अखेर कळी खुलली भाग -४

Marathi Katha
कथेचे नाव- अखेर कळी खुलली भाग -४
राज्यस्तरीय कथामालिका लेखन स्पर्धा
विषय- प्रेमकथा

सुरेशची आणि राघवची जवळीक खूपच वाढत चालली होती आणि ज्याच्यासाठी त्यांनी जवळीकता वाढवली होती त्या प्रयत्नांना एक दिवस यश आले होतेे. राघवने एकेदिवशी बोलता बोलता सुरेशला सांगितलं की ,माझी एक मैत्रीण आहे ती सुद्धा मुंबईत राहते आणि तिचे नाव "राखी "आहे.

हे ऐकताच सुरेशच्या छातीत धडधड एकदम वाढली. हाताची तळवे घामाळले होते. कोणा एका दुसऱ्या पुरुषाकडून आपल्या बायकोचे नाव ऐकून घेणे एवढं सोपं नव्हतं..
बोलता बोलता राघव राखीचे पूर्ण वर्णन करू लागला.

"अरे, राखी खूप चांगली आहे रे. आम्ही एकत्र शिकत होतो. आणि आता सध्या अचानकच आमच्या शाळेचा व्हाट्सअप ग्रुप झाला आहे. त्याच्यामध्ये ती मला भेटली आहे." असे राघव सांगत होता.

"हा तिचे लग्न झाला आहे का ?" सुरेश म्हणाला.

"हो तिचं लग्न झाले आहे. नवरा आहे आणि तिला दोन मुले आहेत. तिला तिचा नवरा आणि मुले अगदी जीव की प्राण आहेत. ती कुठेही असली तर तिचा जीव नवरा आणि मुलांमध्ये गुंतलेला असतो." राघव म्हणाला

"अरे मग ती तुमच्या बरोबर कसं काय?" सुरेश म्हणाला.

"चांगली मैत्री आहे. आमच्यामध्ये असे काही नाही." म्हणून राघवने विषय टाळण्याचा प्रयत्न केला.

नंतर मग सुरेशने त्याला काही जास्त विचारले नाही. पण अधून मधून राघव मात्र नेहमी राखीचा विषय काढत असायचा. तो बोलत बोलत असेही म्हणाला होता की, आमच्या दोघांमध्ये एक मैत्रीच आहे. चांगले मित्र आहोत आम्ही. ते मैत्रीचे नाते कधी प्रियकर प्रियसी असे बनलेच नाही. आणि आजही तसे काही सुद्धा नाही.

राघव तिथून निघून गेला. तरी बराच वेळ सुरेश तिथेच बसून राहिला. तो फक्त विचारच करत होता. मग बराच वेळ झाल्यावर तो उठून नाराज होऊन घरी परत निघाला.
रविवार होता आणि सुट्टी देखील होती. घरी पोहोचल्या पोहोचल्या राखीने सुरेशला येऊन पाठीमागून मिठी मारली आणि विचारले.

"अरे तू इतका का नाराज आहेस ?तू काही विचार करत आहेस का? तुझं चेहरा खूपच उदास दिसत आहे." राखी म्हणाली

सुरेशला मात्र तिची मिठी एखाद्या काट्यासारखी वाटली तिला दूर केला आणि तो म्हणाला

"काही नाही ग कामाचे थोडे टेन्शन आहे." सुरेश म्हणाला

"बरं मग थंडगार सरबत देऊ की ,गरम गरम कॉफी देऊ." राखीने विचारलं.

सुरेश एकही शब्द न बोलता नको असे सांगितले आणि तो आपल्या खोलीमध्ये निघून गेला. राखी देखील स्वयंपाकाच्या तयारीला लागली होती .स्वयंपाक करता करता ती विचार करत होती .अलीकडे सुरेश आपल्या सोबत नीट वागत नाही. आपल्याला वेळ देत नाही .काय झाले असावे?

अलीकडे मात्र राखी समोर तो काही बोलू शकत नव्हता. पण तिच्यापासून दूर असताना त्याला तिचा खूप राग यायचा. तिला चांगली बदडून काढावी आणि तिला जाऊन जाब विचारावे असे त्याला वाटायचे .पण इतके वर्ष आपण आनंद सुखाने संसार केलेले आठवायचे. आणि ते राखीचे निर्मळ मन कोणत्याही अपेक्षेने आठवूण विचार करत असताना आज राघव कडून सर्व काही आपण काढून घ्यायचे म्हणून सुरेशने राघवला भेटायचे ठरवतो..

"अरे राघव काय करत आहेस? आज आपण लंच एकत्र घेऊया." सुरेश म्हणाला.

"अरे आज माझे फॅमिली मेंबर एके ठिकाणी आमंत्रण आहे. तेथे जेवायला जाणार आहेत .पण त्या कार्यक्रमांमध्ये मी बोर होईन म्हणून मी त्यांना आपला कार्यक्रम ठरलाय असे सांगितले आहे." असे सुरेश म्हणाला.

"बरं ठीक आहे येतो मी." राघव म्हणाला.

सुरेशने सांगितलेल्या ठिकाणी राघव आला आणि दोघे भेटले. जेवणाची ऑर्डर दिली. दोघांच्यामध्ये गप्पा सुरू झाल्या .गप्पा मारता मारता सुरेशने विचारलं .

"अरे तुझी ती मैत्रीण राखी तिचं कसं चाललंय.. कुठवर आलं प्रकरण तुमच्यात फक्त मैत्रीचा आहे .की अजून काहीतरी" सुरेश विचारला.

"अरे मित्रा, हे सर्व काही असे सांगायचे नसते." राघव म्हणाला.

"तुमच्या मैत्रीत फक्त मैत्री की आणखीन काही लैंगिक संबंध वगैरे" सुरेश म्हणाला.

सुरेशचे बोलणे अर्धवट तोडत राघव म्हणाला ,"चल तुला तर मी आज सगळे सांगूनच टाकतो. "

राखी तशी खूपच चांगली मुलगी आहे. मर्यादांची शीलवान अशी होती आणि आजही ती तशीच आहे. जशी आधी होती कोणतीही मर्यादा तिने कधीही ओलांडली नाही. एक आदर्श पत्नी ,एक आदर्श गृहिणी, आणि एक आदर्श आई आहे .आमच्यात पूर्वी होती तशी निखळ मैत्री ,आणि अजून देखील मैत्रीच आहे .पूर्वी आम्ही दोघेजण भेटत होतो .जुन्या आठवणी काढून गप्पा मारायचो .मग एकमेकांच्या कुटुंबाबद्दल बोलायचो आणि निसंकोचपणे मला भेटायला यायची राखी. एकदा मात्र ती माझ्याकडे आली होती. मी प्रथमच तिचा हात हातात घेतला .आणि मला वाटलं खरंच किती मऊ उबदार आहे, हा स्पर्श ..सगळं जगच असं असतं तर ? असा मी विचार करत होतो. मी आवेगातच तिला मिठीत घेतलं. खरं तर माझं मन बेभान झालं होतं .तिने प्रथम विरोध केला .पण नंतरचे घडायला नको होते ते घडले. घडून गेले खरे सांगतो, त्या प्रेमात ज्याला आपण वासना म्हणतो, ती नव्हती फक्त आपलेपणाची ऊब आणि आपलेपणाची जाणीव होती .

मला स्वतःलाही वाटलं की , आता कळी उमलून आली आहे तसं पत्नी बरोबर प्रणय करताना कळी उमलून येत नव्हती माझी आणि राखीने ही ते मान्य केलं .जे घडलं त्या क्षणांची त्या तृप्तीची तिला कधीपासून ओढ होती. तिच्या पती बरोबरच्या प्रणयात तिची कळी कधी खुललीच नाही. अगदी अशी ती असोशी उब तो आपलेपणा आणि समर्पण पती बरोबरच्या सहवासात तिला मिळत नव्हता .तिचा नवरा खूप चांगला होता. पण तो वेगळ्याच जगात असयचा. एखाद्या मशीन सारखा वागतो, तसेच स्पर्शातली जादू जणू काही नाहीशी झाली आहे. असे वाटत होते

आमच्यामध्ये घडलेल्या.... अगदी सहजच घडून गेलेल्या प्रसंगातल्या त्या क्षणांना आम्हा दोघांना भरभरून सुख मिळालं. नुसतच सुख नाही पण समाधानाने ऊर्जाही मिळाली. राखीला प्रत्येक गोष्टीची हौस आणि आवड होती. प्रत्येक क्षण उत्सवासारखा जगायला तिला आवडत होता. नवऱ्याबरोबर प्रणय करताना तिला प्रत्येक क्षण उत्सव जाणून जगायचे होते .सर्वांगानं उमलून येऊन मनाच्या गाभाऱ्यात ही प्रणयाचा सुवास भरून अत्यंत रोमँटिक समर्पण करायचं होत. तिचं तिच्या नवऱ्यावर अतिशय प्रेम होत. ती त्याचा विश्वासघात करणार नव्हती. पण तिच्या हृदयातल्या एका कोपऱ्यात एका अपूर्ण इच्छा माझ्या सहवासात पूर्ण झाली होती. कधी कधी काही क्षणात माणूस सगळं आयुष्य जगून घेतो. त्या क्षणी राखीला असंच वाटलं होतं. राघव बोलत होता जेवण मांडून वेटर कधीच निघून गेला होता.

सुरेशने श्वास रोखून धरला होता. राघवचे बोलणे तो नुसता ऐकत होता .आणि राघव अजूनही बोलतच होता. राखी म्हणजे प्रेमासाठी असूसलेले एक वाळवंट होती. आणि मला वाटतं तिच्या नवऱ्याला ओथंबून असलेल्या ढगाप्रमाणे धो धो बरसता येत नाही. तिच्या आयुष्यात एकत्र राहणं ,झोपणं ,जेवण कार्यक्रमाला जाणं, नातेवाईकांच्याकडे जाणं ,त्यांना घरी बोलावणं ,वगैरे वगैरे सगळं होतं. पण प्रणयातली उष्मा नाहीशी झाली होती. तिचा नवरा प्रेमळ होता. त्याला तिचा अभिमान होता. तिलाही त्याच्याशिवाय दुसरं जग नको होते. विसाव्याचे एकमेव स्थान म्हणजे तिचा नवरा होता. पण हा ..पणच एक मधे येत होता. तिच्या प्राणांहून प्रिय असलेल्या त्याला राखीला प्रेम हवंय हे कळत नाही...

सुरेश आतापर्यंत स्वतःला जगण्याची कला आत्मसात केलेला पुरुष मानत होता. याक्षणी मात्र स्वतः विषय पूर्णपणे भ्रमनिरास झाला होता .

"अरे मित्रा ,आज मी माझं मन तुझ्या जवळ मोकळं केले. पण माझ्या मनावर एक मात्र ओझं ,एक दडपण आहे की मी माझ्या बायकोचा कधीच विश्वासघात केला आहे का? पण काय करू? ती तिच्या कामात मग्न होती. इतक्या लांब आहोत आम्ही एकमेकांपासून पण तिला माझे नसणं जाणवत नाही. आणि इथं राखी मात्र आपल्या नवऱ्याबरोबर राहूनही प्रेमाचा उत्कृष्ट क्षण शोधते आहे.. शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही उणीव असतेच ना...

"अरे सुरेश माझे ट्रान्सफर साठी प्रयत्न सुरू आहेत" राघव म्हणाला

"अरे काय सांगतोस काय?" सुरेशने दचकूनच विचारलं ट्रान्सफर म्हणजे ..तुझी ट्रान्सफर...

"अरे हो मित्रा माझी माझी बायको इथे यायला नाही म्हणते आणि मुलांना बाबा त्यांच्याजवळ हवे आहेत.. आणि घर सांभाळणे ही एकट्या बायकोची जबाबदारी नाहीये ना? संसार दोघांचा असतो....


क्रमशः
©®पूजा अक्षय चौगुले .
जिल्हा- कोल्हापूर