अल्लड हे प्रेम जरासे (भाग-वीस)

Story Of A Girl Nisha... Who's Waiting For Her Perfect Guy!

                ए.के.चा निरोप घेऊन निशा लगेच फाटक उघडून आत गेली. त्यानंतर दार उघडून घरात शिरली. घरी पोहोचताच नेहमीप्रमाणे आवरा-आवर करून, घरातली उर्वरित कामे आटोपून व जेवण करून ती बेडवर लोळत बसली. अनायासे ती थोडा वेळ ए.के.चा विचार करायला लागली. तिला सांजवेळी ए.के.ची दिसलेली आगळीवेगळी छटा प्रचंड आवडली होती. ती मनोमन त्याला दाद देत राहिली. त्याच्याशी बोलताना अतिशय सकारात्मक वाईब्ज जाणवल्या होत्या; त्यामुळे त्याचा वावर तिच्या मनाला आपसूकच स्पर्शून गेला होता. थोड्या वेळानंतर तिने तिच्या डायरीत तिच्या दैनंदिन दिनचर्येची अन् इतर बाबींची नोंद करून ठेवली. नंतर कुस बदलत ती निद्रेच्या स्वाधीन झाली. 


                ए.के.च्या आनंदाचा मात्र ठावठिकाणाच नव्हता; म्हणून त्याने उत्साहातच अमेयला कॉल केला. त्याच्याशी त्याने ना जास्त वेळ चर्चा केली ना त्याला निशासोबत घडलेल्या अनपेक्षित भेटीबद्दल आणि संवादाबद्दल सांगितलं... पण त्याच्याशी बोलताना त्याने त्याच्या आनंदाचा उल्लेख केला. त्याने फक्त तो आनंदी असल्याचे कळवले कारण इतर जे काही घडलं होतं ते सर्व तो अमेयला आमोरासामोर सांगणार होता. त्यामुळे थोड्याच वेळात बोलणं आटोपून त्याने कॉल कट करून घेतला. त्यानंतर तो परत एकदा निशाच्या त्या फोटोवरून हात फिरवताना अन् न्याहाळताना झोपी गेला. 


                दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून, घरीच व्यायाम आटोपून, इतर सर्व आवरा-आवर करून झाल्यानंतर ए.के. अंघोळ करून तडकाफडकी तयार झाला. लगेच त्याने नाश्ता आटोपून घेतला. सगळं आवरून घरातून बाहेर पडण्याआधी त्याने परत स्वतःलाच आरशात बघून नेहमीप्रमाणे दाद दिली. मग शेल्फमधून बाइकची चावी आणि डायनिंग टेबलवरुन मोबाईल घेऊन तो बाहेर गेला. 


                त्याने त्याची बाईक घेतली. तिचा साईड मिरर नीट केला. डोक्यावर राजमुकुटाप्रमाणे हेल्मेट चढवलं आणि कीक मारून त्याने बाईक स्टार्ट केली अन् लगेच निशाच्या घराकडे बाईक वळवली. थोड्या वेळातच निशाच्या घरापुढे त्याने बाईक थांबवली व हॉर्न वाजवला. हॉर्नचा आवाज ऐकताच निशा पळतच बाहेर आली. तिने दाराला टाळं लावलं नंतर फाटक बंद करून लगेच ती ए.के.च्या बाईकजवळ येऊन उभी राहिली.


" नो मेकअप! स्टिल लुकिंग गॉर्जियस! सिम्पली ब्युटिफुल! " ए.के. तिचं निरिक्षण करताना हळूच पुटपुटला.


                सुदैवाने निशाला काहीही ऐकू गेले नाही. तिने ए.के.च्या डोळ्यांपुढे चुटकी वाजवली; त्यामुळे लगेच तो भानावर आला. त्याने बाईक स्टार्ट करून तिला बसण्याचा इशारा केला. ती लगेच क्षणाचाही विलंब न करता बसली. त्यानंतर त्याने बाईक सुरू केली आणि सुरू झाला त्यांचा घर ते शाळा इथपर्यंतचा प्रवास! बाईकवर दोघांचंही फारसं बोलणं झालं नाही, जुजबीच बोलणं झालं. काही वेळात ते शाळेत पोहोचले. ती त्याच्या खांद्याचा आधार घेत खाली उतरली नंतर थोड्यावेळाने तो ही बाईकवरून खाली उतरला. 


                एकीकडे निशा आणि ए.के. दोघेही संवाद साधतच स्टाफरूममध्ये जात होते पण तेवढ्यात अमेयने त्या दोघांना एकत्र येताना पाहिलं आणि तो चकित होऊन एका जागी थबकून त्यांच्याकडे पाहतच राहिला. दुसरीकडे निकिताला सुध्दा ए.के. व निशा एकत्र येताना व हसून बोलताना दिसले. त्यामुळे ती रागाने लालबुंद झाली होती. शिवाय तिला जेलस फील होत होतं म्हणून ती पाय आपटतंच स्टाफरूममध्ये निघून गेली. 


अमेयने हातात आलेली संधी न सोडता त्या दोघांना गाठले व निशाला थांबवून त्याने मुद्दाम विचारलं, " निशू, तू याच्याबरोबर काय करत आहेस? " 


निशाने डोळे मोठे केले आणि म्हणाली, " अरे अम्या, ते काल काय झालं ना... " असं म्हणत आदल्या सायंकाळी जे काही घडलं होतं ते तिने अमेयला सांगितलं. 


" अच्छा, हे सर्व घडलं तर! बरं! मग तू जा मी येतो काही वेळात! " अमेयने मंद हसून निशाला प्रतिसाद दिला. त्यानंतर ती लगेच स्टाफरूममध्ये निघून गेली; परंतु ती जाताच ए.के.ला अमेयने खुन्नस दिली आणि इशाऱ्यातच 'तू भेट मग तुला सांगतो' असा दम दिला. त्यामुळे पुढे काय होईल, याचा विचार करूनच अमेयच्या मागोमाग ए.के.ही गेला. 


अमेय कंबरेवर हात ठेवून स्टोअर-रूममध्ये उभा होता. ए.के. तिथे पोहोचताच अमेयने त्याच्या पोटात ठोसा मारला. ए.के. विव्हळला. त्याची कळ ऐकताच अमेय सॉरी बोलू लागला अन् तेवढ्यात ए.के. फिदीफिदी हसू लागला. अर्थातच ए.के.ला ठोसा लागला नव्हता अन् तो ढोंग करत होता. त्यामुळे अमेय चीडचीड करू लागला. 


अमेय रुसून ए.के.ला म्हणाला, " यार, ए.के.! धिस इज नॉट डन! तू मला का नाही सांगितलंस काहीच? आपलं तर काल रात्री कॉलवर बोलणं ही झालं होतं ना? "


" मित्रा, मी तुला हे सगळं कॉलवर सांगायचं नव्हतंच मुळी! कारण मला तुला हे प्रत्यक्षात भेटून सांगायचं होतं ना... " ए.के. उत्साहात म्हणाला. 


" ह्म्म! बरं! " अमेय हळूहळू शांत होऊ लागला. 


" बाय द वे, तुला ना आणखी काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. " ए.के. डोळे मिचकून बोलला. 


" आता आणखी काय लपवून ठेवलंयस तू? " अमेयने साशंक नजरेने पाहिले. 


" ऍक्च्युली, मी त्यादिवशी माशीचा किस्सा अर्धवटच सांगितला होता यार... आज पूर्ण सांगतो. ऐक! " असं म्हणत ए.के.ने पहिल्या दिवसापासूनची सगळी इत्थंभूत माहिती कबूलीजबाब स्वरूप अमेयला दिली.


सर्व ऐकल्यावर अमेय नजर रोखून म्हणाला, " ए.के. तुला कळतंय का? " 


" काय? " ए.के.ने गोंधळून विचारले.


" आय थिंक, यू आर इन लव्ह विथ निशा! " अमेय सुचक बोलला. 


" अं? सिरियसली? सध्यातरी मला असं काहीही वाटत नाहीये यार! " ए.के.ने त्याचं मत मांडलं.


" बेटा जी! यह नखरे हमारे सामने नही... हे असे माझ्यापुढे आढेवेढे घेऊन काहीही साध्या होणार नाहीये; कारण लक्षण तर सेम तशीच आहेत आणि वर तोंड करून म्हणतोय की, मला नाही वाटत. " अमेय त्रासिक कटाक्ष टाकून बोलला. 


" अरेच्चा! भावा खरंच! " ए.के. काकुळतीने स्पष्टीकरण देत बोलला.


" ह्म्म, असू दे! सुरू राहू दे तुझं! चोरी चोरी चुपके चुपके... " अमेय तोंड वाकडं करून बोलला. 


" नाही अम्या... मी खरंच सांगतोय. मला काहीच अंदाज नाहीये निशा आणि माझ्या नात्याबद्दल! त्यामुळे मला खात्री नाहीये की, मला प्रेम झालं असेल; पण एक मात्र खरं की, तिची मला सतत ओढ वाटते. नकळत मी तिच्यात गुंतत जातो. भूरळ पडते मला तिच्यासोबत असताना... असं वाटतं की, जणू मी वेगळ्याच जगात वावरतोय; पण या सगळ्या भावनांना प्रेम म्हणतात अशी मला पूर्णतः खात्री नाहीये. त्यामुळे मी सध्या कन्फ्युज आहे. " ए.के.ने सविस्तर त्याची बाजू मांडली. 


" बरं, बरं! असो... कदाचित तुला आता नाही कळतंय पण कळेल हळूहळू! हे आता वेळेवर सोडून दे! " अमेय खट्याळ स्वरात बोलला.


" ह्म्म... आणि जर समजा, मला याबद्दल काही कळलं नाही तर तू आहेच की, मला सांगायला... #द अमेय देशमुख लव्हगुरू! " ए.के.ने हसत प्रत्युत्तर दिलं. त्यावर दोघांनीही हसतच एकमेकांना टाळी देऊन मिठी मारली. 


अमेय आणि ए.के. एकमेकांशी गप्पा मारत असतानाच तिथे निशा पोहोचली आणि ती दोघांनाही उद्देशून म्हणाली, " बरं झालं! तुम्ही दोघेही इथेच भेटलात. मला ना बोलायचं होतं जरा तुमच्याशी... "  


 "आमच्याशी? " दोघेही एक सुरात ओरडले. 


तेव्हा तिने डोक्यावर हात मारुन घेतला व म्हणाली, " हो तुमच्याशीच! इथे कुणी दुसरं दिसतंय का? नाही ना मग? आता गप्प बसा आणि ऐका मी काय म्हणतेय ते... " निशाच्या वाक्यावर दोघांनीही मानेनेच हुंकार भरला अन् नंतर निशा पुढे बोलायला सरसावली. 


क्रमशः

.......................................................... 


©®

सेजल पुंजे. 

🎭 Series Post

View all