आली दिवाळी अंतिम भाग

दिवाळीची मजा


आली दिवाळी.. भाग ३


" आई, काय करायचे ते सांग. मी तयार आहे. " समीरा ऑफिसमधून आल्या आल्या चहाचा कप तिच्या हातात ठेवत वीर म्हणाला.

" हो.. मी पण तयार आहे." आजोबा बिस्किट घेऊन येत बोलले.

" बापरे.. तुम्ही दोघांनी खूपच मनावर घेतलेले दिसते आहे. " समीरा चहा घेत बोलली. " वीर मग तुझी आजची मॅच? बाबा तुमचे नानानानी पार्क?"

" फराळासाठी सगळे बंद.. सांग काय काय करायचे ते?" वीर आणि आजोबा एकदम बोलले.

" अरे हो.. मला जरा श्वास तर घेऊ दे. मग घेऊ करंज्या करायला."

" करंजी? तू चकली, चिवडा नाही करणार?" वीर एवढेसे तोंड करत बोलला.

" आणि लाडू, अनारसे?" आजोबांचाही चेहरा उतरला होता.

" ते करणारच. पण सुरुवात करंज्यांनी. मी आलेच. तोपर्यंत वीर तू खोबरं किसायला घे."

"मी काय करू?" आजोबांचा उत्साह उतू जात होता.

" बाबा, तुम्ही आता काही नका करू. नंतर वाटल्यास सारण भरा." समीराने पटापट पीठ भिजवले. वीरला गोळे करून दिले. वीर लाटत होता, आजोबा सारण भरत होते, समीरा करंज्या तळून घेत होती.

" हा आहे परफेक्ट फोटो." सुदीप फोटो काढत म्हणाला.

"नाही.. ती परफेक्ट तेव्हा होईल जेव्हा तू काम करायला बसशील." आजोबा बोलले.

" काम तर मी केले आहेच. तुम्ही फराळ करणार म्हणून खालून गरमागरम डोसे आणले आहेत.."

"ये हुईना बात. " वीर आनंदाने बोलला. शेवटी वीर, सुदीप आणि आजोबांच्या मदतीने समीराचा दिवाळीचा फराळ पूर्ण झाला. ऑफिस, घर आणि हा फराळ हे सगळे करून समीरा एवढी थकली होती की शेवटी आजोबांनीच तिला आराम करायला सांगितला. अर्ध्या तासात उठवा, मला आज पहिला दिवा लावायचा आहे असे सांगून समीरा झोपायला गेली..


" उठा उठा, दिवाळी आली, दिवे लावायची वेळ झाली.." वीर समीराला उठवायला आला.

" मी खूप वेळ झोपले का रे? अरे देवा.. अजून रांगोळी काढायची आहे. चहा ठेवायचा आहे. झोप लागली होती रे. उठवायचे ना मला." समीरा बडबडत होती.

" चिल आई. आधी तोंड धू , मग बाहेर ये."
समीरा आवरून बाहेर आली. सगळे घर झाडून पुसून स्वच्छ केले होते. वीरने छान रांगोळी काढली होती. सुदीपने दिव्यांच्या माळा सोडल्या होत्या. आजोबांनी पणत्या तयार ठेवल्या होत्या. घरभर एक प्रसन्नता पसरली होती.

" आवडलं?" सुदीपने विचारले.

" खूप.." समीराच्या डोळ्यात पाणी होते. तिने पटापट पणत्या लावल्या. गायवासराच्या मूर्तीची पूजा केली. आजोबांना नमस्कार केला. आजोबा गहिवरले.

" याला म्हणतात दिवाळी.. जिथे संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन साफसफाई करते, फराळ करते आणि गुण्यागोविंदाने राहते. बरोबर ना?"


तुम्हाला ही कथा कशी वाटली सांगायला विसरू नका.. आणि हो सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची भरभराटीची जावो हीच सदिच्छा..


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all