अखेर कळी खुलली अंतिम भाग

Marathi Katha
कथेचे नाव- अखेर कळी खुलली अंतिम भाग.
राज्यस्तरीय कथामालिका लेखन स्पर्धा .
विषय- प्रेमकथा.

समोर बसलेल्या राघवचे बोलणे ऐकून सुरेशला एकाएकी आपण कोण्या एका मोठ्या माणसासमोर बसलो आहे असे जाणवले. त्याच्यापेक्षा समजूतदार आणि मोठ्या मनाचा कोणीही नाही असे त्याला वाटले. जेवणाचे बिल राघवने दिले. दोघे एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या घरी गेले. सुरेश घरी पोहोचला तोपर्यंत दुपार होऊन गेली होती. घरी आल्यानंतर त्याला आपली मुले दिसली नाहीत. "मुलं कुठे आहेत गं? कुठे दिसत नाहीत? बाहेर गेलेत का?" त्याने राखीला विचारले.

"मुले मित्राकडे बर्थडे पार्टीला गेली आहेत. यायला थोडा उशीर होईल." राखी म्हणाली.

"अरेच्चा! म्हणजे घरी आता आपण दोघेच आहोत." सुरेश म्हणाला.

"हा" राखी म्हणाली.

खरे तर हॉटेलमध्ये राघवचे बोलणे ऐकून त्याच्या मनात राखीबद्दल खूपच राग आला होता. पण तिला बघताच त्याचा राग पूर्णपणे नाहीसा झाला. त्याने राखीला एकदम उचलून घेतले. दोन मिनिटं राखीला काही समजले नाही. राखी आश्चर्यचकित झाली आणि मग तिने त्याच्या गळ्यात हात टाकला. हे सगळं आपण कसं काय करतोय? याचं सुरेशलाही आश्चर्य वाटत होतं. त्याने राखीवर प्रेमाचा पाऊस पाडला. चकित झालेली राखी तृप्त होत होती. त्या पावसात चिंब चिंब भिजत होती. सुरेशला स्वतःलाच जाणवलं की, राखीसोबत असा वेळ घालवून खूप वर्ष झाली होती. गेली कित्येक वर्ष तो सगळं आयुष्य एखाद्या मशिनरी सारखा घालवत होता. राखीचा चेहरा पाहून आणि तिचा आनंद पाहून तो पूर्णपणे समजून गेला होता . किती तृप्त आणि आनंदी झाली होती राखी.

कितीतरी वेळ सुरेशने राखीला आपल्या मिठीत घेतला होता. तो तिला सोडतच नव्हता. तेव्हा राखी हसून म्हणाली,

"अरे, आज काय झाले आहे तुला? आज खूप प्रेम करतोयस." राखी म्हणाली.

"का गं तुला आवडले नाही?" सुरेश म्हणाला.

"तसं नाही रे. मी तरी या क्षणाची खूप वाट पाहत होते. खरंतर असे क्षण मी नेहमी शोधत असायचे. मला का नाही आवडणार तुझे असे वागणे?" राखी म्हणाली.

सुरेशने पुन्हा राखीला मिठीत घेतले. दोघे किती तरी वेळा खूप काही बोलत होते. कितीतरी वर्षांनी दोघांना एकमेकांच्या सोबत वेळ घालवायचा होता. ती वेळ आता आली होती.

थोड्यावेळाने मुले घरी आली. मग दोघांनी काही वेळ मुलांबरोबर दंगामस्ती केली. त्यांना बर्थडे पार्टीची मजा विचारले आणि मुलांसोबत थोडा वेळ घालवला. मग पुढे दोन दिवस सुरेश खूप गडबडीत होता. तो सकाळी फिरायलाही गेला नाही. त्यामुळे त्याची राघव सोबत भेट झाली नाही. तिसऱ्या दिवशी मात्र त्याची राघव बरोबर भेट झाली. तेव्हा राघव म्हणाला,

"अरे सुरेश, माझी बदली झाली आहे. मी आता पुढच्याच आठवड्यात इथून जाणार आहे. तोही कायमचा. मग आपली भेट होणार नाही." राघव म्हणाला.

सुरेश एकदम दचकला आणि म्हणाला "अरे, असे अचानक कसे? आणि तुझी ती मैत्रीण तिला माहित आहे का? की, तू चालला आहेस ते."

"अरे, मी तिला अजून काही कल्पना दिली नाही. आता थोड्याच वेळात फोन करून सांगेन.." राघव म्हणाला.

"का तुमची भेट झाली नाही का? मग भेटणार असाल की तुम्ही." सुरेश म्हणाला.

"नाही रे. तिच्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. ती कुणालाही हा महत्त्वाचा वेळ देऊ शकत नाही." राघव म्हणाला.

"याचा अर्थ तू जाण्यापूर्वी तिला एकदा भेटणार सुद्धा नाहीस?" सुरेश म्हणाला.

"बहुतेक नाही असेच वाटत आहे मला." राघव म्हणाला.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून आल्यानंतर सुरेशने आपली पत्नी राखीकडे पाहिले आणि तिला बहुतेक राघव जाणार आहे याची बातमी कळली आहे असे त्याला वाटले. राघवच्या जाण्याने राखी दुःखी उदास खिन्न झाली आहे का? असे त्याला वाटले .पण राखीकडे बघून त्याला थोडा देखील अंदाज बांधता आला नाही. कारण राखी मुलांचा अभ्यास घेत होती . मग सुरेश फ्रेश होऊन आला. तेव्हा तिने मुलांना म्हटले, "मी बाबांना चहा बनवून देते तुम्ही अभ्यास करा."

राखी स्वयंपाक घरात चहा करण्यासाठी गेली. तिने चहा बनवला आणि डायनिंग टेबलवर सुरेशला चहा ठेवला. चहा घेत घेत सुरेशने राखीला ऑफिसमधल्या काही गोष्टी सांगितल्या. नंतर मुलांच्या अभ्यासाची थोडीफार चौकशी केली .मग सहजच त्याने राखीला विचारले , "तुमचा तो व्हाट्सअप ग्रुपमधला फ्रेंड काय झालं त्याचं ? काय नाव आहे त्याचं ? तू सांगितलं होतंस पण आता माझ्या लक्षात नाही." सुरेश म्हणाला.

"हा हा तो होय राघव. परत जातो म्हणायला लागलाय बायकोकडे आणि त्याची ट्रान्सफर झाली आहे ना." राखी म्हणाली.

"अरेच्चा! ट्रान्सफर झाली आहे ." स्वतःला काही माहित नाही असे सुरेशने दाखवून दिले ..

"अरे चांगलं झालं ना. त्याचं घर आहे. तिथे , बायको ,मुलं संसार आहे त्याचा .बिचारा एकटाच होता इथे .बरं आता तुम्ही टीव्ही बघत बसा आराम करा मी स्वयंपाक बघते." असे म्हणून राखी स्वयंपाक घरात निघून गेली.

इकडे राघव जातोय म्हणून सुरेशने दीर्घ श्वास सोडला आणि एकदम मोकळा श्वास घ्यावा की आपली बायको राखीला मिठीत घ्यावं. या विचारात असताना त्यानं हळूच आपल्या बायकोला मिठीत ओढून घेतलं. आणि अखेर राखीची आणि सुरेशची कळी खुलली आणि त्या कळीचे अगदी डौलदार सुगंधित संसाररूपी फुलांमध्ये रुपांतर झाले...


धन्यवाद

©पूजा अक्षय चौगुले .
जिल्हा- कोल्हापूर