Feb 24, 2024
बालकथा

जे होते ते बऱ्या करिता!

Read Later
जे होते ते बऱ्या करिता!

(बाल मित्रांनो आज मी तुम्हाला परत एक अकबर आणि बिरबल यांचा किस्सा सांगणार आहे. कदाचित सुरुवातीला ही गोष्ट वाचून तुम्हाला असं वाटेल की अरे ही तर अंधश्रद्धा आहे पण या गोष्टीतून सकारात्मक विचार कसा करावा ,या पद्धतीने जर पाहिलं तर एक वेगळा दृष्टिकोनही एखाद्या गोष्टीला असू शकतो हे लक्षात येईल)

             एकदा काय होतं !अकबर बादशहा चं बोट कशानेतरी कापल्या जातं, शेवटी अकबर बादशहा च ते! त्याचं बोट कापल्या जाणं म्हणजे किती वेदना? किती त्रास? बादशहाचा बोट कापल्या गेलं ही बातमी पाहता-पाहता साऱ्या नगर भर पसरते,

       आपलं बोट कापल्या गेलं आहे , हे बादशहाच्या सेवका कडून बिरबलाला कळवल्या जातं. आणि बिरबलही मग तातडीने बादशहाच्या भेटीला येतो, बादशाला झालेली जखम खरोखरीच खोल असते आणि राजवैद्य यांनी येऊन त्यांच्या बोटाला मलमपट्टी केलेली असते. बादशहालाही "त्या" जखमेच्या वेदना लपवता येत नाहीत. पण बिरबल सहजच म्हणून जातो की,  "जे होतं ते बऱ्या करता होतं"! पण बिरबलाच्या या वाक्यामुळे बादशहा प्रचंड दुखावल्या जातो आणि रागाच्या भरात तो बिरबलाला कैदेत टाकायचं फर्मान सोडतो. स्वतः अकबर बादशहाने हा हुकुम दिल्यामुळे सेवकांचा ही नाईलाज होतो आणि नाखुशने का होईना पण ते बिरबलाला कैदेत टाकतात.

            त्यानंतर लगेचच दोन-चार दिवसांनी बादशहाला अचानक शिकारीला जावसं वाटत, म्हणून निवडक सैनिक सोबत घेऊन बादशहा जवळच्या जंगलात शिकारीला जातो, पण दिवसभरात त्याला एकही शिकार मीळत नाही , त्यामुळे तो जंगलात फार आत मध्ये शिकारीच्या शोधात जातो . बादशहा एकटाच पुढे गेल्यामुळे सोबतच्या सैनिकांची आणि बादशहाची चुकामुक होते. जंगलाच्या त्या अगदी आत मधल्या भागात काही आदिवासी लोक राहत असतात, अगदी नेमके त्याच दिवशी त्यांना त्यांच्या देवाकरिता एक नरबळी हवा असतो. अचानक घोड्यावरुन बादशहा तिथे पोहोचल्याने त्यांना आयताच नरबळी मिळतो. त्यामुळे झाडावर उंच चढून बादशहावर  जाळं टाकून ते  बादशहा ला कैद  करतात.

                  रात्री ते राजाचे हात-पाय बांधून यज्ञवेदी वर बादशाहाला नरबळी करता घेऊन जातात, त्याच वेळी त्या आदिवासींचा म्होरक्या म्हणतो की , "या माणसाला कुठे काही इजा तर नाही ना ?,याचे संपूर्ण अवयव ठीक आहेत ना ! ते एकदा तपासून बघा कारण आपल्या देवाला अपूर्ण नरबळी चालत नाही".

                   ज्यावेळी ते आदिवासी लोक बादशहाचे अवलोकन करतात तेव्हा बादशहाच्या हाताच्या बोटाला इजा झालेली त्यांना दिसते आणि हा नरबळी आता आपल्या उपयोगाचा नाही म्हणून ते बादशहा ला सोडून देतात. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाचे सैनिक राजाला शोधत-शोधत जंगलाच्या त्या आत मधल्या भागापर्यंत येतात आणि आपला बादशहा सहीसलामत आहे असं बघून सुटकेचा निश्वास टाकतात.

           बादशहा ही मग राजधानीत परतल्यावर अगदी पहिलं काम करतो , ते म्हणजे बिरबलाला आधी कैदेतून सोडवण्याचं. बादशहाने बिरबलाला कैदेतून सोडवल्या बरोबर , बिरबल बादशहा चे मनःपूर्वक आभार मानतो, तेव्हा बादशहा बिरबलास म्हणतो की, " बिरबला! बरं झालं त्या दिवशी तू म्हटलं होतं की जे होतं ते बऱ्या करता होतं " आणि जंगलात घडलेली सर्व हकीकत ते बिरबला सांगतात,आणि म्हणतात की ,"बिरबला तुला माझ्यामुळे कैदेत राहावे लागले" त्यावेळी हजर जवाबी बिरबल म्हणतो , "जे होते ते बऱ्या करताच होते जहांपना, कारण जर मी तुमच्या बरोबर असतो तर त्या आदिवासींनी तुमचं बोट कटलेलं असल्यामुळे तुम्हाला तर सोडून दिलं असतं पण माझा नक्कीच नरबळी दिला असता". बिरबलाचे हे वाक् चातुर्य बघून बादशहा आणि बिरबल दोघेही हसायला लागतात.


तात्पर्य........ बाल मित्रांनो आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरीही जीवना प्रति जर आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल तर आपण कुठल्याही संकटातून सहीसलामत बाहेर पडू शकतो नाही का?
(वाचकहो तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असेल तर मला फोलो करा आणि आपले मत आणि अभिप्राय नक्की नोंदवा)

(सदर लिखाण हे मोबाईल मधून केले असल्याने शुद्धलेखनाच्या चुका असल्यास क्षमस्व)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//