अलेक्सा

लघुकथा


"अवनी, ए अवनी," रेवाने आवाज देताच तिची लाडकी लेक अवनी तिच्या खोलीत आली.

आईच्या गळ्यात हात टाकून म्हणाली,"हे मॉम, कुठे गेली होतीस तू आता यावेळी? तुला माहिती आहे ना, मी संध्याकाळी घरी येते तेव्हा तुम मेरे नजरोके सामने चाहीये रे मुझे मेरी आईमोशाय."

"फिल्मीपणा बंद करा मॅडम. आणि आता का लहान राहिली आहेस का तू, आई आई करायला....बरं ऐक ना अवनी, महत्त्वाचं बोलायचं होतं गं..."

आईने आवंढा गिळला आणि हिम्मत करून बोलली,
"अवनी, मी आणि सुबोधकाकाने लग्न करायचं ठरवलंय "

"काय....?," अवनी जवळजवळ किंचाळलीच.

"कळतं का तुला काय बोलते आहेस ते? असा विचार तरी कसा केलास तू? या वयात हे काय खूळ आलंय तुझ्या डोक्यात?

नाही हं मम्मा, अजिबात असलं काही करायचं नाही आहेस तू. आजीचा आणि माझा काही विचार तर कर. आणि लोक काय म्हणतील? माझे फ्रेंड्स काय विचार करतील?

असलं काही केलंस ना तर मी अजिबात बोलणार नाही तुझ्याशी. रादर तुझा आणि माझा संबंध संपेल मम्मा," ताडताड बोलून अवनी रागाने तिथून निघून गेली.

आजीने हताश आईकडे आश्वासक बघितलं आणि काळजी करू नकोस असं खुणावलं.

अवनी, रेवाची एकुलती एक लेक. ती 1 वर्षांची असताना रेवाचा नवरा एका अपघातात गेला आणि तेव्हापासून रेवाने एकटीने साऱ्या घराची जबाबदारी आपल्या शिरावर तोलून धरलेली.

आता अवनी ग्रॅज्युएट होऊन नुकतीच नोकरीला लागली होती. तिचा शाळेपासूनचा मित्र अमोल आता लवकरच तिचा नवरा बनणार होता.

जबाबदारी थोडी कमी होत असताना सुबोध रेवाच्या आयुष्यात आला आणि त्यांनी नात्याला नाव देण्याचे ठरवले, पण अर्थातच अवनीची संमती असेल तरच.

पण अवनी.....

"घ्या मॅडम," आजीने कॉफीचा मग तिच्यासमोर ठेवला. दोघी बाल्कनीत उभ्या होत्या. मस्त चंद्राचं चांदणं आणि हवेतला गारवा मन प्रसन्न करत होतं.

"निसर्ग म्हणजे सुख, नाही का अवू? किती मस्त वाटतंय ना. वाटतंय रात्र संपूच नये. पण काय करणार सूर्यदेवाला पण आठवण येईल ना आपल्या सगळ्यांची. शेवटी काय तर निसर्गातील प्रत्येक घटक महत्वाचा आणि सगळे एकमेकांवर अवलंबून, नाही का?"

"आता हे असलं सगळं काय सांगतेय तू आजी, कळेल असे बोल," अजूनही अवनी रागात होती.

"अवू, मघा आईने तुला सांगितलं त्यात वाईट काय आहे बाळा. सुबोध अतिशय चांगला व्यक्ती आहे, आईला समजून घेतो आणि महत्त्वाचे म्हणजे आईला इतक्या वर्षांनंतर कुणातरीबद्दल असे वाटले आहे तर तिला तिचं हे सुख द्यायला नको का?

निसर्ग म्हण नाहीतर माणसं म्हण, सगळ्यांना एकमेकांची गरज भासतेच कधी न कधी, अवलंबून रहावे वाटते कधीतरी...."

"आजी, तू बोलते आहेस हे? विश्वासच बसत नाही आहे माझा. स्त्री ने कसं परावलंबी असू नये, स्वतंत्र असावं, स्वतःच्या पायावर उभं असावं, ब्ला ब्ला ब्ला...असं सगळं बोलणारी तू, आज काय बोलते आहेस? असे कसे विचार बदलले तुझे एकदम?"

"विचार बदलले नाहीत अवनी. अजूनही स्त्री ने परावलंबी नाही तर सगळ्याच बाबतीत स्वावलंबीच असावे यावर मी ठाम आहे. पण एक मुद्दा नेहमी विसरतो आपण सगळे, भावनिक परावलंबित्व. "

"आजी, तू उगाचच इमोशनल गोष्टींना हात घालून मला इमोशनल करू नकोस हं, मला नाही आवडणार मम्मीने लग्न केलेलं. मला नको समजावू प्लिज...." अवनी ऐकून घेण्याच्या मनःस्थितीतच नव्हती.

दोन तीन दिवस झाले...अवनी खूपच चिडचिड करायला लागली होती.

"अवनी, अगं काय झालंय नक्की? अमोल सोबत भांडण वगैरे झालं की काय?," आजीने काळजीने विचारले.

"बघ ना आजी, एकतर मम्मामुळे माझा मूड आधीच खराब होता आणि त्यात हा अमोल...इतका बिझी आहे म्हणे की त्याला माझ्याशी बोलायला पण वेळ नाही.

मला काही शेअर करायचं असेल त्याच्यासोबत याची पण त्याला पर्वा नाही. याआधी तो कधीच असं वागला नाही, कितीही बिझी असला तरी माझ्यासाठी वेळ काढायचा.

आज इतका छान नवीन ड्रेस घातला मी तर बघायला, कॉम्प्लीमेंट द्यायला पण तयार नाही तो शिष्ट...," अवनी आता रडवेली झाली होती आणि आजी अमोलने त्याला सांगितलेले काम बरोबर निभावले म्हणून मनातच खुश झाली होती.

"अग, जाऊ दे गं... तुला काय गरज आहे त्याच्या कॉम्प्लीमेंटची, तू त्याच्या स्तुतीवर ठरवणार आहेस का की तू आज छान दिसते आहेस की नाही ते? तू अमोलवर अवलंबून थोडी आहेस..."

आजी काय बोलते आहे ते अवनीच्या लक्षात येऊ लागले होते.
"अवू, अगं, दोन दिवस अमोलने तुला अटेन्शन नाही दिले तर किती बिथरलीस तू.

तुझी मम्मा तर कितीतरी वर्ष झाले एकटी राहते आहे. तिला नसेल का वाटत कुणी तिला अटेन्शन द्यावे, कॉम्प्लिमेंट द्यावी...

खरंतर अवनी, स्त्री आणि पुरुष दोघांनाही भावनिक आधाराची गरज असतेच, याबाबतीत दोघेही परावलंबीचं आहेत.

फक्त स्त्री थोडी हळवी असते, लवकर मॅच्युअर होते, म्हणून कदाचित तिचं हे भावनिक परावलंबित्व ठळकपणे अधोरेखित केल्या जाते.

तसेच तिचा इमोशनल डिपेंडन्स तिच्यातील वाढत्या वयानुसार होणाऱ्या हार्मोनल चेंजेस वर अवलंबून आहे आणि हार्मोन्सवर अफेक्ट करणारा पण आहे."

अवनी आता शांतपणे आजीचं म्हणणं समजून घेत होती.

"मानसिक स्वास्थ्य आणि पर्यायाने शारीरिक आरोग्य हे तिच्या सुदृढ भावविश्वावर अवलंबून आहे.

ती तुमची अलेक्सा नाही का, तिला सतत तुम्ही ऑर्डर सोडत असता...अलेक्सा, प्लिज स्विच ऑन द फॅन...अलेक्सा, टर्न ऑफ द लाईट....आणि ती निमूटपणे सगळं ऐकते ,

अगदी तसंच, समज एक हाडामासाची अॅलेक्सा प्रत्येकाला हवी असते, कधीतरी काहीही न बोलता आपलं म्हणणं फक्त ऐकून घेणारी, आपल्या कलाकलाने सगळी कामं करणारी, आपल्याला समजून घेणारी, आपल्या भावना जपणारी..."

"आजी, यु आर ग्रेट,"म्हणत अवनी आजीला बिलगली.

दुसऱ्या दिवशी सकाळी अवनी रेवाच्या गळ्यात हात टाकत म्हणाली,"मम्मा, तू ना, जाम बोर आहेस अगदी. आम्हाला सगळ्या बाबतीत तुझ्यावर अवलंबून राहायचा कंटाळा आला आहे आता आणि तू आमच्यावर अवलंबून राहायचे नाही.
तुझ्यासाठी एक अलेक्सा आणली आहे मी...ते बघ"

दाराकडे हात दाखवत अवनी म्हणाली.

"अॅलेक्सा???,"आईच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते, सुबोधकाका हसत घरात येत होता आणि अवनी आणि आजी आनंदाने एकमेकींना टाळी देत होत्या..!!


© डॉ समृद्धी अनंत रायबागकर, अमरावती

कथा: अलेक्सा
विषय: स्त्री आणि परावलंबित्व
कॅटेगरी: राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा
टीम: अमरावती