Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अखेर कळी खुलली भाग -३

Read Later
अखेर कळी खुलली भाग -३
कथेचे नाव- अखेर कळी खुलली भाग -३
राज्यस्तरीय कथामालिका लेखन स्पर्धा
विषय- प्रेमकथा

घरी आल्यानंतर तो घटाघटा एक ग्लास पाणी प्यायला आणि सरळ आपल्या रूममध्ये जाऊन पडून राहिला. त्याच्या डोक्यामध्ये सतत राखीचा विचार येत होता. मनातल्या मनात तो राखीला शिव्या देत होता. किती निर्लज्ज नालायक बाई आहे? तीआपला विश्वासघात कसा काय करू शकते ही बाई ? असा मनातल्या मनात पुटपुटत राहिला. घरातील सर्व सामानाकडे बघत तो विचारात बोलत होता की, मी किती कष्टाने हे घर उभे केले आहे त्याचं राखीला काही देखील वाटत नाही आणि भविष्यात मोठे घर घेण्याचे स्वप्न होते दोघांचे. तरी देखील तिला काहीच वाटलं नाही. आज माझा संसार सगळा विस्कळीत झाला असं तो बोलत राहिला.

कारण सुरेश त्याच्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता आणि त्याचे आई वडील एका छोट्याशा गावामध्ये राहत होते. राखीचे वडील लहानपणीच वारले होते. राखी त्यांची देखील एकुलती एक मुलगी होती. सुरेशची मनःस्थिती खूपच खालावली होती. त्याच्या मनात नको नको ते विचार येत होते. कसली बायको ही आपली विश्वास घातकी. त्याला या बाईसोबत राहणं सुद्धा असह्य वाटू लागले होते.

थोड्या वेळाने मात्र काही वेगळेच घडले. त्यांचे संबंध आजही अतिशय उत्कृष्ट होते. कारण राखीने त्याच्या प्रेमात कोणतीही कमी भासू दिली नव्हती. ज्यामुळे ती दुसऱ्या पुरुषाकडे ओढली होती पण थोडा वेगळा विचार केला तर.. समजा सुरेशकडून असे घडले असते जर तो एका बाईच्या नादी लागला असता तर राखीने याची काय प्रतिक्रिया केली असती? तिने त्याला अगदी नीट समजून घेतले असते आणि स्वतः यातून कसे बाहेर पडायचे आणि तिने अगदी संयमाने परिस्थिती हाताळायचे ठरवले असते.

एवढा कष्टाने उभा केलेला संसार तिने क्षणात विस्कटून दिला नसता. तिने सुरेशला अगदी योग्य पद्धतीने समजावून घेतली असती आणि पुढच्या आयुष्याची वाटचाल अगदी विचारपूर्वक केली असती.

सुरेश घरी आला होता. अगदी थोड्याच वेळात राखी देखील घरी आली. मुलेही घरीच होती टीव्ही पाहत होती. राखी घरी आल्यानंतर सुरेशला पाहते तर तो रूममध्ये झोपला होता. ती एकदम आश्चर्यचकित झाली आणि तिने सुरेशला विचारले.

"अरे तुझी तब्येत तरी ठीक आहे ना? काय होत आहे?" अगदी मायेने डोक्यात हात फिरवीत राखी म्हणाली.

सुरेश एकही शब्द न बोलता गप्पच राहिला.

"अरे मला फोन करायचं होतास? फोन का केला नाहीस? मी आले असते ना लगेच. योगिताला सोडून. तुझ्यापेक्षा महत्त्वाचे माझ्या आयुष्यात कोणी सुद्धा नाहीये." अलगत राखीने सुरेशच्या गालावर ओठ टेकवत म्हणाली.

लगेचच सुरेशचा राग शांत झाला आणि म्हणाला "आज हीरोइन दिसत आहेस ".

"खरंच काय?" लाजून राखी म्हणाली.

"अगं तुझी ती मैत्रीण योगिता कशी आहे ?बरी आहे ना? काय म्हणत होती?" सुरेश म्हणाला.

"आहे बरी "..एवढेच मग बोलून राखी झटकन उठली आणि स्वयंपाकघरात जाऊन म्हणाली "मी तुझ्यासाठी कॉफी करू की काही खायला करू?"

"नको नको फक्त कॉफीच कर. खायला वगैरे काही नको." सुरेश म्हणाला.

राखी अगदी नेहमीसारखीच फ्रेश होती. अगदी हसऱ्या चेहऱ्याने कॉफी बनवायला गेली होती. इकडे सुरेश अगदी हडबडला राखी इतकी कशी काय फ्रेश? आणि एवढी आनंदी कशी काय आहे? काय घडलं असेल नेमके ?याची कल्पना सुरेशला करावीशी वाटली नाही .त्याच्या डोक्यामध्ये एक भन्नाट आयडिया आली होती.

सुरेश आता रोज नियमित न चुकता बागेत जॉगिंगला जाऊ लागला होता. सुरेशचा स्वभाव अगदी बोलका, मनमिळाऊ आणि अगदी हुशार असा होता. त्याने बघता बघता राघवशी मैत्री केली. आणि त्याने जाणूनभुजून राघवशी मैत्री वाढवली. पण मैत्रीमध्ये स्वतःचे नाव मात्र सुरेश न सांगता "शेखर" असे सांगितले.

सुरेशने आपले नाव खोटे सांगायचे ,कारण म्हणजे त्याला राघव आणि राखीच्या नात्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे होते म्हणून त्याने राघवला आपले नाव खोटे सांगितले आणि बोलत बोलत घरचा विषय निघायचा. पण सुरेशने आपल्या बायकोचे नाव राखी आहे. ते कधी सांगितलेच नाही. राखी हे नाव कधी घेतलेच नाही.

रोज भेटून दोघांच्या मैत्रीमध्ये हळूहळू वाढ होत होती. आणि सुरेश राघवला आपल्या ऑफिसबद्दल आणि घरगुती विषयांबद्दल संसाराबद्दलच्या गोष्टी बोलत बोलत सांगत होता .आणि एके दिवशी राघवने सांगायला सुरुवात केली.

राघव म्हणाला, "माझी बायको रिया पुण्यात चांगल्या पोस्टवर नोकरी करते आणि मला दोन मुले देखील आहेत. पुण्यात एका छान शाळेत जातात. तिथून मग माझी मुंबईला बदली झाली. रियाचीदेखील बदली होणार होती मुंबईला पण तिने ते मान्य केले नाही. कारण तिला पुण्यातच राहायचे होते. आणि आता थोड्याच दिवसात मीच पुण्याला परत जायचं ठरवलं आहे."

राघवचे हे बोलणे ऐकून सुरेश एकदम गप्प झाला आणि मनातल्या मनात म्हणू लागला. \"म्हणजे राघव कायमचा येथे आला नाही. त्याची नोकरी अस्थिरच आहे. तो आपल्या गावी परत निघून जाणार..\" बोलता बोलता राघव त्याच्या आणि राखीच्या संबंधाबद्दल अर्थात मैत्रीबद्दल केव्हातरी काहीतरी सांगेल, म्हणून सुरेश कधी कधी राघवला कॉफी प्यायला घेऊन जायचा, कधी कधी रविवारच्या दिवशी दोघेजण लंचला देखील जात होते. हळूहळू राघवची आणि सुरेशची चांगली घट्ट मैत्री बनली...

क्रमशः

©पूजा अक्षय चौगुले .
जिल्हा- कोल्हापूर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pooja

//