Login

अलगद स्पर्श मनाचा मलमली

आपल्याला असलेल्या एका भयंकर रोगाचे निदान होणे अशक्य आहे हे जाणून नायिकेचे न खचता एक सत्कर्म केले

"आई गं खुप त्रास होत आहे.पोटात फारच दुखत आहे आई.काही तरी कर न.आई गं आई..."
तीन महीन्याची बाळंतीण नेहा.आधी दोन मिसकेरेज झाले होते.त्यानंतर तिसऱ्या वेळेस डॉ.नी आता तिला बेडरेस्ट सांगितली होती.
तिच्या आई वडिलांनी तिला माहेरीच नेले.अगदी मोरपीस कसे अलगद ठेवले जाते तसेच तिला आई बाबांनी जपले होते.
आता तिचे नऊ महिने पुर्ण झाले. त्या दिवशी सकाळी तिला अचानक पोटात दुखायला लागले.लगेच तिला दवाखान्यात नेले.आई बाबा देवाजवळ प्रार्थना करु लागले." देवा काहीही होऊ दे.मुलगा किंवा मुलगी .पण बाळ बाळंतीण सुखरूप असु दे."
तोच डॉ.बाहेर आले.आणि म्हणाले " पेशंटचे बी पी वाढले आहे.आणि नाॅर्मल होण्याची शक्यता कमीच आहे.सिझेरियन करावे लागेल."
आई बाबांनी फॉर्म वर सही केली.आणि दोघे बाहेर देवासमोर हात जोडून उभारले.तोच बाहेर नर्स आली आणि म्हणाली " अभिनंदन तुम्ही एका गोड मुलीचे आजी आजोबा झालात.
हे ऐकून आई बाबांचा आनंद गगनात मावेनासा झाला.लगेच त्यांनी आपल्या जावई आणि त्यांच्या आई वडिलांना सांगितले.सगळेजण खुप खुश झाले.
एक आनंदोत्सव साजरा केला.बाळ बाळंतीण सुखरूप घरी आणले.बाळाचे बारसे अगदी थाटात केले.
बाळ जरा तीन महीन्याचे होऊ दे मग घेऊन जा असे आईने जावयांना सांगितले.
बाळ दोन महीन्याचे झाले तोच नेहाच्या पोटात अचानक दुखायला लागले.शेजारची आजी म्हणाली " अगं काही नाही .आता जरा तुप, डिंक लाडू खाणे जास्त होते न मग पोट साफ होत नाही . म्हणून पोट दुखत असेल.जरा ओवा जास्त खा.कमी येईल"
काही केल्या नेहाची पोट दुखी कमीच होईना.शेवटी डॉ.कडे नेले.त्यांनी तीन दिवसांचे औषध दिले.होईल कमी काही काळजी करू नका.म्हटले.
औषध घेतले पण तरीही पोट दुखणे कमी झाले नाही.आता तर आई अधिकच काळजी करू लागली.
पुन्हा तिला डॉ.कडे नेले.त्यानी सोनोग्राफी करून घेण्याचा सल्ला दिला.नेहाच्या बाबांनी नेहाच्या नवऱ्याला बोलावून घेतले.
आता सोनोग्राफी मध्ये काय रिपोर्ट येईल याची चिंता लागून राहिली.

आणि सोनोग्राफीचा रिपोर्ट आला. डॉ.नी नेहाच्या नवऱ्याला बोलावून घेतले. \" नेहाला आतडीचा कॅन्सर झाला आहे.आणि तो खुपचं बळावला आहे.आता तिचे वाचण्याचे चान्स खुपचं कमी आहेत.होऊ शकेल ती काही महिने किंवा काही दिवसांतच ....
....आणि हे देखील होऊ शकते कि वर्ष....कारण जर तिचे शरीर औषधाला चांगला रिस्पॉन्स देत राहील तर आणि ती स्वतः स्वतःला हिम्मतीने सामोरी जावे.....\"
‌ डॉ.बोलत होते आणि नेहाच्या नवऱ्याला एकदम चक्कर आली आणि तो धाडकन जमिनीवर कोसळला.
जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो \" नेहा.... नेहा...
ने...हा... \" इतकेच म्हणू लागला.
*****************
नेहा आता खुपचं कमजोर झाली होती.तिला चालण्यासाठी पण ताकद कमी पडत होती.औषधे आणि फळांचा रस इतकेच काही तिचे दिवसभरात पोटात जायचे.तिला आपल्या आजाराची कल्पना नव्हती.ती वारंवार विचारत होती कि मला काय झाले आहे???
तिला काही नाही गं . तुझ्या बाळंतपणात रक्तस्राव जास्त झाला त्यामुळे विकनेस आला आहे.आणि तू खात ही नाहीस.मग ताकद कशी येणार.असे सांगितले जायचे.
एके दिवशी नेहा काही तरी कारणास्तव आपल्या आईचे कपाट उघडले आणि एकदम तिच्या पायावर एक फाईल पडली.तिने ती फाईल उचलली आणि त्यावर तिचेच नाव होते." अरे ही तर माझ्या रिपोर्ट ची फाईल आहे.बघू तरी काय आहे\" म्हणत तिने फाईल उघडली आणि आपले रिपोर्ट्स बघू लागली आणि ते वाचता वाचता तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि ती तिथेच खाली पडली.
******************
" आई, मला माहीत आहे मी आता माझे आयुष्य खूप कमी वाचले आहे.पण मी मृत्यू इतका जवळ आहे म्हणून घाबरणार नाही.उलट मी हसत हसत मृत्यू समोर जाणार.पण त्या आधी मला काही कामे करायची आहेत.आणि त्यासाठी मला तुझी मदत लागेल आणि मला खात्री आहे तू करणार"
हे ऐकून आईने आपले डोळे पाणावलेले पुसले आणि नेहाच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली" बाळा कसले इतके कमी आयुष्य मागितले गं तू.अग तुझ्या ऐवजी मला का नाही नेत .माझे आयुष्य मी जगलेय गं. आता तर तुझे आयुष्य सुरु झाले आहे.या छकुली ने आता तर तुझ्या आयुष्यात रंग भरला आहे."
‌" आई...रडू नकोस.बघं मी माझ्या रुपात ही छकुली सोडून जात आहे तुझ्या जवळ.माझीच सावली बनून राहील तुझ्या जवळ."
नेहाने आपल्या बाळाला कुशीत घेऊन तिचे पापे घेऊन तिला आईकडे दिले आणि ती आपल्या नवऱ्याकडे गेली.आणि म्हणाली" मला सगळे कळले आहे.मी ....
मला काय झाले आहे आणि मी किती दिवस जगणार आहे."
हे ऐकून तो स्तब्ध होऊन बसला आणि एकदम त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.
" काय हे नेहा.आता तर आपला संसार खऱ्या अर्थाने सुरू झाला होता.तोच तू डाव अर्ध्यावर सोडून चाललीस.मी हे कसे सहन करावा तुझा विरह."
" हे बघा मी जाण्याआधी एक काम करणार आहे.त्यामध्ये तुमची साथ हवीय."
\" हो नक्कीच."
" मी ...म्हणजे माझी एक मैत्रीण आहे .जी मूल देऊ शकत नाही म्हणून तिला तिच्या सासरच्या लोकांनी घराबाहेर काढले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचा नवरा पण त्या लोकांना साथ देत होता.त्यानंतर ती माहेरी आली पण तिथेही तिचे दुर्दैव तिचे वडील या धक्क्यात गेले आई तर ती लहान असताना गेली होती.आता घरात होती ती तिची वहिनी.तिने तिचा छळ सुरू केला.तिला उठता बसता टोमणे देऊ लागली.घरचे सगळे काम तिच्या वर सोपवून आपण आरामात बसायची.इतकेच नव्हे तर जेवण पण बरोबर द्यायची नाही.
एकदा तर चोरीचा आळ घातला तिच्या वर आणि तिला घराबाहेर काढले.भाऊ तिचा तिला बाहेर काढू नये म्हणून सांगू लागला पण त्याचे काही ही नाही ऐकता तिला हाकलून दिले.आता ती जवळच्या मंदिरात जाऊन राहत आहे.तर मी म्हणजे माझे मत आहे कि तुम्ही तिच्या बरोबर लग्न करावे.तिला घर मिळेल आणि आपल्या छकूलीला आई.आणि तुमचे लग्न मी माझ्या डोळ्यासमोर बघावे ही माझी शेवटची ईच्छा आहे."
" अगं काय बोलते तू.वेड लागले का तुला.मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम केले आहे.आणि तूच माझ्या छकुलीची आई आहेस.तुझ्या जागी दुसरी कोणी याची कल्पना सहन होत नाही मला."
शेवटी नेहाच्या आई वडिलांनीं आणि तिच्या सासू सारऱ्यांनी समजावून सांगितले.आणि तो लग्न करण्यासाठी तयार झाला.
**************
नेहाला आता खूपच थकवा जाणवत होता.ती आपल्या पलंगावर पडून एकसारखे आपल्या छकूलीला पाहत होती.जी तिच्या मैत्रिणी च्या मांडीवर खेळत होती.आणि ती देखील तिला बघून हसत होती.हे दृश्य पाहून नेहाच्या डोळ्यात पाणी आले आणि ती एकसारखे तिलाच पहात राहीली.तोच नेहाची आई आली आणि म्हणाली" बाळा नेहा तुझ्या औषधांची वेळ झाली आहे चल उठ बाळा" आणि आईने नेहाच्या डोक्यावर हात ठेवून तिला उठवायचा प्रयत्न केला पण.......
.....पण तिने अलगद आपले प्राण सोडले होते जणू काही मोरपीस हातात घेऊन मलमली स्पर्श करावा आणि तो हवेच्या एका झुळुकाबरोबर हळूच उडून जातात तसे तिचे प्राण तिच्या आजारातून तिला मुक्त करून दिले होते....

©® परवीन कौसर.....