अकल्पीत

एका पावसाळ्यामधील अकल्पित दिवस.


(ही कहाणी एका सत्य घटनेवर आधारित आहे.फक्त स्थळ आणि नाव बदलली आहेत)

"तुमची काय बाई? मज्जाच मज्जा! शेवटी गव्हर्मेंट वाले तुम्ही."
पूजाने हसत हसत मेघाला टोमणा मारला.
" अगं असं काही नसतं काम ते काम असतं. आणि तसंही, माझ्या नवऱ्या पेक्षा तुझ्या नवऱ्यालाच पगार जास्तआहे की."
"हो ग पण आम्ही शेवटी खाजगी नोकरीवाले. तुमच्यासारख्या थोडी सुट्ट्या एन्जॉय करायला मिळतात."
"बरं जाऊ दे,चल निघते मी?"
निरोप घेऊन मेघा निघाली.मेघा कुलदैवताच्या दर्शनासाठी गावी निघाली होती.तिची मैत्रीण पूजाला निरोप सांगण्यासाठी ती पूजाच्या घरी गेली आणि नेहमीप्रमाणे पूजाने तिच्या नवऱ्याच्या सरकारी नोकरीवरून तिला दोन टोमणे मारलेच.कारण चारच दिवसांपूर्वी बहिणीच्या मुलीच्या वाढदिवसाला जाण्यासाठी पूजा ने तिच्या नवऱ्याकडे हट्ट केला होता.परंतु त्याला ऑफिस मधून सुट्टी न मिळाल्यामुळे पूजा एकटीच जाऊन आली होती.

खरंतर पूजा आणि मेघा एकदम घट्ट मैत्रिणी.एकमेकांशिवाय दोघींचे पान हालायचे नाही.परंतु मेघाच्या नवऱ्याची सरकारी नोकर,त्याच्या सुट्ट्या पूजाला उगाचच खटकायच्या.तसं पाहायला गेलं तर पूजाचा नवरा अजय एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर होता.स्वतःचा टू बीएचके फ्लॅट,चार चाकी गाडी आणि पगार ही उत्तम होता. त्यांच्याच सोसायटीमध्ये मेघाचा वन बीएचके फ्लॅट होता.मेघाचा नवरा सुरेश महावितरण कंपनीमध्ये वायरमन च्या पोस्टवर होता.तसं बघायला गेलं तर दोन्ही कुटुंब खाऊन पिऊन सुखी होती.

इंग्लिश मध्ये म्हणतात तसं वेल सेट.
परंतु पूजा नेहमी मेघाला तिच्या नवऱ्याच्या नोकरीवरून टोमणे मारायची. तिच्या मते नऊ ते साडेपाच ड्युटीला जाणाऱ्या सुरेश ला ऑफिस मध्ये काही काम नसत कारण ऑफिस जवळ राहत असल्याने सुरेश रोज जेवायला घरी यायचा. संध्याकाळी शक्यतो घरीच असायचा.शिवाय मुलांचे वाढदिवस असो किंवा काही कार्यक्रम सुरेश आवर्जून सुट्टी घ्यायचा.अपवाद, कधी कधी काही प्रॉब्लेम झाला तर त्याला रात्री अपरात्री सुद्धा ड्युटीवर जावे लागायचे .पण ते क्वचित घडायचे.
याउलट अजय रोज ऑफिस मधुन लेट यायचा. तर कधी ऑफिसची काम घरी घेऊन यायचा.सुट्टी मिळणं पण खूप मुश्कील असायचं.
अर्थात दोघांची क्षेत्र आणि काम वेगवेगळी होती.
मेघा मात्र बऱ्याचदा पूजाच्या अशा वागण्यामुळे नाराज व्हायची.
तिच्या नवऱ्याची धोक्याची काम तिला माहित होती. रखरख तो ऊन असो किंवा धो धो कोसळणारा पाऊस,लाईन फॉल्ट झाला की 22 kv लाईन वर 35 ते 38 फुट उंचावर काम कराव लागायचं.कमरेइतक्या पाण्यात मीटरबॉक्स काढत फिरावं लागायचं.काही दिवसापूर्वी तर,लाईट बिल जास्त आलं म्हणून कुठल्याशा नेत्याच्या कार्यकर्त्यांनी ऑफिसमध्ये येऊन गोंधळ घातला तेव्हा तर उगीचच मारहाण तोडफोड केलेली.किती घाबरली होती मेघा हे सगळं ऐकूनच.
दिवसा मागून दिवस जात होते.पावसाळा तोंडावर होता.एक दिवस रात्री बेफाम वादळ वारे वाहु लगले. विजांचा कडकडाट चालू झाला.धो धो पाऊस कोसळू लागला. सुरेशला त्याच्या ऑफिसमधून एमर्जेंसी साठी कॉल आला.आपला युनिफॉर्म चढवून सुरेश ऑफिसला निघून गेला. सकाळ झाली तरी सुरेश चा पत्ता नव्हता.रात्रीपासून विज ही गायब होती.मोबाईलला नेटवर्कपण मिळत नव्हतं. सगळीकडे पाणी भरल होत.
रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.मेघा मुलांना घेऊन घरातच बसली होती.खिडकीतून बाहेर कोसळणारा पाऊस बघून मनातल्या मनात देवाची करुणा भाकीत होती.तिच्या शेजारीच रमा राहायची.तिचा नवरा ही नवीनच महावितरण मध्ये विद्दुत सहय्यक म्हणून लागला होता.तोही सुरेश सारखाच अचानक कामावर निघून गेला होता.रमा मेघाकडे आली तशा दोघी जरा वेळ बोलत बसल्या.
त्या धो धो कोसळणाऱ्या पावसात दोघींना एकमेकींचा खूप आधार वाटला.
इकडे पावसामुळे अजय ऑफिसला गेला नव्हता.म्हणून पूजा खूप खुश होती.आज तिने अजयच्या आवडीची कांदा भजी बनवली होती.बाहेर पावसाकडे बघत दोघही चहा आणि भजी यांचा आस्वाद घेत होती.लाईट नसल्यामुळे टीव्ही बंद होता.मोबाईलला नेटवर्क नव्हते,म्हणून मग मुलांसोबत ते विविध खेळ खेळत होते.अजय सोबतच्या त्या क्षणांनी पूजा मोहरून गेली होती.अजय सुद्धा आज अगदी रोमँटिक मूडमध्ये होता.हा पाऊस थांबू नये असं मनापासून पुजाला वाटत होतं.

मेघा मात्र पाऊस थांबावा म्हणून देवाकडे अर्जव करत होती.काल रात्रीपासून सुरेशशी तिचा कसला संपर्क नव्हता.पाच वाजत आले होते.दिवस मावळतीकडे झुकला असेल.तसेही सकाळपासून सूर्य देवाने दर्शन दिलं नव्हतं.अचानक दोन मिनिटांसाठी लाईट आली आणि तितक्याच तत्परतेने गायब झाली.आता पावसाचं वातावरण थोडं निवळत आल होत.धो धो बरसणारा पाऊस रिमझिम करत होता.मोबाईलवर एखादी काडी नेटवर्क दाखवत होतं.तिने सुरेशला एक दोन वेळेस फोन ट्राय केला.परंतु तो स्विच ऑफ लागत होता.तेवढ्यात रमा घाबरी घुबरी होऊन पळत आली.तिचा श्वास फुलला होता.बोलताना धाप लागत होती.तिला काय बोलावं काहीच कळत नव्हतं.
तिची अवस्था बघून मेघाही घाबरली.तिने रमाला प्रश्न विचारायला सुरुवात केली "काय झालं ग रमा?का एवढी घाबरलीस?"
"मेघाताई सोसायटीचा वॉचमन कुणाशी तरी बोलत होता.कुणीतरी महावितरणचा कर्मचारी म्हणे खांब्यावरून शॉट लागून खाली पडला."कसंतरी अडखळत रमाने मेघाला सांगितलं.क्षणभर मेघाच्याही पायाखालची जमीन सरकली.तिने घाईघाईत जाऊन देव घरात दिवा लावला.दोघी देवासमोर उभ्या राहिल्या.दोघींच्याही मनात एकच आशा होती की,
\"पडलेला आपला नवरा नसावा.\"
तेवढ्यात मेघा चा फोन वाजला.मेघा घाईत फोन उचलायला पळाली.बघते तर सुरेशचा नंबर होता.तिने पटकन फोन उचलून कानाला लावला.समोरून जे काय ऐकलं त्याने ती काही क्षणासाठी एकदम स्तब्ध झाली. रमा तिला हलवून हलवून काय झालं म्हणून विचारत होती.परंतु तिला काही समजत नव्हते.रमाने तिच्या हातातला फोन घेऊन बोलायला सुरुवात केली.
आज सकाळी लाईन फॉल्ट काढत असताना करंट लागून सुरेश खांद्यावरून खाली पडला होता.करंटने त्याचं शरीरर होरपाळलं होतं.आणि उंचावरून पडल्यामुळे त्याच्या मेंदूला मार लागला होता.हॉस्पिटलमध्ये नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं.सुरेश चा मोबाईल स्विच ऑफ उघडून त्याच्या कलीगने मेघाला कॉल होता.म्हणजे सकाळी लाईन वरून पडलेला आपला नवरा नव्हता हे ऐकून रमाला बरं वाटलं. परंतु तो मेघाचा नवरा होता हे ऐकून खूप दुःख झालं.ती मेघाला सावरायला पुढे झाली.मेघा मात्र काहीही न बोलता एकदम शांत पुतळा बनली होती.लवकरच ही बातमी सर्वत्र पसरली.नातेवाईक आणि मित्र मंडळीं नी घरात गर्दी केली. सुरेश ची दोन्ही मुले केविलवाणी बघत होते.तेवढ्यात ॲम्बुलन्स आली. त्याच्यातून सुरेशची बॉडी काढण्यात आली.सुरेशच्या बहिणी, आई, मुले सुरेशच्या काळपट पडलेल्या देहाकडे बघून हंबरडा फोडत होते.मेघा मात्र निश्चल बसून होती.
पूजाच्या विंग मध्ये ही बातमी पोहचली.ती ऐकून पूजाला खूप मोठा धक्का बसला.मेघा साठी तिला खूप वाईटही वाटलं.ती घाई घाई मध्ये धावत पळत मेघाच्या घरी आली.सुरेशच्या पार्थिवासमोर मेघा बसून होती.पूजा समोर आली,मेघाने एक वार तिच्याकडे आणि एक वेळ समोर सुरेशच्या पार्थिवाकडे बघितलं आणि जोरात हंबरडा फोडला.
ते बघून पूजाच्या काळजाचं पाणी पाणी झालं.तिच्या डोळयातून अश्रू व्हायला लागले.
काय नव्हतं त्या आसवांमध्ये?
दुःख,पश्चाताप आणि बरच काही.........

कोणतच काम छोटं नव्हतं.दोघेही आपल्या परीने मेहनत करत होते.आपले कर्तव्य बजावत होते.जे झालं त्यामध्ये पूजाचा काहीच दोष नव्हता.परंतु कधीतरी मत्सरापोटी बोललेल्या शब्दामुळे आयुष्यभर ती मेघाच्या नजरेला नजर देऊ शकणार नव्हती.प्रत्येक वेळी पाऊस सुखावणारा आणि रोमँटिक असतो असं नाही.कधीकधी तो येतो घरादारात घुसून अनेकांचे संसार वाहून नेतो.बळीराजाच्या घामाचे मोती चिखल माती करून टाकतो.नाहीतर कधी असे अपघात घडवतो आणि कुणाचा तरी बाप कुणाचा मुलगा कुणाचा नवरा घेऊन जातो.

पण तरी सांगते, पाऊस हवाच असतो.