अकल्पित..!८

Tyachi aakruti purnta: dhusar hoistovar tyala nyhalatach ti unhi hoti.ratri matr swat: che ashru an bhavna yanna tine tichya kholit mukt vat karun dili hoti.


राज्य स्तरीय साहित्य करंडक
कथा मालिका
शीर्षक -अकल्पित...!८
विषय - रहस्य कथा

विजय शी बोलल्या नंतर आदिती च्या बाबांनी त्यांच्या  घराची व्यवस्था पाहणारे जे मावशी आणि काका होते त्यांना फोन करून सर्व सूचना दिल्या. आदिती तिथे एकटीच राहायला येणार आहे आणि सोबत तिचे इन्स्पेक्टर मित्र असणार आहेत याची कल्पना त्यांनी त्यांना दिली. ते अत्यंत विश्वासू असल्याने हे कुठेही बाहेर माहीत होणार नाही आणि सध्या वाड्याकडे कुणी येणार नाही याची दक्षता घ्यायची जिम्मेदारी सुद्धा त्यांनी त्यांच्यावर सोपवली होती.

"तुम्ही काही काळजी करू नका साहेब, मी सगळी काळजी घेईन ताईंची. मी आणि मंजुळा आहोतच इथे. शक्यतो वाड्यावर कुणी भटकणार नाही याची पण काळजी घेऊ." वाड्यावरचा  सदू बोलला.

त्याच्याशी बोलल्यावर अन् त्याला नीट समजावून सांगितल्यावर  त्यांना काळजी नव्हती. तो त्यांचा विश्वासू अन् कामसू गडी होता. दोघेही अगदी लेकिसारखी आदिती ची काळजी घेतील हा विश्वास सुद्धा होता.सगळी व्यवस्था नीट लागल्याची सूचना त्यांनी लगेच इन्स्पेक्टर विजय ला दिली होती. स्वतः च्या  गावातल्या आवडीच्या घरी जाऊन ही आदिती ला तिथे अगदी चोरासारखे राहावे लागणार याचे त्यांना खरं तर वाईट वाटत होते पण ती तिथपर्यंत पोचणे अन् सुरक्षित असणे त्यांच्यासाठी  आधी महत्वाचे होते. लेक आता त्यांच्याच दुसऱ्या घरी असूनही त्यांना तिला भेटता येणार नव्हते. कारण  त्यांच्यावर सुद्धा गुप्त पणे पाळत ठेवली जाण्याची शक्यता होतीच ना!!

रात्री माधव ला काही कामानिमित्त गावाला पाठवत आहोत असा देखावा केला गेला. माधव ला मात्र आता आदिती पुढे जाणार आणि तो इथेच असणार याची पूर्ण कल्पना दिली गेली. खरं तर या काही दिवसांतच दोघांमध्ये एवढे सुंदर भावबंध  तयार झाले होते की ते दोघांनाही सोडवत नव्हते. त्याचं आदितीची  मोठ्या बहिणीच्या नात्याने काळजी घेणं,सतत ताई ताई करत तिच्याभोवती रुंजी घालणं, तिचा प्रत्येक शब्द अगदी फुलासारखं झेलणं, सगळंच अगदी अद्भुत होतं आदिती साठी!! त्याला सुद्धा आदिती च्या रुपात एक प्रेमळ ,सुंदर अन् खंबीर ताई भेटली होती. जी त्याच्यावर अगदीच निरपेक्ष प्रेम करू लागली होती. एवढे दिवसात बाकीचे कोणी असोत की नसोत पण माधव मात्र शाळेव्यातिरिक्त इतर वेळी आदिती सोबतच असायचा. सुटीच्या दिवशी तर त्याचं बस्तान तिच्याजवळच असायचं. एवढं दोघांचं गुळपिठ जमलेलं असतांना आता एकमेकांना असं अचानक सोडून जाणं दोघांच्याही जीवावर आलं होतं. पुन्हा भेट होईल की नाही याची शाश्वती पण नव्हती. त्यामुळे दोघेही भावूक झाले होते.
पण ताई सुरक्षित हवी असेल तर आता तिला निरोप द्यावाच लागेल एवढेच त्याला कळत होते. त्यामुळे आता तिचा निरोप घेण्याची तयारी त्याच्या मनाने सुरू केली होती.

"काळजी घे स्वतः ची!"  असे दोघेही फक्त एकमेकांना बजावत होते.

आता आदितीला तिथून लवकरात लवकर हलवणे विजयला गरजेचे वाटू लागले. तिथून केव्हा बाहेर पडता येईल याचाच विचार सतत त्याच्या डोक्यात होता. पोलिस गाडीने तिला सोडणे सुद्धा रिस्की च होते.त्यामुळे गाडी अरेंज करा ,ती पण अतिशय गुप्त पद्धतीने. सोबत सोडायला जातांना सोबत असणारी माणसे सुद्धा अतिशय विश्वासू असणं गरजेचं होतं. त्याचं विचारचक्र सुरू च होतं....!

दुसरा दिवस उजाडला आणि आदितीची चौकशी करत दुपारी चैताली अँड ग्रुप तिथे पोचला होता. दुपारच्या वेळी बरेचसे पेशंट झोपेच्या स्वाधीन असतांना चैताली   प्रत्येक पेशंट ला बघत ती आदिती तर नाही आहे ना हे तपासून घेत होती. तिचे सोबती बाहेर चौकीदाराला आणि पोलिस शिपायाला निष्कारण गोष्टीत गुंतवून ठेवायचे काम पार पाडत होते. 

चैताली आदिती ,आदिती चा धोशा लावत चालली असतांना एका बाई ने स्पेशल रूम कडे बोट दाखवत तिथे आदिती असल्याचे सांगितले अन् चैताली चा मोर्चा त्या रूम कडे वळला. तिच्या सुदैवाने रूम बाहेर कुणीच नव्हते पहाऱ्यावरचा शिपाई नुकताच वॉश रूम मध्ये गेला होता. चैताली साठी ही गोष्ट अगदी पर्वणी ठरली होती. 

ती रूम मध्ये गेली तर आदिती  डोक्यावरून पांघरून झोपली आहे असे तिला आढळले. जवळ कुणी नाही हे बघून तिच्या जवळची बारीक सूरी तिने झोपलेल्या आदीतीच्या मानेचा अंदाज घेऊन एका बाजूने आत ऋतवली होती अन् क्षणातच तिथून  बाहेर पडली होती.
काम फत्ते झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता.अन् चोरटे इशारे साथीदारांना करत ती तिथून बाहेर पडली होती.पाठोपाठ तिचे साथीदारही तिथून बाहेर पडले होते.
आदितीचा काटा काढल्याच्या आनंदात त्यांनी थ्री चीयर्स केलं अन् ते तिथून पुढे गेले.


इन्स्पेक्टर विजय ने सुरक्षेसाठी लावलेल्या छुप्या कॅमेऱ्यात ही सगळी घटना कैद झाली होती. ड्युटी वरच्या शिपायाला तो परतत असतांना चैताली त्या रूम मधून बाहेर पडताना दिसली होती अन् अगदी क्षणातच पूर्ण ग्रुप गायब झाला होता.


त्या शिपायाने लगेच ते फुटेज इन्स्पेक्टर विजय ला पाठवले...

"बापरे! किती पोचलेली हस्ती आहे ही चैताली..! तो विचारच करत राहिला. आणि आता मात्र डोळ्यात तेल घालून या चौकडी चा पाठलाग करायच्या सूचना त्याने आपल्या संपूर्ण टीम ला दिल्या.

आदिती ला तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा त्याचा निर्णय किती योग्य होता याची प्रचिती च त्याला आज आली होती.जर खरंच डमी पुतळ्याच्या जागी आदिती च  असती तर विचार करून च त्याच्या अंगावर सरकन काटा आला. आता आदिती च्या सुरक्षेची काळजी घेणे खूप जरूरी झाले होते. 


आदितीला बोलावून  त्याने ते फुटेज तिला दाखवले अन् आदिती पार गारच झाली. आपण चैताली चं असं काय वाईट केलं की तिने हात धुवून आपल्या मागे लागावं हे तिला कळतच नव्हतं.


"बघ आदिती आता अगदी सावध आणि जपून राहायला हवं, अजिबात बेजबाबदार बनून चालणार नाही आता." आदिती ला सुद्धा त्याचं म्हणणं पूर्ण पटलं होतं.


काल अचानक रात्रीच्या रात्री च तिला तिथून हलवण्याचा त्याचा प्लॅन  किती योग्य होता हे तिला पण जाणवत च होतं. रात्रीचा अंधार अन् काचांना काळी फिल्म लावलेल्या गाडीतून तो स्वतः ड्राईव्ह करत तिला घेऊन आला होता. गाडी सुद्धा दुसऱ्याच गावात पार्क करून उभी केली त्याने अन् तिथून आदिती च्या सर्व सामानाचा भार वाहत अन् तिला सायकल वर डबल सीट बसवून तेवढ्या रात्री आणले  होते त्याने! उद्देश हाच की गाडी पाहून कुणालाही संशय यायचा अन् उगाच वांधा व्हायचा. येतांना त्याने आदिती साठी दोन तीन ड्रेस आणि खायचे काही जुजबी समान सुद्धा आणले होते. त्याचे ते तिच्यासाठी करणे बघून आदितीला तर कोणत्या शब्दात आपल्या भावना व्यक्त कराव्यात तेच कळत नव्हते.मित्र झाला म्हणून काय झालं ? इतकी काळजी अन् त्याचे जीवापाड जपणे  तिला सुरू होते की तो नसता तर तीचे काय झाले असते हा विचारच तिला करवत नव्हता.


काल जसा रात्रीच्या अंधारात तो आला होता तसाच रात्रीच्या अंधारात आज तिची सगळी व्यवस्था लावून तो वापस जाणार होता. जायच्या आधी सदू काका अन् मंजुळा मावशीला तो त्यांच्यावर किती मोठी जबाबदारी टाकली आहे याची जाणीव करून देऊन गेला होता.
काहीही गरज पडली तर त्याला फोन करायला सांगून त्याने तिघांचा निरोप घेतला .


त्याचा निरोप घेतांना आदिती चे डोळे पाण्याने अक्षरशः भरून आले होते. स्वत:च्या च घरी असूनही एक परके पणाचा भास तिला होत होता. आपला खूप भक्कम आधार कुणीतरी हिरावून नेत आहे अन् आपण फक्त थोडा प्रतिकार करत अन् रडत बसलो आहोत अशीच स्वप्न बघत रात्रीची झोपही तिने उगीचच वाया घालवली होती.


खरंच आपल्या मनात विजय बद्दल सुद्धा तशाच भावना तर निर्माण होत नाही आहेत ना ज्या जय बद्दल आपल्याला वाटतात. आपलं तर जय वर प्रेम आहे ना मग विजय च्या इथून जाण्याने सुद्धा आपण एवढ्या रित्या अन् दुःखी कां झालो हे तिचं तिलाच कळत नव्हतं. 


जातांना विजय नी उद्यापासून तो जय च्या शोध मोहिमेवर जाणार असल्याचे सांगितले होते. त्याचा शोध लागला की लगेच तिला कळवण्याचे आश्वासन देत तो तिथून निघाला. जातांना मात्र त्याने तिच्याकडे बघायचे टाळले होते. तिला स्वतः ची काळजी घ्यायला पुन:पून्हा  बजावून समोर बघतच त्याने चालायला सुरुवात केली होती. 

त्याची आकृती पूर्णत: धूसर होईस्तोवर त्याला न्याहाळत च ती उभी होती. रात्री मात्र स्वतः चे अश्रू अन् भावना यांना तिने तिच्या खोलीत मुक्त वाट करून दिली होती.


काय होईल पुढे?  इन्स्पेक्टर विजय ला जय शिर्के सापडेल का? आदिती कोणाची निवड करेल जय ची विजय ची या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर वाचा कथेचा पुढचा भाग.

टीम - भंडारा

©® मुक्ता बोरकर - आगाशे
       मुक्तमैफल

🎭 Series Post

View all