अल्लड हे प्रेम जरासे (भाग - तेवीस)

Story Of Girl Nisha...

निशाची मिटींग होती नेहमीप्रमाणेच समुद्राशी; पण निघण्याआधी तिच्या कानावर काहीतरी शब्द ऐकू आले...


" अबोल प्रीत ही माझी त्याच्यापुढेही 

अन् एकांतातल्या माझ्यापुढेही

कदाचित व्यक्त होणे मला 

या उभ्या आयुष्यात जमणार नाही कधीच

म्हणून होऊन जगापासून अलिप्त 

करते मी अनोखी ही प्रीत साजरी...

भूतकाळातील त्या आठवणी अन् अनुभव 

छळतात ते मज अजूनही क्षणोक्षणी

आठवून सारे काही परत प्रेम मज 

करावेसे आता वाटत नाही

म्हणून अबोल ही प्रीत माझी

माझ्या एकांतासवे अबोलच बरी... 

योग्य-अयोग्याची जाणीव मज नाही, 

किंबहुना, ते जाणून घेण्यातही 

रस माझा उरला नाही

कारण ज्या वाटेवर आताशः जाणे नाही 

तेथील पाऊलखुणांना निरखून पाहण्यात

आता तथ्य जराही वाटत नाही...

म्हणून सये, आयुष्याची राखरांगोळी 

मी पुनश्च कदापि करणार नाही

विश्वासघात करून घेण्याची 

हल्ली इच्छा माझ्यात शेष नाही

कारण लोकांच्या गर्दीपेक्षा 

एकांत असतो जिवलग आपला

निक्षून सांगते आता हे मनही... " 


                रोहिणी काकूंनी कविता म्हटली पण काकूंची ती कविता ऐकून निशा जे समजायचं ते समजून गेली. काही वेळानंतर निशा तेथून समुद्रतटावर गेली. त्यानंतर समुद्राशी गप्पागोष्टी आवरून ती कॅफेत गेली. तिथे पोहोचल्यावर तिने अमेय आणि ए.के.ला सविस्तर माहिती दिली आणि सरतेशेवटी काकूंनी म्हटलेली ती कविताही तिने वर्णिली. त्यानंतर बराच वेळ ते तिघेही चर्चा करत बसले होते. तेवढ्यात अमेयने एक शक्कल लढवली व त्याचा प्लॅन त्याने त्या दोघांनाही सांगितला. त्यांनीही त्या प्लॅनचे समर्थन केले. त्यानंतर तिघांनीही कॉफीच्या मग्जने चिअर्स केले. काही वेळाने तिघेही आपापल्या घरी गेले पण निघण्याआधी ए.के. आणि निशाने एकमेकांसोबत त्यांचे नंबर एक्सचेंज केले. जेणेकरून त्यांच्याकडे उपलब्ध असलेले सर्व नवीन अपडेट्स ते एकमेकांना लगेच सांगू शकतील. थोड्या वेळानंतर घरी पोहोचल्यावर कॉलवर जुजबी बोलून तिघेही परत आपापल्या कामी लागले. 


 दुसऱ्या दिवशी तिघांचीही शाळेत भेट झाली. तिघांचंही नेहमीप्रमाणे डेली रुटीन सुरू झालं होतं अन् असंच पाहता पाहता एक आठवडा सहज उलटून गेला. एके दिवशी तिघेही लंच ब्रेकमध्ये फ्री असताना ए.के.ने सहज निशाला विचारले, " निशा, अमेयने सांगितलेला प्लॅन कधी एक्झिक्युट करणार आहोत आपण? कारण एक आठवडा निसटला आणि आपण हातपाय नाही हलवले अजून! " 


" अरे ए! बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना असं करू नकोस ए.के.! धीर धर जरा... करू सगळं लवकरच पण त्यासाठी घाई न केलेलीच बरी! माझ्या मते, परवा श्रीगणेशा करावा या प्लॅनचा! " निशा उत्साहात बोलली. तिच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज होतं आणि विजयी स्माईलही झळकत होती. 


" परवा काय आहे? रविवार ना? " अमेयने न कळून विचारले. 


" अम्या, फक्त रविवार नाहीये यार... " निशा सुचक बोलली. 


" मग आणखी काय आहे? " ए.के.नेही विचारले. 


" परवा सिडचा वाढदिवस आहे आणि त्यालाही या आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घ्यायचा माझा विचार आहे! आफ्टरऑल तो सुद्धा राजीखुशीने या निर्णयात सामील असणं गरजेचं आहे. " निशाने तिचे मत मांडले. 


" हो, तू बोलतेय अगदी बरोबर! पण तो देईल का साथ आपल्याला? त्याच्या बालबुध्दीला पटेल का हे? " ए.के.च्या मनात शंकेची पाल चुकचुकली. 


" निदान प्रयत्न तरी करून बघू! यश मिळेल वा नाही ते पुढचं पुढे बघून घेऊ... आणि महत्त्वाचं म्हणजे खूप समंजस आहे सिड! कदाचित जे मोठ्या व्यक्तींना कळणार नाही ते त्याला लगेच कळेल. थोडक्यात, काहीही होऊ शकतं. म्हणून मी माझ्या परीने शंभर टक्के प्रयत्न करून बघणार. " निशा सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मंद हसत बोलली. 


" ह्म्म, तुझंही योग्यच आहे. चला तर मग लागा कामाला! निशा मस्त तयारी करून घे प्रोग्रामची अगदी नेहमीसारखीच. शिवाय उद्या सुट्टी आलीय तर बराच वेळ मिळेल. वाटल्यास ए.के.ची मदत घेशील आणि मी तर आहोच मदतीला! बाय द वे, ए.के.! तू करशील ना मदत निशाला? " अमेय मिश्किल हसून बोलला. 


" तू म्हटलं नसतं तरीही केलीच असती मी मदत... " ए.के. अमेयला खुन्नस देत बोलला. 


" हो, ते मलाही माहिती आहे. मी तर फक्त जरा तुझ्या बाजूने तुझी फिल्डींग लावली. " अमेय खट्याळ स्वरात ए.के.शी बोलला. निशाने त्या दोघांची कुरबुर सुरू होताच मस्तकाला हात मारून घेतला. 


         शुक्रवारी शाळा सुटल्यावर आणि शनिवारी पूर्ण दिवस वाढदिवसाची जंगी तयारी ए.के. आणि निशाने मिळून केली होती. सिडच्या वाढदिवसाच्या पार्टीला फक्त मोजकेच लोकं हजर होते. तिथे उपस्थित सर्वांनीच भरपूर मौज केली. सिडच्या वाढदिवासाला केलेली जय्यत तयार पाहून रोहिणी काकूचं मन अगदीच भरून आलं होतं; कारण साहाजिकच तिनेही कधीतरी सिडचा असा वाढदिवस साजरा करण्याचे स्वप्न पाहिले होते पण काही कारणास्तव साध्य झाले नव्हते... परंतु निशाच्या त्या सरप्राईजने रोहिणी काकू फार सुखावल्या होत्या.


                विराज काका सुध्दा सिडच्या वाढदिवसाला हजर होते. त्यांनी आकर्षक असे दोन कॉफी मग्स त्याला भेटस्वरूप दिले. त्यावर सिड आणि रोहिणी काकूचा एकत्र फोटो देखील होता. सिडचे ठराविक मित्र-मैत्रिणी आलेले होते. संपूर्ण बच्चा पार्टी बऱ्यापैकी इंजॉय करत होते. अवघा धुमाकूळ घातला होता त्यांनी! मजामस्करी करत होते. थोड्या वेळाने इंजॉय करून झाल्यावर सर्व मुलं-मुली त्यांच्या घरी गेले. त्यादिवशी सिड नेहमीपेक्षा जास्तच खूश होता. सगळ्या सेलिब्रेशननंतर तो निशाला घेऊन समुद्रकिनारी गेला. त्यांच्या मागोमाग ए.के.ही गेला पण तो थोड्या अंतरावर उभा राहून निरिक्षण करत होता. तेवढ्यात त्याच्या कानी सिडचे शब्द पडले. 


सिड निशाला उद्देशून म्हणाला, " डार्लो, मला सगळ्यांनी गिफ्ट दिलंय पण मी तुझ्या गिफ्टची वाट बघतोय. तू नाही का देणार आज मला गिफ्ट? मला माहिती आहे की, पार्टीचा प्लॅन तुझाच होता पण तरीही मला तुझ्याकडून एक गिफ्ट हवंय म्हणजे हवंय. "  


" अरे पिल्ला, त्यात काय एवढं! सांग तुला काय हवंय? " निशा सिडचे गालगुच्चे घेत म्हणाला. 


" डार्लो, मला जे हवंय ते फक्त तूच देऊ शकतेस आणखी कुणीच नाही. म्हणून तू मला प्रॉमिस कर की, तू नकार देणार नाहीस. " सिड ओठांचा चंबू करत म्हणाला. 


 " बरं, बाळा! तू सांग तर आधी तुला काय हवंय! मी शंभर टक्के तुला ते गिफ्ट देण्याचा प्रयत्न करेल. प्रॉमिस! आता सांग बघू... तुला काय हवंय ते! " निशा सिडला आश्वस्त करत बोलली. 


 " डार्लो, मला ना माझ्या आईला नेहमी हसत बघायचं आहे. ती ना नेहमीच नाराज असते गं! तिचे डोळे सदैव पाणावलेले असतात. मला जाणवतं सतत! कारण जरी ती तिचे अश्रू लपवत असली तरी मला कळतं गं सर्व! आणि मला हे ही माहीत आहे की, ती ना तेव्हाच खूश असते जेव्हा ती विराज काकांबरोबर असते. त्यांच्यासोबत वेळ घालवताना अनामिक सुख तिच्या चेहऱ्यावर असतं. काका नेहमी तिला हसवण्याचा प्रयत्न करतात. कळत-नकळत तिची काळजीही घेतात. म्हणून डार्लो, तू काकांना सांग ना कायम माझ्या आईसोबत राहायला... मलाही आवडेल गं, माझी आई खूश राहिली तर... मला तिला एकांतात रडताना नाही पाहायचं आहे. तू आई आणि विराज काकांना सांग ना एकमेकांची सोबत करायला... जर त्या दोघांना एकमेकांचा आधार होणार असेल तर किती भारी होईल ना! प्लीज डार्लो तू आई आणि काकांशी बोलशील का? " सिड भावूक होऊन बोलत होता अन् त्याचा प्रत्येक शब्द ऐकताना निशाला मात्र अप्रूप वाटत होते. तिला कळत नव्हतं की, नेमका सिड त्याच्या भोळेपणामुळे बोलतोय की, तो त्याचा समंजसपणा आहे. तो विचार करताना निशाचे डोळे देखील आपसुकच पाणावले होते. त्यामुळे ती त्याला कौतुकाने पाहत होती. 



क्रमशः

....................................................... 


©®

सेजल पुंजे. 


🎭 Series Post

View all