अल्लड हे प्रेम जरासे (भाग-सत्तावीस)

Story Of The Girl Nisha

हर्षदाचं बोलणं ऐकून तिच्याच वर्गातला अनय नावाचा एक मुलगा तिला उद्देशून म्हणाला, " काय गं, हर्षे? तुला काय आमच्यासारखी गुणी पोरं दिसत नाहीत का? प्रपोज करायचंच आहे तर आमच्यासारख्या मुलांना कर की... आम्ही कुठे नाही म्हणणार आहोत. आधीच पोरींचा तुटवडा आणि त्यातंही तुमच्यासारख्या शेंबड्या मुलीही ए.के. सरांवर लाईन मारायला लागल्या तर आम्ही काय करायचं? म्हणून तू गपचूप प्रपोज करून टाक. मी चुकूनही तुला नकार देणार नाही. " 

अनय उगाच हर्षदाची छेड काढत होता. दरम्यान हर्षदाही वादावाद घालायला भिडलीच. ती अनयला म्हणाली, " ए, शहाण्या निघ! आला मोठा बडेजावपणा हाकणारा! तुला कोण प्रपोज करणार? साधी अक्कल नाहीये चिमुटभर तुला आणि प्रपोज कर म्हणे. हं! वाट बघ! " 


" ए, गप ए! डोक्यावर चढू नकोस लगेच! तू आली मोठी शहाणी! मला शहाणपण देणारी... जरा काय चढवलं तर लगेच चढलीस. हं! तू आता बस बोंबलत! तुला तर मी भावच देत नसतो. माझ्या मागे मागे फिरशील ना तेव्हा डोकं ठिकाणावर येईल तुझं आणि माझंही काही अडलं नाहीये. म्हणून तू प्रपोज केल्यावर तुला होकार तर मी कधीच देणार नाही. कोण असलं रडकं ध्यान गळ्यात बांधून घेईल. " अनय हर्षदाला चिडवत म्हणाला. 


" ए अन्या आणि हर्षा! थांबा ना जरा दोघेही! काय सारखे भांडत असता? पटत नाही तर नादाला लागताच कशाला? असो... आता गप्प बसा. मला सरसोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. " त्याच वर्गातील श्रीकांत नाव असलेला, सगळ्यात शांत राहणारा मुलगा अनय आणि हर्षदाला शांत बसवून मुद्दा सांभाळण्याचा प्रयत्न करत बोलला.


" ए शिऱ्या... तुझं काय रे मध्येच? " हर्षदा नाक मुरडून बोलली. 


" गप गं जरा वेळ! मला खरंच महत्त्वाचं बोलायचं आहे सरांसोबत! तुम्ही दोघे गप्प बसलात तर बोलता येईल मला... " श्रीकांत बोलला. त्यावर हर्षदाने हुंकार भरला व ती तिच्या जागेवर गप्प बसली. 


त्यानंतर श्रीकांत ए.के.कडे वळून बोलू लागला, " सर, तुम्हाला किती सुंदर बासरी वाजवता येते! आणि खरं सांगायचं तर, ही धून ऐकताना अगदी असं वाटत होतं की, स्वतः श्रीकृष्ण राधेला साद घालतोय. खरंच, सर! खूप कमालीची जादू आहे तुमच्या बासरीच्या सूरात! अडॉरेबल... ॲन्ड द वे ऑफ रिप्रेझेंटिंग इट वॉज अल्सो टू मच नाईस. " 


" ए शिऱ्या, इंग्रजीच्या लाडक्या! झालं ना तुझं बोलून? हेच बोलायचं होतं तुला की आणखी बाकी आहे? " अनय धुसफूस करत बोलला. 


" झालं! हेच बोलायचं होतं मला! " श्रीकांत मंद हसत बोलला. 


" झालं ना! मग आता बंद पड आणि तुझ्या इंग्लिशचे धडे दुसरीकडे गिरव. इथे नको... कळलं? आम्ही अडाणी माणसं तुझी हायफाय इंग्लिश तुझ्या स्वप्नातल्या गर्लफ्रेंडला ऐकवत जा! " हर्षदा श्रीकांतची छेड काढत बोलली. 


" हर्षे, थांब ना जरा आणि अनय, तू पण शांत हो की जरा! का उगाच राडा घालत आहात? " त्यात वर्गातील उद्धव नावाचा मुलगा अनय आणि हर्षदाला शांत करण्याचा प्रयत्न करत बोलला; पण त्याचा प्रयत्नही निष्फळच ठरला.


वर्गातील गोंधळ उत्तरोत्तर वाढतच होता म्हणून सरतेशेवटी निशाच स्वतः वर्गाच्या आत जाऊन हर्षदा आणि अनयला समजावू लागली. तरीही उगाच खोडी करायची म्हणून अनय हर्षदाला उद्देशून म्हणाला, " ए हर्षे, तुला काय वाटलं? आम्ही पोरं तुमच्यासारख्या शेंबड्या मुलींवर फिदा आहोत... अरे, हुड! आम्हालाही नको तुमच्यासारख्या मुली आयुष्यात! आम्हाला तर निशासारखी हवीय. कुठं निशा आणि कुठं तुम्ही! काही तुलनाच नाही. हं... " 


                अनयचे शब्द ऐकताच ए.के. आश्चर्यकारक नजरेने अनयकडे पाहू लागला; कारण चक्क निशाला तिच्या नावाने त्या वर्गातील मुलं हाका मारत होती. ए.के.ला आश्चर्यचकित झालेलं पाहून निशाच त्याचा गोंधळ दूर करत बोलली की, तिनेच विद्यार्थी आणि तिच्यात वयाचं वा इतर कुठलेही अंतर ठेवणे टाळलेले आहे; म्हणूनच सर्व विद्यार्थी तिला नावानेच हाक मारतात. ते ऐकून ए.के.च्या चेहऱ्यावर अनाहूतपणे गोड स्मित पसरले आणि मनातल्या मनात त्याने तिची भरभरून स्तुती केली.


                निशा काही वेळ त्याच वर्गखोलीत बसलेली असताना काही चिमुकली मुलं-मुली, साधारण सहावी वा सातवीतले विद्यार्थी-विद्यार्थिनी त्या खोलीत शिरून निशाजवळ गेले. त्यांना एकाएकी स्वत:जवळ आलेले पाहून निशा जरा गोंधळलीच पण नंतर त्या सगळ्यांना ती इशाऱ्यातच एक भुवई उंचावून 'काय झाले?' म्हणून विचारू लागली.


तिच्या प्रश्नार्थक नजरेच्या उत्तराखातर त्या चिमुकल्या विद्यार्थ्यांतली एक चिमुकली संजीवनी नावाची मुलगी निशाला उद्देशून म्हणाली, " निशा, यावेळी प्लीज सहलीचं काही तरी कर ना! मागच्या वर्षीसुध्दा प्रिन्सिपल सरांनी नकार दिला होता. यावेळी तरी प्लीज काहीतरी कर आणि मागच्या वर्षीसारखं काही होऊ देऊ नकोस. खूप इच्छा आहे गं सहलीला जायची! मोजून मापून दिवस तर मिळतात सहलीचे अन् सहल नसेल तर काय मजा ना शाळेत येण्याची? आम्हा मुलांना सहलीपेक्षा ओढ कोणत्याही गोष्टीची नसते. शिवाय आम्ही वर्षभर एकही दिवस न चुकता शाळेत हजेरी लावतो. थोडक्यात, दांडी न मारता शाळेत येतो म्हटल्यावर निदान एक किंवा दोन दिवसांसाठी का होईना पण आमच्या आनंदासाठी सहल गेली नाही तर आमच्यासारख्या मासूम आणि निरागस लेकरांवर किती तो अन्याय होईल! " 


संजीवनी अगदी केविलवाणा चेहरा करून उदास स्वरात बोलत होती. तिचा उदास चेहरा पाहून दगडालाही पाझर फुटावा असे वाटत होते पण तेवढयात निशा खाकरली आणि गालातल्या गालात हसत संजीवनीची मुद्दाम छेड काढत म्हणाली, " संजू, इथे मासूम लेकरं कोण आहेत गं? " 


" इतरांचं माहिती नाही पण इथे मी एकमेव आहे की, मासूम कोकरू! अगं, निशा... हे सर्व जाऊ देत ना... आधी तू प्रिन्सिपल सरांशी काही बोलून बघ ना... आम्हाला सगळ्यांना जायचंय म्हणजे जायचंय सहलीला! " संजीवनी चेहऱ्यावर फसवा भोळेपणा दाखवून बोलली. 


" अगं, पण संजू! सर ऐकतील का माझं? मी फक्त एक साधारण टीचर आहे गं तुमची! माझ्याकडे एवढे अधिकार नाहीत की, त्यांना मी असं काही बोलावे वा सहल घेऊन जाण्यासाठी आग्रह करावा... " निशा संजीवनीची समजूत काढताना बोलली. 


" ते माहीत नाही आता आम्हाला काहीच; पण आम्हाला नक्की खात्री आहे की, सर तुझं ऐकतील. म्हणून प्लीज, तू आमच्यासाठी फक्त एकदा सरांशी बोलून बघ. गरज पडली तर आम्ही सरांना फोर्स करणारच आहोत ए.के. सरांच्या सोबतीने पण त्याआधी आमचं नेतृत्व तू कर. तू चाल पुढं... आम्ही आहोतच मागं! " संजीवनी काकुळतीने विनवणी करत बोलली. 


" अगं पण... " निशाला काय बोलावे ते सुचेनासे झाले होते.


" पण-बिण काही नाही. फक्त तू एकदा प्रयत्न कर ना! तू आवडती आहेस सगळ्यांचीच! म्हणून प्लीज तू ट्राय कर... ऍटलीस्ट एकदा ट्राय कर. " संजीवनीची वर्गमैत्रीण 'जुई' बोलली. 


" प्लीज, निशा कॅम्पला चल ना... आय मीन, सरांना रिक्वेस्ट कर ना की, आपली सहल कॅम्पसारखी असावी... " खिलेश संजीवनीचा वर्गमित्र बोलला. 


" हो ना, कॅम्पला खरंच मजा येईल. शिवाय नवीन शिकण्याची संधीही मिळेल. " 'अपेक्षा' हर्षदाची वर्गमैत्रीण बोलली. 


" हो ना, निशा प्लीज... " 'आर्या' संजीवनीची वर्गमैत्रीण बोलली. 


                थोडक्यात, निशाला मुख्याध्यापक साहेबांकडे सहलीसंदर्भात चर्चाविमर्श करायला पाठविण्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांचं एकमत झालं. त्यामुळे सर्व चिमुकले, लहान-मोठे हे सर्व विद्यार्थी निशाला विनवणी व जबरदस्ती करू लागले. विद्यार्थ्यांसोबत मिळून ए.के.सुद्धा निशाला विनवणी करू लागला अन् नाईलाजाने सरतेशेवटी निशाने होकार दिला. लगेच ती सगळ्यांना घेऊन स्टाफरूममध्ये गेली आणि त्यांना तिथे शांत बसायला सांगून ती मुख्याध्यापक साहेबांच्या केबिनमध्ये गेली. निशाला केबिनमध्ये जाऊन बराच उशीर झाला होता. त्यामुळे सर्व विद्यार्थी स्टाफरूममध्ये येरझारा घालत होते.


क्रमशः

.........................................................

©®

सेजल पुंजे.


🎭 Series Post

View all