुरुषाची राहिली ना तर कोणत्याही वयोगटातील स्त्रियांना कधीच असुरक्षित वाटणार नाही. " निशा म्हणाली. 


" माझ्यासारखी विचारसरणी असेल आणखी कित्येक जणांची! शिवाय आपण जे विद्यार्थी घडवत आहोत ते सुद्धा हीच विचारसरणी अनुसरतील, हे विसरू नकोस. त्यामुळे आज ना उद्या एक सुरक्षित महाराष्ट्र अन् सुरक्षित भारत निर्माण होईलच! जिथे प्रत्येक मुलगी निर्भीडपणे वावरू शकेल. " ए.के. स्मित करत म्हणाला. 


" अगदी मनातलं बोललास. " निशाने ए.के.च्या सुरात सूर मिसळला. 


" ह्म्म! आहेच मी मनातलं ओळखणारा मनकवडा! " ए.के. मस्करी करत म्हणाला. 


" पूरे! स्वःस्तुतीपुराण प्रारंभ करण्याअगोदर इथेच विराम लाव! " निशा हसून म्हणाली. 


" तू म्हणशील तेच करणार सखे! " ए.के. परत एकदा मस्करीच्या सुरात बोलला. त्यावर निशा देखील खळखळून हसली. 


                त्यानंतर थोडा वेळ गप्पा-टप्पा आटोपून त्या दोघांनी त्यांच्या संभाषणला विराम लावला नि नंतर ते दोघेही एकमेकांचा निरोप घेत आपापल्या तंबूमध्ये शिरले. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी प्रातःविधी आटोपून सर्व विद्यार्थी अन् शिक्षकगण त्यांचं आवरून परतीच्या प्रवासाला सज्ज झाले. तत्पूर्वी त्यांनी नाश्ता करून घेतला. कॅम्पचे ते ठराविक दिवस कधी सरून गेले, याचा पत्ता ना विद्यार्थ्यांना होता, ना शिक्षकांना! नाश्ता अन् इतर सर्व सावरा-सावर करून घेताच सर्वजण परतीच्या मार्गाने निघाले. 


                कॅम्पच्या सर्व आठवणी अन् विशेषतः ए.के.च्या सानिध्यात अनुभवलेल्या काही नाजूक क्षणांच्या सहवासामुळे हळूहळू प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निशाच्या मनात ए.के.ने वेगळंच स्थान निर्माण केलं होतं. कॅम्पहून परतण्यापूर्वी त्या आदल्या रात्री ए.के.सोबत साधलेला संवाद, शिवाय त्याच रात्री अपूर्वाच्या बाबतीतला त्याचा हजरजबाबीपणा, एकूणच स्त्रियांच्या मासिक पाळी संदर्भातील दृष्टीकोन, कवितेमधून व्यक्त होणारा त्याचा संवेदनशील स्वभाव अन् सिक्रेट्स बाळगून त्याच्या व्यक्तित्वाला एक समंजसपणाची किनार लाभल्यासारखे निशाला वाटायचे. त्यामुळे तिच्या मनात ए.के.प्रती वेगळ्याच भावनांचा उदय होऊन तिच्या मनात एका अनामिक आकर्षणाचं वलय हळूहळू निर्माण होऊ लागलं होतं. त्यामुळे तिच्याही नकळत नजरांचा लपंडाव ती देखील खेळायची! प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे त्याच्या सानिध्यात रममाण होत असायची. थोडक्यात, कळत-नकळत ए.के.चा स्वभाव तिला पूर्वीपेक्षा जास्त आवडू लागला होता अन् त्याची सोबतही! 


क्रमशः

....................................................... 


©®

सेजल पुंजे. 



🎭 Series Post

View all