अखेर कळी खुलली भाग -२

Marathi Katha


कथेचे नाव- अखेर कळी खुलली भाग -२
राज्यस्तरीय कथामालिका लेखन स्पर्धा
विषय- प्रेमकथा

एके दिवशी राखीच बोलता बोलता सुरेशला म्हणाली होती की," खूप वर्षानंतर आमच्या शाळेतील एक मित्र -मैत्रिणींचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला होता आणि मला त्यात माझा एक जुना मित्र भेटला .तो मला मेसेज केल्यानंतर मी एकदम आश्चर्यचकित झाले आणि तो म्हणे आता मुंबईतच राहतो."

"तो खूप चांगला आहे .एके दिवशी मी त्याला तुझी ओळख करून देते आणि आपण कधीतरी त्याला घरी बोलवूया जेवायला." राखी म्हणाली.

"हमममम "म्हणून बराच वेळ सुरेश गप्पच राहिला.

राखी आपली एकटीच बडबड करत होती.

मग नंतर सुरेशने हळू आवाजातच राघवच्या फॅमिलीबद्दल विचारले.

मग राखी म्हणाली," अरे राघवची फॅमिली ते तर पुण्याला राहतात सगळे त्याची बायको नोकरी करते आणि मुले शाळा शिकतात. सध्या राघवची बदली झाल्यामुळे तो इथेच राहतो एकटाच. अधूनमधून सुट्टीच्या दिवशी जातो भेटायला पुण्याला".

"बरं बरं राहु दे" म्हणत सुरेशनी हा विषय टाळला..
गौरीच्या लक्षात आले होते की ,बहुतेक आपल्या नवऱ्याला राघव बद्दलचे बोलणे आवडले नाही .परत तिने राघवचा विषय कधी काढला नाही. तरीपण राखीमध्ये जे बदल होत होते ते सुरेशच्या मनाला काही पटत नव्हते. त्याला काहीतरी खटकत होते .राखी मात्र पूर्वीप्रमाणे मुलांसाठी आणि सुरेशसाठी वेळ देत होती .पण सुरेशला राखीमध्ये झालेल्या बदलामुळे तिच्याबद्दल थोडाफार संशय येत होता.

राखीचा फोन चेक केल्यानंतर सुरेशच्या मनात राखी बद्दल नको नको ते विचार येत होते. पण राखीला ओरडावे आणि तिला नको नको ते अपशब्द बोलून मारावे किंवा शिवीगाळ करावे असे काही त्याच्या मनात आले नाही .गौरीबद्दल वाईट मत इतर कोणाला सांगावे हे ही त्याच्या बुद्धीला पटत नव्हते. कारण ती त्याची चांगली पत्नी होती आणि दोघांमध्ये एकमेकांबद्दल खूप छान ऋणानुबंध होते.

राखीने एके दिवशी राघवला भेटायचे ठरवले होते आणि ती एक रविवार पाहून राघवला भेटायला जाणार होती. तिने सकाळी सुरेशला सांगितले होते. की, "आज दुपारी मी थोडा वेळ बाहेर जाणार आहे .जर तुझे काही काम असेल तर तू मला फोन कर".

सुरेश म्हणाला" माझे देखील आज ऑफिसमध्ये एक -दोन तास काहीतरी किरकोळ काम आहे त्यामुळे मी देखील ऑफिसच्या कामासाठी जाणार आहे .जर मी लवकर घरी आलो तर तुला नक्की कॉल करेन. "

राखी बाहेर जाणार आहे हे जेव्हा सुरेशला कळाले तेव्हा तो एकदम सावध झाला होता. कारण त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. मग त्याने लगेच राखीला विचारले,

"अगं राखी तुला कुठे जायचं आहे ?"सुरेश म्हणाला.

"अरे मला एका माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचे आहे." राखी म्हणाली

"कोण मैत्रीण? आणि ती कुठे राहते ?"सुरेश म्हणाला.

"अरे माझी मैत्रीण" योगिता" मी परवा म्हणाले होते नाही का ? शाळेतला नवीन गृप झाला आहे. त्यातली ही एक मैत्रीण आहे. "

"या आधी कधी हे नाव ऐकलं नव्हते?"असे सुरेश मनातल्या मनात म्हणत राहिला पण सुरेशने राखीला परत काही न विचारता गप्पच राहिला.

दुपारच्या वेळी सुरेश ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर निघाला. पण तो ऑफिसला न जाता एका भिंतीच्या आड राहून घराकडेच पाहत होता. तोपर्यंत एक दहा पंधरा मिनिटांनंतर राखी मस्तपैकी साडी नेसून केस मोकळे सोडून अगदी नटून थटून हिरोइन सारखी जाताना सुरेशला दिसली आणि रविवार असल्यामुळे मुले घरीच दार बंद करून बसली होती. आपल्या बायकोला बघून सुरेशला थोड्या वेळ अभिमान वाटला. आपली बायको किती सुंदर आहे त्याचा त्याला अभिमान वाटला. पण त्याच क्षणी झटकन तिने सांगितलेला मित्र राघवचे वर्णन आठवून आणि मनामध्ये खूप राग आला होता.

सुरेशने आपली बायको राखी नेमके कुठे जात आहे हे पाहण्यासाठी तो राखीचा पाठलाग करत होता. राखी मात्र अगदी जवळच्या कॉलनीमध्ये जाणार होती त्यामुळे ती चालतच निघाली. दोन तीन गल्ली सोडल्यानंतर ती एका बिल्डिंगच्या जवळ पोहोचली. तिने बिल्डिंगकडे पाहिले आणि तर काय चक्क चक्क राघव खिडकीतच उभा होता. त्याने राखीकडे बघून हात हलवला.

तिकडे सुरेश पाठलाग करत करत राखीच्या पाठीमागे आला होता. त्यांने खिडकीतून हात केलेल्या राघवकडे पाहिले. आणि याला कुठेतरी आपण पाहिले आहे असे त्याला वाटले .तो दोन मिनिटे विचार करत राहिला. कुठे पाहिले असावे आपण याला? त्याच्या काही केल्या लक्षात येत नव्हते .थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले .हा तर राघव आहे आपण रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना हा आपल्याला भेटतो.

आपली बायको म्हणजेच राखी राघवला भेटायला आली आहे. हे पाहताच क्षणी सुरेशला खूप राग आला .त्याला आत्ता जाऊन आपल्या बायकोला हात धरून ओढून आणावे की काय? आणि चार थोबाडीत द्यावे आणि तिचे पितळ उघडे करावे असे तो विचार करत होता. तिने आपल्याला खोटे बोलून राघवला भेटायला आली आहे. आपण आपल्या बायकोला मारावे शिवीगाळ करावे की काय करावे ? हा तो मनात विचार करत होता पण त्याने तसे काहीच केले नाही. जरी काही क्षणापुरता त्याच्या मनात राखी विषयी जरी वाईट विचार आला होता .तरीपण तो एक ही शब्द न बोलता तसाच घरी निघून गेला.

राघवच्या मनात अनेक प्रश्नांनी थैमान घातले होते. त्या विचारातच तो घरी गेला.

क्रमशः

©पूजा अक्षय चौगुले .
जिल्हा- कोल्हापूर