आली दिवाळी.. भाग २

साफसफाई दिवाळीची


आली दिवाळी.. भाग २


" वीर, तो घोडा घेऊन ये.." एका हातात झाडू आणि दुसर्‍या हातात फडके घेऊन उभे असलेल्या सुदीपने वीरला हाक मारली. घोडा हा शब्द ऐकून कपाट स्वच्छ करत असलेले आजोबा पटकन बाहेर आले.

" घोडा?? घोडा कुठे आणि कोणी आणला?" त्यांनी विचारले.

" बाबा, घोडा म्हणजे ही नवीन शिडी. त्याला घोडा म्हणतात." सुदीपने माहिती पुरवली.

" मग जुन्या शिडीला काय उंट म्हणायचे?" आजोबांनी त्यातल्या त्यात एक शेरा मारला.

" बाबा तुम्ही पण ना.." सुदीप हसत बोलला. तेवढ्यात वीर तो घोडा घेऊन आला.

" चढ आता त्याच्यावर. हा झाडू घे आणि जेवढी दिसतील तेवढी जळमटे काढ." सुदीपने हुकूम दिला. वीर बिचारा गुपचूप चढला. तो चढल्यावर आजोबा बोललेच,

" हे म्हणजे घोड्यावर गाढव बसल्यासारखे वाटते आहे." ते ऐकून सुदीपला जोरात ठसका लागला. वीर हिरमुसला. पण बोलला काहीच नाही. सुदीपच्या हसण्याने त्याने धरून ठेवलेली शिडी हलली आणि त्यावर ठेवलेली पाण्याची बादली सुदीपच्या अंगावर पडली. हे बघून आता वीर आणि आजोबा जोरात हसायला लागले.
"काम सोडून काय दात काढताय?" स्वयंपाकघर स्वच्छ करत असलेली समीरा ओरडत बाहेर आली आणि सुदीपला भिजलेले बघून हसायला लागली.

" ही अशी करतात का कामे? नाहीतरी आता ओला झालाच आहेस तर पटापट भिंती पुसून घे. आत्ताशी हॉल चालू केला आहे अजून दोन बेडरूम बाकी आहेत. याच स्पीडने गेलात ना तर दिवाळी संपली तरी तुमची साफसफाई होणार नाही." दम देऊन समीरा आत गेली तशी वीर आणि सुदीपने पटापट कामे करायला सुरुवात केली. आजोबा मध्येमध्ये लुडबुड चालूच होती. पण समीराने दिलेल्या धमकीमुळे हॉल पटापट स्वच्छ झाला. नंतर मोर्चा वळला बेडरूममध्ये. तिथे शिरताच मगाशी आजोबांनी काढलेला पसारा दिसला.

" आजोबा, फोटो?"

" हो रे.. मगाशी कपाट आवरायला काढले तर कपाटात हे फोटो दिसले. तो घोडा ऐकून बाहेर आलो ते तिथेच रमलो. हे आवरायचेच राहिले."

" आजोबा, मी बघू फोटो." वीरने विचारले.

" त्यात काय विचारतोस?" वीर अल्बम काढून फोटो बघत बसला.

" आजोबा, हा कोणाचा फोटो आहे?"

" हा? हा तुझा बाबा.." हळूहळू आजोबांच्या लग्नापासून, सुदीपच्या बारशापर्यंत सगळेच फोटो निघाले. तिघेही ते फोटो बघण्यात, त्याच्या आठवणीत दंगले होते.

" झाले का आवरून?" कमरेवर हात ठेवून समीरा रागाने बघत होती..

"तरी म्हटले, कोणाचा आवाज कसा नाही.. मी तिथे मरमर करते आणि तुम्ही इथे अल्बम बघत बसा. कोणाचीही काडीचीही मदत नाही." समीराचे चिडण्याचे हळूहळू रडण्यात रूपांतर होत होते.

" ए आई, नको ना रडूस.. तू रडलेली मला अजिबात आवडत नाही. माहित आहे ना तुला?" वीर समीराचे डोळे पुसत म्हणाला.

" हो.. ना.. समीरा पुस ते डोळे. आणि राहिले घर अस्वच्छ तर काय फरक पडतो?" आजोबा तिची समजूत काढत म्हणाले. सुदीपने पण डोळ्यांनीच तिची माफी मागितली. तशी ती डोळे पुसत उठली.

" रडू नको तर काय करू? तुमची एक खोली आवरून होईना.. अजून मला फराळाचे सगळे करायचे आहे. कधी होणार हे सगळे? मला खूप टेन्शन आले आहे. मुलगी असती तर दोघींनी मिळून केले तरी असते."

" आई, मुलामुलींमध्ये भेद करणे मला पटत नाही. आजच्या आज हे घर स्वच्छ करून उद्यापासून फराळाला तुला मदत करेन.. ये मेरा वचन है, मेरा वचन ही है मेरा शासन.." वीर फुशारकीने बोलला.


वीरला जमेल का फराळ करायला? बघू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all