अकल्पित (भाग ५ अंतिम)

लेकीमुळेच खऱ्या अर्थाने घराचे गोकुळ बनते.


(मागील भागात आपण पाहिले, अवनीच्या निधनानंतर घर पूर्णतः तुटले होते. पण सुजाताने मोठ्या हिमतीने घराला सावरले. एके दिवशी ती अचानक दचकून जागी झाली. आता पाहुयात पुढे.)

"अगं सुजा घाबरु नकोस, काय झालं? हे घे पाणी पी आधी?"

आनंदच्या हातातली पाण्याचा ग्लास घेत सुजाताने गटागट पाणी प्यायले.

"आता बरं वाटतंय का? रिलॅक्स हो थोडी. काय ग, वाईट स्वप्न पाहिलं का एखादं?"

"अवनी ताई..."

"सुजा....अवनी आली होती स्वप्नात?"

"हो. राहून राहून असं वाटतंय की रात्रभर अनु ताई माझ्या सोबतच होत्या. खूप गप्पा मारल्या आम्ही. अजूनही विश्वास बसत नाहीये की हे सारं स्वप्न होतं." बोलता बोलता अवनीच्या आठवणीत सुजाता रडवेली झाली.

"काय म्हणाली मग ती? स्वप्नातही छळतच असेल ना?"

"नाही ओ असं काही नाही. पण मला त्यांची एक गोष्ट नाही समजली. त्या म्हणाल्या की,\"सुजा वहिनी, मी कधीही तुम्हाला सोडून गेले नाही. कायम तुमच्या सोबतच होते आणि यापुढेही राहणार. माहिती आहे, तुम्ही नाही विसरले मला आणि मी बरी तुम्हाला अशी सहजासहजी विसरून देईल मला? आज तू आहे म्हणून मला घरातील कोणाचीच काळजी नाही बघ. पण भेटू आपण लवकरच."

"अवनीच्या बोलण्याचा काय अर्थ असेल ओ? लवकरच भेटू म्हणजे?"

"बरं आता नको जास्त टेन्शन घेऊस. आपण सारखा तिचाच विचार करत असतो ना, म्हणून आली असेल ती स्वप्नात."

"अहो पण पहाटे पडलेले स्वप्न खरे होते म्हणतात."

"सुजा, हे बघ माणसाच्या मेंदूवर जरी कोणाचे नियंत्रण नसले तरी त्याचे मन हे या सर्व गोष्टींचे खरे साक्षीदार असते. वारंवार आपण त्याच त्याच गोष्टींचा विचार करत राहिले तर आपल्या मनाचा ताबा हा मेंदू घेतो आणि मग गाढ झोपेतही मेंदू ॲक्टिव होतो. त्यामुळेच ही स्वप्न पडत असतात ग. याला दुसरे काही लॉजिक असेल असे मला तरी वाटत नाही."

"कदाचित असूही शकते." म्हणत मग सुजातानेदेखील आनंदच्या या गोष्टीवर तात्पुरता विश्वास ठेवला. पण तिचे मन मात्र अजूनही स्वप्नातील अवनीच्या त्या बोलण्याचाच विचार करत होते.

अवनी गेल्यावर मोठ्या मुश्किलीने घर सावरले होते. हे सर्व करत असताना सुजाताची मात्र कसोटी पणाला लागली होती. तिच्या समजूतदार स्वभावाचा पुन्हा एकदा विजय झाला होता. पण काहीही झाले तरी घरातील अवनीची कमी मात्र कोणीही भरुन काढू शकत नव्हते.

पुढे काही दिवसांतच सुजाताची आनंदाची बातमी आली. घरातील सर्वांनाच खूप आनंद झाला. कारण आता अवनीनंतर घरात येणारे हे पहिले बाळ असणार होते. पुन्हा एकदा लहान बाळाची नाजूक पावले दुडूदुडू धावणार होती घरात. बाळाच्या बोबड्या बोलांनी घराचे पुन्हा एकदा गोकुळ होणार होते.

खरंच, नुसत्या विचारानेच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले. आनंदला तर काय करू नि काय नको असेच झाले होते. बाप होण्याचा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.

घरात येणाऱ्या ह्या चौथ्या पिढीच्या स्वागतासाठी म्हातारी आजीदेखील पुन्हा एकदा तरुण झाली होती जणू. वरचेवर सुजाताला अत्यंत मोलाचे सल्ले आणि मार्गदर्शन आजीकडून मिळायचे.

येणाऱ्या बाळामुळे घरावरील दुःखाचे सावट आता बऱ्यापैकी कमी झाले होते. अवनीच्या माघारी सर्वचजण हसणे जणू विसरुनच गेले होते. पण आता पुन्हा एकदा घरात आनंदाचे वारे वाहू लागले.

बघता बघता सुजाताचे दिवस भरत आले. डिलिव्हरी अगदी तोंडावर येवून ठेपली.

"सर्व गोष्टी सुरळीत पार पडू दे;" म्हणत सुजाताच्या सासूबाई आणि आजे सासूबाई वरचेवर देवाकडे प्रार्थना करत होत्या. कारण आता कोणताही मोठा धक्का पचवण्याची त्यांच्यात अजिबात ताकद उरली नव्हती. निदान आता ह्या आनंदाला तरी कोणाची दृष्ट न लागो, एवढीच अपेक्षा होती सर्वांची. सारे काही सुरळीत पार पडेपर्यंत जीवात जीव नव्हता त्यांच्या.

सासरच्यांच्या या अशा प्रेमापोटी सुजाताने डिलिव्हरीसाठी माहेरी जाणेदेखील टाळले.

"आपण माहेरी गेलो तर, इकडे सर्वजण सारखी काळजी करत राहतील. त्यापेक्षा इथेच राहून त्यांच्या आनंदाचे खरे साक्षीदार बनूया. हवं तर नंतर जाता येईल माहेरी."

असा विचार करून सुजाताने सासरी जाणे सध्या तरी पोस्टपोन केले. साऱ्यांच्या प्रेमात ती अगदी न्हावून निघत होती. सासू सासऱ्यांकडून, नवऱ्याकडून आणि लाडक्या आजे सासूबाईंकडून ती मनसोक्त लाड पुरवून घेत होती.

"आज खरं माझी अनु पाहिजे होती. दादा वहिनीला बाळ होणार, या नुसत्या बातमीने उड्या मारत बसली असती." न राहवून आईला लेकीची आठवण आलीच.

"खरंच आज अनुताई असायला हव्या होत्या. कित्ती मज्जा आली असती." सुजाता देखील नणंदेच्या आठवणीने कासावीस झाली.

"मी आहे ग इथेच, डोन्ट वरी, तू फक्त काळजी घे तुझी."

जणू काही सुरु असलेली ही चर्चा अनु स्वतः ऐकत होती.

"अरे, अनुताई...अचानक अनुचा भास झाला सुजाताला. त्यामुळे क्षणभर ती गोंधळलीच.

"नेमकं काय सुरू आहे हे? कसला संकेत आहे हा? राहून राहून सारखं वाटतं अनुताई माझ्या अगदी जवळ आहेत. त्या दिवशी ते स्वप्न आणि आता हे.
पण ठीक आहे, असेल माझ्या मनाचा खेळ तरीही खूप छान वाटतंय. देवा तू सारं काही मला भरभरुन दिलंस. माझ्या अनु ताई जिथे कुठे असतील तिथे सुखात ठेव त्यांना."

दुसऱ्याच दिवशी सुजाताला दवाखान्यात ॲडमिट केले. बाळ खूपच हेल्दी असल्याने सुजाताला खूपच त्रास होत होता. त्यामुळे ऐनवेळी सिझेरीयन करण्याचा निर्णय घेतला डॉक्टरांनी.

पुढच्या एक दिड तासातच बाळाचे रडणे कानी पडले नि सर्वांचा जीव अगदी भांड्यात पडला. गोरीगोमटी आणि गुटगुटीत परी जन्माला आली.

बाळाला पाहताच क्षणी बाळाच्या आजी बाबांना तिच्यात अनुचा भास झाला. जणू काही अनुनेच नव्याने पुन्हा जन्म घेतला की काय?  असेच वाटत होते. बऱ्याच अंशी ती अनुचेच रूप घेवून जन्माला आली होती.

"कसा असतो बघा नियतीचा खेळ...
सुख दुःखाचा आपसूकच साधला जातो इथे मेळ..
सुखामागून दुःख नि दुःखामागून येतेच पुन्हा सुखाची वेळ..
जीवन म्हणजेच जणू सुख दुःखाची आंबड गोड भेळ.."

छोट्या परीमुळे पुन्हा एकदा घराचे गोकुळ होणार याची आता सर्वांनाच खात्री पटली होती.

पुढे काही दिवस सुजाता माहेरी गेली आरामासाठी. अडीच महिने माहेरी राहून ती पुन्हा सासरी परतली.

घरातील सारे जण आता बाळाच्या बाळलीलांत हरवून जात.

"आता इथे अवनी असती तर ती अशी बोलली असती नि तशी बोलली असती, लहानपणी अनु सेम अशीच दिसायची, डिक्टो अनुचीच झेरॉक्स कॉपी आहे ही ठमाबाई."

सर्वांच्याच तोंडी आता सारखे अनुचेच नाव असायचे.

सुजाताला मात्र खात्री पटली होती, "ते स्वप्न फक्त स्वप्न नव्हते; कोणाला पटो अगर न पटो पण अनुताईंनी त्यांच्या येण्याचा हा संकेत मला दिला होता. त्यांनंतरच माझी आनंदाची बातमी आली. पण ते काहीही असो, अनुताई तुमच्या राहिलेल्या सर्व इच्छा मी या छोट्या अनुच्या रुपात नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, वचन देते मी तुम्हाला."

मनातल्या मनात सुजाता मात्र स्वतःला खूपच भाग्यवान समजत होती. आज असे मातृत्व लाभल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होते.

पुढे काही दिवसांतच बाळाच्या बारशाचा कार्यक्रम ठरविण्यात आला.
खूप दिवसांनी म्हणजे जवळपास आनंद आणि सुजाताच्या लग्नानंतर घरात असा मोठा कार्यक्रम होणार होता.

आनंद आणि सुजाताने एकमताने बाळाचे नाव ठरविले होते. सर्वांसाठी ते एक सरप्राइज असणार होते.

योगायोगाने बारशाचा कार्यक्रम अवनीच्या वाढदिवसाच्या दिवशीच करण्याचे योजिले होते. सर्व नातेवाईक आणि पाहुणे मंडळी बाळाला पाहण्यासाठी आणि बाळाचे नाव ऐकण्यासाठी उत्सुक झाले होते.

अखेर ती वेळ आलीच, अलगद पडदा बाजूला करण्यात आला नि नाव पाहून साऱ्यांच्या चेहऱ्यावर आपसूकच हास्य उमटले.

"अवनी"

नाव वाचून तर आनंदच्या आई बाबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. उपस्थित असणारे सर्वचजण अगदीच भावूक झाले. सर्वांसाठी हे अनपेक्षित होते.

आनंद आणि सुजाताने सर्वांना हे गोड असे सरप्राइज दिले होते. पुन्हा एकदा अवनी आनंदाने हसणार, खेळणार, बागडणार होती. पुन्हा नव्याने घराचे गोकुळ होणार होते.

छोटी अवनी आता तिच्या अवनी आत्याच्याच पावलावर पाऊल ठेवणार, याची सर्वांनाच खात्री होती. पुन्हा नव्याने अवनीसोबत आनंदाचे क्षण टिपण्यासाठी सर्वच जण सज्ज झाले.

आज खऱ्या अर्थाने अवनीला तिच्या दादा वहिनीकडून वाढदिवसाचे हे अनोखे गिफ्ट मिळाले होते. त्यामुळे तिच्या पश्चातही तिचे अस्तित्व आता कायम जपले जाणार होते.

खूप मोठ्या दुःखानंतर आज सर्वांच्याच चेहऱ्यावर सुखाचे आणि समाधानाचे हासू फुलले होते.

म्हणूनच म्हणावेसे वाटते...

"आयुष्य जगताना वाटेत आडवे आले कितीही दुःखाचे डोंगर,
तरी खचून कधी जायचे नसते..
अंधाऱ्या रात्रीच्या गर्भातच सोनेरी सकाळ ही दडलेली असते..
नशीबापेक्षा जास्त कोणाला कधीच काही मिळत नाही,
आणि नशीबापेक्षा कमी तो मुळीच काही देत नाही..
फक्त मनातील विश्वास तेव्हढा दांडगा हवा,
जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जायचेच असते,
फक्त प्रत्येकाची वेळ ही केव्हा येईल याचे गणित कोणालाच ठावूक नसते..
जेवढे मिळाले तेवढे आयुष्य मात्र आनंदाने जगायचे,
आणि इतरांच्या मनात हक्काचे स्थान तेवढे मिळवायचे..
इतरांच्या मनात हक्काचे स्थान तेवढे मिळवायचे.."

समाप्त

सदरची कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तवाशी तिचा काहीही संबंध नाही. फक्त मनोरंजनात्मक दृष्टिकोनातून वाचकांनी तिचा आनंद घ्यावा.
तसेच कथा आवडली तर कमेंट करून नक्की तुमचा अभिप्राय द्यावा.

धन्यवाद

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all