अकल्पित..!७

Kahi kelya Vijay la Kahi suchena.aaditi chi jujabi chaukashi Karin to punha vicharnar gadhala.tyala tasech vicharnar baghun àditine shevti vicharlech...

राज्य स्तरीय करंडक कथा मालिका -  
शीर्षक -अकल्पित...! ७
विषय - रहस्य कथा


        दुसऱ्या  दिवसा पासून जय ची शोध मोहीम जोरात सुरू झाली. सर्वच अपेक्षित ठिकाणी विविध पथकं शोध घेऊ लागली.


इकडे दोन तीन दिवस विजय चौकशी साठी न आल्याने आदिती चा सुद्धा जीव टांगणीला लागलेला. सगळीच मंडळी तिची आपुलकी ने काळजी घेत असली तरी विजय चं आणि तिचं असलेलं जुनं मैत्र तिला आता खूपच आपलेपणाचं वाटू लागलं होतं.जेव्हा आपण एखाद्या अनोळखी किंवा नव्या दुनियेत वावरत असतो ना तेव्हा ओळखीचा एखादा छोटा धागा सुद्धा खूप आपलासा वाटायला लागतो तसं तिचं झालेलं.

जय एक चांगला मित्र अन् आता दुसरा हा विजय  जुना पण जवळचा मित्र..! काळाच्याच ओघात दूर गेलेला अन् त्याचं ओघात पुन्हा जवळ आलेला.सध्या आदिती ची अवस्था अशी होती की तिला विजय च्या मदतीचा भक्कम आधार होता. तिला तिच्या जुन्या विश्वाशी जोडू शकणारा  तीच्यालेखी तोच तर एक दुवा होता. त्याचं तिथे असणं तिला तिच्या सुरक्षिततेची  अन् पुन्हा तिच्या विश्वात तिला परतता येईल याची हमी वाटायची.
त्यामुळे दोन , तीन दिवस त्याचं न दिसणं तिला अस्वस्थ करणारं होतं.


त्याच विचारात ती गढली असतांना माधव लगबगीने तिकडे आला." ताई, आताच मला इन्स्पेक्टर साहेब येताना दिसले. ते डॉक्टर साहेबांच्या केबिन मध्ये गेले आहेत मग येतीलच की इकडे. " अतिशय आनंदाने तो सांगू लागला. 

हे साहेब आपल्या ताईचे मित्र आहेत. ते आले की ताई आनंदी असते नाहीतर सतत कसल्या तरी विचारात गढलेली असते हे त्याला जाणवले होते. त्याला थोड्याच दिवसात आदिती खूप आवडू लागली होती. तिच्या प्रेमळ अन शांत स्वभावाने तिने सगळ्यांना आपलेसे केले होते. 
एवढ्या बिकट परिस्थिती मध्ये सुद्धा  तिचे मनाने  ठाम असणे ,आपल्या मुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे हा सारा विचार ती करायची. शहरात राहणारी ती पण या साध्या गावातील लोकांनाही तिने लवकरच आपले मानले होते. सगळ्यांना अगदी ताई ,माई ,दादा, आप्पा सारखी संबोधनं लावल्याशिवाय ती बोलत नसे. बोलतांना तिच्या बोलण्यात असलेली अदब सगळ्यांना आपलेसे करून गेली होती. माणुसकीच्या नात्याने सगळ्यांनी तिची मदत केली होती अन् तिने तिच्या स्वभावाने ती सार्थ ठरवली होती.


"इन्स्पेक्टर साहेब, काल चार पाच मुलांचे टोळके गडाच्या पायथ्याला काहीतरी शोधतांना मला दिसले. मी "काय करताय पोरांनो ?" म्हणून विचारलं तर त्यांनी "सहज फिरतोय ..!"म्हणून सांगितलं. मग मीही आपली गुरे राखू लागलो. पुन्हा ती मंडळी स्वतः च माझ्या कडे आली आणि या भागात कुणी मुलगा किंवा मुलगी पडलेली दिसली का? या काही दिवसात किंवा जवळपास असं काही ऐकण्यात आलं का? म्हणून विचारायला लागली.
तुम्ही मागे थोडी कल्पना दिली होती ना साहेब आम्हाला कुणाला काहीच सांगायचं नाही म्हणून  मी सरळ त्यांना नाही म्हणून सांगितलं.  एक जण तिकडे येणाऱ्या विजय ला सांगत होता.


त्याचं बोलणं ऐकलं आणि विजय च्या चेहऱ्यावर चिंतित भाव उमटले. त्याला तिथेच थांबवून तो आदिती कडे आला. 


"आदिती तुझ्याकडे चैताली च्या ग्रुप चे फोटो आहेत का?"विजय


"हो ,ट्रेकिंग च्या दिवशी सकाळी अगदी सुरुवात करायच्या आधी काढलेले काही फोटो आहेत त्यात ते असतील." आदिती.


विजय नी खिशातून तिचा मोबाईल काढून तिच्या सुपूर्द केला.गॅलरी ओपन करून आदिती ने फोटोज् पाहिले.दोन तीन फोटोंमध्ये चैताली आणि ग्रुप व्यवस्थित कॅप्चर झाला होता.तो फोटो विजय नी त्या माणसा समोर धरला अन् यातलं कुणी त्यात होतं का हे विचारलं.


"ह्या मॅडम आणि त्यांच्या बाजूला उभी असलेली मुलं हीच तर होती त्यादिवशी..!" त्या फोटो ला बघत त्याने सांगितले. 

आदिती नी सुद्धा तोच चैताली आणि ग्रुप असल्याचा दुजोरा भरला  अन् आता मात्र विजय चा चेहरा वेगळ्याच चिंतेने ग्रासला.त्या माणसाने जरी ' नाही ' म्हणून सांगितले असेल पण गावातली एखादी व्यक्ती सत्य सांगण्याची अन् आदिती नजीकच्या  शहरातल्या या दवाखान्यात असल्याचे सांगण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे आता आदितीला,तिच्या जीवाला पुन्हा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आता च डॉक्टरांशी भेटून त्याने तिच्या तब्येतीची चौकशी केली होती . अन् तिची प्रकृती स्थिर असल्याचे ऐकून त्याला झालेला आनंद आता क्षणात मावळला होता.


आदितीला दुसरीकडे कुठेतरी हलवण्याची गरज होती.


" कुठे ठेवायचे आदितीला आता?" हा खूपच मोठा प्रश्न होता त्याच्यासमोर! दवाखान्यात कुणीही कधीही येऊ शकते त्यामुळे तो सेफ नव्हताच. माधव च्या गावात ठेवायचं म्हटलं तर एवढ्या छोट्या गावात गुप्तता पाळली जाणे अगदी अवघडच!!! गावात साधं कुणी शिंकलं तर साऱ्या गावाला पत्ता  लागेल अशी अवस्था.


काही केल्या विजय ला काही सुचेना. आदिती ची जुजबी चौकशी करून तो पुन्हा विचारात गढला. त्याला तसे विचारात बघून आदिती ने शेवटी विचारलेच..
"कशाचा एवढा विचार करतोस विजय,काही टेन्शन आहे का?"

"तुझ्याच सुरक्षेचा विचार करतोय आदिती. चैताली चा ग्रुप तुझा आणि जय चा माग घेत आता डोंगर पायथ्याशी पोचले आहेत. माधव च्या गावचा माणूस मला तेच सांगत होता आता. तुला मी आता त्यांच्या ग्रुप चे फोटो त्यासाठी च मागितले होते अन् त्या माणसाने त्यांना ओळखले सुद्धा. त्याने बिचाऱ्याने माझ्या सूचनेचा आदर करत त्यांना नाही म्हणून सांगितले अन् मला सावध सुद्धा केले पण प्रत्येकच जण ही काळजी घेईल च हे सांगता येत नाही. त्यामुळे तुझा मुक्काम इथून आता हलवावा लागेल. तुझी तब्येत सुद्धा आता बरी आहे त्यामुळे डॉक्टर सुद्धा आता यासाठी परवानगी देतील. पण तुला ठेवायचे कुठे ? हा मात्र माझ्यासमोर अगदी यक्षप्रश्न आहे." विजय सांगून मोकळा झाला.


आता मात्र आदिती ची धाकधूक वाढली होती. पण तिच्या करारी आणि  धीरगंभीर स्वभावा नुसार त्याही परिस्थितीत ती डोके शांत ठेवून विचार करायला लागली होती. काही वेळ शांत डोक्याने विचार केला अन् मग आनंदाची लकेर तिच्या चेहऱ्यावर उमटली.


"विजय, गावात आमचं घर आहे. तिथे फक्त आमच्या घराची देखभाल करणारे काका आणि मावशी असतात. वरून हे घर सुद्धा तसं गावापासून लांबच आहे त्यामुळे कुणाचं फारसं येणं , जाणं नसते तिथे. तू बाबांना फोन लावून बघ मी बोलते त्यांच्याशी." आदिती


विजय नी लगेच आदिती च्या बाबांना कॉल केला. विजय चा कॉल दिसताच त्यांनीही पटकन च तो रिसिव्ह केला.
"हॅलो काका,मी विजय बोलतोय. थोडा प्रॉब्लेम झाला आहे. आदिती च्या सुरक्षेसाठी मला तिला कदाचित दुसरीकडे हलवावे लागेल. कुठे ठेवायचं तिला हा माझ्यासमोर मोठा प्रश्नच होता. तीनीच उत्तर शोधलय त्याचं. तुम्ही तिच्याशीच बोलून घ्या." म्हणत त्याने फोन आदितीला दिला.


आदिती अन् तिच्या बाबांचं बोलणं म्हणजे  एक सुखसंवाद होता त्याच्यासाठी. एकमेकांसाठी चे प्रेम,काळजी, त्यांचा एकमेकांसाठी तुटणारा जीव अन् हे सगळं असूनही एकमेकांना दिलासा देणारं बोलणं ,माझी काळजी करू नको म्हणून दोन्हीकडून सांगणं. ना रडणं ,ना भेकणं,ना कुठला आकांडतांडव! आहे त्या परिस्थितीला स्वीकारत त्यातून मार्ग काढायची त्यांची धडपड...! मनोमन त्याने त्यांना सलाम केला.


आदिती ने बाबांशी नीट बोलून पुढची सारी व्यवस्था लावून घेतली. 


माधव ला आदितीच्या सोबत पाठवायचे की नाही  यावर विचार विनिमय सुरू झाला. माधव जर आदिती सोबत गेला तर त्याच्या गावात तो कुठे गेला ?कां गेला? मग आदिती ला कुठे ठेवले ? याबद्दल उगीचच चर्चा सुरू होतील असा विचार करून अन् बऱ्याच दिवसांपासून गावातील लोकांनी पेललेल्या तिच्या जबाबदारी तून  त्यांना सुद्धा निदान थोडासा दिलासा मिळेल असे  साऱ्यांना वाटले. परत आदिती ला जिथे हलवले जाणार होते ते ठिकाण आणि तिथली लोकं तिच्या चांगल्याच परिचयाची होती अन् गुप्तता बाळगायची असेल तर जेवढे लोकं कमी तेव्हढेच बरे हे तत्त्व अंगिकारून  आदितीला एकटीलाच तिथे नेऊन सोडायचं यावर शिक्का मोर्तब झालं.


पुढे काय झालं आदितीचं? चैताली चा ग्रुप तिच्यापर्यंत पोचला की ती सुरक्षित जागी पोचली हे जाणून घेण्यासाठी वाचा कथेचा पुढचा भाग.

टीम - भंडारा
©® मुक्ता बोरकर - आगाशे
        मुक्तमैफल


 

🎭 Series Post

View all