आलिया भट्ट

About Bollywood Actress Alia Bhatt
आलिया भट्ट ही हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा जन्म दिनांक १५ मार्च १९९३ रोजी मुंबईतील भट्ट कुटुंबात झाला. प्रसिद्ध हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक महेश भट्ट व पूर्व अभिनेत्री \" सोनी राजदान \" यांची ती कनिष्ठ कन्या आहे. तसेच ९० च्या दशकातील नावाजलेली अभिनेत्री पूजा भट्ट यांची धाकटी बहीण आहे. आलिया चे शिक्षण जमनाबाई नर्सिंग स्कूल येथे झाले. ( पुरेशी माहिती उपलब्ध नाही. )

पदार्पण :

आलिया भट्ट हिने बालवयात १९९९ साली \" संघर्ष \" या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

२०१२ साली तिने करण जोहर दिग्दर्शित \" स्टुडंट ऑफ द इयर \" या चित्रपटात तिची पहिली प्रमुख भूमिका केली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारात \" सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री \" चे नामांकनही मिळाले.

सुरुवात :

मात्र तिला खरी ओळख मिळाली ती २०१४ मधील \" हायवे \" या चित्रपटातून. यातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. हायवे चित्रपट आलिया च्या करियर मधील पहिला मैलाचा दगड ठरला.

पुढे आलियाच्या अभिनयात अधिकाधिक प्रगल्भता येऊ लागली. \" डियर जिंदगी \" सारख्या Coming of age drama film मध्ये आपल्या व्यवसायात आश्वासक, स्मार्ट असणारी ; पण दुसरीकडे लहानपणापासून होत आलेल्या नातेसंबंधातील अपेक्षाभंगांमुळे वैयक्तिक जीवनात नैराश्याच्या गर्तेत सापडलेली \" कायरा \", बद्रिनाथ की दुल्हनिया \" सारख्या एक सामाजिक संदेश लपलेल्या Romantic - comedy चित्रपटात करियरला सर्वप्रथम प्राधान्य देत, आपली स्वप्नं पूर्ण करून आत्मनिर्भर बनू पाहणारी निश्चयी तरूणी \" वैदेही \", राजी सारख्या देशभक्तीपर चित्रपटामध्ये, ऐन तारुण्यात आपली स्वप्ने, इच्छा-आकांक्षा बाजूला सारून देशाच्या सुरक्षेसाठी परमुलखात लग्न करून जाणारी गुप्तहेर \" सहमत \", गली बॉय चित्रपटातील बिनधास्त, डॅशिंग मुलगी आणि तितकीच निरागस, प्रेमळ, पझेसिव्ह प्रेयसी \" सफीना \" अशा विविधांगी भूमिका पार पाडत आलिया ने करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
२०१७ सालीच्या \" उडता पंजाब \" चित्रपटासाठी तिने सर्वोत्तम अभिनेत्री चा फिल्मफेअर पुरस्कारही मिळवला.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित \" गंगुबाई काठियावाडी \" या चित्रपटातून एका निडर, हिकमती, जहांबाज प्रौढ वयीन स्त्रीचे अगदी सर्वस्वी वेगळे पात्र साकारून आलिया ने सर्वांना चकित करून सोडले आहे. चित्रपटातील आलिया च्या अभिनयाचे भरभरून कौतुक करण्यात आले.

अशी गुणी, कुशल अन् अभिनेत्री आलिया भट्ट हिला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, व पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या सदिच्छा.

@ प्रथमेश काटे