अल्बम.. भाग 06

Love story

ती दोघं जणं मॉलमध्ये आले. अनन्या पहिल्यांदाच मॉलमध्ये आली होती. ती सर्वत्र पाहत होती.. मानस पुढे पुढे चालला होता. अनन्या एका जागी थांबून त्या वेगळ्या विश्वाला पाहत उभी होती.. इथे सामान महाग असणार या भीतीने तिची नजर पर्सकडे गेली. त्यात फक्त 150 रूपये होते.. मानस ज्या दिशेने गेलाय त्या दिशेकडे तिची नजर गेली.. तिला मानस चालताना पाठमोरा दिसत होता. ती थोडी घाबरलेली होती..

    तो तिच्याजवळ आला . ती घाबरलेली आहे हे लक्षात आलं होतं. तरीही त्याने विचारलं..

मानस काय झालं गं ?

अनन्या .. आपण दुसरीकडे जाऊया ?

मानस का ? इथे का नको ?

अनन्या इथे महाग असेल सगळं आणि कपडे घ्यायला आत्ता नाहीत पैसे माझ्याकडे...

मानस मी तुला कधी म्हणालो की तू पैसे दे म्हणून ?

त्याने तर तिला खेचतच काही कपड्यांपाशी नेलं.. तो तिच्यासाठी कपडे शोधू लागला.. काही स्टायलिश कपडे त्याने निवडले .. तिला ट्राय करायला सांगितले.. तिला थोडी लाज वाटत होती पण कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी करतंय हे बघून तिने ते कपडे घालून बघितले. कधीच असे अपडे म्हणजे जिन्स वगैरे घातलं नसल्याने ती अवघडत होती. ती अवघडतच त्याच्यासमोर उभी होती. त्याने तिच्या संपूर्ण शरीराकडे बघितलं.. ती खाली मान घालून उभी होती. जिन्स गैरे घालूनही हवा तसा बदल दिसत नव्हता. काहीतरी राहील्यासारखं वाटत होतं. शेवटी त्याने तिला केस मोकळे सोडायला सांगितले . त्याच्यासाठी तिने केस मोकळे सोडले. ती खूप वेगळी , सुंदर दिसत होती. तिला या नव्या बदलाची मात्र लाज वाटत होती. त्याच्या पुढे मात्र ती शांतच उभी होती. माझ्यातल्या या बदलाला घरचे स्वीकारतील का ? हा तिला गहन प्रश्न पडला. त्याने कदाचित तिच्या मनातलं ओळखलं असावं. तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला आधार देत म्हणाला –

मानस घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत. कुणीही तुला काहीही बोलणार नाही.

त्याचं हे बोलणं तिला आधार देत होतं. त्याच्यावर तिचा विश्वास बसत चालला. तो काऊंटरवर गेला . बिल साधारण 5000 पर्यंत नक्कीच होतं. ती सुध्दा काऊंटर पाशी आली.

अनन्या किती झालंय बील ?

तिने हा प्रश्न विचारतानाच त्याने गुगल पे वरून बिल भरलं..

अनन्या बोल ना ..

मानस दिले मी..

अनन्या तू कशाला दिलेस ?

मानस कारण मी तुला इथे आणलं.. आणि तू जर मला याचे पैसे दिलेस तर मी अजिबात बोलणार नाही तुझ्याशी.

अनन्या स्मितहास्य करते.

मानस निघूया ?

अनन्या अरे पण हे जीन्स वगैरे घालून..

ती पुढे काही बोलणार तोच त्याने तिला अडवलं.

मानस मी पुन्हा तुला बोलतोय.. तुला कोणीच काहीही बोलणार नाही. अगं , कॉलेजमध्ये गेल्यावर मुलं अशी फिदा होतील तुझ्यावर..

तिचा तो हसरा चेहरा लगेच मावळला..

अनन्या हेच तर नकोय मला.. मला नाही आवडत कोणी माझ्याकडे असं बघितलेलं. मला त्या नजरांचा त्रास होतो.. हे सांगून नाही कळणार तुला ..

मानस हाच त्रास नष्ट करूया आज आपण.. आज तुझा वेष बदलला , लवकरच तुझा स्वभाव त्या भूमिकेला साजेसा करेन..

अनन्या वेष बदलता येणं सोप्पं आहे.. स्वभाव कधीच नाही बदलत कुणाचाच. मला हे चेंज करायचंय. मला माझं आधीचं आयुष्य खूप चांगलं वाटतं. नव्या जगात मला जगणं असह्य झालंय .

मानस किती दिवस भूतकाळात वावरणारेस ? भूतकाळ आपलं भविष्य नसतो , वर्तमानकाळ आपलं भविष्य ठरवतो..

अनन्या हे तुझे डायलॉग नाटकात चांगले वाटतात वास्तवात नाही..

मानस तू हा विचार का नाही करत की एकांकिकेतलं पात्रं मॉडर्न असून देखील मी तुला का निवडलं ? तुझ्यात मला असं काय दिसलं असावं ? ,या दोन प्रश्नांची उत्तरं शोध.. तुझे सगळे प्रोब्लेम चुटकीसरशी निघून जातील... हे बघ , हा तुझ्यातला बदल तुझ्या आयुष्यात खूप चांगला बदल घडवणारे.. जोवर मी आहे तोवर तुला या सगळ्यामुळे कसलाही प्रोब्लेम होणार नाही ... तू प्लीज या सगळ्यामुळे त्रास घेऊ नकोस , चिडू नकोस .

ती पुन्हा काही बोलणार तोच त्याने पुन्हा तिला थांबवलं.

मानस मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. तू आत्ता माझ्यासोबत येत्येस..

त्याने तिचा हात पकडला. तिचं पुढे काहीही न ऐकता तो तिला मॉलच्या बाहेर घेऊन आला. बाईकला किक मारली.. ती थोडी बिथरत होती पण तिच्याकडे आता पर्याय नव्हता. तिला त्याच्यासारखा एक चांगला मित्र या सगळ्यामुळे मिळाला होता. तिला हे सगळं हवं होतं पण हे अनुभवण्यापासून तिचा भूतकाळ तिला अडवत होता.. ती बिथरतच बाईकवर वन साईड बसली.. दोघे कॉलेजच्या दिशेने रवाना झाले.

क्रमशः

®© पूर्णानंद मेहेंदळे